व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कामचाटका रशियाचे पॅसेफिक वंडरलँड

कामचाटका रशियाचे पॅसेफिक वंडरलँड

कामचाटका रशियाचे पॅसेफिक वंडरलँड

रशियामधील सावध राहा! लेखकाकडून

तीनशे पेक्षा अधिक वर्षांआधी, आशियातून पूर्वेकडे जाणारे रशियन संशोधक, एका डोंगराळ द्वीपकल्पाजवळ येऊन थबकले जो दक्षिणेकडे पॅसेफिक महासागरात शिरतो. यामुळे अखॉत्स्क आणि बेरींग समुद्र एकमेकांपासून विभागतात. इटलीपेक्षा थोडा मोठा चमत्कारीक सौंदर्य असलेला हा प्रदेश अजूनतरी पुष्कळ लोकांना माहीत नाही.

हिवाळ्यात, कामचाटक्याच्या आतल्या प्रदेशात जशी थंडी असते तशी किनाऱ्‍याजवळ नसते. आतल्या काही भागांत तर, २० फूटांपेक्षा जास्त बर्फ पडतो आणि कधीकधी तर जवळजवळ ४० फूट पडू शकतो! उन्हाळ्यात या द्वीपकल्पावर समुद्री धुके आणि जोराचे वारे असते. कामचाटकाच्या ज्वालामुखी जमिनीवर होणाऱ्‍या भरपूर पावसामुळे वनस्पतींची भरभरून वाढ होते. यामध्ये बेरी फळांची झाडे, माणसाच्या उंचीएवढे गवत आणि जंगली फुले जसे की, कुरणाचा राजा म्हटला जाणारा गुलाब पाहायला मिळतात.

द्वीपकल्पाचा जवळजवळ एकतृतीयांश भाग स्टोन किंवा एरमन्स बर्च झाडांनी व्यापलेला आहे. यांची खोडे व फांद्या जोरदार वाऱ्‍यामुळे व अतिहिमवृष्टीमुळे वाकलेल्या व पिळदार दिसतात. हे बर्च वृक्ष अतिशय कणखर व मंदगतीने वाढणारे वृक्ष आहेत. त्यांची मुळे चिवट असतात. यामुळे बर्च वृक्ष अगदी कोठेही—डोंगराच्या उतारावरही आडवे वाढू शकतात. जून महिन्यात जेव्हा अजूनही हिमवृष्टी होत असते तेव्हा यांना पालवी फुटते आणि ऑगस्ट महिन्यात ती पिवळी देखील पडते; हिवाळा येत असल्याची ती सूचना देतात.

ज्वालामुखी, गीझर आणि गरम पाण्याचे झरे

पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्‍यावर ज्वालामुखींची एक माळच आहे ज्याला रिंग ऑफ फायर म्हटले जाते. तर, या ठिकाणी स्थित असलेल्या कामचाटकात सुमारे ३० सक्रिय ज्वालामुखी आहेत. “अप्रतिम, चमत्कारिक सुरेख शंकू” असे वर्णन केलेला क्लूचेफस्काय नावाचा ज्वालामुखी, समुद्रसपाटीपासून १५,५८४ फूट उंच जातो; यामुळे युरेशियातील हा सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी समजला जातो. रशियन संशोधकांनी कामचाटकात पहिले पाऊल टाकले तेव्हापासून अर्थात १६९७ पासून आतापर्यंत या द्वीपकल्पावर ६०० पेक्षा अधिक ज्वालामुखींचे उद्रेक झाल्याचे वृत्त आहे.

टोल्बाचीक भागात, १९७५/७६ मध्ये, भेगी ज्वालामुखी उद्रेकांमुळे सुमारे ८,००० फूट उंच जळती मशाल तयार झाली होती. राखेच्या ढगांतून विजा चमकत होत्या. जवळजवळ दीड वर्ष सुरु असलेल्या या उद्रेकांमुळे आणखी चार नवीन ज्वालामुखी शंकू तयार झाले. तलाव आणि नद्या नाहीशा झाल्या आणि गरम राखेमुळे संपूर्ण जंगलेच्या जंगले अगदी मुळापर्यंत जळून गेली. गावाबाहेरचा एका मोठा पट्टाच वाळवंट बनला.

परंतु बहुतेक उद्रेक लोकवस्तीपासून खूप दूरवर झाले असल्यामुळे खूप कमी लोक यात मृत्यूमूखी पडले. पण कामचाटकाला येणाऱ्‍या पर्यटकांना दुसऱ्‍या कारणांसाठी खासकरून व्हॅली ऑफ डेथला जाताना सावध असले पाहिजे. व्हॅली ऑफ डेथ किखपिनिच ज्वालामुखीच्या पायथ्याशी आहे. जेव्हा वारं वाहत नसते, खासकरून बर्फ वितळण्याच्या वेळी विषारी ज्वालामुखी वायु या दरीत घुटमळत असतो तेव्हा तो वन्यजीवांसाठी एक जीवघेणा पाश ठरू शकतो. एकदा तर दहा अस्वलांचे आणि अनेक लहान प्राण्यांची शवे या दरीत आढळली होती.

मोठ्या तोंडाच्या उझॉन कटाहात चिखल उकळताना दिसतो आणि या उकळत्या कटाहात रंगीबेरंगी अलगे वनस्पती भरलेली दिसते. याच भागात व्हॅली ऑफ गिझर्स (गरम पाण्याच्या झऱ्‍यांची दरी) आहे; हिचा शोध १९४१ मध्ये लावण्यात आला होता. यांपैकी काही झऱ्‍यांचा उद्रेक प्रत्येक दोन ते तीन मिनिटांत होत असतो आणि काहींचा दर दोन तीन दिवसांच्या अंतराने होत असतो. पित्रपावलेफस्क-कामचाटस्काय शहराच्या उत्तरेकडे १८० किलोमीटर दूर असलेल्या या अद्‌भुत ठिकाणाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून नेले जाते. पण, परिस्थितीकीचे नाजूक संतुलन बिघडू नये म्हणून पर्यटकांच्या संख्येवर कडक नियंत्रण ठेवण्यात येते. यासाठी, कामचाटकाची सहा क्षेत्रे वर्ल्ड हेरिटेज साईट्‌स म्हणून सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

कामचाटकामध्ये अनेक गरम पाण्याचे झरे आहेत. यांतील बहुतेक झऱ्‍यांतील पाण्याची उष्णता ३०-४०° से. च्या आसपास असते. दीर्घ कडाक्याच्या थंडीच्या महिन्यात पर्यटकांना यांत डुंबण्याचा आगळा-वेगळा आनंद मिळतो. भूऔष्णिक उष्णतेचा वीजनिर्मितीसाठी देखील उपयोग करण्यात येतो. खरे तर, रशियाचे पहिले भूऔष्णिक शक्‍तिकेंद्र याच द्वीपकल्पावर बांधण्यात आले होते.

अस्वले, सॅमन मासे आणि समुद्री घारी

सुमारे १०,००० ब्राऊन बेअर्स म्हटली जाणारी अस्वले अजूनही कामचाटकात आहेत. त्यांचे सरासरी वजन १५०-२०० किलो असते; पण त्यांची कत्तल करण्यात आली नाही तर ते या वजनाच्या जवळजवळ तीनपट अधिक वाढू शकतात. ईटलमेन लोकांच्या लोककथांमध्ये, अस्वल हा त्यांचा “भाऊ” होता व त्यामुळे ते या प्राण्यांना पूज्य मानत होते. पण बंदुकींचे आगमन झाले तेव्हापासून ही भाऊबंदकी संपुष्टात आली. आता पर्यावरणवाद्यांना हे प्राणी नामशेष होण्याची भीती वाटू लागली आहे.

अस्वले लाजऱ्‍या स्वभावाचे प्राणी असल्यामुळे क्वचितच त्यांचे दर्शन घडते. पण, जून महिन्यात सॅमन मासे नदीत विणीसाठी येतात तेव्हा या माशांवर ताव मारण्यासाठी मोठ्या संख्येने अस्वले बाहेर येतात. एक अस्वल एका वेळेला दोन डझन सॅमन मासे फस्त करू शकते! इतकी भूक कशी? शीतकाळात अन्‍नाचा तुटवडा असल्यामुळे आणि या काळात ते स्वतः एखाद्या सुरक्षित गुहेत अथवा झाडाच्या ढोलीत शीतकालसमाधी घेत असल्यामुळे, उर्जा टिकवून ठेवण्याकरता उन्हाळ्यातच त्यांना भरपूर चरबी साठवावी लागते.

स्टेलर्स समुद्री घार, हे पक्षी देखील सॅमन माशांवर ताव मारायला येतात. हा रूबाबदार पक्षी आपले पंख पसरवतो तेव्हा त्यांची लांबी २.५ मीटर इतकी असते. काळ्या रंगाच्या या घारीच्या खांद्यांवर एक पांढरा ठिपका असतो आणि तिची पाचरीच्या आकाराची शेपूटसुद्धा पांढरी असते. आता सुमारे ५,००० घारीच काय त्या उरल्या आहेत आणि त्यांची संख्या घटत आहे. जगाच्या फक्‍त याच प्रदेशात आणि अधूनमधून अलास्काच्या अलूशन व प्रीबलोफ या द्वीपांवर या घारी आढळतात. या घारी वर्षानुवर्षे एकच घरटे वापरतात; त्याच घरट्यात आणखी काटक्या घालून किंवा आतून आस्तर लावून त्या आपले जुने घरटे नवीन बनवतात. एकदा एक असे घरटे सापडले ज्याचा व्यास ३ मीटर होता आणि ते इतके वजनदार होते की ते ज्या बर्च झाडावर बांधण्यात आले होते ते झाड ओझ्यामुळे चिरले!

कामचाटकातील मानव वस्ती

कामचाटकातील सध्याचे रहिवासी हे बहुतेक रशियन आहेत. परंतु येथे हजारो आदिवासी आहेत; यांपैकी उत्तरेकडे राहणारे कर्याक लोकांची संख्या जास्त आहे. इतर गटांत, चुकची आणि ईटलमन लोक आहेत ज्यांची आपापली स्वतंत्र भाषा आहे. कामचाटकाचे बहुसंख्य रहिवासी पित्रपावलेफस्क-कामचाटस्काय शहरात राहतात; हे प्रशासकीय केंद्र आहे. उरलेल्या द्वीपकल्पावर लोक इतरत्र विखुरलेले आहेत आणि किनाऱ्‍यावरील व नदीकाठाजवळील बहुतेक गावांत केवळ बोटीने किंवा विमानानेच जाता येते.

येथील अर्थव्यवस्था मासेमारी आणि खेकडामारी यांच्यावर जास्तकरून निर्भर आहे. कामचाटकाचे महालाल खेकडे प्रसिद्ध आहेत. एका पायापासून दुसऱ्‍या पायापर्यंत ते १.७ मीटर इतके लांब असतात; विकण्यासाठी त्यांना रचून ठेवले जाते तेव्हा ते फार आकर्षक वाटतात.

सन १९८९ पासून यहोवाचे साक्षीदार एका वेगळ्या प्रकारच्या मच्छीमारीसाठी कामचाटकाला भेट देतात. तेव्हापासून ते “माणसे धरणारे” म्हणून कामचाटकात दूरवर राहणाऱ्‍या लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत आहेत. (मत्तय ४:१९; २४:१४) यांतील काहींनी राज्य संदेशाला प्रतिसाद दिला आणि आता हे, निर्मितीपेक्षा निर्माणकर्ता यहोवा देव याची ओळख करून घेऊन त्याची उपासना करण्यास इतरांना मदत करत आहेत. अनेक स्थानीय लोकांवर दुष्ट आत्म्याच्या भीतीचे सावट पसरलेले दिसते. परंतु सत्याची ओळख घडल्यावर पुष्कळ स्थानीय लोक या भीतीपासून मुक्‍त होत आहेत. (याकोब ४:७) शिवाय, भविष्यात संपूर्ण पृथ्वीवरून सर्वप्रकारचा दुष्टपणा आणि दुष्टकृत्ये करणाऱ्‍यांना काढून टाकले जाईल व “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल,” हे देखील शिकत आहेत.—यशया ११:९. (g ३/०७)

[१८ पानांवरील चौकट/चित्रे]

ज्वालामुखी कटाहाचे विहंगम दृश्‍य

एका प्राचीन ज्वालामुखीचे खोरे अर्थात उझोन कटाह सुमारे १० किलोमीटर लांब आहे. याच्या सरळ उभ्या भिंतींच्या आत, “कामचाटका ज्या ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्या सर्व गोष्टी” आहेत, असे एका पुस्तकात म्हटले आहे. या खोऱ्‍यात गरम आणि थंड पाण्याचे झरे आहेत, चिखल उकळत असलेले कटाह आहेत, मातीचे ज्वालामुखी आहेत, मासे आणि हंस मुक्‍त विहार करणारे शुद्ध पाण्याचे तलाव आहेत आणि हिरवीगार वनराई आहे.

मिरायकल्स ऑफ कामचाटका लँड नावाच्या पुस्तकात म्हटले आहे, की जेथे शरदऋतू फार कमी अवधीचा असतो परंतु अतिशय देखणा असतो असे कामचाटकासारखे दुसरे ठिकाण “पृथ्वीवर इतरत्र कोठेही नाही.” किरमिजी टंड्रा वनस्पतींच्या पार्श्‍वभूमीवर, गडद पिवळे व सोनेरी बर्च वृक्ष अगदी उठून दिसतात; आणि इकडे तिकडे उकळत असलेल्या मातीच्या कुंडांतून निघणारी पांढरी वाफ निळ्याभोर आकाशाकडे झेपावताना दिसते. पहाटे, बर्फाच्या कणांचा पातळ थर चढलेली असंख्य पाने गळून जमिनीवर पडताना जी बारीक रुणझुण होते तेव्हा असे वाटते, जणू काय जंगल ‘गाणे गाऊन,’ हिवाळ्याच्या आगमनाची मंद स्वरात सूचना देत आहे.

[१९ पानांवरील चौकट]

विषारी तलाव!

सन १९९६ मध्ये, कॉरीमस्की तलावाच्या खाली मरून गेल्याप्रमाणे वाटलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे ३० फूट उंच लाटा तयार झाल्या आणि आजूबाजूचा जंगल परिसर भुईसपाट झाला. काही मिनिटातच या तलावातील पाणी इतके आम्लयुक्‍त झाले की त्यात कोणतेही जीवजंतू टिकून राहणे शक्य नव्हते. तरीपण, या ज्वालामुखी उद्रेकामुळे व लाटांमुळे जो शिलारस बाहेर किनाऱ्‍यावर वाहत आला त्यात एकही मृत प्राणी आढळला नाही, असे संशोधक ॲण्ड्रू लोगन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले: “उद्रेकापूर्वी हजारो मासे (प्रामुख्याने सॅमन आणि ट्राऊट मासे) कॉरीमस्की तलावात होते. उद्रेकानंतर हा तलाव निर्जीव झाला.” परंतु या तलावातील अनेक मासे वाचले असावेत. शास्त्रज्ञ असा अंदाज लावत आहेत, की कदाचित कोणत्यातरी प्रकारच्या धोक्याच्या सूचनेमुळे—कदाचित पाण्याच्या गुणधर्मातील बदलामुळे—मासे सावध झाले असावेत आणि जवळच्या कॉरीमस्की नदीत ते पळून गेले असावेत.

[१६ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

रशिया

कामचाटका