व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गर्भनिरोधकांचा वापर नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे का?

गर्भनिरोधकांचा वापर नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे का?

बायबलचा दृष्टिकोन

गर्भनिरोधकांचा वापर नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे का?

तुमचे याविषयी काय मत आहे? विवाहित जोडप्यांनी गर्भनिरोधकांचा वापर करणे चुकीचे आहे का? या प्रश्‍नाचे तुम्ही काय उत्तर द्याल, हे तुमच्या धार्मिक विश्‍वासांवर अवलंबून आहे. कॅथलिक चर्चनुसार, कोणत्याही प्रकारे प्रजननात बाधा घालणे हे “मुळातच पाप” आहे. कॅथलिक धर्मसिद्धान्त असे प्रतिपादित करतो की विवाहित जोडप्याच्या प्रत्येक समागमातून गर्भधारणा होण्याची शक्यता असण्यास हवी. त्याअर्थी, कॅथलिक धर्मानुसार गर्भनिरोधकांचा वापर “नैतिकदृष्ट्या अयोग्य” आहे.

बऱ्‍याच लोकांना हा दृष्टिकोन पटत नाही. “संयुक्‍त संस्थानांतील ७५% कॅथलिकांचे असे म्हणणे आहे की चर्चने कृत्रिम संततीनियमनाच्या पद्धतींचा वापर करण्यास परवानगी द्यावी. . . . आणि दररोज लाखो लोक चर्चच्या या नियमाचे उल्लंघन करतात,” असे पिट्‌झबर्ग पोस्ट-गॅझेटच्या या विषयावरील एका लेखात सांगण्यात आले. या लाखो लोकांपैकी एक लिंडा नावाची स्त्री, जिला तीन अपत्ये आहेत, ती गर्भनिरोधके वापरत असल्याचे उघडपणे कबूल करते. ती म्हणते, “मी काही पाप करत आहे असे मला मुळीच वाटत नाही.”

पण देवाचे वचन या विषयी काय सांगते?

जीवन मौल्यवान आहे

देवाच्या दृष्टीने लहान बाळाचे जीवन, त्याच्या विकासाच्या अगदी प्राथमिक टप्प्यांपासूनच अतिशय मौल्यवान आहे. देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने इस्राएलचा राजा दावीद याने असे लिहिले: “तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. . . . मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले . . . ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते.” (स्तोत्र १३९:१३, १६) गर्भधारणा होते तेव्हा एका नव्या जीवनाला सुरुवात होते. मोशेच्या नियमशास्त्रात असे सांगण्यात आले होते की गर्भात असलेल्या बाळाला इजा करणाऱ्‍याला शिक्षा दिली जावी. किंबहुना निर्गम २१:२२, २३ (NW) यात स्पष्टपणे सांगितले आहे की जर दोन पुरुष एकमेकांशी भांडत असताना एखाद्या गर्भवती स्त्रीला किंवा तिच्या गर्भातील बाळाला प्राणघातक ईजा झाली तर ही बाब नियुक्‍त न्यायाधीशांपुढे आणली जावी. त्यांनी परिस्थितीची तपासणी करून, त्या व्यक्‍तीने जाणूनबुजून हल्ला केला किंवा कसे हे ठरवावे. पण “जिवाबद्दल जीव” असा निकाल ते देऊ शकत होते.

हे तत्त्व गर्भनिरोधकांच्या विषयाला समर्पक आहे. कारण संततीनियमनाच्या काही पद्धतींत गर्भपात घडवून आणला जातो. गर्भनिरोधनाच्या या पद्धती जीवनाचा आदर करण्याच्या तत्त्वाशी सुसंगत नाहीत. पण बहुतेक गर्भनिरोधके मात्र गर्भपात घडवून आणत नाहीत. तर संततीनियमनाच्या अशा पद्धतींचा वापर करण्याबाबत काय?

बायबलमध्ये ख्रिश्‍चनांना कोठेही प्रजोत्पादन करण्याची आज्ञा देण्यात आलेली नाही. पहिल्या मानवी जोडप्याला आणि नोहाच्या कुटुंबाला देवाने असे सांगितले होते की “बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.” पण ख्रिश्‍चनांना मात्र ही आज्ञा देण्यात आली नाही. (उत्पत्ति १:२८; ९:१) म्हणून, विवाहित जोडप्यांना आपले कुटुंब वाढवायचे आहे किंवा नाही, त्यांना किती मुले हवी आहेत आणि ते या मुलांना केव्हा जन्म देऊ इच्छितात हे सर्व त्यांचे वैयक्‍तिक प्रश्‍न आहेत ज्यांविषयी त्यांनी स्वतः निर्णय घेतला पाहिजे. त्याचप्रकारे, बायबलमध्ये संततीनियमनाचा निषेधही करण्यात आला नाही. त्याअर्थी, बायबलच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, पती व पत्नी जर गर्भपात न घडवून आणणारी एखादी गर्भनिरोधनाची पद्धत वापरू इच्छित असतील तर हा त्यांचा वैयक्‍तिक निर्णय आहे. पण कॅथलिक चर्च गर्भनिरोधनाचा निषेध का करते?

मानवी बुद्धीच्या तुलनेत देवाची बुद्धी

कॅथलिक धर्माविषयी माहिती देणाऱ्‍या एका ग्रंथानुसार सा.यु. दुसऱ्‍या शतकात ख्रिश्‍चनांनी पहिल्यांदा स्टोईक तत्त्वज्ञानावर आधारित एक नियम स्वीकारला. या नियमानुसार विवाहित जोडप्यांच्या लैंगिक संबंधांचा केवळ एकच वैध उद्देश आहे आणि तो म्हणजे संतती उत्पन्‍न करणे. या दृष्टिकोनामागील तर्कवाद बायबलवर नव्हे तर तत्त्वज्ञानावर आधारित होता. तो देवाच्या बुद्धीवर नव्हे तर मानवी विचारांवर आधारित होता. हेच तत्त्वज्ञान अनेक शतकांपासून अस्तित्वात असून, निरनिराळ्या कॅथलिक तत्त्ववेत्त्यांनी त्यात आपल्या मतांची भर घातली आहे. * पण या तत्त्वज्ञानाच्या परिणामस्वरूप अशी धारणा जन्माला आली की केवळ सुख उपभोगण्याच्या उद्देशाने लैंगिक समागम करणे हे एक पाप आहे. आणि त्याअर्थी, संतती उत्पन्‍न करण्याची शक्यता नसल्यास लैंगिक संबंध अवैध किंवा अनैतिक आहेत. पण बायबल असे शिकवत नाही.

बायबलमधील नीतिसूत्रांच्या पुस्तकात, पती व पत्नी यांच्यातील योग्य लैंगिक सहवासामुळे निष्पन्‍न होणाऱ्‍या आनंदाचे अलंकारिक भाषेत वर्णन केले आहे: “तू आपल्याच टाक्यांतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. तुझ्या झऱ्‍याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी यांप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो.”—नीतिसूत्रे ५:१५, १८, १९.

पती व पत्नी यांच्यातील लैंगिक संबंध देवाने दिलेली एक देणगी आहे. पण संतती उत्पन्‍न करणे हा या संबंधाचा एकमात्र उद्देश नाही. लैंगिक संबंधांतून विवाहित जोडपे एकमेकांबद्दल कोमल भावना व प्रेम व्यक्‍त करू शकतात. त्यामुळे, जर एखाद्या जोडप्याने गर्भधारणा न होऊ देण्यासाठी गर्भनिरोधनाच्या एखाद्या पद्धतीचा अवलंब केला तर तो त्यांचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे आणि त्याबद्दल कोणीही त्यांचा न्याय करू नये.—रोमकर १४:४, १०-१३. (g ९/०७)

तुम्ही कधी याचा विचार केला आहे का?

▪ पतीपत्नीने लैंगिक संबंध ठेवणे पाप आहे का?—नीतिसूत्रे ५:१५, १८, १९.

▪ गर्भनिरोधकांचा वापर करत असल्यास ख्रिश्‍चनांनी कोणती गोष्ट आठवणीत ठेवली पाहिजे?—निर्गम २१:२२, २३.

▪ गर्भनिरोधकांचा वापर करणाऱ्‍या विवाहित जोडप्यांविषयी इतरांचा दृष्टिकोन कसा असावा?—रोमकर १४:४, १०-१३.

[तळटीप]

^ न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिया यानुसार १३ व्या शतकात पोप ग्रेगरी नववा याने “गर्भनिरोधनाच्या विरोधात पहिला सर्वसामान्य कायदा” स्थापित केला.

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

पहिल्या मानवी जोडप्याला आणि नोहाच्या कुटुंबाला देवाने असे सांगितले होते की “बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.” पण ख्रिश्‍चनांना मात्र ही आज्ञा देण्यात आली नाही