व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

महाकठीण प्रश्‍न

महाकठीण प्रश्‍न

महाकठीण प्रश्‍न

“का?” या साध्याशा शब्दातून कितीतरी तळमळ आणि मनाची घालमेल व्यक्‍त होते. एखादे संकट कोसळल्यानंतर किंवा एखादी शोकांतिका घडल्यावर लोक सहसा असा प्रश्‍न विचारतात. एखाद्या भागात वादळाचे तांडव नृत्य चालते तेव्हा ते कशाचीही गय करत नाही; मार्गात जे येईल त्याला पायदळी तुडवून मोठा विध्वंस होतो. भूमिकंपामुळे शहरांची शहरे जमीनदोस्त होतात. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर शांत सुरळीत चाललेले लोकांचे नित्यजीवन अचानक, भीती व हिंसेमुळे विस्कळीत होते. एखाद्या अपघातात आपली प्रिय व्यक्‍ती जखमी होते किंवा तिचा मृत्यू होतो.

बहुतेकदा, अशा घटनांमध्ये निष्पाप व हतबल लोक बळी पडतात. अलिकडील काळांत अशा दुर्घटनांचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्यामुळे पुष्कळ लोक देवाकडे पाहून आक्रोश करीत त्याला असा प्रश्‍न विचारतात: “का देवा, का?” खाली दिलेल्या काही उदाहरणांचा विचार करा:

◼ “देवा, तू आमच्याबरोबर असं का वागलास? आम्ही असं काय केलं ज्यामुळे तू आमच्यावर असा कोपलास?” रॉईटर्स बातमी एजन्सीने असा अहवाल दिला, की सुनामीत आपल्या गावाचा नाश झालेल्या भारतातील एका स्त्रीने हे प्रश्‍न विचारले.

◼ “देव कुठं होता? सर्व गोष्टींवर देवाचं नियंत्रण आहे तर मग त्याने या गोष्टी का घडू दिल्या?” टेक्सास, यू.एस.ए. मध्ये एका बंदूकधारी मनुष्याने चर्चमध्ये गोळीबार करून अनेक भाविकांना जखमी केले व काहींना ठार मारले. ही बातमी वृत्तपत्रात छापून आली तेव्हा त्यात वरील प्रश्‍न होते.

◼ “देवानं तिला का मरू दिलं?” असे एका स्त्रीने विचारले जिची मैत्रीण कॅन्सरमुळे मरण पावली होती. या मैत्रिणीच्या पतीला आता एकट्यालाच त्यांच्या पाच मुलांची काळजी घ्यावी लागणार होती.

आपल्या दुःखांमागे देवाशिवाय इतर कोणाचाही हात नाही, असा विचार करणारे केवळ इतकेच लोक नाहीत, तर बरेच आहेत. उदाहरणार्थ, नैसर्गिक आपत्तींविषयी अलीकडेच इंटरनेटद्वारे घेतलेल्या एका सर्व्हेत अर्ध्याअधिक लोकांना वाटले की संकटे, जसे की समुद्री वादळे देवच आणतो. पण इतक्या लोकांना असे का वाटते?

धर्मांनी केला गोंधळ

समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी धार्मिक नेत्यांनी, लोकांच्या मनात चाललेल्या गोंधळाला काहीसे खतपाणी घातले आहे. संकटांविषयी धार्मिक नेते सहसा कोणती उत्तरे देतात त्याविषयी तीन उदाहरणांवर आपण विचार करूया.

पहिले, पुष्कळ धार्मिक नेते असे शिकवतात, की स्वच्छंदी लोकांना शिक्षा करण्यासाठी देवच संकटे आणतो. उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांत, न्यू ओरलियन्स, लुईजियाना येथे कॅटरिना वादळाने धुमाकूळ घालून सर्वकाही उध्वस्थ केले तेव्हा काही पाळकांनी असे म्हटले, की देव, शहराला शिक्षा देत होता. शहरात खूप भ्रष्टाचार, जुगार व अनैतिकता वाढल्यामुळे देवाचा कोप भडकला होता. काहींनी तर, याला बायबलसुद्धा पुष्टी देते असे म्हणून देवाने पूराने व अग्नीने दुष्टांचा नाश कसा केला त्या बायबलमधील उदाहरणांचा उल्लेख केला. परंतु हे सर्व दावे बायबलचा विपर्यास करतात.—“देवाची करणी?” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.

दुसरे, काही पाळक असा दावा करतात, की मानवावर कोसळणाऱ्‍या संकटांसाठी देवाकडे रास्त कारणे आहेत; पण ही कारणे आपल्या समजबुद्धीच्या पलिकडे आहेत. पुष्कळ लोकांना ही कल्पना पचत नाही. त्यांच्या मनात, ‘एक प्रेमळ देव खरोखरच अशा दुष्ट गोष्टी घडवून मग जे त्याच्याकडे आतुरतेने सांत्वन मिळण्यासाठी पाहतात व हे असे “का” घडले याचे कारण विचारतात तेव्हा तो त्यांना धुडकावून का लावतो?’ असे प्रश्‍न येत राहतात. पण बायबल तर देवाविषयी म्हणते की “देव प्रीति आहे.”—१ योहान ४:८.

तिसरे, इतर धार्मिक पुढाऱ्‍यांना वाटते, की कदाचित देव सर्वशक्‍तिमान व प्रेमळ नाही. पुन्हा एकदा अशा स्पष्टीकरणामुळे मनात आणखी गंभीर प्रश्‍न उभे राहतात. ज्याने “सर्व काही” म्हणजे हे अगाध विश्‍व देखील “निर्माण केले” तो, या एका पृथ्वी ग्रहावरचे दुःख काढून टाकण्यास असमर्थ आहे का? (प्रकटीकरण ४:११) ज्याने आपल्याला प्रेम करण्याचे सामर्थ्य दिले, ज्याचे वचन त्याचे वर्णन प्रीतीचे साक्षात रूप असे करते तो इतका निगरगट्ट आहे का, की मानवाचे दुःख पाहून त्याला काहीच वाटत नाही?—उत्पत्ति १:२७; १ योहान ४:८.

अर्थात, वर दिलेली तीन कारणे ही, देवाने अजूनपर्यंत दुःख का राहू दिले आहे, याचे स्पष्टीकरण मानव कसे वेगवेगळ्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करतात त्याची उदाहरणे आहेत. हा असा प्रश्‍न आहे ज्यामुळे भले भले लोक सुद्धा अनेक शतकांपासून चक्रावून गेले आहेत. पुढील लेखात आपण, बायबलची शिकवण या महत्त्वपूर्ण व समयोचित विषयावर काय आहे त्याची चर्चा करणार आहोत. तुम्हाला दिसून येईल, की बायबलचे योग्य व तर्काला पटेल असे स्पष्टीकरण मनातील सर्व शंका दूर करते. शिवाय बायबलमध्ये, ज्या लोकांना आपल्या जीवनात अनेक दुःखद गोष्टी सहन कराव्या लागल्या अशांसाठी खूप सांत्वन आहे. (g ११/०६)

[४ पानांवरील चौकट/चित्र]

देवाची करणी?

आज आपण पाहतो त्या नैसर्गिक आपत्तींसाठी देव जबाबदार आहे अशी शिकवण बायबल देते का? मुळीच नाही! बायबलमध्ये देवाच्या न्यायदंडांविषयी दिलेले वर्णन नैसर्गिक आपत्तींपेक्षा खूप वेगळे आहे. जसे की, देव निवडक आहे. तो सरसकट सर्वांचा नाश करत नाही. तो प्रत्येक व्यक्‍तीचे हृदय पाहतो आणि त्याच्या दृष्टीत जे दुष्ट आहेत केवळ त्यांचा तो नाश करतो. (उत्पत्ति १८:२३-३२) शिवाय, न्यायदंड आणण्याआधी तो त्याविषयी लोकांना ताकीद देतो. यामुळे जे धार्मिक लोक आहेत त्यांना या न्यायदंडापासून आपला जीव वाचवण्याची संधी मिळते.

परंतु नैसर्गिक आपत्ती, कसलीही पूर्वसूचना न देता अचानक कोसळतात; या आपत्तींमध्ये कोणाचीही गय केली जात नाही. भले-बुरे, लहान-मोठे, असे सर्व यांत मृत्यूमुखी पडतात किंवा अधू होतात. आणि काही अंशी मानवाने नैसर्गिक पर्यावरणाचा नाश करून व भूमिकंप, पूर आणि प्रतिकूल हवामान असलेल्या ठिकाणी घरे बांधून अशा नैसर्गिक आपत्ती आणखीनच ओढून घेतल्या आहेत.

[चित्राचे श्रेय]

SENA VIDANAGAMA/AFP/Getty Images

[४ पानांवरील चित्र]

धार्मिक नेत्यांनी चक्रावून टाकणारी उत्तरे दिली आहेत