पैशांविषयी सुज्ञ दृष्टिकोन कोणता?
बायबलचा दृष्टिकोन
पैशांविषयी सुज्ञ दृष्टिकोन कोणता?
बायबलनुसार, ‘पैसा आश्रय देणारा आहे.’ (उपदेशक ७:१२) कारण पैशानेच आपण अन्न, वस्त्र व निवारा विकत घेऊ शकतो. त्याअर्थी पैसा गरिबीमुळे येणाऱ्या संकटांपासून आश्रय देतो. भौतिक दृष्टीने विचार केल्यास पैशाने खरोखर काहीही विकत घेता येते. उपदेशक १०:१९ म्हणते, “पैशाने सर्व काही साध्य होते.”
देवाचे वचन आपल्याला परिश्रम करण्याचे प्रोत्साहन देते, जेणेकरून आपल्याजवळ स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याचे सामर्थ्य असावे. (१ तीमथ्य ५:८) प्रामाणिकपणे कठीण परिश्रम करणाऱ्याला साहजिकच समाधान, आत्मसन्मान व सुरक्षितता जाणवते.—उपदेशक ३:१२, १३.
शिवाय, परिश्रम केल्यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या इतरांना साहाय्य करण्यास समर्थ होतो. येशूने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) आपण गरजू व्यक्तींना, विशेषतः सहख्रिस्ती बांधवांना मदत करण्याकरता किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी एखादी भेटवस्तू विकत घेण्याकरता आनंदाने आपला पैसा खर्च करतो तेव्हा आपल्याला हा आनंद अनुभवण्यास मिळतो.—२ करिंथकर ९:७; १ तीमथ्य ६:१७-१९.
येशूने आपल्या अनुयायांना केवळ क्वचितप्रसंगीच नव्हे, तर नेहमी उदार असण्याचे प्रोत्साहन दिले. उदारता ही आपली स्वाभाविक वृत्तीच बनवण्याचा सल्ला येशूने त्यांना दिला. त्याने म्हटले, इतरांना “देत जा.” (लूक ६:३८) देवाच्या राज्यासंबंधी कार्यांच्या वृद्धीकरता दान देण्याच्या बाबतीतही हेच तत्त्व लावता येते. (नीतिसूत्रे ३:९) आपण अशारितीने उदारता दाखवतो तेव्हा आपण यहोवा व त्याच्या पुत्रासोबत ‘मैत्री जोडतो.’—लूक १६:९.
‘द्रव्याच्या लोभापासून’ सावधान
स्वार्थी लोक क्वचितच कोणाला काही देतात. आणि जेव्हा देतात तेव्हा त्यामागे काहीतरी स्वार्थी उद्देश असतो. सहसा समस्या ही असते, की त्यांना पैशाचा लोभ असतो. पण त्यांना वाटते त्याप्रमाणे यामुळे आनंद मिळत नाही तर सहसा दुःखच त्यांच्या पदरी पडते. १ तीमथ्य ६:१० म्हणते: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” द्रव्याचा किंवा पैशाचा लोभ इतका असंतुष्टीदायक, इतकेच नव्हे तर अपायकारकही का आहे?
एक कारण म्हणजे, लोभी व्यक्तीची तहान कधीही न भागणारी असते. उपदेशक ५:१० म्हणते, “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ति होत नाही.” तेव्हा पैशाचा लोभ धरणारे कधी न संपणाऱ्या अशा वैफल्याने स्वतःला ‘भोसकून घेतात.’ शिवाय त्यांच्या या लोभामुळे त्यांचे कोणाशीही पटत नाही, त्यांचे कौटुंबिक जीवन आनंददायक नसते, इतकेच काय तर त्यांना नीट झोपही लागत नाही. “कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही.” (उपदेशक ५:१२) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पैशाच्या लोभामुळे मनुष्य देवाच्या मर्जीतून उतरतो.—ईयोब ३१:२४, २८.
बायबलमधील व गैरधार्मिक इतिहासातही अशा अनेक व्यक्तींची उदाहरणे आहेत की ज्यांनी केवळ पैशासाठी चोरी, न्यायाचा विपर्यास, देहविक्रय, खून, विश्वासघात व लबाडी केली. (यहोशवा ७:१, २०-२६; मीखा ३:११; मार्क १४:१०, ११; योहान १२:६) येशू पृथ्वीवर सेवाकार्य करत होता तेव्हा त्याने एका “फार श्रीमंत” अधिकाऱ्याला आपला अनुयायी होण्यास बोलावले. पण दुःखाची गोष्ट म्हणजे या मनुष्याने ही सुवर्णसंधी नाकारली, फक्त एवढ्यासाठी की यामुळे त्याला आर्थिक हानी होईल. तेव्हा येशूने म्हटले: “ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे!”—लूक १८:२३, २४.
सध्याच्या ‘शेवटल्या काळात’ ख्रिश्चनांनी खासकरून सतर्क राहिले पाहिजे कारण सर्वसामान्य लोक पूर्वीच भाकीत केल्याप्रमाणे “धनलोभी” झाले आहेत. (२ तीमथ्य ३:१, २) आपल्या आध्यात्मिक गरजांविषयी जागरूक राहणारे खरे ख्रिस्ती या लोभी वृत्तीला बळी पडत नाहीत कारण त्यांच्याजवळ असे काहीतरी आहे की जे पैशापेक्षा कित्येकपटीने जास्त मौल्यवान आहे.
पैशापेक्षा मौल्यवान
पैसा आश्रय देतो असे म्हणताना शलमोन राजाने असेही म्हटले होते की “ज्ञान [“बुद्धी,” NW] आश्रय देणारे आहे” कारण ‘ते जीविताचे रक्षण करिते.’ (उपदेशक ७:१२) त्याने असे का म्हटले? येथे शलमोन बायबलमधून मिळालेल्या अचूक ज्ञानाच्या व देवाच्या सुदृढ अशा भयावर आधारित असलेल्या बुद्धीविषयी बोलत होता. अशाप्रकारची ईश्वरी बुद्धी पैशापेक्षा जास्त मोलाची असते कारण ती एका व्यक्तीला जीवनात अनेक धोक्यांपासून आणि अवेळी मृत्यू येण्यापासूनही वाचवते. खरी बुद्धी बाळगणाऱ्याला ती एखाद्या मुकुटाप्रमाणे सुशोभित करते व इतरांचा मान मिळवून देते. (नीतिसूत्रे २:१०-२२; ४:५-९) आणि या बुद्धीमुळे एका व्यक्तीला देवाची संमती मिळत असल्यामुळे तिला “जीवनवृक्षरूप” म्हटले आहे.—नीतिसूत्रे ३:१८.
ज्यांना अशाप्रकारची बुद्धी मिळवण्याची प्रामाणिक इच्छा आहे आणि जे तिचा शोध घेण्यास तयार आहेत त्यांना ती सहज प्राप्त होते. “माझ्या मुला, . . . जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल, कारण ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखांतून ज्ञान व सुज्ञता येतात.”—नीतिसूत्रे २:१-६.
खरे ख्रिस्ती पैशापेक्षा बुद्धीला जास्त मौल्यवान समजतात. म्हणूनच त्यांच्या जीवनात शांती, आनंद व सुरक्षितता असते जी पैशाचा लोभ धरणाऱ्यांना लाभत नाही. इब्री लोकांस १३:५ म्हणते: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’” अशी सुरक्षितता पैशाने खचितच मिळू शकत नाही. (g ६/०७)
तुम्हाला काय वाटते?
◼ पैसा आश्रय देतो तो कोणत्या अर्थाने?—उपदेशक ७:१२.
◼ ईश्वरी बुद्धी पैशापेक्षा जास्त मौल्यवान का आहे?—नीतिसूत्रे २:१०-२२; ३:१३-१८.
◼ आपण पैशाचा लोभ का धरू नये?—मार्क १०:२३, २५; लूक १८:२३, २४; १ तीमथ्य ६:९, १०.