व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्माणकर्ता आहे असे आम्ही का मानतो?

निर्माणकर्ता आहे असे आम्ही का मानतो?

निर्माणकर्ता आहे असे आम्ही का मानतो?

अनेक वैज्ञानिक क्षेत्रातील बरेच तज्ज्ञ, निसर्गातील बुद्धिमान रचना पाहून थक्क होतात. पृथ्वीवरील क्लिष्ट जीवसृष्टी आपोआप झाली, यावर विश्‍वास ठेवणे त्यांच्या तर्काला पटत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींना बनवणारा एक निर्माणकर्ता आहे असे अनेक शास्त्रज्ञ व संशोधक मानतात.

यांपैकी काही जण यहोवाचे साक्षीदार बनले आहेत. बायबलमध्ये ज्याच्याविषयी सांगितले आहे तो देवच या भौतिक विश्‍वाचा रचनाकार व घडविणारा आहे, ही खात्री त्यांना पटली आहे. ते या निष्कर्षास का पोहंचले? या संदर्भात सावध राहाने! काहींची मुलाखत घेतली. तुम्हाला त्यांचे वेधक अभिप्राय वाचायला आवडतील. *

“जीवसृष्टीची अनाकलनीय क्लिष्टता”

वोल्फ-एकहार्ट लॉएनिग

पार्श्‍वभूमी: गेल्या २८ वर्षांपासून मी वनस्पतींच्या आनुवंशिकी उत्परिवर्तनांच्या संदर्भात असलेले वैज्ञानिक काम करत आहे. यांपैकी २१ वर्षांपासून मी, जर्मनीतील कोलोन येथील मॅक्स-प्लँक-इन्स्टिटूट फॉर प्लान्ट ब्रिडींग रिसर्च येथे काम करत आहे. आणि जवळजवळ तीस वर्षांपासून मी यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती मंडळीत वडील या नात्याने देखील सेवा करत आहे.

आनुवंशिकताविज्ञानाच्या विषयावरील माझ्या प्रायोगिक संशोधनामुळे, तसेच जीवविज्ञान विषय जसे की शरीरविज्ञान व आकारविज्ञान, यांच्यावरील माझ्या अभ्यासामुळे मला जीवसृष्टीची प्रचंड व बहुतेकदा अनाकलनीय क्लिष्टता वारंवार प्रत्ययास येते. या विषयांवरील माझ्या अभ्यासांमुळे माझी ही खात्री पटली आहे, की जीवसृष्टी मग ती लहानतली लहान असली तरी, कोणा बुद्धिमान व्यक्‍तीने निर्माण केली आहे.

जीवसृष्टी जटील आहे, याची जाणीव विज्ञान क्षेत्रातील सर्वांना आहे. पण, या मनोरंजक वस्तुस्थिती सहसा, उत्क्रांतीला पाठबळ देणाऱ्‍या संदर्भात सादर केल्या जातात. परंतु माझ्या मते, बायबलमधील सृष्टीविषयीच्या अहवालाचे खंडन करण्यासाठी वापरले जाणारे पुरावेसुद्धा, वैज्ञानिक तपासणींत कोलमडून पडतात. अनेक वर्षांपासून मी अशा तथाकथित पुराव्यांचे परीक्षण करून पाहिले आहे. जीवसृष्टीचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर व विश्‍वाला चालवणाऱ्‍या नियमांच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर पुष्कळ विचार केल्यानंतर मला दिसून आले, की पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात राहावी म्हणून सर्वकाही कसे अगदी तंतोतंत जुळले आहे. हे सर्व पाहिल्यावर या सर्व गोष्टींमागे निर्माणकर्ता आहे, हे मला मानावंच लागलं.

“मी जे काही पाहतो त्याला एक कारण आहे”

बायरन लिओन मेडोज

पार्श्‍वभूमी: मी संयुक्‍त संस्थानांत राहतो आणि नॅशनल एरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन येथे लेसर फिजिक्स शाखेत काम करतो. सध्या मी, विश्‍वव्यापी हवामान, वातावरण आणि इतर ग्रहांच्या कार्यांवरील देखरेखीत सुधारणा करण्यासाठी असलेल्या तंत्रज्ञानात विकास करण्याच्या कामात सहभागी आहे. व्हर्जिनिया येथील किलमारनक भागातील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत मी वडील या नात्याने सेवा करीत आहे.

संशोधन करताना मला बहुतेकदा भौतिकशास्त्राच्या तत्त्वांवर काम करावे लागते. विशिष्ट गोष्टी कशा व का घडतात, हे समजण्याचा मी प्रयत्न करत असतो. या विश्‍वात जे काही घडते त्या प्रत्येक गोष्टीमागे एक कारण आहे, याचा स्पष्ट पुरावा मला माझ्या अभ्यासावरून दिसून येतो. निसर्गातील सर्व गोष्टींचे मूळ कारण देव आहे असे आपण वैज्ञानिकरीत्या तर्कशुद्धपणे स्वीकारू शकतो, असे मला वाटते. निसर्गातील नियम इतके स्थिर आहेत, की हे नियम कोणा संयोजकाने अर्थात निर्माणकर्त्याने घालून दिले आहेत, असा मला विश्‍वास करावाच लागतो.

हा निष्कर्ष इतका स्पष्ट असतानाही पुष्कळ वैज्ञानिक उत्क्रांतीवाद का मानतात? कदाचित हे उत्क्रांतीवादी मनात काही पूर्वधारणा बाळगूनच पुराव्यांकडे पाहात असावेत का? वैज्ञानिकांमध्ये ही काही नवीन गोष्ट नाही. पण, कोणत्याही नैसर्गिक गोष्टीचे निरीक्षण करताना, आपण तिच्याविषयी काढलेला निष्कर्ष, मग तो कितीही खात्रीलायक वाटत असला तरी, अचूक निघेलच याची शाश्‍वती नसते. उदाहरणार्थ, लेसर फिजिक्सवर संशोधन करणारी व्यक्‍ती असे ठामपणे म्हणू शकते, की प्रकाश ध्वनि-लहरींप्रमाणे एक लहर आहे कारण सहसा प्रकाश लहरींप्रमाणे कार्य करतो. परंतु, या व्यक्‍तीचा निष्कर्ष अपुरा असू शकतो कारण, पुरावा हेही सूचित करतो, की प्रकाश फोटोन्स नामक कणांच्या गटाच्या रूपात असतो. तसेच, उत्क्रांतीवाद एक वस्तुस्थिती आहे असा आग्रह धरून चालणारे वैज्ञानिक, पुराव्यांची केवळ एकच बाजू पाहून असा निष्कर्ष काढतात. शिवाय, पुराव्यांकडे पाहतानाही ते मनात विशिष्ट पूर्वधारणा बाळगूनच पाहात असतात व त्याच आधारावर निष्कर्षही काढतात.

लोक उत्क्रांतीवादाला एक वस्तुस्थिती म्हणून कसे काय स्वीकारू शकतात, याचेच मला खूप आश्‍चर्य वाटते; कारण, उत्क्रांतीवादी ‘तज्ज्ञांचेच’ आपापसांत अजून, उत्क्रांती कशी झाली असावी यावर वाद चालले आहेत. उदाहरणार्थ, काही २ अधिक २ म्हणजे चार असे तज्ज्ञ म्हणत असतील, आणि जर इतर तज्ज्ञ या गणिताचे उत्तर ३ किंवा ६ असे म्हणत असतील तर तुम्ही, गणिताला एक सिद्ध केलेली वस्तुस्थिती म्हणून मान्य कराल का? जर विज्ञानाने, जे सिद्ध करता येते, परीक्षण करता येते व पुनःनिर्माण करता येते, हेच स्वीकारले तर मग, सर्व जीवसृष्टी एकाच पूर्वजाकडून उत्क्रांतीद्वारे अस्तित्वात आली हा सिद्धान्त वैज्ञानिक वस्तुस्थिती होऊ शकत नाही. (९/०६)

“शून्यातून काहीही निघू शकत नाही”

केनेथ लॉईड तनाका

पार्श्‍वभूमी: मी एक भूवैज्ञानिक आहे आणि सध्या ॲरिझोनाच्या फ्लॅगस्टाफ शहरातील यु.एस. जिऑलजिकल सर्व्हे येथे काम करत आहे. जवळजवळ तीस वर्षांपासून मी, भूविज्ञानाच्या विविध क्षेत्रांत आणि ग्रहांच्या भूशास्त्रीय विशेषांच्या संशोधनात भाग घेतला आहे. मान्यताप्राप्त वैज्ञानिक मासिकांत मी केलेल्या संशोधनावर आधारित लेख आणि मंगळाचे भूशास्त्रीय नकाशे छापण्यात आले आहेत. यहोवाचा साक्षीदार या नात्याने मी, लोकांना बायबलचे वाचन करण्याचे उत्तेजन देण्याकरता दर महिन्याला सुमारे ७० तास खर्च करतो.

मला लहानपणापासून उत्क्रांतीवादाची शिकवण देण्यात आली होती. परंतु, हे विश्‍व तयार होण्यासाठी लागलेली अफाट शक्‍ती, कोणाही शक्‍तिशाली निर्माणकर्त्याविना अस्तित्वात आली, ही गोष्ट माझ्या बुद्धीला पटत नव्हती. शून्यातून काहीही निघू शकत नाही. मला बायबलमध्येही एक जबरदस्त मुद्दा सापडतो जो निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाचा पुरावा देतो. माझ्या क्षेत्रातील वैज्ञानिक पुराव्यांची बरीच उदाहरणे या पुस्तकात दिली आहेत; जसे की, पृथ्वीचा आकार गोल आहे व ती “निराधार” टांगलेली आहे. (ईयोब २६:७; यशया ४०:२२) हे पुरावे किंवा या वस्तुस्थिती, मानवाने शोध करून शाबीत करण्याआधी कित्येक वर्षांआधी बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आल्या होत्या.

आपल्या शरीराच्या रचनेचा विचार करा. आपल्याजवळ संवेदनांची व आत्म-जाणिवेची क्षमता आहे, बुद्धिमत्तेने विचार करण्याची, संभाषण करण्याची कुवत आहे तसेच आपल्याला भावना देखील आहेत. विशेषतः आपण प्रेम अनुभवू शकतो, समजू शकतो आणि व्यक्‍त करू शकतो. हे अद्‌भुत मानवी गुण आपल्यात कसे आले त्याचे स्पष्टीकरण उत्क्रांतीवादाला देता येत नाही.

स्वतःला विचारा, ‘उत्क्रांतीवाद शाबीत करण्यासाठी वापरली जाणारी माहिती कितपत विश्‍वसनीय व खरी आहे?’ भूवैज्ञानिक अहवाल, अपुरा, जटील व गोंधळून टाकणारा आहे. उत्क्रांतीवादी, प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग करून उत्क्रांती प्रक्रिया खात्रीलायकपणे सिद्ध करू शकलेले नाहीत. शिवाय, वैज्ञानिक सहसा माहिती मिळवण्यासाठी उत्तम संशोधन तंत्रांचा उपयोग करत असले तरी, या संशोधनातून विशिष्ट निष्कर्ष काढताना बहुतेकदा त्यांचे स्वार्थी हेतू असतात. माहिती जेव्हा अनिर्णायक किंवा विरोधाभासात्मक असते तेव्हा ते स्वतःची मते सांगतात, याची कित्येक उदाहरणे आहेत. त्यांना त्यांच्या करियरची व स्वाभिमानाची जास्त चिंता लागलेली असते.

एक वैज्ञानिक व बायबल विद्यार्थी यानात्याने मी, सर्व उपलब्ध असलेल्या वस्तुस्थितींशी व शोधांशी सुसंगत असलेले पूर्ण सत्य शोधतो, जेणेकरून मला सर्वात अचूक समज प्राप्त होऊ शकेल. आणि मला निर्माणकर्त्याबद्दलची शिकवण सर्वात तर्कशुद्ध वाटते.

“कोशिकांत स्पष्ट दिसणारी रचना”

पॉला किंचेलो

पार्श्‍वभूमी: कोशिका, अणूशास्त्र व सूक्ष्मजीवजंतूशास्त्रात संशोधक म्हणून माझ्याजवळ अनेक वर्षांचा अनुभव आहे. मी सध्या अमेरिकेतील जॉर्जिया येथील ॲटलांटामध्ये एमरी युनिव्हर्सिटीत काम करते. याशिवाय मी रशियन भाषिक समाजात स्वयंसेवी बायबल शिक्षिका म्हणूनही काम करते.

जीवशास्त्राचा अभ्यास करत असताना मला, चार वर्षे फक्‍त कोशिका आणि तिच्या घटकांचा अभ्यास करावा लागला होता. डीएनए, आरएनए, प्रथिने आणि चयापचय, यांच्याविषयी शिकत असताना मी त्यांतील जटीलता, सुव्यवस्था आणि अचूकपणा पाहून चाट पडले. मानव, कोशिकांबद्दलची किती माहिती शिकला आहे, या गोष्टीने तर मी प्रभावीत झालेच, परंतु, त्याला आणखी कितीतरी गोष्टी शिकायच्या आहेत, याचेही मला आश्‍चर्य वाटले. कोशिकांत स्पष्ट दिसणारी कल्पक रचना, मी देवावर विश्‍वास का ठेवू लागले त्याचे एक कारण आहे.

हा निर्माणकर्ता कोण आहे, आणि विशेषकरून त्याचे नाव यहोवा आहे, हे मला बायबलचा अभ्यास केल्यानंतर समजले. माझी ही खात्री पटली आहे, की तो केवळ एक बुद्धिमान रचनाकारच नव्हे तर एक कृपाळू व प्रेमळ पिता आहे जो माझी काळजी घेतो. बायबल, जीवनाचा उद्देश काय आहे ते सांगते आणि सुखी भविष्याची आशा देखील देते.

ज्या लहान मुलांना शाळेत उत्क्रांतीवाद शिकवला जातो त्यांना कशावर विश्‍वास ठेवायचा हे समजत नसेल. त्यांच्यापैकी काहीजण गोंधळून जात असतील. जर त्यांचा स्वतःचा देवावर विश्‍वास असेल, तर ही जणू काय त्यांच्या विश्‍वासाची एक परीक्षा असते. पण, ते आपल्याभोवती निसर्गात असलेल्या अनेक अद्‌भुत गोष्टींचे परीक्षण करण्याद्वारे व निर्माणकर्त्याविषयी व त्याच्या गुणांविषयी ज्ञान घेत राहून या परीक्षेवर मात करू शकतात. मी स्वतः असे केले आहे व या निष्कर्षास आले आहे, की बायबलमधील सृष्टीचा अहवाल शंभर टक्के अचूक आहे आणि तो खऱ्‍या विज्ञानाच्या विरोधात नाही.

“निसर्गातील नियमांचा सुरेख साधेपणा”

एनरिके हर्नानडेज लेमस

पार्श्‍वभूमी: मी यहोवाच्या साक्षीदारांचा पूर्णवेळ सेवक आहे. तसेच, सैद्धान्तिक भौतिकशास्त्राशी संबंधित संशोधनात मी सहभागी असून नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको येथे काम करतो. सध्या मी, ग्रॅवोथर्मल कॅटॅस्ट्रोफे नावाच्या घटनेचे उष्मागतिकरीत्या शक्य असलेले विश्‍लेषण शोधायचा प्रयत्न करतोय. ग्रॅवोथर्मल कॅटॅस्ट्रोफे ताऱ्‍याच्या वाढीचे तंत्र आहे. मी, डीएनए साखळ्यांची जटीलता यांचाही अभ्यास केला आहे.

जीवन इतके क्लिष्ट आहे की ते आपोआप येणे अगदी अशक्य आहे. उदाहरणार्थ, डीएनए रेणूत असलेल्या प्रचंड माहितीचा विचार करा. एका गुणसूत्राची आपोआप उत्पत्ति होण्याची गणितीय शक्यता, नऊ लाख कोटींत एक, इतकी कमी आहे; ती जवळजवळ अशक्यच म्हटले तरी चालेल. बुद्धिहीन शक्‍तींनी फक्‍त एकाच गुणसूत्राची नव्हे तर सर्व जिवंत प्राण्यांमध्ये असलेल्या आश्‍चर्यकारक जटीलतेची निर्मिती केली असा विश्‍वास करणे निव्वळ मूर्खपणा आहे, असे मला वाटते.

शिवाय, मी जेव्हा पदार्थाचा—मग तो अतिसूक्ष्म असो अथवा अवकाशातील महाढगांची हालचाल असो—अभ्यास करतो तेव्हा त्यांना कार्यहालचाल करायला लावणाऱ्‍या निसर्ग नियमांचा सुरेख साधेपणा पाहून प्रभावीत होतो. हे नियम, केवळ एका कुशल गणिततज्ज्ञाच्या कृती नव्हेत तर त्या एका कुशल कलाकाराच्या हस्ताक्षराप्रमाणे आहेत.

लोकांना जेव्हा मी एक यहोवाचा साक्षीदार आहे असे सांगतो तेव्हा त्यांना आश्‍चर्य वाटते. कधीकधी ते मला विचारतात, की मी देवावर कसा काय विश्‍वास ठेवू शकतो? त्यांची प्रतिक्रिया मी समजू शकतो; कारण बहुतेक धर्म लोकांना, त्यांना जे शिकवले जाते त्याचा पुरावा मागण्याचे किंवा आपले विश्‍वास पडताळून पाहण्याचे उत्तेजन देत नाहीत. परंतु बायबल आपल्याला, आपल्या ‘विवेकाचा’ अर्थात विचारशक्‍तीचा उपयोग करण्याचे उत्तेजन देते. (नीतिसूत्रे ३:२१) निसर्गात दिसणारी सर्व बुद्धिमान रचना आणि बायबलमधील पुरावा या दोन्ही गोष्टींमुळे माझी ही खात्री पटली आहे, की देव अस्तित्वात आहे. इतकेच नव्हे, तर तो आपल्या प्रार्थना देखील ऐकतो.

[तळटीप]

^ परि. 3 या लेखात तज्ज्ञांची जी मते छापण्यात आली आहेत, ती त्यांची वैयक्‍तिक मते आहेत. ज्या संस्थांमध्ये ते कार्य करतात त्यांचीही तशीच मते आहेत असे नाही.

[२२ पानांवरील चित्राचे श्रेय]

मंगळाचे चित्र: Courtesy USGS Astrogeology Research Program, http://astrogeology.usgs.gov