हे जग कोणत्या दिशेने चालले आहे?
हे जग कोणत्या दिशेने चालले आहे?
आज आपण पाहत असलेला नैतिकतेचा ऱ्हास, बायबलमध्ये आधीच भाकीत करण्यात आला होता. त्याचे वर्णन अशाप्रकारे करण्यात आले आहे: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. . . . माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, . . . क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील.”—२ तीमथ्य ३:१-५.
बायबलमधील ही भविष्यवाणी, आजच्या जगाचे अगदी अचूक वर्णन करते, याजशी तुम्ही सहमत व्हाल. पण ही भविष्यवाणी जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी करण्यात आली होती! या भविष्यवाणीची सुरुवात “शेवटल्या काळी,” या शब्दांनी करण्यात आली आहे. ‘शेवटला काळ’ या वाक्यांशाचा काय अर्थ होतो?
कशाचा ‘शेवटला काळ’?
‘शेवटला काळ’ हा वाक्यांश सर्वसामान्य बनला आहे. एकट्या इंग्रजी भाषेतच, या नावाने शेकडो पुस्तके आहेत. उदाहरणार्थ, अलिकडेच निघालेल्या अज्ञानतेचा शेवटला काळ—युद्धात असलेली अमेरिका, १९१७-१९१८ या पुस्तकाचा विचार करा. पुस्तकाच्या प्रस्तावनेत हे स्पष्टपणे दिसून येते, की ‘शेवटला काळ’ हा वाक्यांश पुस्तकात जिथे जिथे वापरण्यात आला आहे तिथे तिथे तो एका ठराविक काळाला सूचित करतो; एक असा काळ जेव्हा नैतिकता अगदी अधोगतीला लागली आहे.
प्रस्तावनेत असेही पुढे म्हटले आहे: “इतिहासातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा १९१४ मध्ये देश झपाट्याने बदलत चालला होता.” होय, १९१४ मध्ये संपूर्ण जगानेच जणू काय युद्धात भाग घेतला; असे पूर्वी कधी झाले नव्हते. पुस्तक पुढे म्हणते: “या
युद्धात फक्त सैनिकांनी भाग घेतला नव्हता तर नागरिक आणि सैनिक दोघांनी भाग घेतला होता; हे एका सैन्याचे दुसऱ्या सैन्याविरुद्धचे युद्ध नव्हे तर एका राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्राविरुद्धचे युद्ध होते.” हे युद्ध, बायबल ज्याला ‘शेवटला काळ’ म्हणते त्याच्या सुरुवातीला घडले; याविषयी आपण पुढे पाहणार आहोत.या जगाचा अंत होण्याआधी ते, ‘शेवटला काळ’ म्हटलेली एक ठराविक कालावधी अनुभवेल असे बायबल शिकवते. खरे पाहता, बायबल असे म्हणते, की एक असे जग होते जे लयास गेले किंवा त्याचा विनाश झाला; त्याविषयीचे वर्णन ते असे करते: “तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला.” हे ‘तेव्हा’ म्हणजे केव्हा घडले आणि कोणत्या जगाचा नाश झाला होता? ते ‘अभक्तांचे प्राचीन जग’ होते जे नोहा नावाच्या एका मनुष्याच्या दिवसात होते. तसेच आजचे जगही नाश होणार आहे. पण, नोहा आणि त्याच्या कुटुंबाप्रमाणे जे शेवटपर्यंत देवाची सेवा करतात ते या नाशातून वाचतील.—२ पेत्र २:५; ३:६; उत्पत्ति ७:२१-२४; १ योहान २:१७.
या अंताविषयी येशू काय म्हणाला होता?
येशू ख्रिस्तही ‘नोहाच्या दिवसांविषयी’ बोलला होता. तेव्हा ‘जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून घेऊन गेला.’ त्या जगाचा नाश होण्याआधी जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आजच्या काळातही म्हणजे ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळातही असेल अशी तुलना त्याने केली. (मत्तय २४:३, ३७-३९) इतर बायबल अनुवादांमध्ये “जगाचा शेवट” किंवा “युगाचा शेवट” हे वाक्यांश वापरण्यात आले आहेत.—ईझी टू रीड व्हर्शन आणि सुबोध भाषांतर.
जगाचा शेवट होण्याआधी येशूने पृथ्वीवरील जीवन कशाप्रकारचे होईल ते भाकीत केले. युद्धाविषयी त्याने असे म्हटले: “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.” हे, १९१४ च्या सुरुवातीला घडले, असे इतिहासकारांनी पाहिले आहे. म्हणूनच, वर उल्लेखलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे म्हटले होते, की “१९१४ मध्ये संपूर्ण जगानेच जणू काय युद्धात भाग घेतला. . . . हे एका सैन्याचे दुसऱ्या सैन्याविरुद्धचे युद्ध नव्हे तर एका राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्राविरुद्धचे युद्ध होते.”
आपल्या भविष्यवाणीत येशूने पुढे म्हटले: “जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत.” इतर गोष्टींबरोबर ‘अनीति वाढेल’ असेही त्याने म्हटले. (मत्तय २४:७-१४) हे आज आपल्या दिवसात घडत असल्याचे आपण नक्कीच पाहतो. आजची नैतिकता इतकी काही ढासळली आहे की ती बायबल भविष्यवाणी पूर्ण करते!
उतरती कळा लागलेल्या या जगात आपण कशाप्रकारे जगले पाहिजे? प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्चनांना नैतिक ऱ्हासाविषयी काय लिहिले ते पाहा. त्याने लोकांच्या ‘दुर्वासनांविषयी’ सांगताना असे म्हटले: “त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीहि स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले.”—रोमकर १:२६, २७.
इतिहासकार असे म्हणतात, की पहिल्या शतकात मानव समाज नैतिक ऱ्हासात खोल खोल चालला होता तेव्हा “छोट्याशा ख्रिस्ती समाजाचे धर्माचरण व सभ्यपणा, कामासक्त लोकांच्या डोळ्यात खुपत होता.” यावरून आपण जरा थांबून स्वतःला विचारले पाहिजे: “माझ्याविषयी आणि मी ज्यांना माझे मित्र म्हणून निवडतो त्यांच्याविषयी काय? जे अनैतिक लोक आहेत अशांपासून आम्ही वेगळे, नैतिकरीत्या सभ्य लोक म्हणून उठून दिसतो का?”—१ पेत्र ४:३, ४.
आपला संघर्ष
आपल्या आजूबाजूला अनैतिकता माजली असली तरीसुद्धा आपण “ह्या कुटिल व विपरीत पिढीत . . . निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले” असण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला ‘जीवनाच्या वचनावर घट्ट पकड’ बसवावी लागेल. (फिलिप्पैकर २:, NW) ख्रिस्ती जन नैतिक भ्रष्टतेपासून स्वतःला निष्कलंक कसे ठेवू शकतात याचा कानमंत्र बायबलमधील या वाक्यावरून मिळतो. त्यांनी, देवाच्या वचनातील शिकवणुकी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत आणि हे जाणले पाहिजे, की देवाच्या वचनातील नैतिक दर्जे जीवनाच्या उत्तम मार्गाचे प्रतिनिधीत्व करते. १५, १६
‘या युगाचे दैवत’ दियाबल सैतान लोकांना आपल्या बाजूला ओढण्याचा खूप प्रयत्न करतोय. (२ करिंथकर ४:४) बायबल आपल्याला सांगते, की तो “तेजस्वी देवदूताचे सोंग” घेत राहतो. आणि त्याची सेवा करणारे किंवा त्याच्याप्रमाणे वागणारे त्याचे हस्तकही असेच करतात. (२ करिंथकर ११:१४, १५) ते स्वातंत्र्य आणि मौजमस्तीचे वचन देतात पण वास्तविकतेत “भ्रष्टतेचे दास” बनले आहेत.—२ पेत्र २:१९.
तेव्हा फसू नका. जे देवाच्या नैतिक दर्जांकडे दुर्लक्ष करतात त्यांना अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील. बायबलमधील एका स्तोत्रकर्त्याने असे लिहिले: “तारण दुर्जनांपासून दूर आहे; कारण ते [देवाच्या] नियमांचा आश्रय करीत नाहीत.” (स्तोत्र ११९:१५५; नीतिसूत्रे ५:२२, २३) पटते का आपल्याला ही गोष्ट? जर होय तर मग आपण आपले मन व हृदय, स्वच्छंदी जीवनशैलीविषयी होणाऱ्या प्रचारापासून सुरक्षित ठेवले पाहिजे.
पण पुष्कळ जण असा तर्क करतात, की ‘मी जे काही करत आहे ते बेकायदेशीर नाही, तर मग त्यात काही चूक नाही.’ पण असा तर्क करणे बरोबर नाही. आपला प्रेमळ स्वर्गीय पिता, आपले जीवन कंटाळवाणे व बंधनकारक बनवण्याकरता नैतिक मार्गदर्शन देत नाही तर आपले संरक्षण करण्याकरता देतो. आपल्याला ‘जे हितकारक आहे ते तो शिकवतो.’ आपण संकट टाळून आनंदी जीवन जगावे अशी त्याची इच्छा आहे. होय, बायबल असे शिकवते, की देवाची सेवा केल्यामुळे “आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन” मिळते. ते पुढचे जीवन म्हणजे “खरे जीवन” अर्थात त्याने वचन दिलेल्या नव्या जगातील सार्वकालिक जीवन!—यशया ४८:१७, १८; १ तीमथ्य ४:८; ६:१९.
तेव्हा, जे बायबलच्या शिकवणुकींनुसार जगतात त्यांना मिळणाऱ्या लाभांची तुलना, जे चालत नाहीत त्यांना भोगाव्या लागणाऱ्या दुःखांशी करा. देवाचे म्हणणे ऐकून त्याची मर्जी संपादन करणे हा जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे! “जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ असतो,” असे वचन देव देतो.—नीतिसूत्रे १:३३.
नैतिकरीत्या शुद्ध समाज
या जगाचा नाश झाल्यानंतर “दुर्जन नाहीसा होईल,” असे बायबल म्हणते. ते असेही म्हणते: “सरळ जनच देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील.” (स्तोत्र ३७:१०, ११; नीतिसूत्रे २:२०-२२) अशाप्रकारे, अनैतिकता आचरणाऱ्या उरल्यासुरलेल्यांचा व आपल्या निर्माणकर्त्याच्या हितकारक शिकवणुकींनुसार वागण्यास नकार देणाऱ्या सर्वांचा नाश करून पृथ्वी स्वच्छ केली जाईल. मग, देवाने पहिल्या मानवी दांपत्याला ज्या नंदनवनात ठेवले होते त्यासारखी परिस्थिती देवावर प्रेम करणारे संपूर्ण पृथ्वीवरील लोक हळूहूळ वाढवतील.—उत्पत्ति २:७-९.
अशा स्वच्छ केलेल्या पृथ्वीवरील नंदनवनात जगण्याचा आनंद काही औरच असेल! हे सर्व पाहण्याचा निरुपम सुहक्क ज्यांना मिळणार आहे त्यामध्ये, मृतांतून पुनरुत्थित केलेले कोट्यवधी लोक देखील असतील. तेव्हा, देवाने दिलेल्या या अभिवचनात आनंद करा: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण २१:३, ४. (g ४/०७)
[९ पानांवरील संक्षिप्त आशय]
एका जगाचा अंत झाला तेव्हा देवाला भिऊन वागणारे काही लोक होते जे जिवंत राहिले
[१० पानांवरील चित्र]
या जगाचा अंत झाल्यानंतर पृथ्वी एक नंदनवन होईल