व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्मितीवरील माझ्या विश्‍वासाचे मी समर्थन कसे करू शकतो?

निर्मितीवरील माझ्या विश्‍वासाचे मी समर्थन कसे करू शकतो?

तरुण लोक विचारतात . . .

निर्मितीवरील माझ्या विश्‍वासाचे मी समर्थन कसे करू शकतो?

“वर्गामध्ये जेव्हा उत्क्रांतीवादावर चर्चा सुरू झाली तेव्हा मला दिसून आलं, की हे सर्व, मला जे शिकवण्यात आलं होतं त्याच्या अगदी उलट आहे. उत्क्रांतीवादच खरा आहे अशारितीने तो विषय आमच्यापुढे सादर करण्यात आला. आणि माझ्यावरही हा सिद्धान्त स्वीकारण्याची जबरदस्ती केली जातेय असं मला वाटलं.” —रायन, वय १८.

“मी १२ वर्षांचा होतो तेव्हा आमच्या एक शिक्षिका उत्क्रांतीवादी होत्या. त्यांच्या कारवर तर डार्विनचं स्टिकरसुद्धा होतं! त्यामुळे मी निर्मितीवर विश्‍वास करतो हे सांगायचं माझं धाडसच होत नव्हतं.”—टायलर, वय १९.

“समाजशास्त्राच्या आमच्या बाईंनी जेव्हा, पुढचा धडा उत्क्रांतीविषयी असेल, असं सांगितलं तेव्हा मला खूप भीती वाटली. कारण, या वादाच्या विषयावर मला माझं मत सांगावं लागेल, हे मला माहीत होतं.”—राकेल, वय १४.

रायन, टायलर आणि राकेल यांच्याप्रमाणे तुम्हालाही, वर्गात जेव्हा उत्क्रांतीवादाचा विषय निघतो तेव्हा काहीसे अस्वस्थ वाटत असेल. कारण तुमचा तर असा विश्‍वास आहे, की देवानेच “सर्व काही निर्माण केले.” (प्रकटीकरण ४:११) शिवाय, तुमच्या अवतीभोवती तुम्ही बुद्धिमान रचनेचा पुरावा देखील पाहता. परंतु, पाठ्यपुस्तकांत मात्र असे सांगितले जाते की आपण उत्क्रांतीने अस्तित्वात आलो. आणि तुमच्या शिक्षकांचेही हेच म्हणणे आहे. तुम्हाला कदाचित वाटेल, की ‘विद्वानांशी’ वाद घालणारे आपण कोण? शिवाय आपण जर देवाबद्दल बोलायला लागलो, तर आपले वर्गमित्र काय म्हणतील?

यासारखे प्रश्‍न जर तुम्हाला सतावत असतील, तर चिंता करू नका! कारण, निर्मितीवर फक्‍त तुमचाच विश्‍वास आहे असे नाही. खरे तर, अनेक शास्त्रज्ञांचा आणि शिक्षकांचासुद्धा उत्क्रांतीच्या सिद्धान्तावर विश्‍वास नाही. संयुक्‍त संस्थानात, ५ विद्यार्थ्यांपैकी ४ जण, पाठ्यपुस्तके काहीही म्हणत असले तरी, निर्माणकर्ता आहे असेच मानतात!

पण, ‘मी निर्मितीवर का विश्‍वास ठेवतो याबद्दल जर मला सांगावे लागले, तर मी काय म्हणू?’ असा तुमच्या मनात प्रश्‍न असेल. तुम्हाला लाज वाटत असली तरी तुम्ही धैर्याने आपल्या विश्‍वासांविषयी सांगू शकाल ही खात्री बाळगा. पण, तुम्ही आधी चांगली तयारी केली पाहिजे.

आधी स्वतः परीक्षण करा!

तुमचे आईवडील ख्रिस्ती असतील, तर त्यांनी तुम्हाला निर्मितीवर विश्‍वास करायला शिकवले म्हणून तुम्ही तसा विश्‍वास करत असाल. पण तुम्ही जसजसे मोठे होता तसतसे तुम्हाला देवाची उपासना “समजबुद्धीने” कराविशी वाटेल, तुम्ही जो विश्‍वास करता त्याविषयी पक्का आधार हवा असला पाहिजे. (रोमकर १२:१, NW) पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना “सर्व गोष्टींची पारख करा” असे उत्तेजन दिले. (१ थेस्सलनीकाकर ५:२१) निर्मितीच्या विश्‍वासाविषयी तुम्ही हे कसे करू शकता?

सर्वात आधी, पौलाने देवाविषयी काय म्हटले त्याचा विचार करा. त्याने लिहिले: “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्‍य गोष्टी . . . निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” (रोमकर १:२०) हे शब्द लक्षात ठेवून, मानव शरीर, पृथ्वी, हे प्रचंड विश्‍व, खोल महासागर यांचा विचार करा. कीटकांची, वनस्पतींची, प्राण्यांची लक्षवेधक दुनिया—किंवा निसर्गातील ज्या काही गोष्टी तुम्हाला विशेष आवडतात त्यांचा विचार करा. मग स्वतःच्या ‘समजबुद्धीचा’ उपयोग करून स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘कोणत्या गोष्टीमुळे, निर्माणकर्ता असल्याची माझी खात्री पटली?’

या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता, १४ वर्षीय सॅम, मानव शरीराचे उदाहरण कसे देतो ते पाहा. तो म्हणतो: “मानव शरीरात किती बारीकसारीक तपशील आहेत; शिवाय ते किती जटील आहेत. शरीरातले सर्व अवयव कसे एकजुटीने कार्य करतात. मानव शरीराची उत्क्रांती होणं शक्यच नाही!” १६ वर्षीय हॉली याजशी सहमत आहे. ती म्हणते: “मला मधुमेह असल्याचं जेव्हा निदान करण्यात आलं तेव्हा, आपलं शरीर कसं कार्य करतं ते मला समजलं. जसं की, स्वादूपिंड हा लहानसा अवयव जठराच्या मागच्या बाजूला असतो पण त्याची कार्ये मात्र मोठी असतात; तो रक्‍तपुरवठ्याचं काम करतो आणि इतर अवयवांना काम करायला लावतो.”

दुसऱ्‍या युवकांचे वेगळे दृष्टिकोन आहेत. १९ वर्षीय जॅरेड म्हणतो: “आपल्यात उपासना करण्याची क्षमता आणि गरज आहे, सौंदर्य पाहून प्रशंसा करण्याची व शिकण्याची इच्छा आहे, हा, निर्माणकर्ता आहे यावर विश्‍वास ठेवण्यासाठी माझ्याकरता मोठा पुरावा आहे. खरे तर, उत्क्रांतीवादात सुचवले जाते त्याप्रमाणे, आपले अस्तित्त्व टिकवून ठेवण्याकरता आपल्याला या गुणांची आवश्‍यकता नाही. तेव्हा, याचे केवळ एकच स्पष्टीकरण असू शकते. आपण जीवनाचा आनंद लुटावा या उद्देशाने कुणीतरी आपल्याला इथं ठेवलं आहे.” लेखाच्या सुरुवातीला ज्याचा उल्लेख करण्यात आला होता तो टायलरसुद्धा अशाच निष्कर्षावर पोचला आहे. तो म्हणतो: “जीवन टिकवून ठेवण्यात वनस्पतींची देखील भूमिका आहे आणि त्यांची रचना, कल्पना करता येत नाही इतकी क्लिष्ट आहे यांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझी खात्री पटते, की या सर्वांचा एक निर्माणकर्ता जरूर आहे.”

तुम्ही जर या सर्व गोष्टींवर विचार केला असेल आणि तुमची खरोखरच जर पूर्ण खात्री पटली असेल तर निर्मितीविषयी बोलणे तुम्हाला जास्त सोपे जाईल. तेव्हा, सॅम, हॉली, जॅरेड आणि टायलर यांच्याप्रमाणे देवाच्या विलोभनीय हस्तकृतींवर विचार करायला वेळ काढा. या गोष्टी तुम्हाला काय “सांगतात” त्याकडे “लक्ष द्या.” तुम्हीही शेवटी प्रेषित पौलाप्रमाणे म्हणाल, की “निर्मिलेल्या पदार्थांवरून” फक्‍त देवाचे अस्तित्वच नाही तर त्याचे गुणही स्पष्ट दिसून येतात. *

बायबल नेमके काय शिकवते ते माहीत करून घ्या

देवाने बनवलेल्या गोष्टींचे जवळून परीक्षण करण्याव्यतिरिक्‍त, बायबल या विषयावर नेमके काय शिकवते हेही माहीत करून घेतले पाहिजे जेणेकरून तुम्हाला निर्मितीवरील तुमच्या विश्‍वासाचे समर्थन करता येईल. बायबल थेटपणे ज्यावर काही भाष्य करीत नाही अशा गोष्टींवर वाद करण्याची गरज नाही. पुढे अशा काही गोष्टींची उदाहरणे दिली आहेत.

▪ माझं विज्ञानाचं पाठ्यपुस्तक म्हणतं, की पृथ्वी आणि सौरमाला कोट्यवधी वर्षांपासून अस्तित्वात आहे. पृथ्वी किंवा सौरमाला किती वर्षांपासून अस्तित्वात आहे, याविषयी बायबल काही सांगत नाही. खरे पाहता, बायबल जे सांगते ते, हे विश्‍व सृष्टीच्या पहिल्या ‘दिवसाच्या’ सुरुवातीच्या कोट्यवधी वर्षांआधीपासून अस्तित्वात होते या कल्पनेशी सुसंगत आहे.—उत्पत्ति १:१, २.

▪ पृथ्वीला केवळ सहा दिवसांत निर्माण करणे शक्य नाही, असे माझ्या बाई म्हणतात. सृष्टीच्या सर्व सहा दिवसांतील प्रत्येक “दिवस” अक्षरशः २४ तासांचा होता, असे बायबल सांगत नाही. अधिक माहितीसाठी, याच मासिकाची पृष्ठे १८-२० पाहा.

▪ प्राणी आणि मनुष्य यांत हळूहळू कसे बदल होत गेलेत, त्याच्या अनेक उदाहरणांवर आमच्या वर्गात चर्चा झाली. बायबल म्हणते, की देवाने ‘प्रत्येक जाताची’ सजीवसृष्टी बनवली. (उत्पत्ति १:२०, २१) जीवन हे निर्जीव पदार्थातून सुरू झाले किंवा देवाने एका कोशिकेतून उत्क्रांतीची प्रक्रिया सुरू करून दिली, अशी शिकवण या वचनात नाही. पण, प्रत्येक ‘जातीत’ पुष्कळ प्रकार असू शकतात. तेव्हा, प्रत्येक ‘जातीतच’ बदल होऊ शकतात ही गोष्ट बायबल अमान्य करत नाही.

आपल्या विश्‍वासांची खात्री बाळगा!

तुम्ही निर्मितीवर विश्‍वास करता याबद्दल तुम्हाला लाज वाटण्याचे काहीएक कारण नाही. पुराव्यांचा विचार केल्यावर, तर्कशुद्धपणे होय अगदी शास्त्रीयदृष्ट्या आपण असा विश्‍वास करू शकतो, की आपण बुद्धिमान रचना असलेली सृष्टी आहोत. निर्मितीवर नव्हे, तर तर्काला न पटणाऱ्‍या उत्क्रांतीवर पुराव्यांविना विश्‍वास ठेवण्यासाठी आणि चमत्कार करणाऱ्‍याविना चमत्कार घडू शकतात हे मानण्याकरता तुम्हाला असाधारण विश्‍वासाची गरज आहे. खरे पाहता, सावध राहा! याच्या या अंकातील इतर लेख वाचल्यावर, पुरावा निर्मितीला पाठबळ देतो, अशी तुमची नक्कीच खात्री पटेल. समजबुद्धीचा उपयोग करून या विषयावर काळजीपूर्वक विचार केल्यानंतर संपूर्ण वर्गासमोर तुमच्या विश्‍वासाचे समर्थन करण्याचे धाडस तुमच्यात येईल.

याआधी जिचा उल्लेख केला त्या राकेलला हे दिसून आले. ती म्हणते: “काही दिवसांतच मला ही जाणीव झाली की मी माझ्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगितलं पाहिजे. मी माझ्या बाईंना जीवन—ते कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) हे पुस्तक दिलं. पुस्तकातल्या ज्या गोष्टी मी त्यांच्या निदर्शनास आणू इच्छित होते ती वाक्ये मी मार्क केली. त्यांनी मला नंतर सांगितलं, की या पुस्तकानं, उत्क्रांतीविषयी त्यांचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला, आणि पुढे जेव्हा जेव्हा त्यांना वर्गात या विषयावर शिकवावं लागेल तेव्हा तेव्हा त्या या पुस्तकातल्या माहितीचा उपयोग करतील!” (९/०६)

“तरुण लोक विचारतात. . . ” या सदरातील आणखी लेख पुढील वेबसाईटवर मिळू शकतात: www.watchtower.org/ype

विचार करा

◼ शाळेत निर्मितीवरील तुमचा विश्‍वास तुम्ही इतरांना निःसंकोचपणे कसे सांगू शकाल?

◼ ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या त्याच्याबद्दल तुमच्या मनात असलेली कृतज्ञता तुम्ही कशी व्यक्‍त करू शकता?—प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७.

[तळटीप]

^ परि. 14 पुष्कळ तरुणांना, जीवन—ते कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) आणि तुमची काळजी वाहणारा निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी) या प्रकाशनांतील माहितीची उजळणी केल्यामुळे फायदा झाला आहे. ही दोन्ही प्रकाशने यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केली आहेत.

[२७ पानांवरील चौकट]

“भरपूर पुरावा”

“तुम्ही एका लहान मुलाला काय सांगाल, ज्याला घरात निर्माणकर्त्यावर विश्‍वास ठेवायला शिकवलं जातं परंतु शाळेत उत्क्रांतीवादाचे शिक्षण दिले जाते?” असा प्रश्‍न यहोवाची साक्षीदार असलेल्या एका सूक्ष्म जीवजंतूशास्त्रज्ञ स्रीला विचारण्यात आला. तिचे उत्तर काय होते? “देव अस्तित्वात आहे हे स्वतःला सिद्ध करून देण्यासाठी आणि तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवले म्हणून नव्हे तर तुम्ही स्वतः पुराव्यांचे परीक्षण केल्यामुळे या निष्कर्षास पोंहचला आहात हे दाखवून देण्यासाठी तुम्हाला ही संधी चालून आहे असे तुम्ही समजले पाहिजे. कधीकधी, जेव्हा शिक्षकांना उत्क्रांतीवाद ‘शाबीत’ करून दाखवण्यास सांगितले जाते तेव्हा, आपल्याला हे जमत नाही, हे त्यांच्या लक्षात येते; आपल्याला असा विश्‍वास करायला शिकवले होते, म्हणून आपण उत्क्रांतीवादावर विश्‍वास करू लागलो, हे त्यांना जाणवते. निर्मितीवरील विश्‍वासाच्या संबंधाने आपल्याबाबतीतही असेच घडू शकते. म्हणूनच, देव खरोखरच अस्तित्वात आहे, याची स्वतः खातरी करून घेणे खरोखर महत्त्वाचे आहे. देव अस्तित्वात असल्याचे भरपूर पुरावे आहेत. ते शोधायला कठीण नाहीत.”

[२८ पानांवरील चौकट/चित्र]

तुमची कशामुळे खात्री पटली?

निर्माणकर्ता असल्याची तुमची खात्री कशामुळे पटली याची तीन कारणे खाली लिहा:

१. .......................

२. .......................

३. .......................