व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कलीप्सो त्रिनिदादचे अनोखे लोकसंगीत

कलीप्सो त्रिनिदादचे अनोखे लोकसंगीत

कलीप्सो त्रिनिदादचे अनोखे लोकसंगीत

त्रिनिदाद येथील सावध राहा! लेखकाकडून

त्रिनिदाद व टोबॅगो या जुळ्या बेटांनी मिळून बनलेल्या प्रजासत्ताक देशाचा उल्लेख होताच तुम्हाला कशाची आठवण येते? बहुतेक लोकांना या बेटांची नावे ऐकल्यावर स्टील ऑर्केस्ट्रा व उत्साहपूर्ण कलीप्सो संगीताची हमखास आठवण येते. कलीप्सो हा अतिशय मोहक व वैशिष्ट्यपूर्ण संगीतप्रकार दक्षिण कॅरिबियन समुद्राच्या प्रदेशांत उदयास आला असला तरी आज मात्र तो दूरदूरपर्यंत लोकप्रिय झाला आहे. *

कलीप्सो काललू या पुस्तकानुसार, “१८९८ च्या दरम्यान व त्यानंतर त्रिनिदादमध्ये कार्निव्हलच्या वेळी एकतर रस्त्यांवर नाचगाणे करणाऱ्‍यांनी किंवा स्टेजवर व्यावसायिक व निमव्यावसायिक गायकांनी गायिलेल्या कोणत्याही गीताला” कलीप्सो हे नाव देता येते. कलीप्सो हा संगीतप्रकार, आफ्रिकन गुलामांनी त्रिनिदादला आणलेल्या ऐतिहासिक आफ्रिकन कथाकथन परंपरेतून जन्मास आला असण्याची शक्यता आहे. काळाच्या ओघात आफ्रिकन गीते, नृत्य व ड्रम्स यांचा फ्रेंच, स्पॅनिश, इंग्रज व इतर संस्कृतींच्या प्रभावांसोबत मिलाफ होऊन या मिश्र सांस्कृतिक वातावरणात कलीप्सोचा जन्म झाला असावा.

कलीप्सो या नावाची व्युत्पत्ती कशी झाली हे निश्‍चित सांगता येत नाही. काहींचे असे म्हणणे आहे की हे नाव कायसो या पश्‍चिम आफ्रिकी शब्दातून आले आहे. उत्कृष्ट कलाप्रयोगाची वाहवाह करण्याकरता हा शब्द वापरला जात असे. १८३० च्या दशकात त्रिनिदाद व टोबॅगो या दोन्ही बेटांवरून गुलामीचे उच्चाटन होण्याच्या आधीही वार्षिक कार्निव्हल उत्सवांत चांट्‌वेल गायकांची गीते ऐकण्याकरता बरीच गर्दी जमत. या खास संगीतप्रकारात गायक आपल्या गीतातून स्वतःची बढाई मारत एकमेकांचा उपहास करायचे. आपला खास ठसा उमटवण्याकरता प्रत्येक कलीप्सो गायक स्वतःकरता एक खास टोपणनाव निवडून आपली स्वतःची अशी वेगळीच शैली निर्माण करत.

कलीप्सो शैली व तिचा प्रभाव

कलीप्सो गायकांना पूर्वीपासूनच त्यांच्या मार्मिक व हजरजवाबी शैलीबद्दल मानले जाते. शिवाय, बऱ्‍याच कलीप्सो गायकांना आणखी एक अनोखी कला अवगत आहे. ती म्हणजे, कसलीही पूर्वतयारी न करता तिथल्या तिथे गीताच्या विषयाला समर्पक असलेली कडवी रचून गाणे. विशेष म्हणजे या कडव्यांत साधलेले यमक अगदी अचूक आणि त्यांतील शब्दचित्रे अतिशय बहारदार असत. पूर्वीच्या काळी, कलीप्सो गायक सहसा आफ्रिकन व त्रिनिदाद यांच्या मिश्र वंशांचे आणि समाजातील गरीब वर्गांतील असत. पण आज मात्र सर्व वंशांच्या, वर्णाच्या व सामाजिक वर्गाच्या लोकांत कलीप्सो गायक आढळतात.

त्रिनिदाद व टोबॅगोचे भूतपूर्व सांस्कृतिक व्यवस्थापक डॉ. हॉलिस लिव्हरपूल एक इतिहासकार आणि कलीप्सो गायक देखील आहेत. पूर्वीच्या काळच्या कलीप्सो गायकांविषयी त्यांनी सावध राहाला! असे सांगितले: “त्यांची विनोदबुद्धी हीच त्यांची खासियत होती. कारण लोक कलीप्सो गायकाच्या तंबूत खासकरून करमणुकीसाठी, लोकवार्ता ऐकण्यासाठी आणि आपण ऐकलेल्या अफवांची खात्री करण्यासाठी यायचे. उच्च वर्गातले लोक खालच्या वर्गातल्या लोकांचे काय चालले आहे हे पाहण्यासाठी आणि सुभेदार व त्याची माणसे, जनतेत आपली लोकप्रियता घटली की वाढली हे पाहण्यासाठी यायचे.”

बरेचदा, कलीप्सो गायक आपल्या गीतांतून प्रशासकीय अधिकाऱ्‍यांचा आणि समाजातील उच्चवर्गीयांचा उपहास करीत. त्यामुळे या गायकांकडे सामान्य माणसांचा कैवारी म्हणून पाहिले जात असे. दुसरीकडे पाहता, अधिकारीवर्ग त्यांना पाण्यात पाहात. कधीकधी कलीप्सो गायक आपल्या गीतांतून शासकांची इतकी कडाडून टीका करायचे की हळूहळू वसाहतवादी सरकारला त्यांच्यावर निर्बंध लादण्याकरता कायदे संमत करणे भाग पडले. कलीप्सो गायकांनी याचे प्रत्युत्तर दुहेरी अर्थाची गीते रचण्याद्वारे दिले आणि काहीकाळातच या कलेतही ते पारंगत झाले. आजपर्यंत कलीप्सो गीतांत सहसा दुहेरी अर्थाचे बोल असतात.

कलीप्सो गायक केवळ भाषेचा कलापूर्ण वापर करणारेच नव्हे तर शब्दांचे, वाक्प्रचारांचे जनक देखील होते. किंबहुना वेस्ट इंडीजच्या बोली भाषेत त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. बरेच लोक, कधीकधी राजकीय पुढारीसुद्धा आपला मुद्दा ठासून सांगण्याकरता कलीप्सो गायकांच्या गीतांतील बोल उद्धृत करतात.

आधुनिक कलीप्सो

अलीकडच्या काळात निरनिराळ्या संगीतशौकिनांच्या आवडीनिवडीनुसार कलीप्सोचे कित्येक नवे प्रकार व पोटप्रकार जन्मास आले आहेत. इतर संगीतप्रकारांप्रमाणेच काही कलीप्सो गीतांतले बोल अनैतिक स्वरूपाचे असतात. तेव्हा आपल्याला कशाप्रकारची भाषा ऐकायला मिळेल याचा विचार करून काळजीपूर्वक निवड करणे अगत्याचे आहे. (इफिसकर ५:३, ४) आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकतो, ‘विशिष्ट दुहेरी अर्थाचे बोल माझ्या मुलांना अथवा पहिल्यांदाच ही गीते ऐकणाऱ्‍याला समजावून सांगताना मला लाज वाटेल का?’

कधी त्रिनिदाद व टोबॅगोला यायला मिळाले तर इथले नयनरम्य समुद्रकिनारे व खडकांच्या रांगा तसेच बेटांवरील मिश्र वांशिक व सांस्कृतिक वातावरण तुम्हाला मोहवून टाकल्याशिवाय राहणार नाही. शिवाय, स्टील ऑर्केस्ट्रा आणि जगभरातील सर्व वयोगटांच्या लोकांना भुरळ पाडणारी उत्साहपूर्ण, मोहक कलीप्सो संगीताची लय देखील निश्‍चितच तुमच्या पसंतीस उतरेल. (g १२/०६)

[तळटीप]

^ स्टील ड्रम्स वाजवणारे बॅण्ड्‌स बरेचदा कलीप्सो गीतांचे संगीत वाजवतात पण कलीप्सो गायक सहसा गिटार, ट्रम्पेट, सॅक्सोफोन आणि ड्रम्स या वाद्यांच्या तालावर गीते गातात.

[२८, २९ पानांवरील चित्रे]

स्टील ड्रम्स