नम्रपणा दुर्बलता आहे की ताकद?
बायबलचा दृष्टिकोन
नम्रपणा दुर्बलता आहे की ताकद?
गर्विष्ठ आणि हेकट लोक हे समाजात आदर्श आहेत, असेच सहसा जगात दाखवले जाते. नम्र आणि लीन जनांना, अशक्त, लाजाळू किंवा हांजी हांजी करणारे म्हणूनच लेखले जाते. पण खरा नम्रपणा खरोखरच दुर्बलता आहे का? आणि गर्विष्ठपणा ही ताकद आहे का? बायबल याविषयी काय म्हणते?
लेखाच्या सुरुवातीलाच हे सांगितले पाहिजे, की बायबल विशिष्ट प्रकारच्या गर्वाला संमती देते. जसे की, ख्रिश्चनांनी, यहोवा त्यांचा देव आहे व तो त्यांना ओळखतो, याबद्दल गर्व बाळगला पाहिजे. (स्तोत्र ४७:४; यिर्मया ९:२४; २ थेस्सलनीकाकर १:३, ४) आपली मुले जेव्हा ख्रिस्ती आचरणात उत्तम उदाहरण असतात व खऱ्या उपासनेची निर्भयतेने बाजू घेतात तेव्हा पालक त्यांचा अभिमान बाळगू शकतात. (नीतिसूत्रे २७:११) परंतु, गर्वाची एक दुसरी बाजू देखील आहे जी हानीकारक आहे.
गर्व आणि नम्रता यांचे जवळून परीक्षण
गर्वाची एक व्याख्या फाजील अहंकार अशी आहे. फाजील अहंकार बाळगणाऱ्या व्यक्तीच्या मनात स्वतःविषयी व आपण इतरांपेक्षा, कदाचित सौंदर्याच्या बाबतीत, कुलाच्या बाबतीत, हुद्द्याच्या बाबतीत, कौशल्यांच्या बाबतीत किंवा संपत्तीच्या बाबतीत श्रेष्ठ आहोत अशा अयोग्य भावना असतात. (याकोब ४:१३-१६) बायबल अशा लोकांविषयी सांगते की जे ‘गर्वाने फुगलेले’ आहेत. (२ तीमथ्य ३:४) दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर गर्विष्ठ व्यक्तीचे स्वतःबद्दल फुगलेले मत असते जे उचित नाही.
परंतु नम्र व्यक्ती स्वतःकडे प्रामाणिक व निरपेक्ष दृष्टिकोनातून पाहण्याचा, स्वतःच्या कमतरता व देवासमोर आपण किती क्षुद्र आहोत हे कबूल करण्याचा प्रयत्न करते. (१ पेत्र ५:६) याशिवाय, ती इतरांचे श्रेष्ठ गुण जाणते आणि तिला त्याचा आनंदही होतो. (फिलिप्पैकर २:३) यास्तव, तिला कोणाचाही हेवा वाटत नाही किंवा तिच्या मनात कसलीही ईर्षा नसते. (गलतीकर ५:२६) यामुळे खऱ्या अर्थाने नम्र असलेल्या व्यक्तीचे इतरांबरोबर चांगले नातेसंबंध राहतात आणि ती मानसिकरीत्या सुरक्षित व स्थिर राहते.
येशूचे उदाहरण घ्या. पृथ्वीवर येण्याआधी तो स्वर्गात एक शक्तिशाली आत्मिक प्राणी होता. आणि पृथ्वीवर तो परिपूर्ण, निष्पाप मनुष्य होता. (योहान १७:५; १ पेत्र २:२१, २२) त्याच्या सारखी कौशल्ये, बुद्धिमत्ता, ज्ञान कुणाजवळ नव्हते. तरीपण त्याने यांचे प्रदर्शन केले नाही तर तो नेहमी नम्र राहिला. (फिलिप्पैकर २:६) एके प्रसंगी तर त्याने आपल्या शिष्यांचे पाय देखील धुतले. आणि लहान मुलांना त्याने मायेने कुरवाळले. (लूक १८:१५, १६; योहान १३:४, ५) इतकेच नव्हे तर एका बाळकाला आपल्या बाजूला उभे करून त्याने म्हटले: “जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करितो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय.” (मत्तय १८:२-४) होय, येशूच्या आणि त्याच्या पित्याच्या नजरेत, खरा मोठेपणा हा नम्रतेतच आहे, गर्वात नाही.—याकोब ४:१०.
नम्रपणा ही एक ताकद आहे
येशू नम्रतेचा आदर्श असला तरी तो पुढेपुढे करणारा किंवा लाजाळू अथवा भित्रा मुळीच नव्हता. त्याने सत्याची निर्भीडपणे साक्ष दिली आणि त्याला मनुष्याची भीती तर मुळीच नव्हती. मत्तय २३:१-३३; योहान ८:१३, ४४-४७; १९:१०, ११) म्हणूनच त्याचा विरोध करणाऱ्यांपैकीही काही जण त्याचा आदर करायचे. (मार्क १२:१३, १७; १५:५) पण येशूने कधीही इतरांवर वर्चस्व गाजवले नाही. उलट, त्याने नम्रपणे, दयाळुपणे व प्रेमाने लोकांना स्वतःकडे आकर्षित केले; गर्विष्ठ लोक कधीही करू शकत नाहीत त्या मार्गाने त्याने लोकांची मने जिंकली. (मत्तय ११:२८-३०; योहान १३:१; २ करिंथकर ५:१४, १५) आजही लाखो लोक ख्रिस्तावर खरे प्रेम असल्यामुळे व मनात गाढ आदर असल्यामुळे एकनिष्ठपणे त्याच्या आज्ञांचे पालन करतात.—प्रकटीकरण ७:९, १०.
(आपण नम्र झाले पाहिजे असे उत्तेजन देवाच्या वचनात दिले आहे कारण जे मनाने दीन असतात ते लगेच त्यांना दिलेला सल्ला स्वीकारतात आणि त्यांना शिकवणे आनंदविणारे असते. (लूक १०:२१; कलस्सैकर ३:१०, १२) नवी अचूक माहिती दिली असता, अपुल्लोसारखे ते, त्यांच्या दृष्टिकोनात बदल करण्यास तयार असतात. अपुल्लो हा आरंभीच्या ख्रिश्चनांमध्ये एक निपुण शिक्षक होता. त्याला जेव्हा नवीन माहिती कळवण्यात आली तेव्हा त्याने आपल्या दृष्टिकोनात बदल केले. (प्रेषितांची कृत्ये १८:२४-२६) नम्र लोकांना आपल्या मनातील शंका बोलून दाखवण्याची लाज वाटत नाही. परंतु गर्विष्ठ लोक असे कधीच करत नाहीत. आपली अज्ञानता सर्वांस कळून येईल, अशी त्यांना भीती वाटत असते.
पहिल्या शतकातील एका कुशी षंडाच्या उदाहरणाचा विचार करा ज्याला शास्त्रवचनातील एक विशिष्ट भाग समजत नव्हता. ख्रिस्ती शिष्य फिलिप्प याने त्याला विचारले: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” कुशी षंडाने त्याला उत्तर दिले: “कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?” काय ही नम्रता! आणि तेही आपल्या देशात मोठ्या हुद्द्यावर असलेला हा कुशी षंड ही नम्रता दाखवत होता! त्याच्या नम्रतेमुळेच त्याला शास्त्रवचनातील गहन सूक्ष्मदृष्टी प्राप्त झाली.—प्रेषितांची कृत्ये ८:२६-३८.
परंतु या कुशी षंडाच्या अगदी उलट यहुदी शास्त्री व परुशी होते जे स्वतःला त्यांच्या काळातले सर्वात धार्मिक ज्ञानी समजत होते. (मत्तय २३:५-७) येशू आणि त्याचे अनुयायी जे सांगत होते ते नम्रपणे ऐकून घेण्याऐवजी त्यांनी त्यांना तुच्छ लेखले आणि त्यांच्या बोलण्यात चुका शोधायचा प्रयत्न केला. त्यांच्या या अशा गर्विष्ठपणामुळे ते आध्यात्मिक अंधकारातच राहिले.—योहान ७:३२, ४७-४९; प्रेषितांची कृत्ये ५:२९-३३.
तुम्ही कोणत्या प्रकारची माती आहात—चिकण की कडक?
बायबलमध्ये यहोवा देवाची तुलना एका कुंभाराशी तर मानवाची मातीशी केली आहे. (यशया ६४:८) जी व्यक्ती नम्र असते ती देवाच्या हातातील चिकण मातीसारखी असते. देव अशा व्यक्तीला आकार देऊन तिला एका सुंदर भांड्याप्रमाणे बनवू शकतो. परंतु गर्विष्ठ लोक कडक मातीसारखे कोरडे असतात ज्यांना चुरडून फेकण्याव्यतिरिक्त त्यांचा इतर कोणताही उपयोग नसतो. अशा कोरड्या कडक मातीसारख्या गर्विष्ठ लोकांपैकी एक उदाहरण आहे प्राचीन इजिप्तचा फारो राजा. या घमेंडी राजाने यहोवाला ललकारले आणि आपला जीव गमावून बसला. (निर्गम ५:२; ९:१७; स्तोत्र १३६:१५) फारोच्या दुःखद अंतावरून हे नीतिसूत्रे किती खरे आहे ते दिसून येते: “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.”—नीतिसूत्रे १६:१८.
वर चर्चा करण्यात आलेल्या विषयावरून हे सूचित होत नाही, की देवाच्या लोकांना कधीच गर्विष्ठपणाच्या भावनांवर मात करावी लागत नाही. येशूचे प्रेषित नेहमी, त्यांच्यात कोण मोठा आहे यावर वाद घालायचे. (लूक २२:२४-२७) तरीपण ते गर्विष्ठ बनले नाहीत तर त्यांनी येशूचे ऐकले आणि कालांतराने आपल्या मनोवृत्तीत बदल केला.
“नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय,” असे शलमोनाने लिहिले. (नीतिसूत्रे २२:४) तेव्हा, नम्रपणा विकसित करण्यासाठी आपल्याजवळ किती चांगली कारणे आहेत! नम्रपणा हा केवळ एक शक्तिशाली व आवडता गुणच नाही तर या गुणामुळे आपण देवाची कृपादृष्टी आणि सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ प्राप्त करू शकतो.—२ शमुवेल २२:२८; याकोब ४:१०. (g ३/०७)
तुम्हाला काय वाटते?
◼ सर्व प्रकारचा गर्व वाईट आहे का?—२ थेस्सलनीकाकर १:३, ४.
◼ नम्रपणा एखाद्याला शिकण्यास प्रवृत्त कसे करतो?—प्रेषितांची कृत्ये ८:२६-३८.
◼ देवाच्या सेवकांनी नम्रपणा विकसित केला पाहिजे का?—लूक २२:२४-२७.
◼ नम्र लोकांना कोणते प्रतिफळ मिळणार आहे?—नीतिसूत्रे २२:४.
[२०, २१ पानांवरील चित्र]
लहान मुलेही येशूकडे आकर्षित झाली कारण तो एक नम्र मनुष्य होता