व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तिला शिकायला मिळालेल्या सत्यावर तिचे प्रेम होते

तिला शिकायला मिळालेल्या सत्यावर तिचे प्रेम होते

तिला शिकायला मिळालेल्या सत्यावर तिचे प्रेम होते

मे २००४ मध्ये कर्करोगाने मृत्यू होण्याआधी, एका स्त्रीने एक पत्र लिहिण्यास सुरुवात केली होती. तिला ते पत्र पूर्ण करता आले नाही, कारण अचानक तिची तब्येत खूपच खालावली. पण हे न पाठवलेले अधुरे पत्र ज्यांनी ज्यांनी वाचले त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. हे पत्र वाचल्यावर देवावरचा त्यांचा विश्‍वास आणखी दृढ झाला.

पत्रात, लेखिका सूझन सांगते की अमेरिकेतल्या कनेक्टिकट येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका ख्रिस्ती वडिलांना तिने पहिल्यांदा फोन केला होता, तेव्हा ती अवघ्या १४ वर्षांची होती. त्या कोवळ्या वयात तिला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले याविषयी ती पुढे सांगते. मागच्या वर्षी सूझनच्या आईला हे हेलावून सोडणारे पत्र मिळाले आणि तिने त्याची एक प्रत न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाला पाठवली.

सूझन लिहिते की तिला कनेक्टिकट येथील वडिलांचा दूरध्वनी क्रमांक १९७३ साली एका टेलिफोन डायरेक्टरीत सापडला होता. ती सांगते, “त्या वर्षी, १४ वर्षांची असताना टेहळणी बुरूजसावध राहा! ही मासिके वाचून मी ठरवले की हेच सत्य असावे. यापूर्वी मी कधीही यहोवाच्या साक्षीदारांना भेटले नव्हते. त्यामुळे मी डायरेक्टरीत शोधू लागले आणि त्यांचे नंबर सापडल्यावर असा एक नंबर निवडला ज्याचे पहिले आकडे माझ्या फोन नंबरसारखेच होते. ब्रदर गेन्रिक यांनी फोन उचलला तेव्हा त्यांना हे ऐकून आश्‍चर्य वाटले की मी पूर्वी कधीही साक्षीदारांना भेटले नव्हते.” *

पेचप्रसंग

सूझन तिच्या पत्रात सांगते की ती दहा वर्षांची असताना, तिला कनेक्टिकट येथे तिच्या मावशीच्या घरी राहण्यास पाठवण्यात आले. खरे तर तिला फक्‍त थोडे दिवस मावशीकडे राहण्यास पाठवले होते, पण काही काळानंतर सूझनने फ्लोरिडा येथे राहणाऱ्‍या आपल्या आईला कळवले की ती इथेच राहू इच्छिते. पत्रात सूझन सांगते की तिची परिस्थिती, “स्टॉकहोम सिंड्रम नावाचा मनोविकार झालेल्यांसारखी झाली होती. या विकारात व्यक्‍तीला आपला छळ करणाऱ्‍याबद्दल आपुलकी वाटू लागते.” * तिला खूपच वाईट वागणूक सहन करावी लागली.

“माझी मावशी आणि तिच्यासोबत राहणारा तिचा मित्र माझा खूप छळ करायचे. शिवाय, त्यांच्या घरी क्वचितच कोणी यायचं. शाळेला जायची परवानगी मिळाली तरीसुद्धा, माझ्याजवळ जेवणाचा डबा नसायचा, चांगले कपडे नसायचे. खरेतर माझी आई माझ्या खर्चासाठी पुरेसे पैसे पाठवत होती. तरीपण माझ्याजवळ आंतल्या कपड्यांचा एकच जोड होता. माझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान असलेल्या मावशीच्या मुलींजवळ मात्र, सर्व काही होते.” सूझनला बायबलबद्दल अधिक शिकून घेण्याची इच्छा आहे हे मावशीला समजणे किती धोक्याचे होते, हे स्पष्ट करण्यासाठी तिने ही सगळी पार्श्‍वभूमी लिहिली.

सूझनचे बायबलचे ज्ञान वाढत जाते

“ब्रदर गेन्रिक यांनी माझी ओळख लॉरा नावाच्या एका प्रौढ ख्रिस्ती बहिणीशी करून दिली. हळूहळू तिने बायबलवरील माझ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे दिली. सहसा आम्ही एका लाँड्रीत भेटायचो.” सूझन सांगते की यापूर्वी तिने कधीही स्वतःहून कोणतेच निर्णय घेतले नव्हते, पण या चर्चा केल्यानंतर आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते यांसारखी बायबल आधारित पुस्तके वाचल्यानंतर तिने निर्णय घेण्याचे ठरवले.

सूझन सांगते, “एका शुक्रवारी रात्री मी मावशीला सांगून टाकले की काही काळापासून मी साक्षीदारांसोबत चर्चा करत आहे. त्या रात्री तिने मला झोपू दिले नाही. रात्रभर मी स्वयंपाकघरात उभी होते. त्या दिवसानंतर साक्षीदार बनण्याचा माझा निर्णय आणखीनच पक्का झाला.”

तेव्हापासून ब्रदर गेन्रिक सुझनला बायबल समजण्यास मदत करण्यासाठी पुस्तके इत्यादी देत असत. सूझन लिहिते, “१९७४ सालचे यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक मी कधीही विसरू शकत नाही. कारण यात दुसऱ्‍या महायुद्धाच्या आधी व दरम्यान साक्षीदारांनी नात्सी जर्मनीत कशाप्रकारे छळ सोसले याविषयीचा वृत्तान्त होता. . . . तो वाचल्यानंतरच मी ब्रदर ग्रेनिक यांना माझ्याकरता राज्य गीते टेपवर रेकॉर्ड करण्याची विनंती केली. एका वर्षातच मी १९६६ सालच्या ‘सिंगिंग ॲन्ड अकंपनीइंग युवरसेल्व्स विथ म्युझिक इन युवर हाट्‌र्स’ या गीतपुस्तकातील सगळी म्हणजे ११९ गीते अनुक्रमाने गायला शिकले.”

“दरम्यान ब्रदर गेन्रिक माझ्यासाठी बायबल आधारित भाषणे, नाटके आणि संमेलनाच्या कार्यक्रमांच्या टेप्स देखील आणू लागले. ते रूट १० या रस्त्यावरील एका विशिष्ट टेलिफोनच्या खांबाजवळ या वस्तू आणून ठेवायचे आणि मग मी त्या तेथून उचलून आणायची . . . एव्हाना मला माझ्या परिस्थितीचा खूपच वैताग आला होता. कारण एकाही सभेला न जाता मी माझ्याने होईल तितकी प्रगती केली होती. मला वाटतं माझी शक्‍ती जणू संपली होती.”

सूझन सांगते की पुढची एकदोन वर्षे अत्यंत कठीण होती. तिची ओळख असलेल्या दोन्ही साक्षीदारांशी तिने संपर्क तोडला होता. पण मग ती सांगते की “ती सगळी गाणी शिकणे माझ्याकरता एक ‘पीडा’ ठरली.” का? कारण अचानक माझ्या मनात एका गीतातले शब्द यायचे, जसे ‘सोल्जर्स ऑफ जाह डू नॉट सीक ए लाईफ ऑफ ईज.’ (यहोवाचे सैनिक आरामशीर जीवनाची अपेक्षा करू शकत नाहीत.) मला माहीत होते की हे शब्द दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान जर्मनीतल्या छळ छावणीत असलेल्या एका साक्षीदाराने लिहिले होते आणि या जाणिवेने मला अधिकच बोचणी व्हायची. आपण भित्रट आहोत आणि यहोवाने आपल्याला सोडून दिले आहे असे मला वाटू लागले.” *

शेवटी मुक्‍तता मिळाली

“माझा १८ वा वाढदिवस माझ्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. कित्येक वर्षांपासून आमच्या घरी कोणीही साक्षीदार आलेला नव्हता कारण ‘या घरी जाऊ नये’ असे शीर्षक असलेल्या यादीत आमचे नाव होते. पण त्या दिवशी दुसऱ्‍या एका मंडळीची बहीण आमच्या घरी आली आणि घरी मी एकटीच असल्याने मला तिच्याशी बोलायला मिळाले. त्याआधी कधी शनिवारी मी घरी एकटीच असल्याचे मला आठवत नाही. यावरून माझी खात्री पटली, की यहोवाने अजूनही आपल्याला सोडून दिलेले नाही. त्यामुळे, मी पहिल्यांदा ज्यांच्याशी संपर्क केला होता त्या ब्रदर गेन्रिक यांना मी पुन्हा फोन केला आणि मी घर सोडायला तयार आहे असे सांगून त्यांचा सल्ला मागितला. शेवटी मला घर सोडून दुसरीकडे राहण्यास मदत करण्यात आली.”

सूझन १९७७ सालच्या एप्रिल महिन्यात दुसऱ्‍या ठिकाणी राहण्यास गेली. तिने पत्रात लिहिले, “पुढच्या वर्षभर मला सर्व सभांना व संमेलनांना उपस्थित राहता आले आणि मी सेवाकार्यातही सहभाग घेऊ लागले. मी आईशी पुन्हा संपर्क साधला. या सर्व वर्षांत मला किती वाईट वागणूक देण्यात आली होती याची तिला कल्पनाही नव्हती. तिला ऐकून धक्काच बसला. तिने लगेच मला आवश्‍यक असलेल्या सर्व गोष्टींची व्यवस्था केली. काही वर्षांआधी आई अलास्का येथे राहण्यास गेली होती. तिने बायबलमधील सत्यांविषयी खूप आवड दाखवल्यामुळे १९७८ साली मी अलास्काला तिच्याजवळ राहायला गेले. कालांतराने ती साक्षीदार बनली आणि आजपर्यंत ती विश्‍वासू राहिली आहे.

“मी सभांना जाऊ लागल्यानंतर ब्रदर. गेन्रिक यांनी ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयाला भेट देण्याकरता एक सामुहिक सहल आयोजित केली आणि त्यांनी मलाही सोबत येण्याचे निमंत्रण दिले. ही मला आजपर्यंत कोणीही दिलेली सर्वात मौल्यवान भेट होती. कारण या ट्रिपमुळे यहोवाच्या संघटनेविषयी माझ्या मनात जी कदर आणि कृतज्ञता निर्माण झाली ती शेवटपर्यंत राहील. झाले, आणखी काय लिहू? थोडक्यात लिहितेय कारण हे पत्र मला पूर्ण करायचे आहे.”

वरील मजकूर खरे तर एकेका ओळीचे अंतर ठेवून लिहिलेल्या साडे सहा पानांच्या पत्रातील काही अंश आहेत. अपूर्ण पत्राच्या शेवटी सूझनने लिहिले, “मागच्या महिन्यात अचानक मला खूप वाईट झटका आला. मला वाटले आता मी जाते . . . मी यहोवाला प्रार्थना केली की जर मला दोन आठवड्यांचे आरोग्य मिळाले तर मी उरलेल्या काही गोष्टी करू इच्छिते. . . . आता माझ्या हातात जास्त वेळ नाही, पण मला एवढंच म्हणावंसं वाटतं की सत्यात आल्यानंतरची ही वर्षं अद्‌भुत होती. यापेक्षा आणखी चांगले जीवन काय असू शकेल?”

शेवटी तिने काहीही लिहिले नाही, नावसुद्धा लिहिले नाही. आणि हे पत्र तिने कोणालाही पाठवले नाही. ज्यांना ते सापडले त्यांना ते कोणाला द्यावे हे माहीत नव्हते. पण याआधी उल्लेख केल्याप्रमाणे ते सूझनच्या आईला पाठवण्यात आले.

सूझनबद्दल थोडी माहिती

एप्रिल १४, १९७९ रोजी सूझनचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तिची आई फ्लोरिडाला परतली. पण सूझनची नॉर्थ पोल मंडळीच्या बंधूभगिनींशी खूप जवळची मैत्री जुळल्यामुळे ती अलास्कामध्येच राहिली. त्यानंतर काही काळातच तिने पायनियर म्हणून पूर्णवेळेची सेवा सुरू केली. शेवटी ती फ्लोरिडा येथे राहण्यास आली आणि १९९१ साली ख्रिस्ती वडील व तिच्यासारखेच पायनियर असलेल्या एका बांधवाशी तिचे लग्न झाले. सूझनचा मृत्यू झाल्यानंतर काही काळातच त्यांचाही मृत्यू झाला.

सूझन व तिचे पती मंडळीत सर्वांचे लाडके जोडपे होते. तिच्या आजारपणामुळे तिला सेवाकार्य करणे शक्य नव्हते. पण तोपर्यंत त्या दोघांनी मिळून पूर्णवेळेच्या सेवेत सहभाग घेतला. एकूण २० वर्षे तिने पूर्णवेळेच्या सेवेत घालवली. फ्लोरिडा येथे झालेल्या तिच्या अंत्यविधीचा कार्यक्रम नॉर्थ पोल मंडळीला दूरध्वनीने प्रक्षेपित करण्यात आला.

सूझनचे पत्र आपल्याला, जे यहोवाची सेवा करतात व ज्यांना पुनरुत्थानाची आशा आहे ते आध्यात्मिकरित्या किती आशीर्वादित आहेत याची आणखी प्रकर्षाने जाणीव करून देते. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) तसेच यहोवाच्या जवळ येणाऱ्‍या सर्वांच्या तोही जवळ येतो हे देखील सूझनच्या अनुभवावरून सिद्ध होते!—याकोब ४:७, ८. (g १२/०६)

[तळटीपा]

^ बंधू गेन्रिक व त्यांची पत्नी १९९३ साली एका दुःखद दुर्घटनेत दगावले.

^ सावध राहा!, डिसेंबर २२, १९९९ अंकातील पृष्ठ ७ पाहावे.

^ सिंग प्रेझेस टू जेहोवा, गीत क्र. २९, “फॉर्वड, यू विटनेसेस!”

[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]

“सत्यात आल्यानंतरची ही वर्षं अद्‌भुत होती. यापेक्षा आणखी चांगले जीवन काय असू शकेल?”

[२१ पानांवरील चित्र]

सूझन दहा वर्षांची असताना

[२३ पानांवरील चित्र]

सूझन व तिचे पती, जेम्स सेमूर