व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंधारातचमकणाऱ्‍या “इवल्याशा आगगाड्या”

अंधारातचमकणाऱ्‍या “इवल्याशा आगगाड्या”

अंधारातचमकणाऱ्‍या “इवल्याशा आगगाड्या”

▪ ब्राझीलच्या ग्रामीण भागात एखाद्या शांत संध्याकाळी, झाडाझुडपांच्या खाली साचलेल्या पाचोळ्यातून तुम्हाला लहानशी एक “आगगाडी” जाताना दिसेल. या आगगाडीच्या समोरच्या बाजूला दोन लाल “हेडलाइट” आणि दोन्ही बाजूला पिवळ्या व हिरव्या रंगांच्या ११ दिव्यांच्या जोड्या दिसतील. अर्थात, ही काही खरीखुरी आगगाडी नाही. तर उत्तर व दक्षिण अमेरिकेत सापडणाऱ्‍या फेंगोडिडी जातीच्या किड्यांच्या अंड्यांतून निघालेली दोन इंची अळी आहे. या किड्यांच्या माद्या या स्थितीतच राहतात व त्या रात्रीच्या वेळी दिवे लावलेल्या आगगाडीच्या डब्यांसारख्या दिसतात. यावरून त्यांना आगगाडी अळ्या हे नाव पडले आहे. ब्राझीलच्या ग्रामीण भागातले लोक यांना इवल्याशा आगगाड्या म्हणतात.

दिवसा, फिक्या तांबूस रंगाची ही अळी सहजासहजी दिसत नाही. पण रात्री मात्र हिच्या रंगीबेरंगी दिव्यांमुळे ती सर्वांचे लक्ष आकर्षित करते. या दिव्यांना लुसिफेरिन नावाच्या संद्रिय पदार्थामुळे ऊर्जा प्राप्त होते. या पदार्थाचे लुसिफरेस नावाच्या एन्झाईमच्या मदतीने ऑक्सिडीकरण होते व त्यामुळे शीत प्रकाश उत्सर्जित होतो. हा प्रकाश लाल, नारंगी, पिवळा, किंवा हिरवा असतो.

या अळीचे लाल हेडलाइट सतत सुरू असतात पण दोन्हीकडचे पिवळे व हिरवे दिवे मात्र सतत सुरू नसतात. संशोधनावरून असे दिसून येते की या हेडलाइट्‌समुळे अळीला पैसा म्हटले जाणारे लहान किडे शोधायला मदत होते. हे त्यांचे आवडते खाद्य. दोन्हीकडे असणारे हिरवे पिवळे दिवे मुंग्या, बेडूक व कोळी यांच्यापासून अळ्यांचे रक्षण करतात. जणू हे दिवे त्यांना असा संदेश देत असतात, की “चला निघा! मी काही खाण्याची वस्तू नव्हे!” अळीला धोक्याची चाहूल लागताच हे दोन्ही बाजूचे दिवे चमकू लागतात. तसेच अळी जेव्हा पैसा या लहान किड्यांवर हल्ला करते आणि जेव्हा मादी आपल्या अंड्यांभोवती वेटोळे घालून बसते तेव्हा देखील हे दिवे चमकतात. सामान्य परिस्थितीत दोन्ही बाजूच्या दिव्यांचा प्रकाश हळूहळू प्रखर होत जातो आणि मग विझतो—हे सर्व काही सेकंदांतच घडते आणि मग जितक्यांदा आवश्‍यक असेल तितक्यांदा ही प्रक्रिया घडते.

होय, झाडाझुडपांतल्या पाचोळ्यातही थक्क करणाऱ्‍या नैसर्गिक सौंदर्याचा आविष्कार घडू शकतो. यावरून सृष्टिकर्त्याची स्तुती करणाऱ्‍या स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही: “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत!”—स्तोत्र १०४:२४. (g ११/०६)

[२० पानांवरील चित्राचे श्रेय]

Robert F. Sisson / National Geographic Image Collection