तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार?
तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार?
“प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.”—इब्री लोकांस ३:४.
हे शब्द लिहिणाऱ्या बायबलच्या एका लेखकाचा तर्कवाद तुम्हाला पटतो का? या लेखकाने हे विधान लिहिले तेव्हापासून जवळजवळ २००० वर्षांचा काळ उलटला आहे. आणि या काळादरम्यान विज्ञानाच्या क्षेत्रात मनुष्याने बरीच प्रगती केली आहे. पण निसर्गात दिसणाऱ्या कल्पक रचनेकरता कोणी न कोणी रचनाकार जबाबदार आहे असे मानणारे लोक आजही आहेत का? हा रचनाकार, सृष्टिकर्ता अर्थात देव खरोखरच अस्तित्वात आहे असे आजही कोणी मानते का?
हो, औद्योगिकरित्या प्रगत देशांतही असे बरेच लोक आहेत. उदाहरणार्थ, न्यूजवीक मासिकाने २००५ साली अमेरिकेत घेतलेल्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले की, “देवानेच विश्वाची सृष्टी केली आहे” असे ८० टक्के लोक मानतात. या लोकांचे पुरेसे शिक्षण झालेले नसल्यामुळे ते असे मानतात का? ज्यांचे भरपूर शिक्षण झाले आहे त्यांच्याविषयी काय? उदाहरणार्थ, वैज्ञानिकांपैकी कोणाचा देवावर विश्वास आहे का? नेचर या विज्ञानावर आधारित असणाऱ्या मासिकात १९९७ साली एक वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. जीवविज्ञान, भौतिकशास्त्र आणि गणिताच्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींवर घेण्यात आलेल्या एका अभ्यासासंबंधी हे वृत्त होते. या अभ्यासातून असे निष्पन्न झाले की त्या सर्व तज्ज्ञांपैकी जवळजवळ ४० टक्के तज्ज्ञ असे मानतात की देव अस्तित्वात आहे. इतकेच नव्हे, तर तो आपल्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांचे उत्तर देतो असेही ते मानतात.
पण इतर वैज्ञानिक मात्र या मताचा कडाडून विरोध करतात. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. हर्बर्ट ए. हॉप्टमन यांनी अलीकडेच वैज्ञानिकांच्या एका परिषदेला उद्देशून बोलताना म्हटले की अलौकिक गोष्टींवर, विशेषतः देवावर विश्वास ठेवणे हे उत्तम विज्ञानाशी सुसंगत नाही. त्यांनी म्हटले, “अशाप्रकारचा विश्वास मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने हितावह नाही.” देवाला मानणारे वैज्ञानिक देखील सृष्टीतील कल्पक रचनेकरता एक रचनाकार जबाबदार आहे असे शिकवण्यास थोडे मागेपुढेच पाहतात. का बरे? याचे एक कारण सांगताना, स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटमध्ये पुराजीवशास्त्राचे तज्ज्ञ असणारे डग्लस एच. अर्विन म्हणतात: “विज्ञानाचा एक नियम आहे. यात चमत्कारांना परवानगी नाही.”
एखादी गोष्ट मानण्यास परवानगी आहे किंवा नाही हे तुम्ही इतरांना तुमच्याकरता ठरवू द्याल का? तुम्ही असे करू शकता. किंवा, उपलब्ध पुराव्यांचे परीक्षण करून तुम्ही स्वतः निष्कर्ष काढू शकता. पुढच्या लेखांत विज्ञानाच्या अलीकडील काही शोधांविषयी वाचताना स्वतःला हा प्रश्न विचारा: ‘सृष्टिकर्ता आहे असा निष्कर्ष काढणे तर्काला धरून आहे का?’ (g ९/०६)
[३ पानांवरील संक्षिप्त आशय]
पुराव्यांचे स्वतःहून परीक्षण करा
[३ पानांवरील चौकट]
यहोवाचे साक्षीदार सृष्टिवादी आहेत का?
यहोवाचे साक्षीदार उत्पत्तिच्या पुस्तकात निर्मितीचा जो वृत्तांत दिला आहे त्यावर विश्वास ठेवतात. पण ज्यांना सृष्टिवादी म्हटले जाते त्यांच्यापैकी ते नाहीत. का? पहिली गोष्ट म्हणजे, सृष्टिवादावर (क्रिएशनिझम) विश्वास असलेले बरेचजण असे मानतात की हे विश्व, पृथ्वी आणि यावरील सर्व सजीव सृष्टी सुमारे १०,००० वर्षांपूर्वी, २४ तासांच्या अवधीच्या ६ दिवसांदरम्यान निर्माण करण्यात आली. पण बायबल असे शिकवत नाही. * तसेच, सृष्टीवाद्यांनी बायबल ज्यांना पुष्टी देत नाही असे अनेक सिद्धान्त स्वीकारले आहेत. पण यहोवाचे साक्षीदार, केवळ बायबलचा आधार असलेले धार्मिक विश्वास स्वीकारतात.
शिवाय काही देशांत, सृष्टीवादी ही संज्ञा मूलतत्त्ववादी गटांच्या संदर्भात वापरली जाते. हे गट राजकारणातही सक्रिय आहेत. आपल्या धार्मिक आचारविचारांना बढावा देण्याकरता ते राजकीय नेत्यांवर, न्यायाधीशांवर व शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर विशिष्ट कायदे व शिकवणुकी स्वीकारण्याचा दबाव आणतात.
यहोवाचे साक्षीदार राजकारणात कधीही सहभाग घेत नाहीत. सरकारला कायदे बनवून त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे हे ते कबूल करतात व त्यांच्या या अधिकाराला मान देतात. (रोमकर १३:१-७) पण ‘तुम्ही या जगाचे नाही’ या येशूने केलेल्या विधानाचे मात्र ते गांभिर्याने पालन करतात. (योहान १७:१४-१६) त्यांच्या सार्वजनिक सेवाकार्यात, ते देवाच्या आदर्शांनुसार जगल्याने किती फायदे मिळतात याविषयी जाणून घेण्याची लोकांना संधी देतात. पण इतरांना बायबलमधील आदर्श स्वीकारण्यास जबरदस्ती करण्यासाठी कायदे बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मूलतत्त्ववादी गटांना ते पाठिंबा देत नाहीत. कारण अशा गटांना पाठिंबा देऊन ते आपली ख्रिस्ती तटस्थता भंग करू इच्छित नाहीत.—योहान १८:३६.
[तळटीप]
^ परि. 11 या अंकातील पृष्ठ १८ वरील “बायबलचा दृष्टिकोन: विज्ञान आणि उत्पत्तीचा अहवाल यांत विसंगती आहे का?” हे शीर्षक असलेला लेख पाहावा.