व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

महानदी मेकाँग

महानदी मेकाँग

महानदी मेकाँग

मेकाँग नदी आशिया खंडातील सहा देशांतून वाहते. जवळजवळ १०० वेगवेगळ्या जातीजमातींच्या काही १,००,००,००० लोकांचे जीवन तिच्यावर अवलंबून आहे. वर्षाला या नदीतून १.३ दशलक्ष टन मासे पकडले जातात. हे प्रमाण नॉर्थ सी या समुद्रातून वर्षाला पकडल्या जाणाऱ्‍या माशांपेक्षा चौपट आहे! मेकाँग नदीची लांबी ४,३५० किलोमीटर असून ही आग्नेय आशियातील सर्वात लांब नदी आहे. बऱ्‍याच देशांतून वाहात असल्यामुळे या नदीला बरीच नावे आहेत. त्यांपैकी सर्वात सुपरिचित नाव मेकाँग हे आहे. हे नाव मे नाम काँग या तिच्या थाई भाषेतील नावाचा अपभ्रंश आहे.

उंच हिमालयांत उगम पावणाऱ्‍या मेकाँग नदीचा उत्तुंग प्रवाह पर्वतांच्या उतारांवरून कोसळत, असंख्य अरुंद दऱ्‍याखोऱ्‍यांतून जोमाने वाहत येतो. चीनमध्ये या नदीचे नाव लांत्सांग असून, चीनचा प्रदेश ओलांडेपर्यंत या नदीने आपल्या एकूण लांबीतील निम्म्या लांबीचे अंतर पार केलेले असते. या ठिकाणी ही नदी आपल्या उगमस्थानापासून चक्क १५,००० फूट खाली येते. याच्या तुलनेत मेकाँग नदीचा पुढचा भाग फक्‍त १,६०० फूट खाली उतरतो. त्यामुळे इथपासून पुढे नदीचा प्रवाह बराच संथ आहे. चीनचा प्रदेश ओलांडल्यावर म्यानमार व लाओस या देशांच्या सीमारेषेवरून आणि लाओस व थायलंड या देशांच्या सीमेवर बऱ्‍याच अंतरापर्यंत ही नदी वाहते. कंबोडिया या देशात या नदीला दोन फाटे फुटतात आणि ते दोन्ही व्हिएटनाममध्ये वाहात जातात. शेवटी या दोन फाट्यांना आणखी अनेक फाटे फुटून शेवटी ही नदी अनेक मुखांनी दक्षिण चिनी समुद्राला जाऊन मिळते.

अठराशे साठच्या दशकाच्या उत्तरार्धात फ्रेंच लोकांनी मेकाँग नदीवाटेने चीनमध्ये प्रवेश करता येण्याजोगा जलमार्ग शोधून काढण्याचा बराच प्रयत्न केला. पण कंबोडियात क्राट्ये गावाजवळ या नदीच्या जलद प्रवाहांपर्यंत आणि दक्षिण लाओसमध्ये खोन धबधब्यांपर्यंत पोचल्यावर मात्र त्यांचे स्वप्न चक्काचूर झाले. जगातल्या कोणत्याही धबधब्याच्या तुलनेत खोन धबधब्यांवरून कोसळणाऱ्‍या पाण्याचे प्रमाण जास्त आहे. कॅनडा व अमेरिकेच्या सीमेवर असलेल्या सुप्रसिद्ध नायगारा धबधब्यांच्या तुलनेतही खोन धबधब्यांवरून दुप्पट पाणी वाहते.

जीवनदायी नदी

आग्नेय आशियातील अर्थव्यवस्थेत मेकाँग नदीची महत्त्वाची भूमिका आहे. लाओसची राजधानी व्हँत्यान तसेच कंबोडियाची राजधानी नॉम पेन ही दोन्ही शहरे या नदीवरील महत्त्वाची बंदरे आहेत. आणखी पुढे गेल्यावर व्हिएटनामच्या प्रदेशात तर जणू लोकांचे अस्तित्वच मेकाँग नदीवर अवलंबून आहे. येथे नदीला सात फाटे फुटल्यामुळे ४०,००० चौरस किलोमीटरचा त्रिभुज प्रदेश तयार झाला असून त्याचे जलवहन क्षेत्र अंदाजे ३,२०० किलोमीटर इतके आहे. हे उदंड प्रमाणात उपलब्ध असणारे पाणी येथील शेती व्यवसायाला, विशेषतः भातशेतीला उपयुक्‍त आहे. नदीकाठी साचलेल्या गाळामुळे हा सखल प्रदेश अतिशय सुपीक झाला आहे. या प्रदेशांत शेतकरी वर्षाला तीनवेळा भाताचे पीक काढतात. म्हणूनच की काय, थायलंडच्या पाठोपाठ व्हिएटनाम हा जगातल्या अनेक लोकांचे मुख्य अन्‍न असणाऱ्‍या तांदळाची सर्वाधिक निर्यात करणारा देश आहे.

मेकाँग नदीत अंदाजे १,२०० जातीचे मासे आढळतात आणि यांपैकी काही माशांचे, तसेच कोळंबीचे संवर्धनाने उत्पादन केले जाते. ट्रे रिएल नावाचा एक स्थानिक मासा तर एका विशेष कारणाने सुप्रसिद्ध झाला आहे—कंबोडियाच्या चलनाचे रिएल हे नाव या माशाच्या नावावरून घेतलेले आहे. मेकाँग नदीत शिंगाडा माशाची एक दुर्मिळ जात सापडते. हा मासा कधीकधी नऊ फुट लांबीपर्यंत वाढतो. २००५ साली मच्छीमारांनी एक २९० किलो वजनाचा शिंगाडा पकडला होता. कदाचित हा जगातला गोड्यापाण्यात राहणारा सर्वात मोठा मासा असावा! आणखी एक, निदान मेकाँग नदीत दुर्मिळ असणारा मासा म्हणजे इरावाडी डॉल्फिन. संशोधक म्हणतात की आता नदीत या जातीचे १०० पेक्षा कमी मासे शिल्लक राहिलेले असावेत.

लाखो लोकांना अन्‍न पुरवण्यासोबतच मेकाँग नदी सर्व आकारमानांच्या जहाजबोटींकरता नौसुलभ आहे. या नदीत प्रवाशांची ने-आण करणाऱ्‍या लहान लहान होडींपासून, समुद्रातून किंवा समुद्राकडे जाणाऱ्‍या मोठ्या मालवाहू जहाजांची वाहतूक असते. पर्यटकांनाही या नदीचे आकर्षण आहे. बऱ्‍याच पर्यटकांना खोन धबधब्यांच्या पलीकडे असणाऱ्‍या व्हँत्यान शहराला भेट देण्यास आवडते. या शहरातील कालवे, पगोडे, तसेच बांबूच्या काठ्यांवर बांधलेली घरे सुप्रसिद्ध आहेत. शिवाय हे शहर १,००० वर्षांपेक्षा अधिक काळापासून एक महत्त्वाचे व्यावसायिक, राजकीय व धार्मिक केंद्र आहे. व्हँत्यानपासून नदीवाटे ल्वांग प्राबांगला जाता येते. हे शहर मेकाँग नदीवरील आणखी एक बंदर असून, एकेकाळी ते विस्तीर्ण थाई-लाओ राज्याचे राजधानी शहर होते. काही काळापर्यंत, तसेच फ्रेंच शासनाच्या काळातही हे शहर लाओस राज्याची राजधानी होती. आजही या ऐतिहासिक शहरात फ्रेंच वसाहतींचे वातावरण कायम आहे.

अलीकडच्या काळात मेकाँग नदीत काही अस्वस्थ करणारे बदल दिसून येत आहेत. उदाहरणार्थ, चुकीच्या मच्छिमारीच्या पद्धतींमुळे माशांच्या जाती नष्ट करणे, जंगलतोड तसेच वीजनिर्मितीकरता नदीवर मोठमोठ्या धरणांचे बांधकाम. बऱ्‍याच जणांच्या मते तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पण परिस्थिती अगदीच निराशाजनक नाही.

बायबलमध्ये हे आश्‍वासन दिलेले आहे की आपला प्रेमळ निर्माणकर्ता लवकरच आपल्या राज्याच्या माध्यमाने मानवांच्या कारभारांत हस्तक्षेप करील. (दानीएल २:४४; ७:१३, १४; मत्तय ६:१०) त्या परिपूर्ण जागतिक शासनाच्या देखरेखीत सबंध पृथ्वी पुन्हा पूर्वस्थितीस आणली जाईल. नद्या सुद्धा लाक्षणिक अर्थाने हर्षित होऊन ‘टाळ्या वाजवतील.’ (स्तोत्र ९८:७-९) हर्षित होऊन टाळ्या वाजवणाऱ्‍या त्या नद्यांमध्ये महानदी मेकाँगही निश्‍चितच असेल. (g ११/०६)

[२४ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

चीन

म्यानमार

लाओस

थायलंड

कंबोडिया

व्हिएटनाम

मेकाँग नदी

[२४ पानांवरील चित्र]

मेकाँगच्या त्रिभुज प्रदेशातील भातखाचरे

[२४ पानांवरील चित्र]

मेकाँग नदीत जवळजवळ १,२०० जातींचे मासे आढळतात

[२५ पानांवरील चित्र]

तरंगती बाजारपेठ

[२४ पानांवरील चित्राचे श्रेय]

भातखाचरे: ©Jordi Camí/age fotostock; मासेमारी: ©Stuart Pearce/World Pictures/age fotostock; पार्श्‍वभूमी: © Chris Sattlberger/Panos Pictures

[२५ पानांवरील चित्राचे श्रेय]

बाजार: ©Lorne Resnick/age fotostock; स्त्री: ©Stuart Pearce/World Pictures/age fotostock