व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोणाजवळ पेन्सिल आहे का?

कोणाजवळ पेन्सिल आहे का?

कोणाजवळ पेन्सिल आहे का?

ब्रिटन येथील सावध राहा! लेखकाकडून

स्वस्त, लगेच वापरता येण्याजोगी, आणि अगदी हलकी. खिशात सहज मावणारी. वीजेची गरज नाही, शाई गळण्याची भीती नाही आणि लिहिलेले सहज पुसता येते. मुले पहिल्यांदा हिनेच लिहायला शिकतात. मोठमोठे कलाकार हिचा वापर करून अप्रतिम कलाकृती निर्माण करतात. आणि आपल्यापैकी बहुतेकजण नोट्‌स घेण्यासाठी हिचा वापर करतात. ही म्हणजे स्वस्त आणि मस्त पेन्सिल. सबंध जगात सर्वात जास्त वापरले जाणारे लिहिण्याचे साधन. हिचा शोध कसा लागला आणि आज आपण पाहतो त्या रूपात ही कशी आली याची आगळी वेगळी कहाणी सुरू होते इंग्लंडच्या ग्रामीण भागात लागलेल्या एका आकस्मिक शोधाने.

काळे शिसे

सोळाव्या शतकात इंग्लंडच्या उत्तरेकडे लेक डिस्ट्रिक्ट प्रदेशातील बॉरोडेल नावाच्या डोंगरांजवळ असलेल्या एका दरीत, एका विचित्र काळ्या पदार्थाची डिखळे सापडली. हा खनिज पदार्थ कोळशासारखा दिसत असला तरी तो जळत नव्हता; कागदावर याचा काळा चमकदार डाग पडे, जो सहज पुसताही येत होता. पण हा पदार्थ काहीसा तेलकट असल्यामुळे लोक त्याचे तुकडे मेंढीच्या कातडीत गुंडाळून किंवा त्याच्या लहान काड्या बनवून त्या दोऱ्‍याने बांधत. काळे शिसे लाकडी कवचांमध्ये बसवण्याची कल्पना सर्वप्रथम कोणाला सुचली हे तर ज्ञात नाही, पण १५६० च्या दशकादरम्यान सर्वात जुन्या प्रकारच्या पेन्सिली युरोप खंडात पोचल्या होत्या.

काही काळातच कलाकारांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काळे शिसे खाणींतून काढून निर्यात केले जाऊ लागले. १७ व्या शतकात ते सर्वत्र वापरले जात होते. त्याच दरम्यान, पेन्सिल उत्पादकांनी काळ्या शिशापासून चांगल्या प्रतीचे लेखनाचे साधन तयार करण्याचे प्रयोग सुरू केले. बॉरोडेल येथे सापडलेले शिशाचे साठे शुद्ध आणि सहज काढता येण्याजोगे असल्यामुळे चोरांनी व काळा व्यापार करणाऱ्‍यांनी याचा फायदा घेतला. हे पाहून ब्रिटिश पार्लमेंटने १७५२ साली एक कायदा काढला ज्यात या पदार्थाची चोरी केल्यास तुरुंगवास अथवा ब्रिटिश अंमलाखाली असलेल्या एखाद्या वसाहतीत हद्दपार करण्याची शिक्षा दिली जाईल असे जाहीर करण्यात आले.

स्वीडिश रसायनवेत्ता कार्ल डब्ल्यु. शेल यांनी १७७९ साली हा आश्‍चर्यजनक शोध लावला की काळे शिसे मुळात शिसे नसून मृदू रूपात असलेले शुद्ध कार्बनच आहे. दहा वर्षांनी जर्मन भूगोलशास्त्रज्ञ अब्राहाम जी. वर्नर यांनी ग्रीक भाषेत “लिहिणे” या अर्थाच्या ग्राफीन या शब्दावरून या पदार्थाला ग्राफाइट असे नाव दिले. तेव्हा, या पेन्सिलीचे नाव शिसपेन्सिल असले तरी त्यात शिसे मुळात नसतेच!

पेन्सिलचा विकास

बरीच वर्षे, इंग्लंडमध्ये सापडणाऱ्‍या ग्राफाइटचीच पेन्सिल उद्योगावर मक्‍तेदारी होती कारण ते आणखी कोणतीही प्रक्रिया न करता वापरण्याइतके शुद्ध रूपात होते. युरोपमध्ये अन्यत्र आढळणारे ग्राफाइट तितके शुद्ध नसल्यामुळे तिथले पेन्सिल उत्पादक पेन्सिलचे शिसे सुधारण्याचे प्रयत्न करू लागले. फ्रेंच अभियंता नीकोला-झाक काँते यांनी ग्राफाइट व मृत्तिका एकत्र दळून त्यापासून शिशाच्या कांड्या तयार केल्या व त्या भट्टीत भाजल्या. ग्राफाइट व मृत्तिका यांचे प्रमाण कमी जास्त करून त्यांनी काळ्या रंगाच्याच निरनिराळ्या छटांच्या पेन्सिली निर्माण केल्या. हीच प्रक्रिया आजही वापरात आहे. काँते यांनी १७९५ साली आपल्या शोधाचे हक्क मिळवले.

एकोणीसाव्या शतकात पेन्सिल उत्पादन हा एक मोठा उद्योग बनला. सायबेरिया, जर्मनी आणि आता ज्याला झेक रिपब्लिक म्हणतात तेथेही ग्राफाइटचे साठे आढळले. जर्मनीत आणि मग संयुक्‍त संस्थानांत अनेक कारखाने सुरू झाले. यांत्रिक प्रगती आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले तसतशी पेन्सिलची किंमत घसरू लागली आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला तर संयुक्‍त संस्थानांत शाळकरी मुले देखील न रंगवलेल्या लाकडी पेन्सिली वापरू लागली होती.

पेन्सिलचे आधुनिक रूप

दर वर्षी जगभरात कोट्यवधी पेन्सिलींचे उत्पादन होते. आज, लिहिण्याचे व चित्ररेखाटनाचे साधन म्हणून पेन्सिल अत्याधुनिक रूपात उपलब्ध आहे. एका सर्वसाधारण लाकडी पेन्सिलने ३५ मैलांच्या लांबीची रेष ओढता येते किंवा ४५,००० शब्द लिहिता येतात. काही यांत्रिक पेन्सिली टोपण वा विशिष्ट कळ दाबल्यास शिसे पुढे सरकवणाऱ्‍या पद्धतीच्या असून त्यांत अतिशय बारीक शिशाच्या कांड्या असतात ज्यामुळे टोक करण्याचा त्रास वाचतो. पेन्सिलचे कवच प्लॅस्टिक किंवा धातूचे असू शकते. ग्राफाइटच्या ऐवजी रंगीत पेन्सिलींमध्ये डाय किंवा रंगद्रव्ये असतात व या पेन्सिली कित्येक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

अष्टपैलू, बहुपयोगी, साधी आणि कार्यक्षम असणारी पेन्सिल काळाच्या ओघात, अजूनतरी अप्रचलित होण्याचे चिन्ह दिसत नाही. म्हणूनच, भविष्यातही तुमच्या घरात किंवा कार्यालयात हा प्रश्‍न तुम्हाला बरेचदा ऐकायला मिळेल, “कोणाजवळ पेन्सिल आहे का?” (g ७/०७)

[१९ पानांवरील चौकट/चित्र]

शिसे पेन्सिलच्या आत कसे काय जाते?

पेन्सिलचे शिसे तयार करण्यासाठी प्रथम ग्राफाइट व मृत्तिका व पाणी एकत्र मिळून दळतात. मग हे मिश्रण एका बारीक धातूच्या नळीतून दाबले जाते ज्यामुळे शिशाची अखंड कांडी मिळते. ही कांडी वाळवून, पेन्सिलीच्या लांबीएवढे तुकडे कापले जातात व भट्टीत भाजले जातात. भाजलेले शिसे वसा व मेण यांच्या मिश्रणात भिजवतात. पेन्सिली तयार करण्यासाठी सहसा देवदाराचे लाकूड वापरले जाते कारण पेन्सिलला टोक करण्यासाठी हे लाकूड सोयीचे असते. सर्वप्रथम, अर्ध्या पेन्सिलीइतकी जाडी असलेल्या लाकडाच्या फळ्या तयार करून त्या सपाट केल्या जातात व या फळ्यांवर अर्धवर्तुळाकार समांतर खाचा पाडल्या जातात. मग एका फळीवर या खाचांमध्ये शिशाची कांडी बसवली जाते आणि मग दुसरी फळी या फळीवर चिकटवून दाबली जाते. चिकटवण्याचा पदार्थ वाळल्यावर पेन्सिली कापून वेगळ्या केल्या जातात. मग पेन्सिलीला हवा तो आकार देऊन, त्या घासून गुळगुळीत करतात व त्यांवर रंगाचे थर देतात आणि उत्पादकाचे चिन्ह व इतर माहिती असलेला शिक्का मारतात. पेन्सिल तयार झाल्यावर तिला मध्ये जोड आहे हे लक्षातही येत नाही. कधीकधी एका टोकाला खोडरबर बसवितात.

[चित्राचे श्रेय]

Faber-Castell AG

[२० पानांवरील चौकट/चित्र]

कोणती पेन्सिल निवडावी?

तुमच्या आवश्‍यकतेनुसार पेन्सिल निवडण्यासाठी पेन्सिलवर लिहिलेली अक्षरे व संख्या पाहा. यांवरून पेन्सिल किती कठीण किंवा मऊ आहे हे समजते. मऊ शिशाच्या पेन्सिलीने जास्त गडद खूण उमटते.

HB हे बहुपयोगी, मध्यम प्रतीचे शिसे समजले जाते.

B या अक्षराने दर्शवलेल्या प्रतीची पेन्सिल मऊ असते. २B किंवा ६B अशी संख्या पेन्सिल किती मऊ प्रतीची आहे हे दर्शवतात. संख्या जितकी जास्त तितके शिसे मऊ असेल.

H या अक्षराने दर्शवलेल्या प्रतीची पेन्सिल कठीण असते. संख्या जितकी जास्त, उदाहरणार्थ २H, ४H, ६H वगैरे, तितके शिसे जास्त कठीण असते.

F प्रतीची पेन्सिल बारीक टोकाची असते.

काही देशांत पेन्सिलची प्रत दर्शवण्याची वेगळी पद्धत असते. उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांत २ क्रमांकाची पेन्सिल ही HB प्रतीची पेन्सिल असते. या पद्धतीनुसार संख्या जितकी मोठी तितके शिसे कठीण असते.