व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलाखत एका जीवरसायनशास्त्रज्ञाशी

मुलाखत एका जीवरसायनशास्त्रज्ञाशी

मुलाखत एका जीवरसायनशास्त्रज्ञाशी

सध्या अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनियाच्या लीहाय युनिव्हर्सिटीत जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक असणारे मायकल जे. बीही यांनी १९९६ साली डार्व्हिन्स ब्लॅक बॉक्स—द बायोकेमिकल चॅलेंज टू एव्हल्यूशन हे पुस्तक प्रसिद्ध केले. सावध राहाच्या! मे ८, १९९७ अंकात, “सृष्टी अस्तित्वात कशी आली? अपघाताने की तिची रचना करण्यात आली?” या शीर्षकाखाली जी लेखमाला प्रकाशित करण्यात आली होती त्यात बीही यांच्या पुस्तकातील संदर्भांचा उल्लेख करण्यात आला होता. डार्व्हिन्स ब्लॅक बॉक्स हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्यानंतरच्या दशकात, उत्क्रांतीवादी वैज्ञानिकांना बीही यांनी डार्व्हिनच्या सिद्धान्ताविरुद्ध उठवलेल्या वादांचे खंडन करण्याकरता बरेच प्रयत्न करावे लागले आहेत. बीही हे रोमन कॅथलिक आहेत. त्यामुळे टीका करणाऱ्‍यांनी त्यांच्यावर असा आरोप लावला आहे की त्यांच्या धार्मिक विश्‍वासांचा त्यांच्या शास्त्रीय निष्कर्षांवर पगडा आहे. इतरांचे म्हणणे आहे की बीही यांचा तर्कवाद वैज्ञानिकदृष्ट्या निराधार आहे. सावध राहाने! प्राध्यापक बीही यांची भेट घेऊन, त्यांनी मांडलेल्या विचारांमुळे इतके वादळ का निर्माण झाले आहे यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली.

सावध राहा!: सजीव सृष्टीकडे पाहून तिची उद्देशपूर्ण रचना करण्यात आल्याचा पुरावा दिसून येतो असे आपल्याला का वाटते?

प्राध्यापक बीही: गुंतागुंतीच्या क्रिया करणारे कोणतेही यंत्र पाहिल्यावर कोणी न कोणी त्याची रचना केली आहे असाच निष्कर्ष आपण काढतो. दैनंदिन जीवनात आपण अशा कितीतरी यंत्रांचा उपयोग करतो, उदाहरणार्थ, गवत कापण्याचे यंत्र, कार किंवा त्यापेक्षा साध्या वस्तू. मला सहसा उंदीर पकडण्याच्या यंत्राचे उदाहरण घ्यायला आवडते. या यंत्रात वेगवेगळ्या भागांची जडणघडण अशा प्रकारे केलेली असते की त्यांनी उंदीर पकडण्याची क्रिया पार पाडावी. हे पाहून तुम्ही निष्कर्ष काढता की या यंत्राची उद्देशपूर्ण रचना करण्यात आली आहे.

आजच्या घडीला विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की सजीव सृष्टीच्या अगदी मूलभूत स्तरावर कोणकोणत्या क्रिया घडतात हे त्यांनी शोधून काढले आहे. आणि या रेणवीय स्तरावरही ज्या गुंतागुंतीच्या यांत्रिक क्रिया घडत असतात त्या पाहून वैज्ञानिक सुद्धा आश्‍चर्यचकित झाले आहेत. उदाहरणार्थ, जिवंत पेशींमध्ये सूक्ष्म रेणवीय “मालवाहू गाड्या” असतात ज्या आवश्‍यक वस्तूंची नेआण करत असतात. या ‘मालवाहू गाड्यांना’ डावीकडे जायचे की उजवीकडे हे सांगणारे रेणवीय “सूचना फलक” देखील असतात. काही पेशींना तरल पदार्थांतून पुढे चालवणाऱ्‍या “मोटर” बसवलेल्या असतात. दुसऱ्‍या कोणत्याही ठिकाणी इतक्या गुंतागुंतीच्या क्रिया करणाऱ्‍या यंत्रणा पाहून लोक हाच निष्कर्ष काढतील की या सर्व गोष्टींची रचना करण्यात आली आहे. तेव्हा, डार्व्हिनचा उत्क्रांतीचा सिद्धान्त काहीही म्हणो, पण या गुंतागुंतीच्या यंत्रणांकरता इतर कोणतेही स्पष्टीकरण सापडत नाही. अशाप्रकारच्या यंत्रणा कोणीतरी रचना केल्याशिवाय येऊ शकत नाहीत हाच आपला आजवरचा अनुभव असल्यामुळे, जिवंत पेशींमधील रेणवीय यंत्रणांचीसुद्धा उद्देशपूर्ण रितीने रचना करण्यात आली आहे असा निष्कर्ष काढणे वावगे ठरणार नाही.

सावध राहा!: उद्देशपूर्ण रचनेसंबंधी तुमच्या निष्कर्षांशी तुमचे बहुतेक वैज्ञानिक मित्र सहमत नाहीत. तुमच्या मते, याचे काय कारण असू शकते?

प्राध्यापक बीही: बहुतेक वैज्ञानिक माझ्या निष्कर्षांशी सहमत होत नाहीत कारण उद्देशपूर्ण रचनेच्या संकल्पनेला अशाप्रकारचे अर्थबोध आहेत की ज्यांचे विज्ञानाला स्पष्टीकरण देता येत नाही—निसर्गापेक्षाही श्रेष्ठ असे काहीतरी आहे असे या संकल्पनेवरून सुचवले जाते. अशाप्रकारचा निष्कर्ष काढायला बरेचजण कचरतात. पण मला तर असेच शिकवण्यात आले होते की पुरावा जेथे घेऊन जाईल तेथे विज्ञानाने गेले पाहिजे. माझ्या मते, पुरावा जर एखाद्या गोष्टीकडे इतक्या स्पष्टपणे संकेत करत असेल तर केवळ त्यातून निघणारा निष्कर्ष तुम्हाला रुचत नाही किंवा पटत नाही म्हणून तो नाकारणे हे भित्रटपणाचे लक्षण आहे.

सावध राहा!: उद्देशपूर्ण रचनेची संकल्पना स्वीकारणे हे अज्ञानाचे लक्षण आहे असे म्हणणाऱ्‍यांविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे?

प्राध्यापक बीही: उद्देशपूर्ण रचनेचा निष्कर्ष हा अज्ञानामुळे काढलेला निष्कर्ष नव्हे. आपल्याला जे माहीत नाही त्याच्या आधारावर नव्हे तर जे माहीत आहे त्याच्या आधारावर हा निष्कर्ष काढता येतो. डार्व्हिनने १५० वर्षांपूर्वी दी ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक प्रकाशित केले होते तेव्हा, सजीव पेशींची रचना व कार्य अगदी सरळसोपे आहे असे आपल्याला वाटत होते. वैज्ञानिकांचा तेव्हा असा ग्रह होता की पेशी इतक्या साध्या असतात की त्या आपोआप समुद्रातल्या चिखलातून बुडबुड्यांसारख्या अचानक उत्पन्‍न होऊ शकतात. पण या १५० वर्षांत वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधावरून दिसून आले आहे की पेशींमधली रचना ही अतिशय गुंतागुंतीची, आपल्या २१ व्या शतकातल्या यंत्रांपेक्षाही जास्त गुंतागुंतीची आहे. सजीव पेशींमध्ये दिसून येणारी हीच गुंतागुंत, उद्देशपूर्ण रचनेच्या संकल्पनेला पुष्टी देते.

सावध राहा!: तुम्ही मघाशी ज्यांचा उल्लेख केला होता ती गुंतागुंतीची रेणवीय यंत्रे उत्क्रांतीद्वारे, नैसर्गिक निवड म्हटलेल्या प्रक्रियेतून निर्माण झाली असावीत हे सिद्ध करणारा पुरावा वैज्ञानिकांना सापडला आहे का?

प्राध्यापक बीही: तुम्ही जर विज्ञानावर आधारित पुस्तकांत शोधून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की ही रेणवीय यंत्रे डार्व्हिनच्या सिद्धान्तानुसार कशी काय अस्तित्वात आली याचे प्रयोगांद्वारे स्पष्टीकरण देण्याचा किंवा या आधारावर सविस्तर वैज्ञानिक नमूना तयार करण्याचा आजवर कोणीही प्रयत्न केलेला नाही. खरे पाहता, माझे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरच्या दहा वर्षांत, नॅशनल अकॅडमी ऑफ साइन्सेस आणि अमेरिकन असोसिएशन फॉर दी ॲडव्हान्समेंट ऑफ साइन्स यांसारख्या अनेक संस्थांनी आपल्या सदस्यांना कळकळीचे आवाहन केले आहे की सजीव सृष्टीतून उद्देशपूर्ण रचनेचा पुरावा मिळतो या संकल्पनेचे खंडन करण्याचा त्यांनी हरतऱ्‍हेने प्रयत्न करावा; पण तरीसुद्धा या दिशेने अजून कोणीही पाऊल उचललेले नाही.

सावध राहा!: काही लोक अशा प्राण्यांची व वनस्पतींची उदाहरणे देतात ज्यांच्या रचनेत या लोकांच्या मते काहीतरी दोष आहे, यावर तुमचे म्हणणे काय?

प्राध्यापक बीही: एखाद्या सजीव प्राण्याच्या विशिष्ट इंद्रियाचा उद्देश आपल्याला माहीत नाही याचा अर्थ तो महत्त्वाचा नाही असे मुळीच म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, एकेकाळी मानवी शरीरातील व इतर प्राण्यांच्या शरीरातील काही इंद्रिये निरुपयोगी आहेत असा वैज्ञानिकांचा ग्रह होता. जसे की, मानवी शरीरातील आंत्रपुच्छ व गलग्रंथी (अपेंडिक्स व टॉन्सिल) ही निरुपयोगी इंद्रिये आहेत असे समजून सहसा शस्त्रक्रिया करून ती काढून टाकली जात. पण नंतर असा शोध लावण्यात आली की मनुष्याच्या रोगप्रतिबंधक यंत्रणेशी या इंद्रियांचा संबंध आहे आणि त्यामुळे आता ही इंद्रिये काढली जात नाहीत.

आणखी एक आठवणीत ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे जीवविज्ञानात काही गोष्टी अचानक घडतात हे खरे आहे. पण काही गोष्टी अचानक घडतात याचा अर्थ इतक्या गुंतागुंतीच्या रचना व कार्य असलेल्या, सुविकसित रेणवीय यंत्रणा अचानक किंवा आपोआप अस्तित्वात आल्या असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, माझ्या कारला समजा खाच पडली किंवा कारचे टायर पंक्चर झाले तर त्याचा असा अर्थ होत नाही की कारची किंवा टायरची रचना करण्यात आली नव्हती. असे म्हणणे तर्कहीन ठरेल. (९/०६)

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

“माझ्या मते, पुरावा जर एखाद्या गोष्टीकडे इतक्या स्पष्टपणे संकेत करत असेल तर केवळ त्यातून निघणारा निष्कर्ष तुम्हाला रुचत नाही किंवा पटत नाही म्हणून तो नाकारणे हे भित्रटपणाचे लक्षण आहे”