व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातून ते सुखरूप बचावले

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातून ते सुखरूप बचावले

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातून ते सुखरूप बचावले

भारतातील सावध राहा! लेखकाकडून

मुंबई. १ कोटी ८० लाखा पेक्षा अधिक व सतत वाढत असलेल्या लोकसंख्येचे शहर. दररोज, या शहराचे साठ ते सत्तर लाख रहिवाशी निरनिराळ्या उपनगरांकडून शहराकडे व शहराकडून उपनगरांकडे नियमित धावणाऱ्‍या वेगवान लोकल ट्रेन्सनी प्रवास करतात. कोणी नोकरीच्या ठिकाणी, कोणी शाळा कॉलेजांत, बाजारपेठांत तर पर्यटकांकरता आकर्षण असलेल्या ठिकाणी जाण्याकरता प्रवास करतात. गर्दीच्या वेळांत, नऊ डबे असलेली प्रत्येक लोकल ट्रेन, प्रवाशांनी इतकी खचाखच भरलेली असते की जेमतेम १,७१० प्रवाशांची क्षमता असलेल्या या लोकल्समध्ये त्यावेळी जवळजवळ ५,००० प्रवासी कोंबून भरलेले असतात. अशाच गर्दीच्या वेळी ११ जुलै, २००६ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईच्या या लोकल ट्रेन्सना आपले लक्ष्य बनवले. १५ मिनिटांच्या आत पश्‍चिम रेल्वेमार्गावर धावणाऱ्‍या वेगवेगळ्या ट्रेन्सवर सात बाँबस्फोट झाले व त्यात २०० पेक्षा जास्त जण मृत्यूमुखी पडले तर ८०० पेक्षा जास्त जण जखमी झाले.

मुंबईत व तिच्या उपनगरांत असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या एकूण २२ मंडळ्यांपैकी कित्येकजण दररोज लोकलने प्रवास करतात आणि स्फोट झाले त्या लोकलगाड्यांमध्येही काहीजण होते. आनंदाची गोष्ट म्हणजे कोणीही दगावले नाही पण बरेचजण गंभीररित्या जखमी झाले. अनीता नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतत होती. लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे, सहज उतरता यावे म्हणून ती फर्स्टक्लास डब्याच्या दाराजवळच उभी होती. ट्रेन वेगाने पुढे जात असतानाच, अचानक एक भयानक विस्फोट झाला आणि पूर्ण डब्यात काळा धूर पसरला. तिने दारातून बाहेर वाकून उजवीकडे पाहिले तेव्हा तिला पुढल्या डब्याचा धातूचा पत्रा ट्रेनपासून वेगळा होऊन ४५ अंश कोनात लटकत असल्याचे दिसले. मधल्या फटीतून मृतदेह आणि शरीराचे तुकडे रुळांवर पडत असलेले पाहून तर तिच्या पायांतले त्राणच गेले. हे भयनाट्य कधी संपणारच नाही की काय असे वाटत असतानाच ट्रेन थांबली. खरे तर हे सर्व फक्‍त काही सेकंदातच घडले होते. इतर प्रवाशांसोबत अनीतानेही खाली रुळांवर उडी मारली आणि ट्रेनपासून जितक्या दूर जाता येईल तितक्या दूर जाण्यासाठी धावू लागली. तिने आपला नवरा जॉन याला मोबाईलने फोन लावला. फोन लावताच तो लागला हे विशेष, कारण काही मिनिटांतच, असंख्य लोकांनी घाबरून फोन लावायला सुरुवात केल्यावर सबंध शहरातील फोन यंत्रणा विस्कळीत झाली. इतके सर्व डोळ्यासमोर घडूनही अनीता आतापर्यंत शांत होती. पण आपल्या पतीचा आवाज ऐकताच तिचा ताबा सुटला आणि ती रडू लागली. काय घडले त्याचे वर्णन करून तिने त्याला येऊन आपल्याला घेऊन जाण्यास सांगितले. ती त्याच्यासाठी थांबलेली होती, इतक्यात पाऊस पडू लागला आणि घटनेचा तपास करणाऱ्‍यांना उपयोगी पडले असते असे बरेचसे पुरावे वाहून गेले.

क्लॉडियस नावाचा दुसरा यहोवाचा साक्षीदार आपल्या ऑफिसातून नेमका त्या दिवशी एरवीपेक्षा लवकर बाहेर पडला. पश्‍चिम रेल्वेमार्गाच्या शहरातील टर्मिनसवर अर्थात, चर्चगेट स्टेशनवर तो संध्याकाळी ५:१८ च्या लोकलमध्ये फर्स्टक्लासच्या डब्यात चढला. भाईंदरपर्यंतच्या एका तासाच्या प्रवासाकरता बसण्यासाठी जागा शोधत असतानाच त्याला यहोवाच्या साक्षीदारांच्या जवळच्याच एका मंडळीतला जोसफ दिसला. दोघेजण गप्पा मारू लागले आणि वेळ कसा निघून गेला त्यांना कळले नाही. काहीवेळानंतर, दिवसभरच्या कामाने थकलेल्या जोसफला जरा डुलकी लागली. ट्रेन खचाखच भरलेली असल्यामुळे आपल्या स्टेशनच्या आधीचे स्टेशन आले तेव्हा क्लॉडियस उठून दाराजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. क्लॉडियस दाराजवळ पोचल्यावर जोसफ उठला आणि क्लॉडियसचा निरोप घेण्यासाठी तो आपल्या सीटवरून मागे वळाला. सीटच्या बारला धरून क्लॉडियस त्याच्याशी बोलण्याकरता थोडा वाकला. कदाचित यामुळेच क्लॉडियसचा जीव वाचला असावा. अचानक कर्कश्‍श आवाज आला. ट्रेनच्या डब्याला जोराचा हादरा बसला आणि सर्वत्र अंधार व धूर पसरला. क्लॉडियस सीट्‌सच्या मधल्या जागेत फेकला गेला. त्याला आता काहीच ऐकू येत नव्हते फक्‍त कानात घणघणण्याचा आवाज येत होता. तो उभा होता त्या जागी एक मोठा खड्डा पडला होता. त्याच्या आजूबाजूला उभे असलेले काही प्रवासी खाली रुळांवर फेकले गेले होते तर काही जमिनीवर मरून पडले होते. त्या भयानक मंगळवारी रेल्वे यंत्रणेला हादरवून सोडलेल्या सात स्फोटांपैकी पाचव्या स्फोटातून क्लॉडियस जिवंत बचावला होता.

क्लॉडियसला इस्पितळात नेण्यात आले. त्याचे कपडे रक्‍ताने माखले होते. पण ते रक्‍त दुर्घटनेला बळी पडलेल्या इतर प्रवाशांचे होते. त्याला फारसे लागले नव्हते. पण त्याचा कानाचा पडदा फाटला होता, एका हाताला भाजले होते आणि केस जळाले होते. इस्पितळात त्याला जोसफ आणि जोसफची बायको ॲन्जेला भेटली. ॲन्जेला ही पुढच्याच महिलांच्या डब्यात बसली होती आणि तिला काहीच दुखापत झाली नव्हती. जोसफच्या उजव्या डोळ्याला मार लागला होता आणि काही प्रमाणात त्याचीही श्रवणशक्‍ती गेली होती. या तीन साक्षीदारांनी जिवंत बचावल्याबद्दल यहोवाचे आभार मानले. क्लॉडियस सांगतो की शुद्धीवर आल्यावर त्याच्या मनात आलेला पहिला विचार हा होता, की ‘क्षणार्धात माणसाचे सर्वकाही संपू शकते, मग या जगात पैशाच्या, धनसंपत्तीच्या मागे लागणे खरंच किती व्यर्थ आहे!’ त्याने आपला देव यहोवा याच्यासोबत एक नातेसंबंध जोडला होता याचे त्याला मनापासून समाधान वाटले. हा नातेसंबंध इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याला जास्त मोलाचा वाटतो!

लहानशा कालावधीतच मुंबई शहराने बरेच काही सोसले होते. मुसळधार पाऊस व पूर, दंगली आणि आता हे बाँबस्फोट. पण या शहरातील १,७०० पेक्षा जास्त साक्षीदारांची अतिशय सकारात्मक, व आवेशी मनोवृत्ती आहे. ते नियमितपणे आपल्या शेजाऱ्‍यांना एका नव्या जगाच्या अद्‌भुत आशेविषयी सांगतात, एक असे जग जेथे सर्व प्रकारचा हिंसाचार कायमचा नाहीसा झालेला असेल.—प्रकटीकरण २१:१-४. (g ६/०७)

[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]

तो उभा होता त्या जागी एक मोठा खड्डा पडला होता

[२३ पानांवरील चित्र]

अनीता

[२३ पानांवरील चित्र]

क्लॉडियस

[२३ पानांवरील चित्र]

जोसफ व ॲन्जेला

[२२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Sebastian D’Souza/AFP/Getty Images