व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वांनाच लागलाय आरोग्याचा ध्यास!

सर्वांनाच लागलाय आरोग्याचा ध्यास!

सर्वांनाच लागलाय आरोग्याचा ध्यास!

दोन हजार सातशे वर्षांपूर्वी एका संदेष्ट्याने असा एक काळ येण्याविषयी भाकीत केले की जेव्हा रोगराई पूर्णपणे नाहीशी झालेली असेल. त्याचे हे भाकीत आज आपल्या काळापर्यंत जतन करून ठेवण्यात आले आहे आणि यशयाच्या प्राचीन लिखाणांत ते आपल्याला वाचायला मिळते. त्याने अशा एका काळाविषयी सांगितले की जेव्हा “‘मी रोगी आहे’ असे एकही रहिवासी म्हणणार नाही.” पुढे तो सांगतो की “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍याचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.” (यशय ३३:२४; ३५:५, ६) बायबलमधील इतर भविष्यवाण्याही अशाच भविष्याचे वर्णन करतात. उदाहरणार्थ, बायबलमधील प्रकटीकरण हे शेवटले पुस्तक अशा एका काळाविषयी सांगते की जेव्हा देव दुःख व वेदना कायमचे दूर करील.—प्रकटीकरण २१:४.

या प्रतिज्ञा कधी खऱ्‍या होतील का? खरंच कधी असा काळ येईल का, की जेव्हा मानवजात उत्तम आरोग्याचा उपभोग घेईल? जेव्हा रोगराई नाहीशी झालेली असेल? पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत आज लोकांचे आरोग्य बरेच सुधारले आहे हे कबूल आहे. पण सुधारले आहे याचा अर्थ ते उत्तम आरोग्याचा उपभोग घेत आहेत असे म्हणता येत नाही. आजही बरेच लोक रोगराईला बळी पडतात. आजारपणाच्या भीतीने बरेच लोक चिंतातूर होतात. या आधुनिक, प्रगतिशील काळातही शारीरिक व मानसिक दुखण्यांपासून एकही जण पूर्णपणे सुटलेला नाही. हे एक दुःखदायक वास्तव आहे.

आरोग्यासाठी मोजावी लागणारी किंमत

आजारपण अनेक कारणांमुळे तापदायक ठरते. आजारपणामुळे होणारे आर्थिक नुकसान हा एक चिंतेचा विषय बनत चालला आहे. उदाहरणार्थ, अलीकडच्याच वर्षी युरोपमध्ये ५०० दशलक्ष कामाचे दिवस आरोग्याच्या समस्यांमुळे व्यर्थ गेले. इतर ठिकाणीही हीच परिस्थिती आहे. आजारपणामुळे कर्मचाऱ्‍यांची उत्पादनशीलता घटते, तसेच उपचारांचा खर्च इत्यादी कारणांमुळे संबंधित असलेल्या सर्वांनाच हे आर्थिक ओझे झेलावे लागते. कंपन्यांसोबतच सरकारांनाही याची किंमत मोजावी लागते. हे ओझे कमी करण्यासाठी कंपन्या आपल्या उत्पादनांचे दर वाढवतात आणि सरकार त्यांवर कर बसवतात. शेवटी किंमत कोणाला मोजावी लागते? अर्थातच, तुम्हाला!

दुःखाची गोष्ट म्हणजे, गरीबांना चांगला उपचार तर दूरच, पण अगदी प्राथमिक उपचारही मिळवणे अतिशय जड जाऊ शकते. विकसनशील देशांत लाखो लोक आज या दुःखद परिस्थितीला तोंड देत आहेत. या देशांत राहणाऱ्‍या लोकांना प्रशिक्षित कर्मचाऱ्‍यांकडून औषधोपचार मिळवणे जवळजवळ अशक्यच आहे. श्रीमंत देशांतही काहींना चांगला उपचार मिळवण्याकरता बराच संघर्ष करावा लागतो. अमेरिकेत राहणाऱ्‍या ४६ दशलक्ष लोकांची हीच परिस्थिती आहे कारण त्यांच्याकडे आरोग्य विमा नाही.

पण आजारपण हे केवळ आर्थिक कारणांमुळेच तापदायक नसते. असाध्य रोग झाल्यामुळे होणाऱ्‍या मानसिक वेदना, जुनाट व्याधींची दुखणी, इतरांना गंभीर आजारपण आलेले पाहून वाईट वाटणे आणि एखाद्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू अशा कितीतरी गोष्टी यात समाविष्ट आहेत.

आजारपण नसलेल्या जगात राहण्याचे भवितव्य कोणालाही हवेहवेसेच वाटेल. सगळ्या जगालाच चांगल्या आरोग्याचा ध्यास लागला आहे! बऱ्‍याच जणांना ही खात्री आहे की हे भवितव्य अगदीच अशक्य वाटत असले तरीसुद्धा ही एक खरी आशा आहे. काहीजणांना हा पक्का विश्‍वास आहे की मानवनिर्मित तंत्रज्ञानामुळे कालांतराने सर्वप्रकारचे रोग व आजारपण नाहीसे केले जातील. दुसरीकडे पाहता काहीजण विश्‍वास ठेवतात आणि असे मानतात की देवाने पुरातन काळात, जगातून आजारपण नाहीसे करण्याविषयी ज्या भविष्यवाण्या केल्या होत्या त्या तो अवश्‍य पूर्ण करील. मनुष्याला रोगराईवर मात करण्यात यश येईल का? की देवच या जगातून रोगराई नाहीशी करील? भविष्यात नेमके काय घडेल? (g १/०७)