व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या आदर्शातून शिकवा

आपल्या आदर्शातून शिकवा

आपल्या आदर्शातून शिकवा

हे महत्त्वाचे का आहे? कृती धडे शिकवतात. शब्द फक्‍त माहिती देतात. उदाहरणार्थ, आईवडील आपल्या मुलांना सांगतात की दुसऱ्‍यांशी आदराने वागले पाहिजे आणि नेहमी खरे बोलले पाहिजे. पण हेच आईवडील जर एकमेकांवर किंवा मुलांवर खेकसत असतील, किंवा नकोशा कर्तव्यांपासून अंग चोरण्यासाठी खोटे बोलत असतील तर ते आपल्या मुलांना मोठे झाल्यावर असेच वागण्याचे धडे देत असतात. लेखक डॉ. सॅल सव्हीर म्हणतात “मुले ज्याद्वारे शिकतात, असा एक सर्वात जबरदस्त मार्ग” म्हणजे आपल्या आईवडिलांची नक्कल करणे.

हे सोपे का नाही? आईवडिलांच्या हातूनही चुका होतात. प्रेषित पौलाने लिहिले: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) आणि आपल्या बोलण्यावर नियंत्रण करण्याच्या बाबतीत पाहिल्यास, शिष्य याकोबाने असे लिहिले: “मनुष्यांपैकी कोणीहि जिभेला वश करावयास समर्थ नाही.” (याकोब ३:८) शिवाय, बरेचदा मुले आईवडिलांच्या सहनशक्‍तीचा अंत पाहतात. लॅरी हा दोन मुलींचा पिता आहे व स्वभावानेच शांत व संयमी मनुष्य आहे. पण तो म्हणतो, “माझ्या मुली किती लवकर मला संताप आणून देतात हे पाहून मलाच आश्‍चर्य वाटतं.”

यावर उपाय कोणता? मुलांसमोर परिपूर्ण नव्हे, तर चांगले आदर्श होण्याचा प्रयत्न करा. आणि अधूनमधून तुमच्या हातून चुका होतात तेव्हा त्यांतूनही मुलांना एक उपयुक्‍त धडा शिकवण्याचा प्रयत्न करा. दोन मुलींचा पिता ख्रिस सांगतो, “मी कधीही माझ्या लेकरांवर चिडलो किंवा माझ्या एखाद्या अयोग्य निर्णयामुळे त्यांच्यावर काही वाईट परिणाम झाला तर मी माझी चूक कबूल करून त्यांची क्षमा मागतो. यामुळे माझ्या लेकरांना हे शिकायला मिळाले आहे की आईवडिलांच्या हातूनही चुका होतात आणि चांगले वागण्याकरता सर्वांनाच प्रयत्न करावा लागतो.” याआधी ज्याच्याविषयी उल्लेख करण्यात आला आहे, तो कोस्तास म्हणतो: “रागाच्या भरात काहीतरी बोलून गेल्यावर मी नेहमी क्षमा मागतो. यामुळे माझ्या मुलीही, त्यांच्याकडून चूक झाल्यास क्षमा मागायला शिकल्या आहेत.”

यहोवा देव म्हणतो: “तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) अधिकारपदी असलेली व्यक्‍ती एक गोष्ट बोलते आणि करताना मात्र दुसरीच गोष्ट करते तेव्हा मुलांना प्रौढांइतकीच, किंबहुना त्याहूनही जास्त चीड येते. म्हणूनच प्रत्येक दिवसाच्या शेवटी पुढील प्रश्‍न स्वतःला विचारून पाहा: मी आज दिवसभर तोंडून शब्दही काढला नसता, तर फक्‍त माझ्या कृतींवरून मुलांनी कोणकोणते धडे घेतले असते? हेच धडे त्यांना तोंडीही मला द्यावेसे वाटतात का? (g ८/०७)

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

“दुसऱ्‍याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय?” —रोमकर २:२१

[९ पानांवरील चित्रे]

पालक क्षमा मागतात तेव्हा मुलेही क्षमा मागायला शिकतात