व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मद्याच्या गुलामगिरीतून मुक्‍त

मद्याच्या गुलामगिरीतून मुक्‍त

मद्याच्या गुलामगिरीतून मुक्‍त

मद्याचा माफक वापर, भोजनास पूरक ठरू शकतो किंवा मग एखाद्या समारोहाच्या आनंदात भर घालू शकतो. परंतु काहींच्या बाबतीत, मद्यामुळे त्यांच्या जीवनात वादळ उठू शकते. मद्याच्या गुलामगिरीतून मुक्‍त होऊ शकलेल्या एका मनुष्याचा अनुभव खाली देण्यात आला आहे.

आमच्या घरात कसे तंग वातावरण असायचे त्याची आठवण आजही मला अगदी नकोशी वाटते. आई व बाबा दोघेही प्यायचे. मग बाबा आईला मारायचे. पुष्कळदा, मी बाबांचा बळीचा बकरा ठरायचो. त्या दोघांनी एकमेकांपासून विभक्‍त व्हायचे ठरवले तेव्हा मी फक्‍त चार वर्षांचा होतो. मला अजूनही आठवते, मला माझ्या आजोळी नेण्यात आले.

कुणालाही मी नकोए, असं मला वाटायचं. मी सात वर्षांचा होतो तेव्हा मी, घरी बनवलेली वाईन ठेवतात तिथं तळघरात जायचो आणि ती प्यायचो; मला वाटायचं यानं माझं दुःख कमी होईल. मी १२ वर्षांचा असताना, माझ्या आईचं आणि माझ्या आजीचं माझ्यावरून खूप कडाक्याचं भांडण झालं. आई माझ्यावर इतकी चिडली की तिनं गवत उचलण्यासाठी असतो तो लांब दांडीचा काटा माझ्या दिशेने फेकला. मी कसा तरी तो चुकवला. पण मी माझ्या जिवानिशी असा पहिल्यांदाच वाचलो नव्हतो. माझ्या शरीरावरचे व्रण, माझ्या मनावर झालेल्या व्रणांइतके खोल नव्हते.

मी १४ वर्षांचा झालो तेव्हा तर रोजच दारू पिऊ लागलो. वयाच्या १७ व्या वर्षी मी घरातून पळून गेलो. पिण्यामुळे मला वाटायचे मी मुक्‍त प्राणी आहे. मला कशावरूनही लगेच राग यायचा. पुष्कळदा स्थानीय कॅफेमध्ये माझी कुणाबरोबरतरी भांडणं व्हायचीच. माझ्या जीवनात फक्‍त पिणं आणि पिणंच होतं. एका दिवसात मी ५.७ लिटर वाईन, काही बिअरच्या बाटल्या आणि दुसरी दारूसुद्धा प्यायचो.

लग्न झाल्यावर पिण्यामुळे मी माझ्या बायकोलाही त्रास देऊ लागलो. आमच्यात राग, संताप वाढू लागला. मी तिच्यावर व मुलांवर हात उगारायचो. मी ज्या वातावरणात लहानाचा मोठा झालो होतो तेच विनाशकारक वातावरण मी खरं तर पुनःनिर्माण करत होतो. मी कमवत असलेला बहुतेक सर्व पैसा मी पिण्यात घालवायचो. आमच्या घरात कसलचं सामान नव्हतं त्यामुळे माझी बायको व मी खाली फरशीवर झोपायचो. माझ्या जीवनाला काही अर्थच उरला नव्हता आणि आमची परिस्थिती सुधारण्याचा मी देखील काही प्रयत्न करत नव्हतो.

एकदा मी एका यहोवाच्या साक्षीदाराशी बोललो. जगात इतकं दुःख का आहे असं मी त्याला विचारलं. तेव्हा त्यानं मला बायबलमधून दाखवलं, की देव सर्व समस्यांपासून मुक्‍त असं एक जग आणण्याचं वचन देतो. यामुळे साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्याचं मी ठरवलं. मी जसजसं बायबल शिकवणुकींचा माझ्या जीवनात अवलंब करू लागलो आणि माझं पिणं कमी करू लागलो तसतसं माझं कौटुंबिक जीवन बऱ्‍याच प्रमाणात सुधारलं. तरीपण, मला जर यहोवा देवाची स्वीकृत मार्गानं सेवा करायची आहे तर मला माझ्या पिण्याच्या सवयीवर पूर्णपणे मात करावी लागेल, हे मला जाणवलं. पिण्याच्या समस्येशी तीन महिने झुंज दिल्यानंतर मी पूर्णपणे दारू सोडून दिली. सहा महिन्यांनंतर मी बाप्तिस्मा घेण्याद्वारे यहोवा देवाला माझं जीवन समर्पित केलं.

दारूच्या गुलामगिरीतून मुक्‍त झाल्यामुळे मी हळूहळू माझ्यावरील कर्जही फेडून टाकलं. मी स्वतःचं घर घेतलं, एक कार घेतली. ख्रिस्ती सभांना व घरोघरी प्रचाराला जाण्याकरता आम्ही तिचा उपयोग करतो. सरतेशेवटी मी आत्म-सन्मान प्राप्त केला.

कधीकधी पार्ट्यांमध्ये मला मद्य पिण्यास आमंत्रित केले जाते. पण या सवयीवर मात करायला मी किती संघर्ष केला आहे तो पुष्कळ लोकांना माहीत नाही. तो एकच प्याला मला पुन्हा माझ्या जुन्या सवयीकडे वळण्यास कारणीभूत ठरू शकतो. अधूनमधून मला दारू पिण्याची हुक्की येते. पण मग माझ्या इच्छेवर ताबा ठेवण्यासाठी मला खूपदा प्रार्थना करावी लागते आणि मनात ठाम निश्‍चय करावा लागतो. मला तहान लागते तेव्हा मी मद्य नसलेलं पेय पोटभर पितो. आता दहा वर्ष झाली आहेत, मी दारूला शिवलो देखील नाही.

मनुष्य जे करू शकत नाही ते यहोवा करू शकतो. त्याच्या मदतीने मी आज ज्या स्वातंत्र्याचा आनंद लुटू शकत आहे त्या गुलामगिरीतून मी कधी मुक्‍त होईन असं स्वप्नातसुद्धा पाहिलं नव्हतं! बालपणी माझ्या मनावर झालेले व्रण आजही नाहीसे झालेले नाहीत. आजही माझ्या मनात नकारात्मक विचार येतात. पण दुसऱ्‍या बाजूला पाहता, मी देवाबरोबर चांगला नातेसंबंध जोडू शकलो आहे, खरे मित्र ख्रिस्ती मंडळीत आहेत आणि माझ्यासारखेच विश्‍वास करणारं माझं कुटुंब आहे. दारुविरुद्ध मला जो संघर्ष द्यावा लागतो त्यात माझी बायको व मुलं मला पूर्ण मनानं सहकार्य देतात. माझी बायको म्हणते: “पूर्वी माझं जीवन नरक होतं. आज, मी यहोवाचे इतके आभार मानते की त्याच्या मदतीनं मी माझ्या नवऱ्‍याबरोबर व मुलांबरोबर सुखानं नांदत आहे.”—सौजन्याने. (g ५/०७)

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

मी १४ वर्षांचा झालो तेव्हा तर रोजच दारू पिऊ लागलो

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

मनुष्य जे करू शकत नाही ते यहोवा करू शकतो

[१२ पानांवरील चौकट/चित्रे]

बायबल आणि मद्य

▪ बायबल मद्य पिण्यास बंदी करत नाही. “मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस” देवाने मानवजातीला दिलेल्या भेटींपैकी एक आहे, असे वर्णन बायबलमध्ये करण्यात आले आहे. (स्तोत्र १०४:१४, १५) द्राक्षारस समृद्धतेचे व सुरक्षिततेचे लक्षण आहे, असेही बायबल म्हणते. (मीखा ४:४) वास्तविक पाहता, येशू ख्रिस्ताने केलेला पहिला चमत्कार हा एका लग्न समारंभ प्रसंगी पाण्याचा द्राक्षारस बनवण्याचा होता. (योहान २:७-९) प्रेषित पौलाने जेव्हा तीमथ्याच्या ‘वारंवार दुखण्याविषयी’ ऐकले तेव्हा त्याने त्याला “थोडा द्राक्षारस घे,” असे सांगितले.—१ तीमथ्य ५:२३.

▪ बायबल दारूचा प्रमाणाबाहेर उपयोग करण्यास निषेध करते:

‘मद्यप्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.’—१ करिंथकर ६:९-११.

“द्राक्षारसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे.”—इफिसकर ५:१८.

“हाय हाय कोण म्हणतो? अरे अरे कोण करितो? भांडणतंट्यात कोण पडतो? गाऱ्‍हाणी कोण सांगतो? विनाकारण घाय कोणास होतात? धुंदी कोणाच्या डोळ्यांत असते? जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांच्या. द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यांत कसा चमकतो, घशांतून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नको. शेवटी तो सर्पासारखा दंश करितो, फुरश्‍याप्रमाणे झोंबतो. तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील; तुझ्या मनांतून विपरित गोष्टी बाहेर पडतील.”—नीतिसूत्रे २३:२९-३३.

सोबतच्या लेखात दाखवल्याप्रमाणे ज्यांना दारूची समस्या आहे त्यांनी त्यापासून चार हात दूर राहण्याचा सुज्ञ निर्णय घेतला आहे.—मत्तय ५:२९.