व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेमात पडलेल्या युगुलाने विवाहाआधी सेक्स संबंध ठेवणे उचित आहे का?

प्रेमात पडलेल्या युगुलाने विवाहाआधी सेक्स संबंध ठेवणे उचित आहे का?

बायबलचा दृष्टिकोन

प्रेमात पडलेल्या युगुलाने विवाहाआधी सेक्स संबंध ठेवणे उचित आहे का?

किशोरवयीनांच्या एका सर्व्हेतील जवळजवळ ९० टक्के मुलामुलींनी म्हटले, की एक मुलगा व एक मुलगी जर एकमेकांवर प्रेम करत असतील तर त्यांनी विवाहाआधी सेक्स संबंध ठेवण्यात काहीही गैर नाही. प्रसारमाध्यमात ही विचारधारणा दिसून येते व बहुतेकदा ती खपवूनही घेतली जाते. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये सर्रासपणे, सेक्स हे एकमेकांवर प्रेम करणाऱ्‍यांमध्ये सर्वसामान्य आहे, असेच दाखवले जाते.

परंतु जे देवाला संतुष्ट करू पाहतात ते जगाकडून मार्गदर्शन प्राप्त करायचा प्रयत्न करत नाहीत. कारण त्यांना ही जाणीव आहे, की हे जग, दियाबल जो या जगाचा शासक आहे त्याची विचारसरणी प्रतिबिंबित करते. (१ योहान ५:१९) शिवाय ते भावनांच्याही आहारी जात नाहीत कारण त्यांना माहीत आहे, की “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्मया १७:९) या ऐवजी जे खरोखरच सुज्ञ आहेत ते आपल्या निर्माणकर्त्याकडे आणि त्याचे प्रेरित वचन बायबल यातून मार्गदर्शन मिळवतात.—नीतिसूत्रे ३:५, ६; २ तीमथ्य ३:१६.

सेक्स—देवाकडून मिळालेली एक भेट

“प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; . . . ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते,” असे याकोब १:१७ मध्ये म्हटले आहे. विवाहाच्या चाकोरीत राहून उपभोगले जाणारे लैंगिक संबंध हे त्या उत्तम देणग्यांतील एक आहे. (रूथ १:९; १ करिंथकर ७:२, ७) लैंगिक संबंधांमुळे मनुष्य, संतान उत्पन्‍न करू शकतात. शिवाय त्यामुळे पती व पत्नी शारीरिकरीत्या व भावनिकरीत्या एकमेकांच्या अगदी कोमल व सुखकररीत्या जवळ येतात. प्राचीन काळच्या राजा शलमोनाने लिहिले: “तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. . . . तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत.”—नीतिसूत्रे ५:१८, १९.

यहोवा देत असलेल्या देणग्यांचा आपल्याला लाभ व्हावा, त्यांच्यामुळे आपण हर्षित व्हावे असे त्याला वाटते, हे साहजिक आहे. म्हणूनच तर त्याने सर्वात उत्तम नियम व तत्त्वे दिली आहेत ज्यांद्वारे आपण जगू शकतो. (स्तोत्र १९:७, ८) यहोवा आपल्याला ‘जे हितकारक ते शिकवतो; ज्या मार्गाने आपण गेले पाहिजे त्याने आपल्याला नेतो.’ (यशया ४८:१७) तेव्हा, आपला स्वर्गीय पिता जो प्रीतीचे मूर्तीमंत रूप आहे तो आपल्याला जे खरोखर आनंददायक आहे त्या गोष्टीपासून वंचित करेल का?—स्तोत्र ३४:१०; ३७:४; ८४:११; १ योहान ४:८.

विवाहाआधी सेक्स संबंध ठेवणे हे प्रेम नव्हे

स्त्री व पुरुष विवाह करतात तेव्हा ते जणू काय “एकदेह” होतात. दोन अविवाहित लोक व्यभिचार करतात अर्थात लैंगिक संबंध ठेवतात तेव्हा तेही “एकशरीर” होतात खरे परंतु त्यांचे हे एक होणे देवाच्या नजरेत अशुद्ध आहे. * एवढेच नव्हे तर अशाप्रकारचे संबंध हे प्रेमाचे लक्षण नाही. ते कसे?—मार्क १०:७-९; १ करिंथकर ६:९, १०, १६.

कोणत्याही प्रकारच्या खऱ्‍या वचनबद्धतेविना ठेवल्या जाणाऱ्‍या लैंगिक संबंधांना व्यभिचार म्हटले जाते. व्यभिचार करणारे लोक स्वाभिमान गमावतात; तसेच व्यभिचाराचे परिणाम, लैंगिक आजार, नको असलेली गर्भधारणा आणि भावनिक वेदना हे होय. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यभिचार करणारे लोक देवाच्या धार्मिक दर्जांचे उल्लंघन करतात. म्हणूनच, व्यभिचारी लोकांना इतरांच्या कल्याणाची किंवा सुखाची सध्यासाठी किंवा भवितव्यासाठीही जरासुद्धा काळजी नसते.

परंतु एका खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीला, व्यभिचार हे आपल्या आध्यात्मिक भावाच्या अथवा बहिणीच्या हक्कांवर अतिक्रमण करण्यासारखे वाटते. (१ थेस्सलनीकाकर ४:३-६) उदाहरणार्थ, देवाचे सेवक असल्याचा दावा करत असलेले, विवाहबाह्‍य लैंगिक संबंध ठेवतात तेव्हा ते ख्रिस्ती मंडळी अशुद्ध करतात. (इब्री लोकांस १२:१५, १६) तसेच, ते जिच्याबरोबर व्यभिचार करतात अशा व्यक्‍तीला शुद्ध विवेक बाळगण्यापासून आणि जर ही व्यक्‍ती अविवाहित असेल तर तिला नैतिकरीत्या शुद्ध असलेल्या भावी विवाहापासून वंचित ठेवतात. शिवाय, ते आपल्या कुटुंबावर तसेच ज्या व्यक्‍तीबरोबर व्यभिचार करतात तिच्या कुटुंबावरही काळीमा फासतात. आणि या सर्वापेक्षा ते देवाबद्दल घोर अनादर दाखवतात. त्याच्या धार्मिक नियमांचे व तत्त्वांचे उल्लंघन करून ते त्याचे मन दुःखी करतात. (स्तोत्र ७८:४०, ४१) त्यामुळे अशी वाईट कृत्ये करणाऱ्‍या अपश्‍चात्तापी लोकांना यहोवा “शासन” करणार आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:६) यास्तव बायबल जेव्हा “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा” असे जे म्हणते ते उगाच आहे का?—१ करिंथकर ६:१८.

तुम्ही प्रेमात पडला आहात का व तुम्ही लग्न करायचा विचार करत आहात का? तर, लग्नाआधीच्या गाठीभेटींत एकमेकांचा भरवसा आणि आदर मिळवण्याचा प्रयत्न का करू नये? विचार करा: ज्याला आत्म-संयम राखता येत नाही अशा पुरुषावर एखादी स्त्री कसा काय पूर्ण भरवसा ठेवू शकते? आणि जी स्त्री आपल्या प्रेमभावना तृप्त करण्याकरता किंवा पुरुषाला संतुष्ट करण्याकरता देवाच्या नियमांना पायदळी तुडवते तिच्यावर प्रेम करण्यास किंवा तिचा आदर करण्यास एखाद्या पुरुषाला कसे आवडेल?

देवाच्या प्रेमळ दर्जांना पायदळी तुडवणाऱ्‍यांना, ते जे काही पेरतात त्याचे पीक मिळेल, ही गोष्टही आपण लक्षात ठेवली पाहिजे. (गलतीकर ६:७) बायबल म्हणते: “जो जारकर्म करितो तो आपल्या शरीराबाबत पाप करितो.” (१ करिंथकर ६:१८; नीतिसूत्रे ७:५-२७) विवाहाआधी लैंगिक संबंध ठेवलेले एखादे जोडपे मनापासून पश्‍चात्ताप करत असेल, देवाबरोबरचा बिघडलेला नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असेल व एकमेकांवरील भरवसा आणखी पक्का बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या मनातील दोषी भावना हळूहळू कमी होईल हे खरे आहे. तरीपण, सहसा त्यांच्या गत वर्तनाचा व्रण हा तसाच राहतो. ज्यांचे आता लग्न झाले आहे अशा एका तरुण जोडप्याला, त्यांनी व्यभिचार केल्याचा खूप पस्तावा होत आहे. ‘आपल्या लग्नात होणाऱ्‍या कुरबुरी, आपल्या लग्नाचा पायाच अशुद्ध असल्यामुळे तर नाहीत ना?’ असा प्रश्‍न कधीकधी नवऱ्‍याच्या मनात येतो.

खरे प्रेम निःस्वार्थ असते

एकमेकांवर प्रेम करणाऱ्‍या युगुलाच्या मनात प्रणयी भावना असल्या तरी, खरे प्रेम, ‘गैरशिस्त वागत नाहीत’ किंवा आपलाच ‘स्वार्थ पाहत नाहीत.’ (१ करिंथकर १३:४, ५) उलट, ते दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या कल्याणाच्या व सार्वकालिक आनंदाच्या दिशेने कार्य करतात. अशाप्रकारचे प्रेम स्त्री-पुरुषाला एकमेकांचा आदर करण्यास व लैंगिक जवळीक केवळ देवाने ठरवलेल्या उचित वेळी अर्थात वैवाहिक अंथरुणावर उपभोगण्यास प्रवृत्त करते.—इब्री लोकांस १३:४.

खरोखर आनंदी असलेल्या विवाहात भरवसा आणि सुरक्षिततेची भावना असते. ज्यांच्या संसार वेलीवर कळी उमलणार असेल अर्थात ज्या जोडप्याच्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असेल त्या जोडप्याने खासकरून असे गुण दाखवणे आवश्‍यक आहे, कारण मुलांचे संगोपन एका प्रेमळ, स्थिर व सुरक्षित वातावरणात व्हावे, असा देवाचा उद्देश आहे. (इफिसकर ६:१-४) केवळ विवाहातच दोन व्यक्‍ती एकमेकांना खरोखर वचनबद्ध असतात. आपल्या अंतःकरणात आणि आपल्या बोलण्यातही ते, जीवनाच्या प्रत्येक चढउतारात एकमेकांची काळजी घेण्याची, एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची शपथ घेतात.—रोमकर ७:२, ३.

पतीपत्नीतील लैंगिक जवळीकीमुळे त्यांच्यातील बंध आणखी मजबूत होतात. सुखी विवाहातील पतीपत्नीला लैंगिक जवळीक अधिक सुखकर व अर्थपूर्ण वाटते. त्यांचा संगम, असभ्य, विवेकास बोचणारा किंवा निर्माणकर्त्याच्या आज्ञांचे उल्लंघन करणारा नसतो. (g ११/०६)

तुम्हाला काय वाटते?

विवाहाआधी सेक्स संबंधांविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे?—१ करिंथकर ६:९, १०.

व्यभिचार हानीकारक का आहे?—१ करिंथकर ६:१८.

प्रेमात पडलेला मुलगा व मुलगी खरे प्रेम कसे दाखवू शकतात?—१ करिंथकर १३:४, ५.

[तळटीप]

^ “व्यभिचार” असे भाषांतर करण्यात आलेला ग्रीक शब्द, इतर व्यक्‍तीबरोबरच्या सर्व विवाहबाह्‍य लैंगिक संबंधांना सूचित होतो. यांत, लैंगिक अवयवांचा वापर आणि मौखिक लैंगिक संबंध यांचा देखील समावेश होतो.—यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित, सावध राहा! जुलै २२, २००४ पृष्ठ १२ (इंग्रजी) आणि टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, २००४, पृष्ठ १३ पाहा.