व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने दुःख अजूनपर्यंत का राहू दिले आहे?

देवाने दुःख अजूनपर्यंत का राहू दिले आहे?

देवाने दुःख अजूनपर्यंत का राहू दिले आहे?

कधीकधी “का?” असा प्रश्‍न विचारणारी व्यक्‍ती उत्तराबरोबर सांत्वनही मिळवू पाहते कारण पुष्कळ हानी झाल्यानंतर जेव्हा ती प्रश्‍न विचारते तेव्हा तिला पुष्कळ सांत्वनाची देखील गरज असते. बायबलमध्ये अशा लोकांसाठी सांत्वन आहे का? या विषयाशी संबंधित असलेल्या बायबलमधील तीन महत्त्वपूर्ण सत्यांची आपण चर्चा करूया.

पहिले, देवाने दुःख अजूनपर्यंत का राहू दिले आहे? असा प्रश्‍न विचारण्यात काहीही चूक नाही. काही लोकांना वाटते, की असा प्रश्‍न विचारल्याने, देवावर आपला विश्‍वास नाही किंवा आपण त्याचा अनादर करतो. पण, तुम्ही जर प्रामाणिकपणे असा प्रश्‍न विचारत असाल तर तुम्ही त्या लोकांप्रमाणे आहात ज्यांनी देखील असाच प्रश्‍न देवाला केला होता. विश्‍वासू संदेष्टा हबक्कूक याने देवाला विचारले होते: “मला अधर्म का पाहावयास लावितोस? विपत्ति मला का दाखवितोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.” (हबक्कूक १:३) हबक्कूकने यहोवा देवाला असा प्रश्‍न केला म्हणून यहोवाने त्याला शिक्षा दिली नाही. उलट या विश्‍वासू मनुष्याचे हे प्रश्‍न देवाने आपल्या वचनात लिखित केले जेणेकरून आपण ते वाचू शकू.—रोमकर १५:४.

दुसरे, तुम्ही जेव्हा दुःखात असता तेव्हा देवाला तुमची सहानुभूती वाटते, ही गोष्ट तुम्ही समजून घेणे महत्त्वाचे आहे. देव अंतर देत नाही किंवा गूढपणे वागत नाही; त्याला “न्याय प्रिय आहे,” आणि ज्यामुळे दुःख होते त्या दुष्टाईचा त्याला वीट येतो. (स्तोत्र ३७:२८; नीतिसूत्रे ६:१६-१९) नोहाच्या दिवसांत पृथ्वीवर लोकांमधील हिंसाचार पाहून “त्याच्या चित्ताला खेद झाला.” (उत्पत्ति ६:५, ६) देव बदललेला नाही; त्यामुळे आज जे काही घडत आहे याबद्दल आजही त्याला पूर्वीसारखेच वाटते.—मलाखी ३:६.

तिसरे, देव दुष्टाई घडवून आणत नाही. बायबल याविषयीची स्पष्ट माहिती देते. जे लोक खून आणि दहशतवाद यासाठी देवाला जबाबदार ठरवतात ते खरे तर त्याचे नाव खराब करत आहेत. ईयोब ३४:१० मध्ये काय म्हटले आहे पाहा: “देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाहि करावयाला नको.” तसेच याकोब १:१३ मध्ये म्हटले आहे: “कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहांत घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहांत पाडीत नाही.” यास्तव, तुमच्याशी जर कोणी दुष्टपणे वागले असेल तर देव यास कारणीभूत नाही, ही खात्री तुम्ही बाळगू शकता.

जगावर कोण राज्य करतो?

वरील माहिती उल्लेखनीय असली तरी आपल्या मनात हा प्रश्‍न राहतोच, की जर देव प्रीती, न्यायप्रिय, शक्‍तिशाली आहे तर आपल्या अवतीभोवती दुष्ट कृत्ये का घडत आहेत? सर्वात आधी आपल्याला एक चुकीचा ग्रह सुधारावा लागेल. अनेक लोक असा विचार करतात, की सर्वशक्‍तिमान देव या जगावर राज्य करतो, सर्व गोष्टींवर त्याचे नियंत्रण आहे. काही तर असेही म्हणतात की ‘त्याच्या मर्जीशिवाय एकही पान हलत नाही.’ पण बायबल अशी शिकवण देते का?

नाही. जगावर कोण राज्य करतय, याबाबतीत बायबल काय शिकवते हे ऐकून पुष्कळ लोकांना आश्‍चर्य वाटते. उदाहरणार्थ, १ योहान ५:१९ मध्ये असे म्हटले आहे: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” हा दुष्ट कोण आहे? येशू ख्रिस्ताने त्याची ओळख दियाबल सैतान अशी दिली. त्याला “जगाचा अधिकारी” म्हटले आहे. (योहान १४:३०) आता तुम्हाला समजले का, जगात इतकी दुष्टाई व दुःख का आहे ते? सैतान क्रूर, फसवा आणि द्वेषपूर्ण आहे. याच गुणांमुळे आज बहुतेक लोकांना दुःख सहन करावे लागत आहे. पण मग देव सैतानाला राज्य का करू देत आहे?

एदेन बागेतील वादविवाद

एका प्रेमळ व समर्थ पालकावर सर्व लोकांसमक्ष, तो आपल्या मुलांशी खोटे बोलतो, त्यांच्यावर अधिकार गाजवण्याची त्याची पद्धत चुकीची आहे, तो त्यांच्यापासून चांगल्या गोष्टी लपवून ठेवतो, असे आरोप लावण्यात आले तर त्याला कसे वाटेल? ज्याने पालकावर असे आरोप केले आहेत त्याला मारहाण करून पालक आपल्यावर लावलेल्या आरोपांचे खंडन करील का? मुळीच नाही. उलट, अशा पद्धतीने प्रतिक्रिया दाखवून तो पालक त्याच्यावरील आरोपांना पुष्टी देईल.

या उदाहरणावरून आपल्याला, मानव इतिहासाच्या सुरुवातीला एदेन बागेत जेव्हा यहोवाच्या अधिकार करण्याच्या पद्धतीवर शंका घेण्यात आली तेव्हा यहोवा देवाने तो प्रश्‍न कसा हाताळला हे समजते. एदेन बागेत देवाने पहिल्या मानवांना अर्थात आदाम व हव्वेला आपल्या पार्थिव मुलांसाठी एका अद्‌भुत प्रकल्पाविषयी सांगितले. त्यांना संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकायची होती, ती सत्तेखाली आणायची होती आणि तिला बागेसमान बनवायचे होते. (उत्पत्ति १:२८) शिवाय, देवाचे लाखो आत्मिक पुत्र देखील या अद्‌भुत प्रकल्पाविषयी उत्सुक होते!—ईयोब ३८:४, ७; दानीएल ७:१०.

यहोवा देव मोठ्या मनाचा असल्यामुळे त्याने आदाम व हव्वेला एका सुंदर बागेत ठेवले. आणि या बागेत पुष्कळ लज्जतदार फळांची झाडे होती. केवळ एका झाडाचे फळ—“बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करुन देणाऱ्‍या झाडाचे फळ” खाण्यास त्यांना मनाई होती. या झाडाचे फळ न खाण्याद्वारे आदाम व हव्वा आपल्या पित्यावर आपला पूर्ण भरवसा आहे हे दाखवू शकले असते. आपल्या मुलांसाठी काय बरोबर आहे व काय चूक आहे हे केवळ त्यालाच ठरवण्याचा हक्क आहे, हे त्यांनी कबूल केले असते.—उत्पत्ति २:१६, १७.

पण दुःखाची गोष्ट अशी घडली, की देवाच्या आत्मिक पुत्रांपैकी एकाच्या मनात, चुकीची इच्छा उत्पन्‍न झाली; लोकांनी आपली उपासना करावी असे त्याला वाटू लागले. त्यामुळे त्याने हव्वेला सांगितले, की तिने जर मना केलेले फळ खाल्ले तर ती मरणार नव्हती. (उत्पत्ति २:१७; ३:१-५) त्यामुळे या दुष्ट देवदूताने अर्थात सैतानाने देवाने जे सांगितले होते त्याच्या अगदी विरुद्ध तिला सांगितले; दुसऱ्‍या शब्दात त्याने देवाला चक्क लबाड ठरवले! सैतान इतक्यावरच थांबला नाही. देवाने आदाम व हव्वेपासून खूप महत्त्वाची माहिती लपवून ठेवली आहे, असाही त्याने देवावर आरोप केला. बरोबर काय व चूक काय हे मानवांनी स्वतः ठरवले पाहिजे, असे सैतानाने सुचवले. थोडक्यात, सैतानाने देवावर असा आरोप लावला की देव अयोग्य शासक व पिता होता. देवाऐवजी आपल्याला ही कामगिरी दिल्यास आपण ती चांगल्याप्रकारे पार पाडू, असे तो सुचवू पाहत होता.

या धूर्त व दुष्ट लबाडींद्वारे या देवदूताने स्वतःला दियाबल सैतान बनवले. दियाबल व सैतान या नावांचा अर्थ “विरोधक” व “निंदक” असा होतो. आदाम व हव्वेने काय केले? त्यांनी देवाकडे पाठ फिरवली आणि सैतानाची कड घेतली.—उत्पत्ति ३:६.

यहोवा या सर्व बंडखोरांना जागच्या जागी ठार मारू शकला असता. पण आधी आपल्या उदाहरणात उल्लेख केल्याप्रमाणे अशाप्रकारचे वाद हिंसक प्रतिक्रिया दाखवून सोडवता येत नाहीत. आणि सैतानाने जेव्हा देवावर खोटे आरोप लावले तेव्हा कोट्यवधी देवदूत ऐकत होते, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. खरे पाहता, बऱ्‍याच मोठ्या संख्येचे देवदूत सैतानाला जाऊन मिळाले; हे किती देवदूत होते, त्याविषयी बायबलमध्ये काही सांगितलेले नाही. अशाप्रकारे या देवदूतांनी स्वतःला दुरात्मे बनवले.—मार्क १:३४; २ पेत्र २:४; यहुदा ६.

देवाने अजूनपर्यंत हस्तक्षेप का केला नाही?

सैतानाने आदाम आणि हव्वेला आपल्या निर्माणकर्त्यापासून स्वतंत्र होण्यास प्रवृत्त केले खरे, परंतु खरे पाहता त्याने असे एक कुटुंब तयार केले जे खरोखर स्वतंत्र नव्हते तर त्याच्या कह्‍यात होते. जाणूनबुजून अथवा अजाणतेत, हे कुटुंब आपला ‘बाप’ दियाबल याची ध्येये आणि वर्तन स्वीकारू लागले. (योहान ८:४४) परंतु यामुळे त्यांना खरे स्वातंत्र्य व चिरकालिक आनंद मिळणार होता का? नाही; आणि हे यहोवाला चांगल्याप्रकारे माहीत होते. तरीपण त्याने या बंडखोरांना त्यांच्या मर्जीनुसार वागण्याची परवानगी दिली. कारण केवळ याच मार्गाने एदेन बागेत उठलेल्या प्रश्‍नाचा कायमचा सोक्षमोक्ष लावता येणार होता.

आता सुमारे ६,००० पेक्षा अधिक वर्षांपासून मानवजातीने एक जागतिक व्यवस्थीकरण बनवले आहे; सर्व प्रकारच्या शासनपद्धतींचा प्रयोग करून पाहिला, वर्तनाचे नियम करून पाहिले. याचा जो परिणाम आहे तो पाहून तुम्हाला आनंद होतो का? मानव कुटुंब खरोखरच आनंदी, सुखी आणि एकजूट आहे का? याचे स्पष्ट उत्तर नाही, असे आहे! उलट, मानवजात युद्धे, अन्‍नटंचाई, नैसर्गिक आपत्ती, आजारपण आणि मृत्यू यांनी जर्जर झाली आहे. आणि बायबलनुसार याचा परिणाम ‘व्यर्थता,’ “वेदना” व ‘कण्हणे’ हाच आहे.—रोमकर ८:१९-२२; उपदेशक ८:९.

तरीपण काहीजण विचारतील, ‘देवाने दुर्घटना होण्याचे का टाळले नाही?’ असे जर देवाने केले तर तो अन्याय ठरेल, आणि त्यामुळे लोक गोंधळून जातील. त्यांना वाटेल, की देवाविरुद्ध बंड केले तर कोणतेही वाईट परिणाम उद्‌भवत नाहीत. त्यामुळे, त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केल्यामुळे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे घडणारे सर्व गुन्हे व दुर्घटना यांना तो टाळण्यापासून गुप्तपणे रोखत नाही. * सैतानाचे व्यवस्थीकरण यशस्वी झाले आहे, त्याच्याजवळ आनंदाची गुरूकिल्ली आहे या हानीकारक लबाडीला यहोवा कधीही पाठबळ देणार नाही. परंतु याचा अर्थ ज्या दुर्घटना होतात त्यांच्याबद्दल यहोवाला काही वाटत नाही असे नाही. उलट तो एका कार्यात सक्रिय आहे; याविषयी आपण पुढे पाहणार आहोत.

‘माझा पिता काम करीत आहे’

येशूच्या या शब्दांवरून दिसते, की देव सर्व गोष्टींकडे पाहत स्वस्थ बसलेला नाही. (योहान ५:१७) एदेन बागेतील बंडाळीनंतर तो एका कामात व्यग्र झाला आहे. उदाहरणार्थ, त्याने बायबल लेखकांना एका भावी ‘संततीविषयी’ तो करत असलेले अभिवचन लिहून ठेवण्याची प्रेरणा दिली. हे संतान सैतान आणि त्याची कड घेणाऱ्‍यांचा नाश करणार आहे. (उत्पत्ति ३:१५) तसेच, या संतानाकरवी देव एक सरकार अथवा स्वर्गीय राज्य स्थापन करणार होता जे आज्ञाधारक मानवजातीला आशीर्वादित करेल आणि सर्वप्रकारच्या दुःखांचा आणि मृत्यूचा सुद्धा अंत करेल.—उत्पत्ति २२:१८; स्तोत्र ४६:९; ७२:१६; यशया २५:८; ३३:२४; दानीएल ७:१३, १४.

ही अद्‌भुत अभिवचने पूर्ण करण्याकरता यहोवाने त्या राज्याचा जो प्रमुख राजा बनणार होता त्याला पृथ्वीवर पाठवले. हा राजा, दुसरा तिसरा कोणी नसून येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता. (गलतीकर ३:१६) देवाने त्याला ज्या उद्देशासाठी पाठवले त्या उद्देशाप्रमाणे त्याने देवाच्या राज्याची शिकवण देण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. (लूक ४:४३) खरे तर, त्या राज्याचा राजा म्हणून येशू भविष्यात काय काय साध्य करणार आहे याची त्याने एक झलक दाखवली. त्याने हजारोंना जेवू घातले, रोग्यांना बरे केले, मृतांना उठवले आणि एका समुद्री वादळाला शांत करून, नैसर्गिक शक्‍तींवरही ताबा असल्याचे दाखवले. (मत्तय १४:१४-२१; मार्क ४:३७-३९; योहान ११:४३, ४४) येशूविषयी बायबल म्हणते: “देवाची वचने कितीहि असोत, त्याच्या ठायी होय हे आहे.”—२ करिंथकर १:२०.

जे येशूची वाणी ऐकतात आणि “जगातून” अर्थात देवापासून दूर गेलेले व ज्याच्यावर सैतानाचे राज्य आहे अशा व्यवस्थीकरणातून बाहेर येतात त्यांचे यहोवाच्या कुटुंबात स्वागत केले जाते. (योहान १५:१९) खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी मिळून बनलेल्या या विश्‍वव्यापी कुटुंबातील सदस्यांमध्ये बायबल तत्त्वांवर आधारित प्रेम आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा शांती राखण्याचा उद्देश आहे. शिवाय, प्रत्येकाने जणू काय कोणत्याप्रकारचा पूर्वग्रह, असहिष्णुता अथवा जातीभेदाचा लवलेश काढून टाकण्याचा निर्धारच केला आहे.—मलाखी ३:१७, १८; योहान १३:३४, ३५.

मत्तय २४:१४ मधील येशूच्या आज्ञेचे पालन करत खरे ख्रिस्ती सध्याच्या जगाला पाठबळ देण्याऐवजी देवाच्या राज्याचा पक्ष घेतात. जरा विचार करा: ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार संपूर्ण जगभरात कोण करत आहे? विश्‍वव्यापी आध्यात्मिक कुटुंब म्हणून युद्धांत, राष्ट्रीय व जातीय वादांत भाग घेण्यास कोण नकार देतात? देवाच्या वचनातील वर्तनाबाबतचे दर्जे लोक स्वीकारत असले किंवा नसले तरी, कोणते लोक आज त्यानुसार चालत आहेत? (१ योहान ५:३) पुष्कळ लोकांना यहोवाच्या साक्षीदारांमध्ये हे गुण पाहायला मिळतात. हवे तर तुम्ही स्वतः त्यांचे परीक्षण करू शकता.

देवाचे शासन निवडा!

देवापासून दुरावलेल्या व सैतानामुळे भरकटलेल्या मानवजातीने असे एक व्यवस्थीकरण बनवले आहे जे दुःख आणि निराशाच उत्पन्‍न करत आहे. या व्यवस्थीकरणामुळे पृथ्वीग्रह देखील बिघडला आहे. परंतु, यहोवाने एक स्वर्गीय सरकार स्थापन केले आहे ज्याच्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन सुधारले आहे. शिवाय प्रत्येकाला एक पक्की आशा मिळाली आहे. (१ तीमथ्य ४:१०) तुम्ही काय निवडणार?

निवड करण्याची आता वेळ आहे. कारण सैतान आणि त्याच्या दुष्ट जगाला अमर्यादित काळासाठी यहोवा राहू देणार नाही. या पृथ्वीला नंदनवन बनवण्याचा देवाचा उद्देश बदललेला नाही. त्यासाठी, त्याचे राज्य आणि या राज्याचे पुरस्कर्ते आणखी मजबूत होतील तर सैतानाच्या कह्‍यात असलेले जग, देव त्याचा अंत करेपर्यंत वाढत चाललेल्या “वेदनांचा” अनुभव घेईल. (मत्तय २४:३, ७, ८) यास्तव तुम्ही जर देवाला, “का?” अशी हाक मारली असेल तर बायबलमध्ये दिलेल्या सांत्वनदायक व आशेच्या संदेशावर विश्‍वास ठेवून त्याचे ऐका. आताही तुमचे दुःखाश्रू, आनंदाश्रू बनू शकतात.—मत्तय ५:४; प्रकटीकरण २१:३, ४. (g ११/०६)

[तळटीप]

^ काही प्रसंगी यहोवाने मानव व्यवहारांत हस्तक्षेप केला असला तरी, त्याची कार्ये सध्य व्यवस्थीकरणाला पाठबळ देत नाहीत. उलट, त्याच्या कार्यांनी त्याचा उद्देश साध्य होतो.—लूक १७:२६-३०; रोमकर ९:१७-२४.

[७ पानांवरील चित्रे]

मानवी शासनाचे परिणाम पाहून तुम्हाला समाधान मिळते का?

[चित्राचे श्रेय]

बाळ: © J. B. Russell/Panos Pictures; रडणारी स्त्री: © Paul Lowe/Panos Pictures

[८, ९ पानांवरील चित्र]

येशू पृथ्वीला पुन्हा नंदनवन बनवेल व मृतांनाही पुन्हा जिवंत करेल