व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दंतवैद्याकडे कागेलेपाहिजे?

दंतवैद्याकडे कागेलेपाहिजे?

दंतवैद्याकडे कागेलेपाहिजे?

आधुनिक दंतवैद्यक अस्तित्वात येण्याआधी लोकांना अगदी तरुण वयातही दात दुखणे व दात पडणे यांसारखे त्रास होत असत. दात काळे पडल्यामुळे, वाकडेतिकडे वाढल्यामुळे किंवा पडल्यामुळे बऱ्‍याच जणांचा चेहरा विद्रूप होत असे. सगळे दात पडलेल्या म्हाताऱ्‍या लोकांना काहीही चावता येत नसल्यामुळे ते कुपोषणाला व अकाली मृत्यूला बळी पडत. आज मात्र दंतविकार असलेल्या लोकांना दाताच्या दुखण्यापासून मुक्‍ती मिळवणे, आयुष्यभर आपले दात उत्तम स्थितीत टिकवून ठेवणे आणि आत्मविश्‍वासाने स्मितहास्य करणे शक्य झाले आहे. आधुनिक दंतवैद्यकाने या तीन महत्त्वाच्या गोष्टी कशा काय साध्य केल्या?

प्रतिबंधक दंतवैद्यक दातांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यावर व दंतवैद्याकडून नियमित तपासणी करून घेण्यावर भर देते; त्यामुळे दात दुखणे व दात पडणे यांसारखे दंतरोग टाळण्यात प्रतिबंधक दंतवैद्यकाची महत्त्वाची भूमिका आहे. येशूने म्हटले होते, “निरोग्यास वैद्याची गरज नसते.” (लूक ५:३१) दात व हिरड्यांच्या आरोग्याविषयी योग्य माहिती घेतल्यामुळे काहींना इतका फायदा झाला आहे की त्यांना दंतवैद्याकडे जाण्याची क्वचितच गरज पडते. * पण बरेचजण मात्र आवश्‍यक असूनही दंतवैद्याकडे जाण्याचे टाळतात. काहीजणांची याबाबतीत बेपर्वा वृत्ती असते. इतरजण खर्चाचा विचार करून बिचकतात. तर काहींना दंतवैद्याकडे जाण्याची भीती वाटते. तुम्हीही यांपैकी एखाद्या गटात असू शकता. पण सर्वांनी याचा विचार केला पाहिजे, की दंतवैद्य मला कोणत्या प्रकारे मदत करू शकतो? दंतवैद्याकडे गेल्याने कोणता फायदा होऊ शकतो? प्रतिबंधक दंतवैद्यकाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपण हे समजून घेतले पाहिजे की दंतवैद्य कोणत्या समस्या टाळण्याच्या प्रयत्नात असतात.

दातांना इजा कशाप्रकारे होते?

दात दुखणे व दात पडणे यामुळे होणारा त्रास टाळण्यास दंतवैद्य मदत करू शकतो. तुम्ही सहकार्य केल्यास, दंतवैद्य तुमच्या दातांवर जे कीट चढते अर्थात सूक्ष्मजंतूंचा जो पातळ थर चढतो, त्यामुळे होणाऱ्‍या दुष्परिणामांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करतो. हे कीट सूक्ष्मजंतूंना थारा देते. सूक्ष्मजंतू साखरेपासून अम्ले तयार करतात. ही अम्ले दंतवल्कावर हल्ला करतात व तो विरघळून दाताला खड्डा पडतो. हा खड्डा हळूहळू मोठा होत जातो. या स्थितीत तुम्हाला काही त्रास होत नसतो, पण कीड तुमच्या दंतगरात पोचल्यावर मात्र तीव्र वेदना होऊ शकतात.

प्लाकमधील सूक्ष्मजंतू आणखी एका पद्धतीने तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. जर दातांवरील कीट ब्रशने साफ केले नाही तर ते कठीण होते आणि त्याचे कॅल्सीकरण होऊन या दंतकीटणामुळे हिरड्यांना शोथ होण्याची व त्या दातापासून मागे सरकू लागण्याची शक्यता असते. यामुळे दात व हिरड्यांमधील अंतर वाढून त्यात अन्‍नकण साचू लागतात आणि यामुळे सूक्ष्मजंतूंची भरभराट होऊन तुमच्या हिरड्यांना संसर्ग होतो. दंतवैद्य या स्थितीवर नियंत्रण करण्यास मदत करू शकतो, पण जर तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष केले तर मग तुमच्या दातांभोवती असलेल्या उतकांना इतकी हानी होते की शेवटी ते पडतात. किडलेल्या दातांपेक्षा या कारणामुळे सहसा लोकांचे दात पडतात.

सूक्ष्मजंतूंच्या या दुहेरी हल्ल्यापासून तुमची लाळ काही प्रमाणात संरक्षण पुरवते. पोटभर जेवल्यावर किंवा फक्‍त एखादे बिस्किट खालल्यावर तुमच्या लाळेला तोंडात राहिलेले अन्‍न कण काढून टाकण्यास व दातांवरील पातळ थरांत असलेल्या अम्लांची अम्लता नष्ट करण्यास १५ ते ४५ मिनिटे लागतात. तुमच्या दातांवर किती प्रमाणात चिकट साखर किंवा अन्‍नकण चिकटले आहेत यावर हे अवलंबून आहे. सहसा याच कालावधीत तुमच्या दातांना इजा होत असते. तेव्हा तुमच्या दातांना होणारी इजा ही तुम्ही किती साखर खाता यावर नव्हे तर तुम्ही किती वेळा जेवता व शर्करायुक्‍त पदार्थ खाता यावर अवलंबून आहे. झोपेत जास्त लाळ तयार होत नाही त्यामुळे रात्री गोड पदार्थ खाऊन किंवा पिऊन मग दात ब्रशने साफ न करता झोपी जाणे ही तुमच्या दातांकरता सर्वात अपायकारक सवय ठरू शकते. दुसरीकडे पाहता, जेवणानंतर साखर नसलेले च्युईंग गम चघळल्यामुळे जास्त लाळ निर्माण होऊन तुमच्या दातांचे संरक्षण होऊ शकेल.

प्रतिबंधक दंतवैद्यक

तुमच्या दातांच्या स्थितीनुसार, वर्षातून एकदा किंवा दोनदा नियमित स्वरूपाने आपल्या दातांची तपासणी करून घेतली पाहिजे असा सल्ला दंतवैद्य देतात. तपासणीदरम्यान दंतवैद्य कदाचित एक्स-रे प्रतिमा घेतील व तुमचे दात किडण्यास सुरुवात झाली आहे का हे नीट पाहतील. जर कोठे पोकळी तयार झाली असेल तर ते तोंडात बधिरता आणणारे औषध वापरून अतिशय वेगाने फिरणाऱ्‍या दात कोरण्याच्या यंत्राने (गिरमिट) ती भरून काढतील. या प्रक्रियेत तुम्हाला वेदना होणार नाही. ज्यांना खूपच भीती वाटते त्यांच्याकरता काही दंतवैद्य आता लेसर किरणे किंवा कीड विरघळवणारे जेल वापरतात ज्यामुळे गिरमिट वापरण्याची किंवा बधिरता आणण्याची गरज उरत नाही. लहान मुलांच्या बाबतीत दंतवैद्य नव्या आलेल्या दाढींकडे विशेष लक्ष देतात. चर्वण पृष्ठभागावर फटी किंवा खड्डे असल्यामुळे त्या जागा ब्रशने साफ करण्यास कठीण तर जात नाही ना, हे त्यांना पाहायचे असते. अशा फटी सीलंट नावाचा पदार्थ लावून बुजवून टाकण्याचा कदाचित ते सल्ला देतील ज्यामुळे दातांचा पृष्ठभाग सारखा होऊन साफ करणे सोपे जाईल आणि पर्यायाने दातात कीड येणार नाही.

प्रौढ रुग्णांच्या बाबतीत दंतवैद्य खासकरून हिरड्यांचे विकार टाळण्याविषयी जागरूक असतात. जर त्यांना तुमच्या दातांमध्ये कठीण झालेले दंतकीटण आढळले तर ते त्यास खरवडून काढून टाकतात. काहीजण ब्रशने दात साफ करताना काही जागांकडे हमखास दुर्लक्ष करतात. तुमचे दंतवैद्य तुम्हाला ब्रशचा योग्य रितीने कसा वापर करायचा हे सांगू शकतात. काही दंतवैद्य या महत्त्वाच्या कामाकरता रुग्णांना एखाद्या सुप्रशिक्षित डेंटल हायजिनिस्टकडे पाठवतात.

किडके दात टिकवून ठेवणे

जर तुमचे दात किडल्यामुळे खराब झाले असतील, जर एखादा दातच नसेल किंवा जर तुमचे दात वाकडेतिकडे असतील तर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की दंतवैद्यांजवळ तुम्हाला चांगले दात परत देण्याकरता बरीच नवीन तंत्रे आहेत. पण याकरता बराच खर्च येऊ शकतो तेव्हा तुम्ही याबाबतीत आपल्या ऐपतीचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. तरीपण बऱ्‍याच लोकांचे असे मत आहे की याप्रकारच्या उपचारांचे फायदे लक्षात घेता त्याकरता येणारा खर्च योग्यच आहे. या उपचाराने दंतवैद्यक तुम्हाला तुमची चर्वणशक्‍ती परत देऊ शकतात. किंवा ते तुमचे स्मितहास्य अधिक आकर्षक बनवू शकतात—ही निश्‍चितच काही साधीसुधी गोष्ट नाही कारण वाकडेतिकडे दात तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर बराच परिणाम करू शकतात.

पुढचे दात अर्धवट तुटलेले असतील किंवा त्यांवर डाग पडलेले असतील तर दंतवैद्य त्यावर हुबेहूब नैसर्गिक दंतवल्कासारखा असणारा अर्धपारदर्शक चिनीमातीपासून बनवलेला थर चढवण्याचा सल्ला देऊ शकतात. याला व्हेनियर म्हणतात. व्हेनियर्सना तुटलेल्या दाताच्या पृष्ठभागाशी जोडतात ज्यामुळे त्याला एक नवा आकार व स्वरूप मिळते. दात खूपच खराब झालेला असेल तर दंतवैद्य त्यावर शिखरे किंवा क्राऊन लावण्याचा सल्ला देतील. यामुळे जुना दात पूर्णपणे झाकला जातो आणि बाहेरून अगदी नवा बनतो. ही कृत्रिम शिखरे सहसा सोने किंवा अगदी नैसर्गिक दिसणाऱ्‍या पदार्थांनीही बनवली जातात.

तुमचे काही दात पडले असतील तर दंतवैद्य तुम्हाला कशी मदत करू शकतात? ते एकतर काढता येणारी अपूर्ण कवळी बसवू शकतात किंवा रिकाम्या जागेच्या दोन्ही बाजूला असलेल्या एकेका दाताला कॅप लावून आवश्‍यकतेनुसार एक किंवा त्यापेक्षा जास्त कृत्रिम दात धरून ठेवणारे ब्रिज बसवू शकतात. दुसरा पर्याय जो सध्या बराच लोकप्रिय होत आहे तो म्हणजे इंप्लांट. या तंत्रात दंतवैद्य तुमच्या हन्वस्थीतून अर्थात जबड्याच्या हाडातून पूर्वी जेथे दात होता, त्या ठिकाणी टिटेनियम धातूपासून तयार केलेला एक स्क्रू बसवतात. मग हे हाड व हिरड्या पुन्हा योग्य ठिकाणी वाढल्यावर ते या स्क्रूला कृत्रिम दात बसवतात. हे अगदी खरा दात असण्यासारखेच आहे.

वाकडेतिकडे दात असलेल्या व्यक्‍तीला इतरांशी बोलताना लाज तर वाटतेच पण हे दात स्वच्छ करण्यास अतिशय कठीण असल्यामुळे त्यांत बरेच विकार होऊ शकतात. जर वरच्या व खालच्या दातांचा पृष्ठभाग एकमेकांशी योग्य रित्या संलग्न नसेल तर हे वेदनामय असू शकते आणि यामुळे चावायला त्रास होऊ शकतो. पण आनंदाची गोष्ट म्हणजे दंतवैद्य सहसा अशा समस्या ब्रेसेसच्या साहाय्याने सोडवू शकतात. अलीकडच्या संशोधनामुळे आधुनिक ब्रेसेस उठून दिसणारी नसतात आणि त्यांना वारंवार काढून पुन्हा लावावे लागत नाही.

काही दंतवैद्य आजकाल श्‍वासाच्या दुर्गंधीच्या समस्येकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. बऱ्‍याचजणांना अधूनमधून तर काही जणांना नेहमी श्‍वासाच्या दुर्गंधीची समस्या असते. यामागे बरीच कारणे असू शकतात. काही दंतवैद्य या समस्येचे नेमके कारण शोधून काढू शकतात. बऱ्‍याचदा ही समस्या जिभेच्या अगदी मागच्या बाजूला असलेल्या सूक्ष्मजंतूंमुळे असते. यासाठी जिभेला ब्रशने साफ केल्यास व ती खरवडून साफ केल्यास फायदा होतो, तसेच साखर नसलेले च्युईंग गम चघळून तोंडात जास्त लाळ निर्माण करूनही ही समस्या कमी होते. विशेषतः दुग्धजन्य पदार्थ, मांस किंवा मासे खालल्यावर तोंड व्यवस्थित स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.

भीतीवर मात करणे

जर दंतवैद्याकडे जाण्याच्या कल्पनेने तुम्हाला भीती वाटत असेल तर ही भीती मनातून घालवण्यासही दंतवैद्य मदत करू शकतात. तेव्हा, तुम्हाला भीती वाटते हे त्यांना तुम्ही सांगितले पाहिजे. जर तुम्हाला दुखले किंवा भीती वाटली तर हाताने कशाप्रकारे इशारा करता येईल याविषयी त्यांच्याशी चर्चा करा. बऱ्‍याच रुग्णांना यामुळे आपल्या भीतीवर मात करण्यास मदत झाली आहे.

कदाचित तुम्हाला भीती वाटत असेल की दंतवैद्य तुम्हाला रागवतील. दातांची योग्य निगा न घेतल्याबद्दल तुमची कानउघाडणी करतील. पण डॉक्टर रुग्णांशी अशारितीने बोलू लागल्यास रुग्ण त्यांच्याकडे जायचे बंद करतील तेव्हा घाबरू नका कोणताही डॉक्टर असे करणार नाही. बहुतेक दंतवैद्य आपल्या गिऱ्‍हाइकांशी अतिशय प्रेमाने बोलतात.

बऱ्‍याच लोकांना दंतवैद्याच्या बिलची भीती वाटते. पण जर तुम्ही दातांची तपासणी करण्याकरता आता खर्च केला तर भविष्यात येणाऱ्‍या समस्या आणि महागडे उपचार तुम्ही टाळू शकता. बऱ्‍याच ठिकाणी प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीनुसार वेगवेगळ्या दर्जाच्या दंतवैद्यकीय सेवा उपलब्ध असतात. अगदी मूलभूत उपकरणे असलेल्या दातांच्या दवाखान्यातही सहसा एक्सरे यंत्र आणि वेगवान गिरमिटे (ड्रिल्स) असतात. दंतवैद्य बहुतेक प्रक्रिया रुग्णाला वेदना न होऊ देता पार पाडू शकतात. बधिरता आणणारी इंजेक्शने बहुतेक लोकांना, अगदी गरीब लोकांनाही परवडण्यासारखी असतात.

दंतवैद्य हे वेदना देण्याच्या नव्हे तर ती दूर करण्याच्या कार्याला समर्पित असतात. तुमच्या आजीआजोबांच्या जमान्यात होता तसा आज दंतोपचार एक वेदनादायी अनुभव राहिलेला नाही. आरोग्यदायी दातांचा सबंध शरीराच्या आरोग्याशी व एकंदरीत सुखदायी जीवनाशी संबंध असल्यामुळे दंतवैद्याकडे जाणे योग्य ठरेल असे तुम्हाला वाटत नाही का? गेल्यास, तुमच्या बऱ्‍याचशा धारणा निराधार होत्या असे तुम्हाला आढळेल आणि दंतवैद्याकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे तुम्हाला समाधान वाटेल. (g ५/०७)

[तळटीप]

^ या लेखात चर्चेचा रोख दंतवैद्य रुग्णाला मदत करण्यासाठी काय करू शकतो यावर आहे. तुम्ही आपल्या दातांची निगा कशी घेऊ शकता याविषयीच्या माहितीकरता सावध राहा! नोव्हेंबर ८, २००५ (इंग्रजी) अंकातील “आत्मविश्‍वासाने स्मितहास्य करण्यासाठी” हा लेख पाहावा.

[२९ पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

आरोग्यदायी दातांची रचना

शिखर

दंतवल्क

दंतिन

दंतगर व त्यातील तंत्रिका, रक्‍तवाहिन्या

दंतमूल

हिरड्या (जिंजिवा)

हाड

[२९ पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

दाताला लागलेली कीड

कीड लागल्यामुळे पडलेला खड्डा

दात भरल्यामुळे कीड पसरत नाही

[२९ पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

हिरड्यांचे रोग

दातांवरचे कीटण ब्रशने किंवा फ्लॉसने साफ केले पाहिजे

कॅल्सीकरण झालेले कीटण काढणे कठीण असते आणि यामुळे हिरड्या मागे सरकू लागतात

सैल पडू लागलेली हिरड्यांची कड

[३० पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

कृत्रिम दात बसवणे

व्हेनियर दाताच्या पृष्ठभागाला पक्के धरून ठेवते

शिखर

इंप्लांट

ब्रिज हे बसवण्याकरता कृत्रिम दाताच्या दोन बाजूला असलेल्या दातांना शिखरे बसवली जातात