कुटुंबासाठी सुस्पष्ट नियम बनवा आणि ते अंमलात आणा
४
कुटुंबासाठी सुस्पष्ट नियम बनवा आणि ते अंमलात आणा
हे महत्त्वाचे का आहे? जॉर्जिया विद्यापीठातील एक समाजशास्त्रज्ञ रोनाल्ड सिमन्स म्हणतात, “ज्या घरात सुस्पष्ट नियम घालून दिलेले असतात आणि ते नियम तोडल्यास कडक कारवाई होईल हे मुलांना माहीत असते तेव्हा सहसा अशा घरातील मुले जास्त आनंदी असतात ही एक वस्तुस्थिती आहे. पण याउलट जेव्हा घरात कोणतेच नियम नसतात तेव्हा मुले आत्मकेंद्रित व स्वार्थी बनतात. अशी मुले स्वतःही आनंदी राहात नाहीत आणि आपल्यासोबत असलेल्या इतर लोकांचेही जीवन ते असह्य बनवतात.” देवाचे वचन अगदी साध्या शब्दांत सांगते: “जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल, तर तुम्ही त्याला योग्य वेळी काळजीपूर्वक शिकवाल.”—नीतिसूत्रे १३:२४, ईझी टू रीड व्हर्शन.
हे सोपे का नाही? मुलांच्या वागणुकीसंबंधी वाजवी मर्यादा घालून देण्याकरता व त्यांची अंमलबजावणी करण्याकरता वेळ, परिश्रम आणि चिकाटीची गरज असते. आणि मुलांमध्ये जणू या मर्यादांचे उल्लंघन करून पाहण्याची एक नैसर्गिक ओढ असते. दोन मुलांचे पालक असणारे माइक व सोनिया यांनी या संदर्भात जे म्हटले ते अगदी समर्पक आहे. ते म्हणतात, “मुले स्वतंत्र बुद्धी व इच्छा असणाऱ्या लहानशा व्यक्ती असतात आणि उपजतच त्यांचाही पाप करण्याकडे कल असतो.” माइक व सोनियाचे आपल्या मुलींवर खूप प्रेम आहे. पण ते कबूल करतात की “कधीकधी मुले अतिशय हट्टी व स्वार्थी बनतात.”
यावर उपाय कोणता? यहोवाने इस्राएल राष्ट्रासोबत ज्याप्रमाणे व्यवहार केला त्याचे अनुकरण करा. आपल्या लोकांनी ज्या नियमांचे पालन करावे अशी यहोवाची अपेक्षा होती ते नियम त्याने त्यांना स्पष्टपणे सांगितले. (निर्गम २०:२-१७) या नियमांचे उल्लंघन केल्याने होणारे परिणामही त्यांना सांगितले.—निर्गम २२:१-९.
आपल्या मुलांनी ज्या नियमांचे पालन करावे असे तुम्हाला वाटते अशा नियमांची एक लेखी यादी तुम्हीसुद्धा तयार करू शकता. काही आईवडील असे सुचवतात की ही यादी खूप लांबलचक असू नये, तर पाच-सहा नियमांचाच यात समावेश असावा. लांबलचक यादीपेक्षा विचारपूर्वक निवडलेल्या नियमांची छोटीशी यादी अंमलात आणायला आणि आठवणीत ठेवायलाही सोपी असते. ते नियम तोडल्यास काय परिणाम होईल हे ही यादीतील त्या नियमांपुढे लिहून ठेवा. नियम तोडल्याबद्दल दिली जाणारी शिक्षा वाजवी आणि अंमलात आणू शकाल अशी असावी. वेळोवेळी या नियमांची उजळणी करावी म्हणजे आपल्याकडून कशाप्रकारची वागणूक अपेक्षित आहे हे सर्वांना, आई व बाबांनाही आठवणीत राहील.
मुलांनी नियम तोडल्यास, त्याची शिक्षा लगेच दिली जावी. पण ती शांतपणे, निश्चयी वृत्तीने आणि प्रत्येकवेळी सातत्याने दिली जावी. सूचना: जर तुम्ही रागात असाल, तर कोणतीही शिक्षा देण्याआधी तुमचा राग शांत होईपर्यंत थांबा. (नीतिसूत्रे २९:२२) शिक्षा देण्याचे लांबणीवर टाकू नका. शिक्षा बदलण्यासाठी मुलांशी बोली करू नका. नाहीतर, मुलांच्या नजरेत नियमांचे गांभीर्य कमी होईल. हे बायबलमध्ये दिलेल्या एक तत्त्वासारखे आहे: “दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत होते.”—उपदेशक ८:११.
मुलांना हितावह ठरेल अशा आणखी कोणत्या मार्गाने तुम्ही त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव करून देऊ शकता? (g ८/०७)
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
“तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे.”—मत्तय ५:३७