व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात दोन राष्ट्रीय उद्यानांतील गुहांमध्ये केलेल्या अभ्यासांतून २७ नव्या प्राण्यांच्या जातींचा शोध लागला आहे. जोएल डेस्पेन म्हणतात त्यानुसार, “यावरून हेच दिसून येते की आपल्याला आपल्या भोवतालच्या जगाबद्दल अजूनही किती त्रोटक ज्ञान आहे.” डेस्पेन हे नॅशनल पार्क सर्व्हिसचे गुहा तज्ज्ञ आहेत.—स्मिथसोनियन, यु.एस.ए.

जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. चाळीस टक्के लोकांना मलवहनाच्या अगदी मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत.—मीलेन्यो, मेक्सिको. (g १/०७)

“दिवस-दिवसभर टीव्ही पाहणे, एकत्र मिळून जेवण्याची नाहीशी झालेली प्रथा आणि बाबागाडींमध्ये मुलांनी आईवडिलांकडे नव्हे तर बाहेरच्या बाजूला तोंड करून बसण्याची सोय” यांसारख्या कारणांमुळे मूल व आईवडील यांच्यातील सुसंवादाला खीळ बसत आहे. याचा एक परिणाम म्हणजे लहान मुले शाळेत आपले म्हणणे व्यक्‍त करता येत नाही तेव्हा चक्क “हातपाय झटकून तांडव” करू लागली आहेत.—दी इंडीपेंडंट, ब्रिटन. (g २/०७)

तुमच्या ऑफिसला आपले घर समजणारे जंतू

ॲरिझोना विद्यापिठातील सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञांनी अमेरिकेत अनेक शहरांतील कार्यालयांत वसणाऱ्‍या जंतूंचा हिशोब लावला. ग्लोब ॲण्ड मेल वृत्तपत्रानुसार त्यांना असे आढळले की कार्यालयांत “ज्या पाच ठिकाणी सर्वात जास्त जंतू असतात ती अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत: फोन, टेबलाचा पृष्ठभाग, नळांचे हॅण्डल, मायक्रोवेव्हच्या दारांचे हॅण्डल आणि कीबोर्ड.” या वृत्तानुसार, “स्वयंपाकघरातील टेबलावर सापडणाऱ्‍या जंतूंपेक्षा १०० पटीने आणि टॉयलेटच्या सीटवर सापडणाऱ्‍या जंतूंपेक्षा ४०० पटीने जास्त जंतू कार्यालयातील टेबलाच्या पृष्ठभागावर आढळतात.” (g १/०७)

उष्णकटिबंधातील रोगांत औषध कंपन्यांना रस नाही

उष्णकटिबंधातील अनेक रोगांकडे वैद्यकीय संशोधन दुर्लक्ष करते. का? स्कॉटलंड येथील डंडी विद्यापीठात मॉलिक्यूलर बायोलॉजिस्ट असणारे मायकल फर्ग्युसन सांगतात, “औषध कंपन्या [नव्या औषधांवर] संशोधन करण्यास इच्छुक नाहीत, ही एक खेदजनक वस्तूस्थिती आहे.” कारण या प्रदेशातील रोगांवर औषधे काढूनही, या औषध कंपन्यांना आपल्या गुंतवणुकीतून काहीही नफा मिळवण्यास वाव नसतो. त्यापेक्षा या कंपन्या नफा मिळवून देणाऱ्‍या औषधांचे उत्पादन करणे पसंत करतात. उदाहरणार्थ ॲल्झायमर डिसीज, लठ्ठपणा व लैंगिक दुर्बलतेवरील औषधे. दुसरीकडे पाहता, न्यू सायंटिस्ट मासिकानुसार, अंदाजे “१० लाख लोक दर वर्षी मलेरियामुळे दगावतात, पण या रोगावर सुरक्षित व परिणामकारक औषधे अजूनही उपलब्ध नाहीत.” (g २/०७)

मधुमेह—जागतिक महामारी

द न्यू यॉर्क टाईम्स वृत्तपत्रानुसार आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटनेने पुरवलेल्या माहितीच्या आधारावर असे दिसून येते की मागच्या २० वर्षांत सबंध जगात डायबेटीसचे निदान झालेल्या रुग्णांची संख्या ३० लाखावरून २ कोटी ३० लाखापर्यंत गेली आहे. ज्या दहा देशांत मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत त्यांपैकी सात विकसनशील देश आहेत. सदर संघटनेचे अध्यक्ष डॉ. मार्टिन सिलिंक म्हणतात की “आजपर्यंत जगात आलेल्या सर्व महामाऱ्‍यांपेक्षा डायबेटीज सर्वात जहाल आहे.” द न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, “जगातल्या अत्यंत गरीब देशांत हा रोग होणे म्हणजे सरळ मृत्यूलाच आमंत्रण असते.”

जगातला सर्वात उंच लोहमार्ग

जुलै, २००६ मध्ये उद्‌घाटन झालेला जगातला सर्वात उंच लोहमार्ग बिजींग शहराला टिबेटची राजधानी ल्हासा या शहराशी जोडतो. हे एकंदर ४,००० किलोमीटरचे अंतर आहे. द न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, “हा लोहमार्ग म्हणजे अभियांत्रिकीचा एक आश्‍चर्यजनक आविष्कार असून तो बर्फाने आच्छादलेला (आणि अधूनमधून वितळणारा) प्रदेश ओलांडून समुद्रसपाटीपासून १६,००० फुटांपर्यंत वर जातो.” अभियंत्यांनी ज्या अनेक अडचणींवर मात केली त्यांपैकी एक म्हणजे अस्थिरता टाळण्याकरता, रुळे ज्यावर घातली आहेत ती जमीन सतत गोठलेल्या अवस्थेत ठेवणे. इतक्या उंच प्रदेशातून जात असल्यामुळे या रेल्वेच्या डब्यांमध्ये कृत्रिम हवा पुरवावी लागते. तसेच प्रत्येक प्रवाशांकरताही ऑक्सिजनची सोय आहे. (g ३/०७)