व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गाढवांशिवाय इथे पान हलत नाही

गाढवांशिवाय इथे पान हलत नाही

गाढवांशिवाय इथे पान हलत नाही

इथियोपिया येथील सावध राहा! लेखकाकडून

अदिस अबाबा. इथियोपियाची राजधानी. जगातले १६ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर. या शहरातल्या रस्त्यांवर वाहतुकीचे प्रमुख माध्यम म्हणजे गाढव. इतर वाहनांच्या चालकांनी स्वतःला यांची सवय करून घेतली आहे. त्यांना माहीत आहे की गाढवे सहसा रस्ता चुकत नाहीत आणि कसेही करून ते आपल्या ठिकाणी पोचतात. गाढवांना तशी रहदारीची भीती वाटत नाही पण त्यांच्या पाठीवर सहसा भली मोठी ओझी असतात, शिवाय ते मागे वळून पाहात नाहीत. त्यामुळे, जर तुम्हाला कोळसा, शेण किंवा ते जे काही ओझे वाहून नेत असतील ते आपल्या अंगाला लागू नये असे वाटत असेल, तर तुम्ही स्वतःच त्यांच्या वाटेतून बाजूला झालेले बरे!

इथियोपियात अंदाजे पन्‍नास लाख गाढव आहेत. लोकसंख्येशी तुलना केल्यास दर १२ माणसांमागे एक गाढव आहे असे म्हणता येईल. लाखो इथियोपियन लोक दूरस्थ डोंगरमाथ्यांवर राहतात आणि या डोंगरांमध्ये खोल दऱ्‍या आहेत. देशाच्या मधल्या भागात असलेल्या मोठ्या पठार प्रदेशात असंख्य लहानमोठे झरे आहेत. अशा प्रदेशांत असलेल्या ठिकाणांपर्यंत पोचण्याकरता पूल, फार काय कच्चे रस्ते जरी बांधायचे ठरवले तरी देशाच्या अर्थव्यवस्थेवर बराच ताण पडेल. त्यामुळे, कोणतीही कुरकूर न करता, न चुकता इच्छित स्थळी पोचवणारे गाढव हे अर्थातच वाहतुकीचे आदर्श माध्यम ठरले आहे!

इथियोपियाच्या वैविध्यपूर्ण हवामानाशी गाढवे सहजासहजी जुळवून घेतात, मग ते सखल प्रदेशांतील कोरडे, उष्ण हवामान असो किंवा आल्पाईन प्रदेश असोत. शिवाय उभ्या सुळाचे रस्ते असोत, अरुंद फुटपाथ असो, खडकाळ नदीचे पात्र असो, चिखलाने भरलेले किंवा खडबडीत रस्ते असोत, गाढवाला फरक पडत नाही. घोडा किंवा उंट जेथे जाऊ शकत नाही तेथे गाढव जाऊन पोचते. लाखो लोक सामानाची नेआण करण्याकरता गाढवावरच अवलंबून असतात. विशेषतः शहरांमध्ये, कारण बरीच घरे अशा ठिकाणी आहेत की जेथे मोटारी जाऊ शकत नाहीत.

अगदी आडवळणाचे रस्ते असोत किंवा दोन्ही बाजूला कुंपण असलेल्या चिंचोळ्या गल्ल्या असोत, गाढव कोठूनही वाट काढते. ना टायरचा खर्च, ना निसरड्या रस्त्यांवरून घसरण्याची भीती. गाढव सर्व आकारांची व वजनांची ओझी वाहून नेण्यास व कोणत्याही ठिकाणी घरपोच सेवा देण्यास तयार असते. ट्राफिक जॅममध्ये अडकलेल्या मोटारींच्या चालकांना, चिडून शिव्याशाप देत गाडीचे हॉर्न वाजवण्याशिवाय पर्याय नसतो; पण गाढव मात्र गाड्यांच्या गर्दीतून अगदी सहज वाट काढते. वन-वे असलेल्या रस्त्यावर चुकीच्या बाजूने आलेल्या गाढवाला कोणताही पोलीस दंड करू शकत नाही. शिवाय, पार्किंगची डोकेदुखी नाही. गाढवाची किंमत जवळजवळ अडीच हजार रुपये (५० डॉलर) आहे खरी, पण मोटारींच्या किंमती पाहिल्या तर गाढव निश्‍चितच परवडण्यासारखे आहे!

राजधानीतील गाढवे

रोज सकाळी हजारोंच्या संख्येने गाढवे २५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून, ३० लाखांच्या घरात असलेल्या लोकसंख्येच्या अदीस आबाबा शहरात येऊन दाखल होतात. बुधवार आणि शनिवार तर फारच घाईगडबडीचे दिवस असतात कारण या दिवशी आठवड्याचा बाजार भरतो. इथपर्यंत यायलाच त्यांना जवळजवळ तीन तास लागतात त्यामुळे पहाटे सूर्य उगवण्याआधीच ते निघतात. कधीकधी त्यांचे मालक त्यांच्यासोबत चालतात, पण गाढवांइतके वेगाने चालता येत नसल्यामुळे सहसा ते त्यांच्या मागून धावत येतानाच दिसतात.

गाढवांवर कोणती ओझी लादली जातात? सहसा धान्याची पोती, भाजीपाला, जळण, सिमेंटची पोती, कोळसा, खाण्याच्या तेलाचे टिनाचे डबे आणि कोल्ड ड्रिंकच्या बाटल्यांची खोकी इत्यादी ओझी त्यांच्यावर लादली जातात. काही गाढवे ९० किलो किंवा त्यापेक्षाही जास्त वजन वाहू शकतात. वाहून न्यावयाच्या वस्तू लांब असतील, उदाहरणार्थ बांबू किंवा निलगिरी झाडांच्या फांद्या वाहून न्यायच्या असतील तर त्या गाढवाच्या दोन्ही बाजूला बांधल्या जातात, आणि गाढव त्यांना रस्त्यावरून फरपटत नेते. वाळलेल्या गवताचे मोठे ढिगारे लादलेल्या गाढवाचे दृश्‍य सर्वात मजेशीर असते; असे वाटते जणू काय गवताच्या त्या मोठ्या पेंढीला पाय फुटलेत आणि ती पुढे पुढे चालली आहे.

सकाळी जाडजूड ओझी घेऊन बाजाराकडे निघालेली गाढवे चांगलीच वेगाने चालताना दिसतात. पण दिवसभरची खरेदी विक्री संपली आणि पाठीवरची ओझी गेली की घरी परतताना ही गाढवे आरामशीर जातात, कधीकधी रस्त्याच्या कडेला गवत खायलाही थांबतात. सुटीच्या दिवशीही, गाढवांना पाणी भरणे, लाकूड आणणे यांसारख्या दररोजच्या कामांसाठी वापरले जाते. कधी दुसऱ्‍या कोणाला वापरण्यापुरते किंवा भाड्यानेही गाढव दिले जाते. काहीजण तर चक्क व्यावसायिक गाढव वाहतूक कंपन्या चालवतात व त्यांच्याकडे गाढवांचे “ताफे” असतात! काही ठिकाणी घोडागाड्यांसारख्या गाढवगाड्या असतात आणि कधीकधी दोन गाढवांची जोडी मोठी चारचाकी गाडी ओढून नेताना दिसते.

आदराचे स्थान

गाढवांना सांभाळणे तसे पाहायला गेलो तर सोपे असते. ते आपले अन्‍न स्वतः शोधतात आणि अगदी सर्व काही खातात. त्यांना चांगली वागणूक दिली तर, ते आपल्या मालकांना विश्‍वासू राहतात. बौद्धिक क्षमतेच्या बाबतीत, त्यांना घोड्यांपेक्षा जास्त बुद्धिमान मानले जाते. तसेच, त्यांची स्मरणशक्‍ती उत्तम असते. त्यांना रस्ते बरोबर लक्षात राहतात. सोबत कोणी गेले नाही तरीसुद्धा ते पाच मैल अंतरावरून पाणी आणू शकतात. फक्‍त दोन्ही ठिकाणी कोणीतरी ओझे लादण्यासाठी आणि उतरवण्यासाठी असले की झाले. कधीकधी त्यांच्या गळ्यात घंटा लावतात. म्हणजे रस्त्यात निरनिराळ्या ठिकाणी राहणाऱ्‍या लोकांना गाढव आले आहे हे समजते आणि ते आपापले सामान काढून घेतात.

गाढवे परिश्रमी असली तरी, ओझे किती जड असावे, किती चालावे, केव्हा आराम करण्यासाठी थांबावे यासंबंधी त्यांची काही ठाम मते असतात. जर गाढव चालूनचालून थकले किंवा ओझे फार जड झाल्यामुळे किंवा पाठीवर नीट न ठेवल्यामुळे जर अडचण होत असेल तर ते रस्त्यातच ताणून देते. कधीकधी यामुळे मालकाला गैरसमज होऊन तो त्याला शिव्याशाप देतो किंवा मारहाण करू लागतो. बायबलमध्ये दिलेला असाच एक वृत्तान्त तुम्हाला आठवत असेल.—गणना २२:२०-३१.

गाढवांशी विचारीपणे व काळजीने वागले पाहिजे. ओझे नीट न बांधल्यामुळे कधीकधी ते हलते आणि गाढव एखाद्या खड्ड्यात पडून त्याचा पाय मोडतो तेव्हा खूप वाईट वाटते. दुखापती, वेगवेगळ्या परजीवींमुळे होणारा त्रास, पायांना होणारा संसर्ग, न्युमोनिया व इतर समस्यांमुळे या परिश्रमी ओझी वाहणाऱ्‍यांना दुर्बलता येते. हे लक्षात घेऊन अदीस अबाबापासून काही अंतरावर असलेल्या डेब्रा झेट येथे एक अत्याधुनिक गाढवांचे इस्पितळ उघडण्यात आले आहे. यात कम्प्युटर, उपचारकक्ष, ॲम्ब्युलन्स, इतकेच काय तर गांढवांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रशस्त ऑपरेशन थिएटरसुद्धा आहे. २००२ साली एकूण ४०,००० गाढवांवर येथे कोणत्या न कोणत्या प्रकारचा उपचार करण्यात आला.

प्राचीन काळातील कुलप्रमुख अब्राहाम, मोरिया डोंगरावर जाताना त्या डोंगराळ वाटेवरून आपल्या गाढवासोबतच गेला होता. (उत्पत्ति २२:३) इस्राएल देशाच्या दीर्घ इतिहासादरम्यान गाढव हे दैनंदिन जीवनाचा भाग होते. येशू ख्रिस्ताने जेरूसलेम शहरात गाढवावर बसूनच विजयशाली राजाच्या रूपात प्रवेश केला होता.—मत्तय २१:१-९.

इथियोपिया देशातही गाढवांचा इतिहास खूप जुना आहे. आणि आजही लोकांच्या जीवनात त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. काळाच्या ओघात ट्रक्स, मोटारी यांचे स्वरूप बरेच बदललेले आढळते पण गाढवाचे मात्र पूर्वीचेच मॉडेल टिकून राहिले आहे. नक्कीच लोकांच्या मनात त्यांना आदराचे स्थान मिळाले पाहिजे! (g १२/०६)

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

‘The Donkey Sanctuary’, Sidmouth, Devon, UK