व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आशावादी मनोवृत्ती खरेच तुमच्या आरोग्याला लाभदायक आहे का?

आशावादी मनोवृत्ती खरेच तुमच्या आरोग्याला लाभदायक आहे का?

आशावादी मनोवृत्ती खरेच तुमच्या आरोग्याला लाभदायक आहे का?

“आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय.” जवळजवळ ३,००० वर्षांपूर्वी एका बुद्धिमान इस्राएली राजाने असे लिहिले. (नीतिसूत्रे १७:२२) आज डॉक्टरांना त्या देवप्रेरित शब्दांची सत्यता पटली आहे. पण “आनंदी हृदय” हे सर्वांनाच उपजत लाभलेले नसते.

दैनंदिन जीवनाच्या दबावांना सर्वांनाच तोंड द्यावे लागते आणि या दबावांमुळे वैफल्य आणि निराशावादी वृत्ती उत्पन्‍न होते. पण अलीकडील अभ्यासांवरून असे दिसून येते की आपल्या जीवनात समस्या असल्या तरीही आशावादी वृत्ती उत्पन्‍न करण्याचे काही निश्‍चित फायदे आहेत.

आशावादी मनोवृत्तीची व्याख्या “चांगल्या परिणामाची अपेक्षा करण्याची वृत्ती” अशी करण्यात आली आहे. आशावादी मनुष्याच्या जीवनात एखादी वाईट घटना घडते तेव्हा त्याला कसे वाटते? तो कोणताही पराभव कायमचा आहे असे मानत नाही. याचा अर्थ तो वास्तवाकडे डोळेझाक करतो असे नाही. तर, तो वास्तवाचा स्वीकार करून परिस्थितीचे नीट अवलोकन करतो. मग शक्य असेल त्याप्रमाणे तो परिस्थितीत बदल किंवा सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो.

दुसरीकडे पाहता, निराशावादी वृत्तीचा मनुष्य आलेल्या संकटाबद्दल स्वतःला जबाबदार धरतो. या वाईट परिस्थितीतून आपण कधीही बाहेर पडू शकणार नाही असे तो गृहित धरतो आणि आपल्याच मूर्खपणामुळे, कमकुवतपणामुळे किंवा अनाकर्षकतेमुळे ही परिस्थिती आली आहे असे तो मानतो. यामुळे तो निमूटपणे आपला पराभव स्वीकारतो.

आशावादी मनोवृत्तीचा आपल्या आरोग्यावर आणि एकंदर कल्याणावर परिणाम होतो का? हो. अमेरिकेतील मिनसोटा, रोचेस्टर येथील मेयो क्लिनिकच्या शास्त्रज्ञांना ८०० रुग्णांवर ३० वर्षांच्या कालावधीत केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की इतरांच्या तुलनेत आशावादी मनोवृत्तीच्या लोकांचे आरोग्य जास्त चांगले असते आणि ते तुलनात्मकरीत्या जास्त जगतात. संशोधकांना हेही दिसून आले की आशावादी लोक तणावाला अधिक चांगल्याप्रकारे तोंड देतात आणि त्यांना डिप्रेशनचा मनोविकार होण्याची शक्यता कमी असते.

पण या जगातील समस्या वाढतच आहेत. तेव्हा आशावादी असणे निश्‍चितच सोपे नाही. बऱ्‍याच लोकांना सकारात्मक रित्या विचार करणे कठीण जाते यात काही आश्‍चर्य नाही. या समस्येला कसे तोंड देता येईल? सोबत दिलेल्या पेटीतील काही सूचना उपयुक्‍त असल्याचे तुम्हाला आढळतील.

आनंदी मनोवृत्ती सगळ्याच समस्या दूर करू शकत नाही, पण ती नक्कीच आरोग्यदायी आणि अधिक समाधानकारक जीवन जगण्यास मदत करू शकते. बायबल म्हणते: “दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते.”—नीतिसूत्रे १५:१५. (g ९/०७)

[२२ पानांवरील चौकट/चित्र]

आशावादी मनोवृत्ती उत्पन्‍न करण्याकरता काही सूचना *

▪ एखाद्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळणार नाही किंवा एखाद्या कामात आपल्याला यश येणार नाही असे वाटू लागताच तो विचार मनातून झटकून टाका. सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

▪ आपल्या कामातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमचे काम कोणतेही असो, त्यातून तुम्हाला कशामुळे समाधान मिळते याचा शोध घ्या.

▪ जे लोक जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहतात अशा व्यक्‍तींशी मैत्री करा.

▪ ज्या परिस्थितीवर तुम्ही नियंत्रण करू शकता तिला तोंड द्या, जी परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे तिचा स्वीकार करा.

▪ दररोज तुमच्या जीवनात घडलेल्या तीन चांगल्या गोष्टी एका कागदावर लिहा.

[तळटीप]

^ वरील यादीतील काही मुद्दे, मेयो क्लिनिकने तयार केलेल्या एका प्रकाशनावर आधारित आहेत.