व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कापडाची रंजनक्रिया प्राचीन व आधुनिक पद्धती

कापडाची रंजनक्रिया प्राचीन व आधुनिक पद्धती

कापडाची रंजनक्रिया प्राचीन व आधुनिक पद्धती

ब्रिटनमधील सावध राहा! लेखकाकडून

रंगांचा आपल्या भावनांशी जवळचा संबंध आहे. म्हणूनच, सबंध मानव इतिहासात रंजनक्रिया नावाच्या प्रक्रियेकरवी मानवांनी कापडाला रंग देण्याचे तंत्र उपयोगात आणले आहे.

आपण कपडे घेतो किंवा घरातल्या फर्निचरसाठी कव्हर इत्यादी शिवण्यासाठी कापड विकत घेतो तेव्हा ते कापड धुतल्यावर त्याचा रंग जाऊ नये किंवा फिका पडू नये असे आपल्याला वाटते. कापडाचा रंग जाऊ नये म्हणून कोणत्या प्रक्रिया केल्या जातात, तसेच पारंपरिक रंजनक्रियेचे तंत्र कशारितीने विकसित झाले हे सर्व जाणून घेण्यासाठी आम्ही इंग्लंडच्या उत्तरेकडे ब्रॅडफर्ड शहरात असलेल्या एसडीसी कलर म्यूझियमला भेट दिली. * तेथे आम्हाला अशा काही अनोख्या पदार्थांची ओळख झाली की ज्यांचा वापर कित्येक शतकांपासून रंजनक्रियेत केला जात आहे.

प्राचीन काळातली रंजकद्रव्ये

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कापड रंगवण्याकरता वापरली जाणारी जवळजवळ सगळी द्रव्ये नैसर्गिक होती. त्याकाळी वनस्पती, कीटक आणि कालव्यांपासून रंजकद्रव्ये उत्पादित केली जात. उदाहरणार्थ, आयसॅटिस टिंक्टोरिया नावाच्या एका वनस्पतीपासून निळे (१), रेसीडा ल्युटियोला नावाच्या वनस्पतीपासून पिवळे (२) तर रूबिया टिंक्टोरम आणि रूबिया कॉर्डिफोलिया नावाच्या वनस्पतीपासून शेंदरी रंजकद्रव्य मिळवले जाई. लॉगवुड (पतंगी) नावाच्या झाडापासून काळे आणि आर्चिल नावाच्या शेवाळापासून जांभळे रंजकद्रव्य मिळवले जाई. शिंपल्यात राहणाऱ्‍या म्युरेक्स नावाच्या कालव्यातून अत्यंत महागडे असणारे जांभळ्या रंगाचे रंजकद्रव्य उत्पादित केले जाई. याला टिरियन किंवा इंपिरियल पर्पल म्हणत (३). या द्रव्याने रंगवलेली वस्त्रे रोमी सम्राट परिधान करत.

पण रोमी सम्राटांच्याही फार पूर्वीपासून धनाढ्य लोक नैसर्गिक पदार्थांनी रंगवलेली वस्त्रे परिधान करत होते. (एस्तेर ८:१५) उदाहरणार्थ, कर्मिस नावाच्या कीटकापासून लाल रंजकद्रव्याचे उत्पादन केले जात होते. (४). इस्राएलातील निवासमंडपाचे पडदे इत्यादी तसेच इस्राएलातील मुख्य याजकाचे कपडे बनवण्याकरता जे किरमिजी रंगाचे सूत वापरण्यात आले ते कदाचित याच प्रकारचे होते.—निर्गम २८:५; ३६:८.

रंजनक्रिया

कलर म्यूझियममध्ये प्रदर्शित वस्तूंवरून हे स्पष्ट दिसून येते की रंजनक्रिया ही केवळ सूत किंवा कापड रंगात बुडवण्याइतकी साधी नसते. बऱ्‍याच पद्धतींत, रंजनक्रियेच्या प्रक्रियेत रंगबंधक अर्थात मॉर्डंटचा उपयोग केला जातो. या पदार्थाला सूत आणि रंजक या दोन्हींबद्दल आसक्‍ती असते. यामुळे रंजकद्रव्य सूतावर पक्के बसते आणि पाण्यात विरघळत नाही. अलीकडे रंगबंधकाच्या रूपात अनेक रसायनांचा वापर केला जातो व यांपैकी बरीच रसायने धोकेदायक असतात.

रंजनक्रियेतील काही प्रक्रियांमुळे दुर्गंधी निर्माण होते. याचे एक उदाहरण म्हणजे टर्की रेड नावाच्या रंजकद्रव्याने कापड रंगवण्याची लांबलचक आणि जटिल प्रक्रिया. ही प्रक्रिया सूती कापडावर केली जात असे आणि याने तयार होणारा भडक लाल रंग सूर्यप्रकाशाने, धुतल्याने किंवा ब्लीचिंग केल्यानेही फिका पडत नसे. एकेकाळी या प्रक्रियेत ३८ टप्पे होते आणि त्यांना पूर्ण करण्याकरता चार महिने लागत! म्यूझियममध्ये ठेवलली सर्वात सुंदर वस्त्रे या टर्की रेड रंजकद्रव्याने रंगवलेली होती (५).

कृत्रिम रंजकद्रव्यांचे आगमन

नैसर्गिक पदार्थांपासून न बनवलेले पहिले रंजकद्रव्य विल्यम हेन्री पर्किन यांनी १८५६ साली तयार केले असे म्हटले जाते. म्युझियममधील एका तक्‍त्‌यावर पर्किनने मॉव्ह नावाचे गर्द जांभळे रंजकद्रव्य कशाप्रकारे तयार केले याविषयी खुलासा केला आहे. १९ व्या शतकाच्या शेवटापर्यंत अनेक आकर्षक रंगांची कृत्रिम रंजकद्रव्ये बाजारात आली. आज ८,००० पेक्षा जास्त प्रकारच्या कृत्रिम रंजकद्रव्यांचे उत्पादन केले जाते (६). नैसर्गिक रंजकद्रव्यांपैकी फक्‍त लॉगवुड हे वनस्पतिज आणि कोचिनियल हे कीटकजन्य रंजकद्रव्य अद्यापही वापरात आहे.

कलर म्यूझियममधील, कलर ॲण्ड टेक्सटाईल्स नावाच्या एका खास दालनात रेयॉनसारख्या कृत्रिम पदार्थांना रंगवण्याकरता ज्या विशेष प्रक्रियांचा वापर केला जातो त्यांविषयी माहिती दिली जाते. व्हिसकॉस रेयॉन या सध्या वापरात असलेल्या सर्वात लोकप्रिय प्रकारच्या रेयॉन धाग्याचे उत्पादन १९०५ साली करण्यात आले होते. व्हिसकॉस रेयॉनचे रासायनिक गुणधर्म बरेचसे सुतासारखे असल्यामुळे त्याकाळी उपलब्ध असलेली बहुतेक रंजकद्रव्ये या कापडासाठी उपयोगात आणण्याजोगी होती. पण ॲसिटेट रेयॉन, पॉलिएस्टर, नायलॉन आणि ॲक्रिलिक या इतर कृत्रिम व अत्याधुनिक धाग्यांकरता अनेक नवीन प्रकारची रंजकद्रव्ये तयार करावी लागली.

पक्केपणाचे आव्हान

आपण तयार कपडे किंवा कापड विकत घेतो तेव्हा त्याचा रंग जाऊ नये असे आपल्याला वाटत असते. पण बऱ्‍याच कपड्यांचा रंग उन्हाने, किंवा वारंवार डिटरजंटने धुतल्यास फिका पडतो. काही कपड्यांचा रंग घामाने किंवा इतर कपड्यांसोबत धुतले असता फिका पडतो अथवा बदलतो. धुताना कपड्याचा रंग पक्का राहणे हे रंजकद्रव्याचे रेणू कापडाच्या तंतूंना किती पक्केपणाने धरून ठेवतात यावर अवलंबून असते. वारंवार धुतल्याने आणि खास डाग काढण्यासाठी तयार केलेल्या डिटरजंटचा वापर केल्याने रंजकद्रव्य तंतूंपासून वेगळे होतात आणि त्यामुळे कापडाचा रंग फिका पडतो. रंजकद्रव्याचे उत्पादन करणारे उद्योजक आपल्या उत्पादनावर प्रकाशाचा, धुण्याच्या क्रियेचा, साबणांचा आणि घामाचा काही असामान्य परिणाम तर होत नाही याची परीक्षा करून पाहतात.

या म्युझियमला भेट दिल्यामुळे, आपण जे कपडे घालतो ते कशाप्रकारच्या पदार्थांपासून बनवले जातात याविषयी आम्हाला बरीच माहिती मिळाली. पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, आपल्या कपड्यांचा रंग वारंवार धुतल्यावरही फिका पडू नये म्हणून ज्या अनोख्या प्रक्रिया केल्या जातात त्यांविषयी आम्हाला बऱ्‍याच नवीन गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळाली. (g ४/०७)

[तळटीप]

^ एसडीसी—सोसायटी ऑफ डायर्स ॲण्ड कलरिस्ट्‌स—ही संस्था रंजनक्रियेच्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार करते.

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

फोटो १-४: Courtesy of the Colour Museum, Bradford (www.colour-experience.org)

[२७ पानांवरील चित्राचे श्रेय]

फोटो ५: Courtesy of the Colour Museum, Bradford (www.colour-experience.org); फोटो ६: Clariant International Ltd., Switzerland