व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

२००५ सालादरम्यान सबंध जगभरात २८ युद्धे आणि इतर प्रकारचे ११ सशस्त्र संघर्ष सुरू होते.—व्हायटल साइन्स २००६-२००७, वर्ल्डवॉच इनस्टिट्यूट. (g ४/०७)

इंटरनेट वापरणाऱ्‍या १२ ते २० या वयोगटातील डच मुलामुलींपैकी, ज्यांनी वेब कॅमेऱ्‍याचा वापर करून “प्रोफाइल साईट्‌सना,” अर्थात ज्यांवर इतरांशी संभाषण करता येते अशाप्रकारच्या साईट्‌सना भेट दिली त्यांपैकी “४० टक्के मुलांना व ५७ टक्के मुलींना वेब कॅमेऱ्‍यापुढे नग्न होण्यास किंवा लैंगिक कृत्य करण्यास सांगण्यात आले.”—रट्‌जर्स निस्सो ग्रूएप, नेदरलंड्‌स. (g ४/०७)

“तंत्रज्ञानाच्या माध्यमाने मागील शंभर वर्षांच्या कालावधीत अमेरिकेतील कामगारांचा आठवड्यातील काम करण्याचा सरासरी वेळ ३८ टक्क्यांनी कमी झाला असला तरीसुद्धा, कामाच्या ठिकाणी जाण्याकरता करावा लागणारा प्रवास, प्रौढ शिक्षण आणि घरातली वाढलेली कामे या कारणांमुळे कामगारांजवळ फावला वेळ उरत नाही.”—फोर्ब्स, संयुक्‍त संस्थाने. (g ५/०७)

वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी इंटरनेटवर हा जाहीर प्रश्‍न उपस्थित केला “राजकीय, सामाजिक व वातावरणासंबंधी प्रश्‍नांवर जगात इतका गोंधळ माजलेला असताना, मानवजात आणखी १०० वर्षे कशी टिकून राहू शकेल?” एक महिन्यानंतर त्यांनी कबूल केले: “मला उत्तर माहीत नाही. म्हणूनच मी हा प्रश्‍न उपस्थित केला, की लोकांनी यावर विचार करण्यास प्रवृत्त व्हावे व आज आपल्यापुढे असणाऱ्‍या धोक्यांविषयी जागे व्हावे.”—द गार्डियन, ब्रिटन. (g ६/०७)

शेती मनोरुग्णांकरता आरोग्यदायी

अलीकडेच नॉर्वे येथील स्टॅवेन्जर शहरात १४ देशांतून आलेल्या १०० पेक्षा जास्त तज्ज्ञांची परिषद झाली. हे तज्ज्ञ ग्रीन केअर नावाच्या एका नव्या संकल्पनेविषयी विचारविनिमय करण्याकरता एकत्र आले होते. या संकल्पनेत शेतीकाम, अध्यापन व मानसिक उपचारांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एनआरके नावाच्या प्रसार कंपनीच्या वृत्तानुसार कित्येक वर्षांपासून मनोरोगांनी ग्रासलेल्या रुग्णांनी शेती करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना मनोरुग्णालयात ठेवण्याची गरज उरली नाही. हे काम “मनाकरता व शरीराकरता आरोग्यदायी” आहे. नॉर्वेमधील ६०० पेक्षा जास्त शेतमळे आता ग्रीन केअर प्रकल्पात सहभागी असून त्यांना याकरता अतिरिक्‍त मोबदला दिला जातो. (g ४/०७)

चीनमध्ये स्वच्छ पाण्याचा तुटवडा

चीन एका पेचप्रसंगाला तोंड देत आहे, अर्थात “पाण्याचे प्रदूषण व स्वच्छ पाण्याचा तुटवडा.” बहुतेक शहरांत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरता विशेष यंत्रणा आहेत पण या यंत्रणा चालवण्याकरता बऱ्‍याच शहरांजवळ आवश्‍यक निधी उपलब्ध नाही. द वॉल स्ट्रीट जर्नल यातील वृत्तानुसार, “देशातील बहुतेक नद्या, तलाव व कालव्यांतील पाणी कारखान्यांमधून व लोकवस्त्यांमधून येणाऱ्‍या व प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याने तसेच शेतजमिनीतून झिरपलेल्या कीटकनाशकांचा अंश असलेल्या पाण्याने दूषित झालेले आहे.” शिवाय, “जवळजवळ तीस कोटी लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नाही.” वॉल स्ट्रीट जर्नलनुसार परिस्थिती “गंभीर” असून आणखीनच चिघळत चालली आहे. (g ५/०७)

“तुम्ही यहोवाचे साक्षीदार तर नाहीत?”

मागच्या वर्षी, इटलीतील एल्बा बेटाच्या समुद्रकिनाऱ्‍यांवर काही कॅथलिक तरुण पर्यटकांना थांबवून त्यांच्याशी बोलत होते. या कॅथलिक तरुणांनी मास्सा मारीटिमा पियोम्बीनो या क्षेत्रावर देखरेख करणाऱ्‍या एका कॅथलिक बिशपचे आवाहन स्वीकारले होते. या बिशपने त्यांना असे सांगितले होते की जर त्यांना आज व भविष्यातही स्वतःला ख्रिस्ती म्हणवायचे असेल तर त्यांनी आपल्या विश्‍वासाची जाहीर घोषणा करावी. पर्यटक मात्र हे पाहून अचंबित झाले. ई टेम्पो या वृत्तपत्रानुसार या तरुणांना बहुतेक पर्यटकांनी एकच प्रश्‍न विचारला आणि तो म्हणजे, “तुम्ही यहोवाचे साक्षीदार तर नाहीत?” (g ५/०७)

लैंगिक कृत्यांशी संगिताचा संबंध

असोशियेटेड प्रेसने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, “इतर गीते पसंत करणाऱ्‍या मुलांच्या तुलनेत” जी किशोरवयीन मुले व मुली “अश्‍लील व उत्तेजक बोल” असलेली गीते ऐकणे पसंत करतात ती “लैंगिक कृत्यांत लवकर पडतात.” “काही गीतांत शृंगारिक संबंधांविषयी अप्रत्यक्षपणे उल्लेख केला जातो आणि त्यांत स्त्रीपुरुषांचे संबंध विश्‍वास व वचनबद्धतेवर आधारित असल्याचे दाखवले जाते. पण या गीतांच्या तुलनेत, सेक्सविषयी उतावीळ असणाऱ्‍या पुरुषांचे व निव्वळ उपभोगाच्या वस्तू या रूपात स्त्रियांचे चित्रण करणारी गीते, तसेच सेक्स कृत्यांविषयी अगदी उघडपणे उल्लेख करणारी गीते मुलांना कमी वयातच लैंगिक कृत्यांत पडण्यास प्रवृत्त करतात” असे या वृत्तात म्हटले होते. तर आजकालच्या या “गीतांतून समाजापर्यंत कोणते संदेश पोचवले जात आहेत याविषयी पालक, शिक्षक व किशोरवयीन मुलामुलींनी स्वतः देखील विचार करून पाहावा” अशी सूचना या वृत्तात देण्यात आली. (g ५/०७)