विज्ञान आणि उत्पत्तीचा अहवाल यांत विसंगती आहे का?
बायबलचा दृष्टिकोन
विज्ञान आणि उत्पत्तीचा अहवाल यांत विसंगती आहे का?
विज्ञान, बायबलमधील सृष्टीच्या अहवालाचे खंडन करते, असा अनेकांचा दावा आहे. परंतु खरी विसंगती विज्ञान आणि बायबलमध्ये नव्हे, तर विज्ञान आणि नामधारी ख्रिस्ती मूलतत्त्ववाद्यांच्या श्रद्धा यांत आहे. यांपैकी काही गट असा दावा करतात, की बायबलनुसार सर्व भौतिक सृष्टी सुमारे १०,००० वर्षांपूर्वी २४ तासांच्या अवधीच्या सहा दिवसांदरम्यान उत्पन्न करण्यात आली होती.
परंतु, बायबल या निष्कर्षास दुजोरा देत नाही. दुजोरा दिला, तर गेल्या शंभर वर्षांमध्ये करण्यात आलेले वैज्ञानिक शोध, बायबलच्या अचूकतेला खोटे ठरवतील. बायबलमधील मजकुराचा बारकाईने अभ्यास केल्यावर दिसून येते, की बायबलमध्ये जे सांगितले आहे व स्थापित वैज्ञानिक वस्तुस्थिती यांमध्ये कसलीही विसंगती नाही. त्यामुळे यहोवाचे साक्षीदार, “ख्रिस्ती”
मूलतत्त्ववादी आणि अनेक निर्मितीवादी यांच्याशी सहमत नाहीत. बायबल नेमके काय शिकवते, याची चर्चा पुढे करण्यात आली आहे.‘प्रारंभ’ केव्हा झाला होता?
उत्पत्ति अहवालाची सुरुवात एका साध्या परंतु अतिशय जोरदार विधानाने होते: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.” (उत्पत्ति १:१) तिसऱ्या वचनापासून पुढे ज्यांचे वर्णन केले आहे त्या सृष्टीच्या दिवसांत केलेल्या कार्यांपेक्षा एका वेगळ्या कार्याचे वर्णन या वचनात आहे, यावर बायबल विद्वानांचे एकमत आहे. या वचनाचा अतिशय प्रगल्भ अर्थ आहे. बायबलच्या सुरुवातीच्या वाक्यानुसार, हे विश्व आणि आपला पृथ्वीग्रह, सृष्टीचे दिवस सुरु होण्याच्या आधी अनिश्चित काळापासून अस्तित्वात होते.
पृथ्वी जवळजवळ ४०० कोटी वर्षे जुनी आहे असा भूवैज्ञानिकांचा अंदाज आहे आणि खगोलशास्त्रज्ञांच्या मते हे विश्व जवळजवळ १,५०० कोटी वर्षे जुने असावे. हे शोध—किंवा भविष्यात पृथ्वी व विश्वाच्या अस्तित्वासंबंधाने आपल्या ज्ञानात होऊ शकणाऱ्या सुधारणा—उत्पत्ति १:१ च्या विरोधात आहेत का? नाही. बायबलमध्ये “आकाश व पृथ्वी” नेमक्या किती वर्षांपासून अस्तित्वात आहे हे सांगितलेले नाही. विज्ञान, बायबलचे खंडन करत नाही.
सृष्टीच्या दिवसांचा अवधी किती होता?
सृष्टीच्या दिवसांचा अवधी किती होता? एक दिवस २४ तासांचा होता का? उत्पत्तिचा लेखक मोशे याने सृष्टीच्या सहा दिवसांनंतर येणारा दिवस हा साप्ताहिक शब्बाथासाठी नमुना होता, असा नंतर उल्लेख केला असल्यामुळे प्रत्येक सृष्टीचा दिवस २४ तासांचा असला पाहिजे, असे काही जण दावा करतात. (निर्गम २०:११) उत्पत्तिमधील शब्द त्यांच्या या दाव्याला दुजोरा देतात का?
नाही, उत्पत्तिमधील शब्द त्यांच्या या दाव्याला दुजोरा देत नाहीत. वास्तविक पाहता, “दिवस” असे भाषांतर केलेला इब्री शब्द, केवळ २४ तासांच्या दिवसालाच नव्हे तर विविध कालावधींना सूचित करू शकतो. जसे की, देवाच्या सृष्टीच्या कार्यांचे सार देताना मोशेने सर्व सहा सृष्टीच्या दिवसांचे वर्णन एक दिवस असे केले. (उत्पत्ति २:४) याशिवाय, पहिल्या सृष्टीच्या दिवशी, “देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले.” (उत्पत्ति १:५) येथे, २४ तासांच्या अवधीतील केवळ एका भागाला “दिवस” असे संबोधले आहे. तेव्हा, सृष्टीचा प्रत्येक दिवस २४ तासांच्या अवधीचा होता असे स्वैरपणे म्हणण्याकरता शास्त्रवचनांत कोणताही आधार नाही.
मग, सृष्टीच्या दिवसांचा अवधी नेमका किती होता? उत्पत्तिच्या १ व २ अध्यायातील शब्दांवरून सूचित होते, की सृष्टीच्या दिवसांचा अवधी बराच मोठा होता.
सृष्टी टप्प्या टप्प्याने अवतरते
मोशेने उत्पत्तिचा अहवाल इब्री भाषेत व पृथ्वीवर असलेल्या मनुष्याच्या दृष्टिकोनातून लिहिला. या दोन वस्तुस्थिती आणि हे विश्व सृष्टीच्या कालावधीच्या किंवा ‘दिवसांची’ सुरुवात होण्याच्या आधीपासून अस्तित्वात होते ही माहिती, आपल्याला, सृष्टीच्या अहवालाबद्दल असलेले बहुतेक वाद सोडवण्यास मदत करू शकते. ते कसे?
उत्पत्ति अहवालाचे बारकाईने परीक्षण केल्यावर समजते, की एका ‘दिवशी’ सुरू झालेल्या घटना एक किंवा त्याहूनही अधिक दिवसांपर्यंत चालल्या. उदाहरणार्थ, सृष्टीचा पहिला “दिवस” सुरू होण्याआधी, आधीपासूनच अस्तित्वात असलेला सूर्यप्रकाश, कदाचित दाट ढगांमुळे पृथ्वीवर पडू शकत नव्हता. (ईयोब ३८:९) पहिल्या ‘दिवसाच्या’ दरम्यान हा मज्जाव दूर होऊ लागला, त्यामुळे विखुरलेला प्रकाश वातावरणात शिरू लागला. *
उत्पत्ति १:१४-१६) दुसऱ्या शब्दांत, पृथ्वीवरील मनुष्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, सूर्य आणि चंद्र दिसू लागले. या घटना टप्प्या टप्प्याने घडल्या.
दुसऱ्या ‘दिवशी’ वातावरण हळूहळू प्रकाशू लागले, वरील दाट ढग आणि खालील महासागर यांच्यातले अंतर विस्तारू लागले. चवथ्या ‘दिवसापर्यंत’ वातावरण इतके निवळले होते, की सूर्य आणि चंद्र “आकाशाच्या अंतराळात” दिसू लागले. (उत्पत्तिच्या अहवालात असेही सांगण्यात आले आहे, की वातावरण जसजसे स्वच्छ होऊ लागले तसतसे आकाशातील पक्षी—ज्यांत किटकांचा आणि मऊ-पटल पंख असलेल्या प्राण्यांचा समावेश होतो—पाचव्या ‘दिवशी’ उत्पन्न होऊ लागले. परंतु बायबल असे सूचित करते, की सहाव्या ‘दिवसादरम्यान’ देव, “सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी” अद्याप बनवतच होता.—उत्पत्ति २:१९.
तेव्हा, बायबलच्या भाषेवरून ही शक्यता दिसते, की प्रत्येक ‘दिवशी’ किंवा सृष्टीच्या कालावधीत काही मोठमोठ्या घटना एकाच दमात नव्हे तर हळूहळू घडल्या असाव्यात. यांपैकी काही घटना तर कदाचित दुसऱ्या सृष्टीच्या ‘दिवसांपर्यंत’ चालल्या असाव्यात.
प्रत्येक जातीचे
वनस्पती आणि प्राणी हळूहळू निर्माण होत गेले यावरून, देवाने उत्क्रांतीने प्रचंड विविध जिवंत गोष्टी आपोआप होऊ दिल्या, असा अर्थ निघतो का? नाही. अहवाल स्पष्ट सांगतो, की देवाने सर्व मूळ ‘जातीच्या’ वनस्पती आणि प्राणी निर्माण केले. (उत्पत्ति १:११, १२, २०-२५) या मूळ ‘जातीच्या’ वनस्पतींना व प्राण्यांना, बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेसह निर्माण करण्यात आले होते का? एका ‘जातीची’ सीमा काय आहे? याविषयी बायबल काही सांगत नाही. पण ते हे जरूर सांगते, की “प्रत्येक जातीचे सर्व जीव” गजबजू लागले. (उत्पत्ति १:२१) या वाक्यावरून असे सूचित होते, की एकाच ‘जातीत’ घडू शकणाऱ्या बदलांना मर्यादा आहे. मूळ प्रकारच्या वनस्पती व प्राणी दीर्घकाळात फारसे बदललेले नाहीत, याला जीवाश्म अहवाल आणि आधुनिक संशोधन दुजोरा देतात.
हे विश्व, ही पृथ्वी आणि तिच्यावरील सजीव सृष्टी फार कमी कालावधीत, अलिकडील गतकाळात निर्मिण्यात आली, असा काही मूलतत्त्ववाद्यांचा दावा आहे. पण उत्पत्तिचा अहवाल असे शिकवत नाही. उलट, विश्व आणि पृथ्वीवर सजीव सृष्टीच्या निर्मितीविषयी उत्पत्तिमधील अहवाल, अलिकडील अनेक वैज्ञानिक शोधांशी जुळतो.
देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत, ही बायबलची शिकवण पुष्कळ शास्त्रज्ञ आपल्या तात्त्विक विश्वासांमुळे नाकारतात. परंतु, मजेशीर गोष्ट अशी, की या विश्वाला सुरुवात आहे आणि सजीव सृष्टी टप्याटप्याने बऱ्याच काळांच्या अवधीत निर्माण करण्यात आली, असे मोशेने बायबलमधील उत्पत्ति नावाच्या प्राचीन पुस्तकात लिहिले. वैज्ञानिकरीत्या इतकी अचूक माहिती मोशेला सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी कोठून मिळाली असेल? या प्रश्नाचे एक तर्कशुद्ध उत्तर आहे. ज्याच्याकडे स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करण्याची शक्ती व बुद्धी आहे त्यानेच मोशेला ही माहिती दिली असावी. त्यामुळे बायबल “परमेश्वरप्रेरित” असल्याचा जो दावा करते त्याला वरील गोष्ट पुष्टी देते.—२ तीमथ्य ३:१६. (g ९/०६)
तुम्हाला काय वाटते?
◼ विश्वाची निर्मिती करण्यासाठी देवाला किती वर्षे लागली?—उत्पत्ति १:१.
◼ २४ तासांच्या अवधीच्या सहा दिवसांत पृथ्वीची निर्मिती करण्यात आली का?—उत्पत्ति २:४.
◼ पृथ्वीच्या सुरुवातीविषयी मोशेचे लिखाण वैज्ञानिकरीत्या अचूक असण्याचे कारण काय?—२ तीमथ्य ३:१६.
[तळटीप]
^ परि. 14 पहिल्या ‘दिवशी’ काय झाले त्याबद्दलच्या वर्णनात, प्रकाश असे ज्याचे भाषांतर करण्यात आले त्या ओर या इब्री शब्दाचा सर्वसामान्य अर्थ, उजेड असा होतो; पण चवथ्या ‘दिवसासाठी’ मा-ओर हा शब्द वापरण्यात आला ज्याचा अर्थ प्रकाशाचा स्रोत, असा होतो.
[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]
उत्पत्तिमधील अहवाल सृष्टी फार कमी कालावधीत, अलिकडील गतकाळात निर्मिण्यात आली, असे शिकवत नाही
[२० पानांवरील संक्षिप्त आशय]
“प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.”—उत्पत्ति १:१
[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]
विश्व: IAC/RGO/David Malin Images
[२० पानांवरील चित्राचे श्रेय]
नासा फोटो