व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रोगराई नाहीशी होईल!

रोगराई नाहीशी होईल!

रोगराई नाहीशी होईल!

बरेच लोक ही आशा बाळगतात की मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर त्यांना सर्व पीडा, दुःख, वेदना व आजारपणापासून मुक्‍तता मिळेल. पण लोकांचा असा विश्‍वास असला तरीसुद्धा, बायबल मात्र असे सांगते की मानव स्वर्गात नव्हे, तर या पृथ्वीवर एका रम्य नंदनवनात जीवनाचा आनंद उपभोगतील. (स्तोत्र ३७:११; ११५:१६) बायबलमध्ये सांगितले आहे की भविष्यात मानवजात परिपूर्ण आरोग्य, आनंद व सार्वकालिक जीवनाचा आस्वाद घेईल.

आपण का आजारी पडतो आणि मरतो? जगातून रोगराई कशाप्रकारे नाहीशी होईल? या प्रश्‍नांचे बायबलमध्ये उत्तर दिले आहे.

रोगराईचे मूळ कारण आपले पहिले मातापिता आदाम व हव्वा यांना परिपूर्ण निरोगी शरीरांसह निर्माण करण्यात आले होते. (उत्पत्ति १:३१; अनुवाद ३२:४) त्यांना पृथ्वीवर सर्वकाळ राहण्याकरता निर्माण करण्यात आले होते. देवाविरुद्ध जाणूनबुजून पाप केल्यानंतरच त्यांनी आपले परिपूर्ण आरोग्य गमवले आणि त्यांचे शरीर रोगांना बळी पडू लागले. (उत्पत्ति ३:१७-१९) देवाच्या अधिकाराचा धिक्कार केल्यामुळे त्यांना परिपूर्ण आरोग्यदायी शरीर देणाऱ्‍या त्यांच्या निर्माणकर्त्याशी असलेला संबंध त्यांनी तोडून टाकला. ते दोषी बनले. परिणामस्वरूप, देवाने आधीच बजावल्याप्रमाणे ते आजारी पडले आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला.—उत्पत्ति २:१६, १७; ५:५.

देवाविरुद्ध पाप केल्यानंतर आदाम व हव्वा आपल्या मुलांना वारशाने परिपूर्णता नव्हे तर अपरिपूर्णताच देऊ शकत होते. (रोमकर ५:१२) याआधीच्या लेखांत उल्लेख केल्याप्रमाणे, आज शास्त्रज्ञ देखील हे ओळखतात की मनुष्यात उपजतच काही दोष असतात ज्यांमुळे आजारपण व मृत्यू संभवतो. बरेच संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांच्या एका गटाने असा निष्कर्ष काढला की “जीवनाचे इंजीन सुरू होताच शरीर त्याच्या नाशाची प्रक्रिया सुरू करते. ही एक अनिवार्य जैविक वस्तूस्थिती आहे.”

मानवी प्रयत्न निष्फळ रोगराईविरुद्धच्या लढ्यात विज्ञानाने अनेक उल्लेखनीय विजय मिळवले आहेत. पण रोगराईचे मूळ कारणच इतके क्लिष्ट आहे की विज्ञान ते पूर्णपणे कधीही दूर करू शकणार नाही. बायबलचा अभ्यास करणाऱ्‍यांकरता हे आश्‍चर्याचे नाही. त्यांना बायबलमध्ये दिलेले देवाचे हे प्रेरित शब्द माहीत आहेत: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.”—स्तोत्र १४६:३.

परंतु बायबल सांगते त्याप्रमाणे, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहे.” (लूक १८:२७) यहोवा रोगराईचे मूळ कारणच दूर करू शकतो. तो आपले सर्व रोग बरे करील. (स्तोत्र १०३:३) त्याच्या प्रेरित वचनात हे अभिवचन दिले आहे: “पाहा! देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.

तुम्ही काय केले पाहिजे येशू ख्रिस्ताने अगदी स्पष्टपणे सांगितले की रोगराई नसलेल्या भविष्यातील जगात राहण्याकरता आपण काय केले पाहिजे. त्याने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.

देवाचे ज्ञान व त्याच्या पुत्राच्या, अर्थात येशूच्या शिकवणुकी आपल्याला बायबलमध्ये सापडतात. त्यात बरेच व्यवहारोपयोगी ज्ञान देखील आहे जे आजही तुमचे जीवन आणखी आनंददायक बनवू शकते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे देव असे भाकीत करतो की तो जगातून सर्व दुःख नाहीसे करेल व त्याचे आज्ञाधारक उपासक परिपूर्ण जीवनाचा आनंद लुटतील. होय देव अशा भवितव्याची प्रतिज्ञा करतो की जेव्हा “‘मी रोगी आहे’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही!”—यशया ३३:२४. (g १/०७)

[११ पानांवरील चौकट/चित्रे]

आरोग्याविषयी समतोल दृष्टिकोन

बायबल आपल्याला जीवनाचा आदर करण्यास सांगते. यहोवाचे साक्षीदार आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्याद्वारे हा आदर व्यक्‍त करतात. ते अंमली पदार्थ व तंबाखू यांसारखी हानीकारक व्यसने टाळतात. मद्यपान व खाण्यापिण्याच्या सवयींबाबतही देव आपल्या उपासकांकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी या सर्व गोष्टींत अतिरेक करू नये. (नीतिसूत्रे २३:२०; तीत २:२, ३) अशा आरोग्यदायी सवयींमुळे तसेच पुरेशी विश्रांती व व्यायामाची सवय लावल्यामुळे बरेच रोग टाळता येतात किंवा लांबणीवर टाकता येतात. अर्थात, जे आजारी पडतात त्यांना भरवशालायक तज्ज्ञांच्या मदतीची गरज असू शकते.

बायबल आपल्याला सर्व गोष्टींत “मर्यादेने” राहण्यास सांगते. (तीत २:१२; फिलिप्पैकर ४:५) पण आजच्या जगात बरेचजण आरोग्याच्या बाबतीत अतिरेक करतात. कधीकधी रोगांवर उपाय शोधण्यात ते इतके व्यग्र होतात की त्यासाठी ते आपल्या आध्यात्मिक जीवनाकडेही दुर्लक्ष करतात. काहीजण बायबलनुसार आक्षेपार्ह असणारे अपायकारक उपचार अवलंबतात. इतरजण निरुपयोगी किंवा शरीराला हानीकारक असणाऱ्‍या उपचारांवर पैसा व वेळ व्यर्थ घालवतात.

वस्तुस्थिती ही आहे की परिपूर्ण आरोग्य मिळवणे निदान आता तरी अशक्य आहे. भविष्यात रोगराई नाहीशी होण्याची वाट पाहात असताना, बायबलमध्ये दिलेला माफक सल्ला तुम्हाला आरोग्यासंबंधी समतोल दृष्टिकोन राखण्यास मदत करू शकतो.