व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रोगराई नाहीशी करण्यात विज्ञानाला यश येईल का?

रोगराई नाहीशी करण्यात विज्ञानाला यश येईल का?

रोगराई नाहीशी करण्यात विज्ञानाला यश येईल का?

विज्ञानाला या जगातून रोगराई नाहीशी करण्यात यश येईल का? बायबलमध्ये यशया व प्रकटीकरण या पुस्तकांतील भविष्यवाण्या अशा एका काळाविषयी भाकीत करतात का, की जेव्हा मनुष्य स्वतःच जगातून रोगराई नाहीशी करेल? वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीकडे पाहून, काहीजणांच्या मते हे अशक्य नाही.

अनेक राष्ट्रे, तसेच गरीबांचे भले करू इच्छिणाऱ्‍या धनाढ्य व्यक्‍ती आता संयुक्‍त राष्ट्रसंघासोबत मिळून रोगराईविरुद्ध लढा देण्याकरता अभूतपूर्व प्रयत्न करत आहेत. गरीब देशांतील बालकांचे लसीकरण करण्याची एक मोहीम राबवण्यात आली आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघ बालक निधी या संघटनेनुसार, जर अपेक्षित ध्येये गाठण्यात राष्ट्रांना यश आले तर “२०१५ सालापर्यंत, जगातल्या सर्वात गरीब देशांत राहणाऱ्‍या ७० दशलक्ष पेक्षा जास्त मुलांना दर वर्षी पुढील रोगांपासून संरक्षण देणाऱ्‍या लशी पुरवल्या जाऊ लागतील: टीबी, घटसर्प, टेटनस, डांग्या खोकला, गोवर, रुबेला, पीतज्वर, हिमोफायलस इन्फ्लुएन्झा टाईप बी, हेपटायटिस ब, पोलिओ, रोटाव्हायरस, न्युमोकॉकस, मेनिन्जोकॉकस व जॅपनीझ एन्सिफेलायटिस.” याव्यतिरिक्‍त, पिण्याचे शुद्ध पाणी, पूरक आहार, आणि आरोग्याविषयी जनजागृती यांसारख्या मूलभूत आरोग्यवर्धक सोयी पुरवण्याकरताही उपाययोजना केल्या जात आहेत.

वैज्ञानिक मात्र, वैद्यकीय सेवेत केवळ मूलभूत उपचार पुरवू इच्छित नाहीत. आज अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडत आहे. दर आठ वर्षांनी वैज्ञानिकांचे वैद्यकीय ज्ञान दुप्पट वाढते असे म्हटले जात आहे. रोगराईविरुद्धच्या लढ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने कोणकोणते विजय मिळवले आहेत हे खालील उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल.

क्ष-किरण छायाचित्रण ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून डॉक्टर व इस्पितळे सीटी स्कॅन नावाच्या एका प्रक्रियेचा उपयोग करत आहेत. सीटी हे कंप्यूटेड टोमोग्राफी (संगणित छेद-प्रतिमादर्शन) या संज्ञेचे संक्षिप्त रूप आहे. सीटी स्कॅन यंत्राने आपल्या शरीराच्या आतील भागाची त्रिमितीय क्ष-किरण छायाचित्रे घेता येतात. ही छायाचित्रे रोगनिदान करण्यासाठी व शरीरातील आंतरिक विकृतींचे परीक्षण करण्यासाठी उपयोगी पडतात.

रेडिएशन अर्थात प्रारणामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम हा अद्याप वादाचा विषय असला तरी वैद्यकीय तज्ज्ञांना ही खात्री आहे की या प्रगत तंत्रज्ञानाचा येणाऱ्‍या काळात बराच फायदा होईल. शिकागो हॉस्पिटलच्या विद्यापीठातील प्रारणशास्त्राचे (रेडियॉलॉजी) प्राध्यापक मायकेल वॅनीर म्हणतात: “मागच्या दोनचार वर्षांतच [या क्षेत्रात] झालेली प्रगती पाहिल्यास अक्षरशः गरगरायला होतं.”

आता सीटी स्कॅन यंत्रे अधिक जलद व अधिक अचूक आणि त्यासोबतच कमी खर्चिक झाली आहेत. या अत्याधुनिक स्कॅनिंग पद्धतींचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांची जलदता. येथे विशेषतः हृदयाच्या स्कॅनिंगचा उल्लेख करावासा वाटतो. हृदय सतत हलत असल्यामुळे पूर्वी बऱ्‍याच क्ष-किरण प्रतिमा अस्पष्ट यायच्या. त्यामुळे नीट परीक्षण करणे कठीण होते. पण न्यू सायंटिस्ट या मासिकात खुलासा केल्याप्रमाणे, नवी स्कॅनिंग यंत्रे “एका सेकंदाच्या केवळ एक तृतीयांश भागाइतक्या जलदगतीने, म्हणजे हृदयाच्या एका ठोक्यापेक्षाही कमी वेळात शरीराभोवती फिरून चित्रण करतात.” यामुळे अर्थातच अगदी स्पष्ट चित्रे मिळतात.

अत्याधुनिक स्कॅनिंग यंत्रांच्या साहाय्याने आता डॉक्टर केवळ शरीरातील अवयवांचेच नव्हे तर शरीराच्या विशिष्ट भागांत कोणते जीवरासायनिक बदल घडून येत आहेत याचाही अभ्यास करू शकतात. या तंत्रामुळे कर्करोगाचे सुरुवातीच्या स्थितीतच निदान होण्यास मदत होऊ शकेल.

रोबॉटिक सर्जरी (यंत्रमानवांनी केलेली शस्त्रक्रिया) यंत्रमानव आता केवळ विज्ञानकथांपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. निदान वैद्यकीय क्षेत्रात तरी नाही. आज हजारो शस्त्रक्रिया यंत्रमानवांच्या मदतीने केल्या जात आहेत. काहीवेळा शल्यचिकित्सक शस्त्रक्रिया करताना रिमोटकंट्रोल सारख्या उपकरणाच्या साहाय्याने यंत्रमानवाच्या अनेक हातांवर नियत्रंण करतात. यंत्रमानवाच्या हातांत शस्त्रक्रिया करण्याच्या सुऱ्‍या, चाकू, कात्र्या, कॅमेरा व इतर साधने असतात. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शल्यचिकित्सक अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियासुद्धा अतिशय अचूकतेने करू शकतात. न्यूझवीक या मासिकानुसार, “शल्यचिकित्सकांना आढळले आहे की नेहमीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत या तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांच्या शरीरातून अनावश्‍यक रक्‍त जात नाही, त्यांना वेदना कमी होतात, शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंती कमी होतात, रुग्णाला इस्पितळात कमी वेळ राहावे लागते आणि शस्त्रक्रियेनंतर तो कमी वेळात सामान्य होतो.”

नॅनोमेडिसीन नॅनोमेडिसिन म्हणजे नॅनोतंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात उपयोग करणे. नॅनोतंत्रज्ञान हे सूक्ष्म वस्तू निर्माण करून त्यांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानात वापरले जाणारे एकक नॅनोमीटर असून, एका मीटरचे शंभर कोटी भाग केल्यास त्यांपैकी एकाभागाला नॅनोमीटर म्हणता येईल. *

एक नॅनोमीटर किती सूक्ष्म असतो हे समजण्यासाठी पुढील मोजमाप लक्षात घ्या: तुम्ही वाचत आहात त्या मासिकाच्या एका पानाची जाडी १,००,००० नॅनोमीटर आहे आणि आपल्या डोक्यावरच्या एका केसाची जाडी ८०,००० नॅनोमीटर इतकी आहे. रक्‍तातील तांबड्या पेशीचा व्यास २,५०० नॅनोमीटर असतो. जिवाणूंची लांबी जवळजवळ १,००० नॅनोमीटर आणि विषाणूंची लांबी १०० नॅनोमीटर असते. तुमच्या शरीरातील डीएनएचा व्यास २.५ नॅनोमीटर इतका असतो.

या तंत्रज्ञानाच्या पुरस्कर्त्यांना खात्री आहे की लवकरच, मानवी शरीरात जाऊन वैद्यकीय प्रक्रिया पार पाडण्याकरता अभिकल्पित करण्यात आलेली सूक्ष्म उपकरणे निर्माण करण्यात वैज्ञानिकांना यश येईल. ही नॅनोयंत्रे, अर्थात हे अतिसूक्ष्म यंत्रमानव विशिष्ट सूचनांसहित प्रोग्राम केलेले सूक्ष्म संगणक शरीरात नेतील. आश्‍चर्य म्हणजे, ही गुंतागुंतीची यंत्रे जास्तीतजास्त १०० नॅनोमीटर इतक्या मापाच्या सुट्या भागांपासून तयार केली जातील. म्हणजे, ही यंत्रे तांबड्या रक्‍त पेशीपेक्षा २५ पटीने लहान असतील!

ही यंत्रे इतकी सूक्ष्म असल्यामुळे, संशोधक त्या दिवसाची वाट पाहात आहे की जेव्हा ही नॅनो-उपकरणे शरीरातल्या बारीक रक्‍तवाहिन्यांमधून जाऊन रक्‍ताक्षयाने ग्रासलेल्या उतकांपर्यंत प्राणवायू पोचवू शकतील, रक्‍तवाहिन्यांमध्ये आलेले अडथळे व मेंदूच्या पेशींमधील दुखापत दूर करू शकतील, इतकेच काय तर विषाणू, जिवाणू आणि इतर संसर्गजन्य घटक नष्ट करू शकतील. नॅनोयंत्रांचा उपयोग विशिष्ट रोगग्रस्त पेशींना थेटपणे औषधे पुरवण्याकरताही केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शास्त्रज्ञ असे भविष्य वर्तवतात की नॅनो-औषधोपचाराच्या साहाय्याने कर्करोगाची चाचणी करणे अतिशय सुलभ होईल. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र व बायोमेडिकल अभियांत्रिकीचे प्राध्यापक असणारे डॉ. सॅम्युएल विक्लाईन म्हणतात: “कर्करोग अतिशय सूक्ष्म स्वरूपाचा असतानाच व आताच्या तुलनेत बऱ्‍याच आधीपासूनच निदान करण्याची, तसेच फक्‍त ज्याठिकाणी ट्यूमर आहे तेवढ्याच भागात शक्‍तिशाली औषधौपचार करण्याद्वारे औषधांचे दुष्परिणाम कमी करण्याची शक्यता या तंत्रज्ञानामुळे बरीच वाढली आहे.”

हे सर्व केवळ कल्पनाविश्‍वात रमण्यासारखे वाटत असले तरी, काही शास्त्रज्ञांच्या मते नॅनोतंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात वापर हे एक वास्तव आहे. या क्षेत्रातल्या नामवंत संशोधकांच्या मते येणाऱ्‍या दहा वर्षांत, जिवंत पेशींच्या रेणवीय संरचनेची दुरुस्ती व त्यांत बदल घडवून आणण्याकरता नॅनोतंत्रज्ञान वापरले जाऊ लागेल. या तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्‍या एका शास्त्रज्ञाच्या मते: “नॅनो-औषधोपचारांमुळे २० व्या शतकातील सर्व सामान्य रोग, जवळजवळ सर्व प्रकारची दुखणी नाहीशी झालेली असतील. आणि यामुळे मानवी कार्यक्षमतेचा विस्तार होणे शक्य होईल.” आजही काही शास्त्रज्ञ नॅनो-औषधोपचारांचा प्रयोगशाळेतील प्राण्यांवर यशस्वी वापर होत असल्याची वृत्ते देत आहेत.

जेनोमिक्स मानवी शरीरातील जीन्सच्या रचनेच्या अभ्यासाला जेनोमिक्स म्हणतात. मानवी शरीरातील प्रत्येक पेशीत अनेक जीवनावश्‍यक घटक असतात. यांपैकी एक घटक म्हणजे जीन. प्रत्येकाच्या शरीरात जवळजवळ ३५,००० जीन्स असून या जीन्स त्या व्यक्‍तीच्या केसांचा रंग व पोत, तिचा वर्ण व डोळ्यांचा रंग, उंची व इतर गुणलक्षणे ठरवतात. तसेच आपल्या शरीरातील अवयवांच्या कार्यक्षमतेतही या जीन्सची महत्त्वाची भूमिका असते.

जीन्सना काही अपाय झाल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो. किंबहुना, काही संशोधकांच्या मते सर्व रोग, जीन्सच्या कार्यांत झालेल्या बिघाडामुळेच होतात. काही दोषयुक्‍त जीन्स आपल्याला आपल्या आईवडिलांकडून वारशाने मिळतात. इतर जीन्स आपल्या वातावरणातील हानीकारक घटकांमुळे क्षतिग्रस्त होतात.

शास्त्रज्ञांना आशा आहे की लवकरच ते अशा विशिष्ट जीन्सचा शोध लावण्यात यशस्वी होतील की ज्यांमुळे आपल्याला अमुक रोग होऊ शकतो हे आधीच सांगता येईल. यामुळे डॉक्टरांना हे समजण्यास मदत मिळेल की इतरांच्या तुलनेत काही व्यक्‍तींना कर्करोग का होतो आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग इतरांच्या तुलनेत काही व्यक्‍तींमध्ये जास्त नाशकारक का असतात. जेनोमिक्सच्या साहाय्याने हेही शोधून काढण्यास मदत मिळेल की एक औषध एका व्यक्‍तीवर परिणामकारक ठरते पण इतरांवर तेच औषध परिणामकारक का ठरत नाही.

जीन्सविषयी अशा विशिष्ट माहितीमुळे एका व्यक्‍तीसाठी तिच्या गरजांनुसार खास औषध निर्माण करणे शक्य होईल. तुम्हाला या तंत्रज्ञानामुळे कोणता फायदा होऊ शकेल? या संकल्पनेनुसार तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण जेनेटिक गुणलक्षणांना अनुलक्षून तुमच्याकरता उपयुक्‍त असणारा औषधोपचार निवडला जाऊ शकेल. उदाहरणार्थ तुमच्या जीन्सच्या तपासणीवरून जर डॉक्टरांना असे कळले की तुम्हाला विशिष्ट रोग होण्याची शक्यता आहे तर डॉक्टर या रोगाची कोणतीही लक्षणे दिसून येण्याआधीच त्याचे निदान करू शकतील. या संशोधनाच्या पुरस्कर्त्यांचे असे म्हणणे आहे की अशा परिस्थितीत रोग उद्‌भवण्याआधीच योग्य औषधोपचार, आहार आणि जीवनशैलीत फेरबदल करून तो रोग पूर्णपणे टाळता येणे शक्य होईल.

तुमच्या जीन्सच्या अभ्यासावरून कोणत्या औषधांमुळे तुमच्या शरीरात अनिष्ट प्रतिक्रिया निर्माण होईल हे डॉक्टरांना समजेल. यामुळे तुमच्याकरता उपयुक्‍त असणारी औषधे योग्य प्रमाणात देणे त्यांना शक्य होईल. द बॉस्टन ग्लोब या वृत्तपत्रानुसार, “२०२० सालापर्यंत व्यक्‍तीच्या विशिष्ट गरजांनुसार औषधोपचार करण्याच्या प्रथेचा, आपण आता कल्पनाही करू शकणार नाही इतका प्रसार झालेला असेल. व्यक्‍तीच्या जीन्सनुसार तयार केलेली ही डिझायनर औषधे मधुमेह, हृदयविकार, अल्झायमर, सिझोफ्रेनिया आणि इतर अनेक रोगांवर उपचार करण्याकरता वापरली जाऊ लागतील.”

वर उल्लेख केलेली तंत्रज्ञानाची उदाहरणे ही विज्ञानाने वर्तवलेल्या भवितव्याची केवळ काही उदाहरणे आहेत. वैद्यकीय ज्ञान अभूतपूर्व प्रमाणात वाढत आहे. पण निकट भविष्यात रोगराई पूर्णपणे नाहीशी करता येईल असे शास्त्रज्ञांना वाटत नाही. असे अनेक अडथळे आहेत की ज्यांवर मात करणे अजूनही अशक्यप्राय आहे.

अजिंक्य अडथळे

मानवाच्या व्यवहारामुळे रोगराईचा नायनाट करण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, शास्त्रज्ञांचे असे मत आहे की मानवांनी विशिष्ट परिस्थितीकींचे संतुलन बिघडवल्यामुळे नवे व नाशकारक रोग उद्‌भवले आहेत. न्यूझवीक या मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत, वाईल्डलाईफ ट्रस्टच्या अध्यक्षा मेरी पर्ल, यांनी असे सांगितले: “सत्तरीच्या दशकापासून एड्‌स, एबोला, लाईम डिसीज व सार्स यांसारखे ३० पेक्षा जास्त नवे रोग उत्पन्‍न झाले आहेत. यांपैकी बहुतेक रोगांचा वन्यप्राण्यांपासून मानवांना संसर्ग झाला असे मानले जाते.”

शिवाय, लोक आता ताजी फळे व भाज्या कमी आणि साखर, मीठ व संपृक्‍त वसा असलेले पदार्थ जास्त खाऊ लागले आहेत. यासोबतच, शारीरिक व्यायामाचा अभाव व आरोग्याला हानीकारक असलेल्या इतर सवयींमुळे हृदयविकारांत वाढ झाली आहे. धूम्रपान करणाऱ्‍यांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे सबंध जगात कोट्यवधी लोक गंभीर आजारपण व मृत्यूला बळी पडत आहेत. दर वर्षी, जवळजवळ दोन कोटी लोक रस्त्यांवरील दुर्घटनांमध्ये एकतर गंभीररित्या जखमी होतात किंवा दगावतात. युद्धे व इतर प्रकारच्या हिंसाचारामुळेही असंख्य लोक आपला जीव गमावतात किंवा लुळेपांगळे होतात. लाखो लोक दारू व मादक पदार्थांच्या व्यसनामुळे आजारपणाला तोंड देत आहेत.

वैद्यकीय तंत्रज्ञानात इतकी प्रगती झाली असूनही वस्तूस्थिती ही आहे, की कोणत्याही कारणाने का होईना पण अजूनही असे काही रोग आहेत जे अनेकांचा बळी घेतच आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ‘सध्याच्या घटकेला १५ कोटींपेक्षा जास्त लोक डिप्रेशनने (तीव्र मानसिक खिन्‍नता) ग्रस्त आहेत, जवळजवळ २ कोटी ५० लाख लोक सिझोफ्रेनिया (छिन्‍नमनस्कता) व ३ कोटी ८० लाख लोक एपिलेप्सी (मिर्गी) या रोगाने पीडित आहेत.’ लाखो लोकांना एचआयव्ही/एड्‌स, अतिसार, मलेरिया, गोवर, न्यूमोनिया, व टीबी या रोगांची लागण होत असून असंख्य लहान मुले व तरुण त्यांना बळी पडत आहेत.

रोगराई पूर्णपणे नाहीशी करण्याच्या मार्गात इतरही अजिंक्य भासणारे अडथळे आहेत. यांपैकी दोन मोठे अडसर म्हणजे गरिबी आणि भ्रष्टाचार. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने एका वृत्तात असे जाहीर केले की प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्यास व पुरेसा निधी असल्यास संसर्गजन्य रोगांना बळी पडणाऱ्‍या लाखो लोकांचा मृत्यू टाळता येण्यासारखा आहे.

विज्ञान व वैद्यकीय तंत्रज्ञानातील उल्लेखनीय प्रगती या अडथळ्यांवर मात करू शकेल का? लवकरच आपण रोगराईपासून मुक्‍त झालेले जग पाहू शकू का? वरील माहितीच्या आधारावर या प्रश्‍नाचे कोणतेही स्पष्ट उत्तर देता येत नाही हे कबूल आहे. पण बायबल या प्रश्‍नावर प्रकाश टाकते. पुढील लेखात, भविष्यात रोगराई पूर्णपणे नाहीशी होण्याविषयी बायबल काय सांगते याबद्दल चर्चा केली जाईल. (g १/०७)

[तळटीप]

^ “नॅनो” हा उपसर्ग खुजा या अर्थाच्या ग्रीक शब्दापासून आला असून त्याचा अर्थ “शंभर कोटींपैकी एक” असा होतो.

[७ पानांवरील चौकट/चित्रे]

क्ष-किरण प्रतिमा

मानवी शरीराच्या अधिक स्पष्ट व अचूक प्रतिमा आजारपणाच्या सुरुवातीच्या स्थितीतच त्याचे निदान करण्यास साहाय्य करू शकतील

[चित्राचे श्रेय]

© Philips

Siemens AG

यंत्रमानवांनी केलेली शस्त्रक्रिया

शल्यचिकित्सेची साधने हाताळणाऱ्‍या यंत्रमानवांच्या साहाय्याने डॉक्टर अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील अतिशय अचूकतेने करू शकतात

[चित्राचे श्रेय]

© २००६ Intuitive Surgical, Inc.

नॅनो-औषधोपचार

कृत्रिम अतिसूक्ष्म यंत्रे डॉक्टरांना प्रत्यक्ष रोगग्रस्त पेशींवर उपचार करण्याची संधी देतील. या चित्रात रक्‍ताच्या पेशीचे कार्य करणारी एका कलाकाराच्या कल्पनेतील नॅनोयंत्रे दाखवली आहेत.

[चित्राचे श्रेय]

कलाकार: Vik Olliver (vik@diamondage.co.nz)/ अभिकल्पक: Robert Freitas

जेनोमिक्स

व्यक्‍तीच्या जीन्सच्या रचनेचा अभ्यास करून, एखाद्या रोगाची कोणतीही लक्षणे दिसून येण्याआधीच रोगाचे निदान व त्यावर उपचार करता येईल त्या दिवसाची संशोधक वाट पाहात आहेत

[चित्राचे श्रेय]

गुणसुत्रे: © Phanie/ Photo Researchers, Inc.

[८, ९ पानांवरील चौकट]

सहा मारक रोग अद्यापही अजिंक्य

वैद्यकीय ज्ञान व संबंधित तंत्रज्ञान अभूतपूर्व प्रमाणात प्रगती करतच आहे. पण तरीसुद्धा संसर्गजन्य रोगांच्या साथी अद्यापही जगात हैदोस घालतच आहेत. खाली उल्लेख केलेले सहा मारक रोग आतापर्यंतही अजिंक्यच ठरले आहेत.

एचआयव्ही/एड्‌स

जवळजवळ ६ कोटी लोकांना एचआयव्ही नावाच्या विषाणूचा संसर्ग झाला असून २ कोटी लोक एड्‌समुळे दगावले आहेत. २००५ सालादरम्यान पन्‍नास लाख नव्या रुग्णांना एचआयव्हीची लागण झाली आणि तीस लाखांपेक्षा जास्त रुग्ण एड्‌सशी संबंधित कारणांमुळे दगावले. दगावलेल्यांत ५,००,००० लहान मुलांचाही समावेश आहे. एचआयव्हीची बाधा झालेल्यांपैकी बहुतेकांना योग्य उपचार उपलब्ध नाही.

अतिसार

गरिबीने पीडित लोकांमध्ये हा रोग एक प्रमुख मारक रोग असून जवळजवळ ४ अब्ज लोक दर वर्षी या रोगाने पीडित होतात. हा रोग दुषित अन्‍न किंवा पाण्यातून किंवा योग्य स्वच्छता न पाळल्यामुळे पसरतो. दर वर्षी वीस लाखांपेक्षा जास्त लोक या संसर्गांमुळे दगावतात.

मलेरिया

दर वर्षी जवळजवळ तीस कोटी लोकांना मलेरिया होतो. जवळजवळ दहा लाख लोक दरवर्षी या रोगाने दगावतात. यांत बऱ्‍याच मुलांचा समावेश असतो. आफ्रिकेत दर ३० सेकंदाला एक मूल मलेरियाने दगावते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार “विज्ञानाजवळ मलेरियाकरता कोणतेही एकमेव जादुई औषध नसून असा एकमेव उपाय कधी अस्तित्वात येईल असेही वाटत नाही.”

गोवर

गोवर या रोगामुळे २००३ सालादरम्यान ५,००,००० लोक दगावले. मुलांचा बळी घेणारा हा एक प्रमुख रोग असून तो अतिशय संसर्गजन्य आहे. दर वर्षी तीन कोटी लोकांना गोवर होतो. ही खरोखरच एक खेदजनक बाब आहे, कारण गोवरवर परिणामकारक ठरलेली व अत्यंत स्वस्त लस गेल्या ४० वर्षांपासून उपलब्ध आहे.

न्यूमोनिया

जागतिक आरोग्य संघटनेनुसार इतर कोणत्याही संसर्गजन्य रोगाच्या तुलनेत न्यूमोनिया हा रोग अधिक मुलांचा बळी घेतो. पाच वर्षांखाली असणारी वीस लाख मुले दर वर्षी न्युमोनियामुळे दगावतात. यांपैकी बहुतेक मुले आफ्रिका व आग्नेय आशियातील असतात. जगातल्या बऱ्‍याच भागांत सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना आणीबाणीच्या परिस्थितीत आवश्‍यक वैद्यकीय औषधोपचार मिळत नाही.

टीबी

टीबीमुळे २००३ सालादरम्यान १७,००,००० पेक्षा अधिक लोक दगावले. टीबीचे नवे जिवाणू उद्‌भवले आहेत जे औषधांना दाद देत नाहीत व यामुळे आरोग्य अधिकारीही काळजीत पडले आहेत. काही जिवाणूंचे प्रकार सर्व मुख्य टीबी-विरोधी औषधांना प्रतिकारक बनले आहेत. ज्या रुग्णांना योग्य औषधोपचार मिळाला नाही किंवा ज्यांनी टीबीची औषधे मुदतीआधीच थांबवली अशा रुग्णांत सहसा हे प्रतिकारक जिवाणू उद्‌भवतात.

[९ पानांवरील चौकट/चित्र]

पर्यायी औषधोपचारांची वाढती लोकप्रियता

अशाही बऱ्‍याच उपचार पद्धती आहेत की ज्यांना वैद्यकीय शास्त्रात सहसा मान्यता दिली जात नाही. या उपचार पद्धतींना पारंपरिक किंवा पर्यायी औषधोपचार (ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन) म्हणतात. विकसनशील देशांत बहुतेक लोक याच पारंपरिक औषधोपचारावर अवलंबून असतात. गरीब देशांत बऱ्‍याचजणांना डॉक्टरकडे जाऊन उपचार घेणे परवडत नाही, आणि काहीजणांना गोळ्या इंजेक्शने घेण्यापेक्षा हे पारंपरिक उपचार जास्त पसंत पडतात.

श्रीमंत देशांतही अलीकडे पर्यायी औषधोपचारांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. या औषधोपचारांपैकी ॲक्युपंक्चर, कायरोप्रॅक्टिक, होमियोपॅथी, नॅचरोपॅथी आणि हर्बल औषधे सर्वात लोकप्रिय आहेत. यांपैकी काही उपचारांवर शास्त्रोक्‍त पद्धतीने अभ्यास करण्यात आला असून काही दुखण्यांवर हे उपचार परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. पण यांपैकी काही पद्धतींची परिणामकारकता अजून पुरती सिद्ध झालेली नाही. या पर्यायी औषधोपचारांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या सुरक्षिततेविषयी काही प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. बऱ्‍याच देशांत या औषधोपचारांवर कोणतेही निर्बंध नाहीत. यामुळे प्रशिक्षित डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, बनावट औषधे आणि तोतया डॉक्टर यांसारख्या प्रथांना खतपाणी मिळू शकते. कधीकधी पुरेशी माहिती व प्रशिक्षण नसणारे मित्र व नातेवाईक, चांगल्या हेतूनेच का होईना पण, स्वतः डॉक्टर असल्यागत आरोग्यविषयक सल्ला देण्यास उत्सुक असतात. यामुळे कित्येकदा औषधांमुळे अनिष्ट परिणाम आणि आरोग्याशी संबंधित इतर धोके संभवू शकतात.

बऱ्‍याच देशांत या पर्यायी औषधोपचारांवर आवश्‍यक निर्बंध असून हळूहळू डॉक्टरसुद्धा या पर्यायी पद्धतींना मान्यता देऊ लागले आहे. किंबहुना बऱ्‍याच ठिकाणी वैद्यकीय डॉक्टर्स स्वतः या पर्यायी पद्धतींनी रुग्णांचा उपचार करतात. पण या पर्यायी पद्धतींचा वापर करूनही जगातून रोगराई नाहीशी करता येईल असा दावा करता येणार नाही.