व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हीही एक नवीन भाषा शिकू शकता!

तुम्हीही एक नवीन भाषा शिकू शकता!

तुम्हीही एक नवीन भाषा शिकू शकता!

माईक म्हणतो, “दुसरा कोणताही अनुभव इतका तृप्तीदायक ठरला नसता.” फेल्प्स त्याला दुजोरा देतो, “हा माझ्या जीवनातला सर्वात चांगला निर्णय होता.” या दोघांनीही नवीन भाषा शिकून घेण्याचे आव्हान स्वीकारले होते. आणि याचसंदर्भात ते बोलत होते.

जगातल्या बऱ्‍याच देशांत नवीन भाषा शिकून घेणाऱ्‍यांची संख्या वाढत आहे. हे लोक निरनिराळ्या कारणांसाठी नवीन भाषा शिकताहेत. काहीजण वैयक्‍तिक, काहीजण आर्थिक तर काहीजण धार्मिक कारणांसाठी. सावध राहाने! परकी भाषा शिकत असलेल्या बऱ्‍याच जणांची मुलाखत घेतली. प्रौढावस्थेत नवी भाषा शिकण्याचा अनुभव कसा होता? नवी भाषा शिकू इच्छिणाऱ्‍याने कोणत्या गोष्टी आठवणीत ठेवाव्यात? इत्यादी प्रश्‍न त्यांना विचारण्यात आले. पुढील माहिती त्यांनी दिलेल्या उत्तरांवर आधारित आहे. तुम्हाला हे मुद्दे उद्‌बोधक व प्रेरणादायी आढळतील; विशेषतः जर तुम्ही स्वतः नवी भाषा शिकत असाल अथवा त्याविषयी विचार करत असाल तर. उदाहणार्थ, दुसऱ्‍या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याकरता मुलाखत देणाऱ्‍यांच्या मते, एखाद्या व्यक्‍तीजवळ कोणते गुण असणे आवश्‍यक आहे याविषयी पाहा.

धीर, नम्रता, आणि जुळवून घेण्याची तयारी

लहान मुले फक्‍त ऐकून-ऐकूनही एकाच वेळी दोन किंवा कधीकधी त्यापेक्षा जास्त भाषा बोलायला शिकतात. पण प्रौढांना मात्र नवीन भाषा शिकणे कठीण जाते. त्यामुळे त्यांनी ही बाब धीराने घेतली पाहिजे कारण नवी भाषा शिकायला बराच काळ लागू शकतो. तसेच इतर कामांच्या व्यापामुळे, बरेचदा इतर ध्येये तात्पुरत्या काळासाठी बाजूला ठेवावी लागतात.

जॉर्ज याच्या मते, “व्यक्‍ती नम्र असली पाहिजे. नवी भाषा शिकताना, तुम्हाला लहान मुलांसारखे होता आले पाहिजे. आणि काहीवेळा इतरजण तुम्हाला लहान मुलांसारखीच वागणूक देतील हे तुम्ही आठवणीत ठेवले पाहिजे.” हाउ टू लर्न ए फॉरेन लँग्वेज या पुस्तकानुसार: “जर तुम्हाला खरोखरच प्रगती करायची इच्छा असेल, तर तुम्हाला आपला स्वाभिमान काहीसा दूर सारावा लागेल आणि मानपमानाची चिंता सोडून द्यावी लागेल.” तुमच्याकडून चुका झाल्यास मनाला फार लावून घेऊ नका. “जर तुम्ही चुका केल्या नाहीत तर तुम्ही नवी भाषा अजून हवी तितकी वापरण्यास सुरुवात केलेली नाही असे दिसून येईल,” असे बेन सांगतो.

तुमच्या चुकांवर इतरजण हसले तर वाईट वाटून घेऊ नका, तर तुम्हीही त्यांच्यासोबत हसा! काही काळानंतर, आपण केलेल्या या चुकांबद्दल सांगून तुम्ही स्वतःच दुसऱ्‍यांना हसवाल. तसेच, प्रश्‍न विचारायला घाबरू नका. एखादी गोष्टी विशिष्ट पद्धतीने का म्हटली जाते हे समजून घेतल्यामुळे ती आठवणीत ठेवायला सोपे जाते.

नवी भाषा शिकताना केवळ ती भाषाच नव्हे तर एक नवी संस्कृतीच आपण आत्मसात करत असतो. तेव्हा आपल्या मनातले पूर्वग्रह दूर करा आणि नवीन गोष्टींशी जुळवून घेण्याची तयारी ठेवा. जूली सांगते, “नवीन भाषा शिकताना मला ही जाणीव झाली की प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे दृष्टिकोन आणि प्रत्येक काम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. अमुक पद्धत किंवा अमुक दृष्टिकोन दुसऱ्‍यापेक्षा चांगला किंवा वाईट नसून, कधीकधी फक्‍त वेगळा असतो.” म्हणूनच, जेने असा सल्ला दिला, “नवी भाषा बोलणाऱ्‍या लोकांसोबत मैत्री करा आणि त्यांच्यासोबत मौजमजा करा.” अर्थात यहोवाच्या साक्षीदारांनी आधी याची खात्री केली पाहिजे की हे मित्र चांगले सोबती आहेत आणि त्यांची भाषा शुद्ध आहे किंवा नाही. (१ करिंथकर १५:३३; इफिसकर ५:३, ४) जे पुढे म्हणतो, “तुम्हाला त्यांच्यामध्ये, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांचे संगीत इत्यादी गोष्टींमध्ये रस आहे हे त्यांना कळेल तेव्हा साहजिकच ते तुमच्याशी आपुलकीने वागतील.”

नव्या भाषेचा तुम्ही जितका जास्त अभ्यास कराल आणि संभाषणात तिचा जितका जास्त उपयोग कराल तितकीच झपाट्याने तुमची प्रगती होईल. यासंदर्भात जॉर्ज म्हणतो, “कोंबडी जशी एकेक दाणा खाते तसेच आपणही नवीन भाषेविषयी एकेक गोष्ट शिकतो. या लहानलहान गोष्टी तशा फार महत्त्वाच्या नसतात पण हळूहळू त्यांचा संचय वाढत जातो.” बिल, ज्याने मिशनरी या नात्याने बऱ्‍याच भाषा शिकून घेतल्या, तो म्हणतो, “मी सतत आपल्याजवळ शब्दांच्या याद्या बाळगायचो आणि दिवसभरात काही मिनिटांची जरी सवड मिळाली तर लगेच मी या शब्दांची उजळणी करायचो.” अधूनमधून कधीतरी खूप वेळ बसून अभ्यास करण्यापेक्षा, कमी वेळच का होईना पण नियमितरित्या अभ्यास करणे जास्त परिणामकारक असल्याचे बऱ्‍याच जणांना आढळले आहे.

नवी भाषा शिकण्यासाठी सहाय्यक ठरू शकतील अशी वाटेल तेवढी साधने आज बाजारात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ पुस्तके, कॅसेट्‌स व सीडी, फ्लॅश कार्ड आणि आणखी बरेच काही. ही सर्व साधने असूनही, बऱ्‍याच जणांचा अनुभव आहे की नेहमीच्या वर्गासारख्या वातावरणातच नवी भाषा सर्वात चांगल्याप्रकारे शिकता येते. तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही वापरू शकता. अर्थात, वैयक्‍तिक परिश्रम आणि चिकाटीशिवाय तुम्हाला काहीही साध्य करता येणार नाही, हे आठवणीत असू द्या. पण शिकण्याची प्रक्रिया सोपी आणि आनंददायक बनवण्यासाठी बरेच काही केले जाऊ शकते. यातलाच एक भाग म्हणजे त्या भाषेच्या लोकांचा व संस्कृतीचा प्रत्यक्ष परिचय करून घेणे.

जॉर्ज सांगतो, “भाषेचे मूलभूत नियम आणि निदान नवशिक्याइतका शब्दसंग्रह जमवल्यावर, पुढचे आदर्श पाऊल म्हणजे, तुम्ही काही काळ त्या विशिष्ट देशात अथवा प्रांतात जाऊन राहिले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ती भाषा बोलणाऱ्‍या लोकांमध्ये वावरता येईल.” बार्ब याला दुजोरा देते, “त्या देशाला भेट दिल्यामुळे भाषेचा अस्सल स्वाद तुम्हाला चाखता येईल.” सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या वातावरणात सतत वावरल्यामुळे तुम्हाला नव्या भाषेत विचार करण्यास साहाय्य मिळेल. अर्थात बहुतेकजणांना दुसऱ्‍या देशात जाऊन राहणे शक्य नसेल. पण तुमच्या राहत्या ठिकाणीही त्या विशिष्ट भाषेशी व संस्कृतीशी परिचित होण्याकरता बराच वाव असू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही जी भाषा शिकत आहात त्या भाषेत कदाचित बरीच नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह नसणारी प्रकाशने किंवा रेडिओ व टीव्ही कार्यक्रम उपलब्ध असतील. आपल्या परिसरातच ही भाषा बोलणाऱ्‍या लोकांचा पत्ता काढा आणि त्यांच्याशी बोला. हाउ टू लर्न ए फॉरेन लँग्वेज या पुस्तकानुसार, “प्रगती करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय, तर सराव.” *

प्रगती काहीशी मंदावल्यास

नवी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असताना, कधीकधी तुम्हाला असे वाटेल की तुमची प्रगती काहीशी मंदावली आहे. जणू काय, शिखराकडे वाटचाल करण्याऐवजी तुम्ही एखाद्या पठारावर येऊन अडकलाय. असे घडल्यास तुम्ही काय करू शकता? सर्वप्रथम तुम्ही ही नवी भाषा शिकण्याचे का ठरवले याची स्वतःला आठवण करून द्या. यहोवाच्या साक्षीदारांपैकी बरेचजण इतरांना बायबलविषयी शिकून घ्यायला मदत करण्यासाठी नवी भाषा शिकायचे ठरवतात. जर तुम्हीही नवी भाषा शिकण्याचा आपला मूळ उद्देश लक्षात ठेवला तर तुमच्या निर्धाराला बळकटी मिळेल.

दुसरी गोष्ट म्हणजे, स्वतःकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नका. हाउ टू लर्न ए फॉरेन लँग्वेज या पुस्तकात म्हटल्यानुसार, “कदाचित तुम्ही मूळ भाषिकांइतक्या सहजतेने ही भाषा कधीच बोलू शकणार नाही. पण नवीन भाषा शिकण्याचे मुळातच हे उद्दिष्ट नाही. लोकांना तुमचे बोलणे कळले पाहिजे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.” तेव्हा, नवीन भाषा आपल्या मातृभाषेइतक्या अस्खलितपणे बोलता येत नाही याची खंत बाळगू नका. तर जे काही तुम्ही शिकला आहात ते स्पष्टपणे बोलण्यावर आपले लक्ष केंद्रित करा.

तिसरी गोष्ट म्हणजे, आपण कोठपर्यंत प्रगती केली आहे हे तपासण्याकरता, आतापर्यंतच्या प्रवासात कोणकोणते महत्त्वाचे पल्ले गाठले याची आठवण करा. भाषा शिकणे हे गवत वाढताना पाहण्यासारखे आहे. गवत वाढताना तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकत नाही पण दिवसेंदिवस त्याची उंची वाढत जाते. तसेच, तुम्ही सुरुवात केली होती तेव्हाच्या तुलनेत नक्कीच तुम्ही प्रगती केली असल्याचे तुम्हाला आढळेल. इतरांसोबत स्वतःची तुलना करू नका. यासंदर्भात बायबलमध्ये गलतीकर ६:४ यात दिलेले तत्त्व अतिशय उत्तम आहे. त्यात म्हटले आहे: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.”

चवथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भाषा शिकण्याकरता तुम्ही केलेले प्रयत्न एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे असे समजा. जरा विचार करा: तीन ते चार वर्षांच्या मुलांजवळ कितपत वक्‍तृत्व कौशल्य असते? क्लिष्ट शब्दप्रयोग किंवा लांबलचक वाक्यरचनेचा ती उपयोग करू शकतात का? अर्थातच, नाही! तरीपण ती सर्वसाधारण संभाषण नक्कीच करू शकतात. तात्पर्य हे, की लहान मूल सुद्धा अचानक नव्हे तर अनेक वर्षांनंतर भाषेवर प्रभुत्त्व मिळवते.

पाचवी गोष्ट, भाषेचा शक्य तितका वापर करा. बेन म्हणतो, “नवीन भाषेचा नियमित उपयोग न केल्यास, माझी प्रगती खुंटल्याचे मला आढळायचे.” तेव्हा नवीन भाषा वापरत राहा, खंड पडू देऊ नका. शक्य तितके, शक्य तेव्हा त्याच भाषेत बोला! अर्थात, लहान मुलांइतकाच तुमचा शब्दसंग्रह असतो तेव्हा तुम्हाला आपले विचार व्यक्‍त करताना काहीसे निराश झाल्यासारखे वाटेल. मीलेव्ही नावाची एक मुलगी म्हणते, “मला जे सांगायचे आहे, आणि जेव्हा ते सांगायचे आहे ते न सांगता येणे हीच माझी सर्वात मोठी समस्या होती.” पण हीच निराशा तुम्हाला धीराने प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा देऊ शकते. माईक सांगतो, “इतरांनी सांगितलेले किस्से किंवा विनोद आपल्याला समजत नाहीत याची मला खूप चीड येई. पण असे वाटत असल्यामुळेच मी आणखी प्रगती करत राहण्याचा निर्धार करू शकलो.”

इतरजण कशी मदत करू शकतात

जे आधीपासूनच एखादी भाषा बोलतात ते नवीन शिकणाऱ्‍या व्यक्‍तीला कशी मदत करू शकतात? याआधी ज्याच्याविषयी सांगितले होते तो बिल असा सल्ला देतो, “लहान मुलांशी बोलतो तसे बोलू नका, तर हळूहळू, पण अचूकरित्या बोला.” जूली सांगते, “चुका सुधारण्याकरता उतावीळ होऊ नका, आणि नवशिक्या व्यक्‍तीची वाक्ये पूर्ण करू नका.” टोनी आपल्या अनुभवावरून सांगतो, “ज्यांना दोन्ही भाषा येत होत्या ते सहसा माझ्याशी माझ्या मूळ भाषेतच बोलायचे. पण यामुळे खरे तर माझी प्रगती मंदावली.” याकरताच, नवीन भाषा शिकणाऱ्‍यांपैकी काहीजणांनी आपल्या मित्रमैत्रिणींना आधीपासूनच सांगून ठेवले आहे की त्यांनी त्यांच्याशी नवीन भाषेतच बोलावे आणि कोठे प्रगती करता येईल हे त्यांच्या लक्षात आणून द्यावे. तसेच नवीन भाषा शिकणाऱ्‍यांना त्यांच्या प्रयत्नांची प्रामाणिक प्रशंसा केल्यासही बरेच प्रोत्साहन मिळते. जॉर्जने सांगितल्याप्रमाणे, “माझ्या मित्रांच्या प्रेमळ प्रोत्साहनाशिवाय मी नवीन भाषा शिकू शकलो नसतो.”

नवीन भाषा शिकून घेण्याकरता इतके प्रयत्न करण्यात खरंच काही अर्थ आहे का? बिल, ज्याला अनेक भाषा बोलता येतात तो उत्तर देतो, “नक्कीच आहे! नवीन भाषा शिकण्याच्या प्रयत्नात माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन रुंदावला आहे; वेगवेगळ्या गोष्टींकडे इतरांच्या नजरेतून पाहण्यास मी शिकू शकलो. विशेषतः, या भाषा बोलणाऱ्‍या लोकांसोबत बायबलचा अभ्यास करताना, ते कशाप्रकारे सत्याचा स्वीकार करतात व आध्यात्मिक प्रगती करतात हे पाहताना सर्व प्रयत्नांचे चीज झाल्यासारखे वाटते. माझ्या ओळखीचे एक भाषाविशारद ज्यांनी १२ भाषांवर प्रभुत्त्व मिळवले आहे, ते एकदा मला म्हणाले, ‘मला तुझा हेवा वाटतो. मी तर फक्‍त मौज म्हणून नवनवीन भाषा शिकतो, पण तू मात्र लोकांना मदत करण्यासाठी भाषा शिकतोस.’” (g ३/०७)

[तळटीप]

^ सावध राहा! फेब्रुवारी ८, २००० अंकातील पृष्ठे १२-१३ पाहावीत.

[१३ पानांवरील संक्षिप्त आशय]

इतरांना मदत करण्याची इच्छा ही नवी भाषा शिकण्याकरता एक शक्‍तिशाली प्रेरणा ठरू शकते