व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुवासिक द्रव्यांच्या उत्पादकांचे मनपसंत फळ

सुवासिक द्रव्यांच्या उत्पादकांचे मनपसंत फळ

सुवासिक द्रव्यांच्या उत्पादकांचे मनपसंत फळ

इटलीतील सावध राहा! लेखकाकडून

सुवासिक द्रव्यांचा इतिहास फार जुना आहे. बायबलचे लेखन झाले त्या काळात ज्या कोणाची ऐपत होती तो आपले घर, कपडे, बिछाने व शरीर सुगंधित करण्यासाठी सुवासिक द्रव्यांचा उपयोग करत असे. त्याकाळी सुवासिक द्रव्ये बनवण्याकरता अगरु, बाल्सम, दालचिनी आणि इतर सुगंधी मसाल्यांचा वापर केला जात असे.—नीतिसूत्रे ७:१७; गीतरत्न ४:१०, १४.

वृक्षवनस्पतींचे अर्क आजही सुवासिक पदार्थांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. असाच एक घटक पदार्थ कसा उत्पादित केला जातो हे पाहण्याकरता आम्ही पतीपत्नी, इटॅलियन द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील सर्वात खालच्या टोकाला असलेल्या कलेब्रिया प्रदेशात आलो आहोत. बर्गमॉट हे नाव कदाचित तुम्ही याआधी ऐकले नसेल, पण या फळाचा सुवास बाजारात उपलब्ध असलेल्या स्त्रियांच्या पर्फ्युम्सपैकी एक तृतीयांश पर्फ्युम्समध्ये आणि पुरुषांकरता निम्म्या कोलोन्समध्ये आढळतो. या बर्गमॉटविषयी थोडी माहिती घ्यायला तुम्हाला आवडेल का?

बर्गमॉट हे लिंबू वंशातील एक सदापर्णी झाड आहे. मार्च-एप्रिलच्या सुमारास या झाडाला फुले येतात आणि ऑक्टोबर ते डिसेंबरच्या सुमारास याची मऊ सालींची व संत्र्याच्या आकाराची पिवळी फळे पिकू लागतात. बऱ्‍याच तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बर्गमॉट ही एक संकरज वनस्पती आहे आणि हे मुळात कोठून आले हे एक रहस्यच आहे. ही झाडे जंगली स्वरूपात कधीही आढळत नाहीत आणि बी पेरूनही ती लावता येत नाहीत. तर या झाडाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्‍यांना जुन्या झाडांची कलमे या वंशातील इतर झाडांवर उदाहरणार्थ लिंबांच्या किंवा संत्र्याच्या झाडावर बांधावी लागतात.

पर्फ्युम्स उत्पादकांच्या दृष्टीने विचार केला तर बर्गमॉट फळांत काही अनोखे गुणधर्म आहेत. सदर विषयावरील एका पुस्तकात असा खुलासा करण्यात आला होता की या फळातून काढलेला अर्क “इतर सुगंधांसोबत सहज मिसळतो आणि त्यांना विरून जाऊ देत नाही. यामुळे निरनिराळ्या सुगंधांचा अंश असलेला एकच मुख्य सुगंध तयार करणे शक्य होते आणि या सुगंधातील प्रत्येक सुगंधी अंशाला बर्गमॉटमुळे एक खासप्रकारचा ताजेपणा येतो.” *

कलेब्रिया येथील बर्गमॉटची लागवड

ऐतिहासिक सुत्रांनुसार, १८ व्या शतकाच्या सुरुवातीपासून कलेब्रिया प्रदेशात बर्गमॉट झाडे आढळतात. स्थानिक शेतकरी कधीकधी या फळांचा अर्क प्रवाशांना विकतही असत. पण कोलोनची लोकप्रियता वाढत गेली तसतसे बर्गमॉटची व्यापाराच्या उद्देशाने लागवड करण्यास सुरुवात झाली. १७०४ साली जान पाओलो फेमीनीस या जर्मनीला स्थलांतर केलेल्या इटॅलियन माणसाने एकप्रकारचे सुवासिक पाणी तयार केले व त्याला त्याने अद्‌भुत प्रकारचे पाणी या अर्थाचे ॲक्वा ॲडमिरॅबिलिस हे नाव दिले. यातील मुख्य घटक बर्गमॉट फळांचा अर्क होता. या पर्फ्युमला नंतर लोक ओ-ड्‌-कोलोन, “कोलोन वॉटर” किंवा नुसतेच कोलोन म्हणू लागले कारण कोलोन नावाच्या शहरात याचे उत्पादन केले जात होते.

बर्गमॉटची पहिली वृक्षवाटिका १७५० सालाच्या सुमारास रेजियो येथे लावण्यात आली आणि याच्या अर्काच्या विक्रीतून मिळालेल्या मोठ्या नफ्यामुळे इतरांनाही याची लागवड करण्याचे प्रोत्साहन मिळाले. दक्षिणेकडून उघड्यावर पण उत्तरेकडून येणाऱ्‍या थंड वाऱ्‍यांपासून सुरक्षित अशा ठिकाणी ही झाडे चांगली वाढतात. यांना सौम्य हवामान लागते; तापमानात अचानक बदल, जोराचे वारे आणि बऱ्‍याच काळापर्यंत आर्द्र हवा यांना मानवत नाही. आणि अगदी हेच आदर्श हवामान त्यांना इटली देशाच्या अगदी दक्षिणी टोकाच्या समुद्र किनाऱ्‍यालगत असलेल्या; केवळ ५ किलोमीटर रुंदीच्या व १५० किलोमीटर लांबीच्या अरुंद जमिनीच्या पट्टीत लाभले आहे. इतर ठिकाणीही बर्गमॉटची लागवड करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी याच्या जागतिक उत्पादनापैकी बहुतेक रेजियो प्रांतातच केले जाते. याशिवाय, बर्गमॉटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केवळ आफ्रिकेतील कोट दि वार येथे केले जाते.

हिरवट पिवळ्या रंगाचा बर्गमॉटचा तेलार्क, द्रवरूपात असून तो फळाच्या सालीतून काढला जातो. हा तेलार्क काढण्याच्या पारंपरिक पद्धतीत, प्रथम फळ कापून त्याचे दोन भाग केले जात. मग त्यातील गर काढून टाकला जाई. यानंतर सालींना अशाप्रकारे पिळले जायचे की ज्यामुळे सालींच्या बाहेरील रंगीत थरातून तेलार्क स्पाँजमध्ये फवारला जाईल. एक पाऊंड तेलार्क काढण्यासाठी जवळजवळ २०० पाऊंड बर्गमॉट फळांवर ही प्रकिया करावी लागायची. आजकाल सहसा यंत्रांनीच बर्गमॉटचा तेलार्क काढला जातो. या यंत्रांत सबंध फळापासून साल वेगळी करण्यासाठी खरबरीत पृष्ठभूमी असलेल्या डिस्क किंवा रोलर्सचा वापर केला जातो.

फारसे प्रसिद्ध नसलेले पण मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे

कलेब्रिया प्रदेशाबाहेर कोणाला बर्गमॉटविषयी फारशी माहिती नाही पण एका माहिती सूत्रानुसार “सुगंधांच्या जाणकारांना बर्गमॉट अतिशय मौल्यवान वाटते.” या फळाचा सुवास फक्‍त पर्फ्युम्स नव्हे तर साबणे, डिओडोरंट, टूथपेस्ट व क्रीम्समध्ये आढळतो. खाद्य पदार्थांना विशेष स्वाद देण्याकरता बर्गमॉटचा अर्क चहापत्ती, आईस्क्रीम, मिठाया व पेयांमध्ये वापरला जातो. त्वचा काळवंडण्याचा गुणधर्म या फळात असल्यामुळे उन्हात असताना त्वचेवर लावण्याच्या अनेक क्रीम व लोशन्समध्ये बर्गमॉटचा अंश वापरला जातो. यात पूतिरोधक व जंतूनाशक गुणधर्म असल्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान, नेत्ररोग व त्वचारोगांवर उपचार करताना संसर्गरोधक म्हणून वापरण्याकरता औषधी उद्योगातही याला महत्त्व आहे. बर्गमॉट पेक्टिन नावाचा पदार्थ चिकटपणा देणारा घटक असल्यामुळे रक्‍तस्राव व अतिसार रोखणाऱ्‍या औषधांत याचा वापर केला जातो.

तज्ज्ञांनी बर्गमॉट तेलार्कातून जवळजवळ ३५० घटकांचे पृथक्करण केले आहे. यामुळेच बर्गमॉट या एकाच फळात सुगंधांच्या अनेक छटा व इतर असंख्य गुणधर्म आढळतात!

बायबलच्या लेखकांना बर्गमॉटविषयी माहिती असण्याची फारशी शक्यता नाही. पण या फळाच्या गुणधर्मांविषयी आवडीने जाणून घेणाऱ्‍या आणि निर्माणकर्त्याच्या अगाध बुद्धीविषयी अचंबा वाटणाऱ्‍या प्रत्येकाला स्तोत्रकर्त्यासोबत असे म्हणावेसे वाटेल: ‘फळझाडे . . . परमेश्‍वराचे स्तवन करोत.’—स्तोत्र १४८:१, ९. (g ६/०७)

[तळटीप]

^ काही लोकांना परागकणांची किंवा विशिष्ट फुलांची ॲलर्जी असते त्याप्रमाणेच पर्फ्युम्सचीही असते. सावध राहा! कोणत्याही विशिष्ट उत्पादनाची शिफारस करत नाही.

[२५ पानांवरील चित्र]

सबंध फळांची साल किसून बर्गमॉटचा तेलार्क काढला जातो

[चित्राचे श्रेय]

© Danilo Donadoni/Marka/age fotostock