व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तणावांपासून मुक्‍त व्हायला वानवातूला या!

तणावांपासून मुक्‍त व्हायला वानवातूला या!

तणावांपासून मुक्‍त व्हायला वानवातूला या!

न्यू कॅलेडोनिया येथील सावध राहा! लेखकाकडून

तुम्ही तणावाखाली आहात का? सगळे टाकून कुठेतरी निघून जावे असे तुम्हाला वाटते का? मग तुम्ही एका सुरेख बेटावर आहात अशी कल्पना करा. समुद्राच्या निळ्याशार पारदर्शक पाण्यात पोहत आहात, हिरव्यागार अरण्यात भटकत आहात किंवा बेटावर राहणाऱ्‍या जमातींच्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीची ओळख करून घेत आहात अशी कल्पना करा. असे नंदनवन खरंच कोठे आहे का? आहे तर! वानवातूच्या एकांत बेटांवर.

ऑस्ट्रेलिया आणि फिजीच्या मधोमध असलेली वानवातू बेटे, नैर्ऋत्य प्रशांत महासागरात इंग्रजी अक्षर Y या आकारात असलेली ८० लहान लहान बेटांची श्रृंखला आहे. भूशास्त्रज्ञांच्या मते, या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागातील महाकाय विवर्तनिकी भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे समुद्राखाली मोठमोठे पर्वत तयार झाले. यांपैकी सर्वात उंच पर्वतांची शिखरे समुद्री पृष्ठभागाच्या वरती आली आणि अशारितीने डोंगराळ वानवातू बेटे तयार झाली. आज भूपट्टांच्या हालचालीमुळे बरेचदा कमी तीव्रतेचे भूकंप तर होतातच पण यामुळे नऊ जिवंत ज्वालामूखी देखील अस्तित्वात आले आहेत. धाडसी पर्यटक हवे असल्यास ज्वालामुखीच्या अगदी जवळ जाऊन लाव्हारस देखील पाहू शकतात.

या बेटांवर हिरवीगार पर्जन्यारण्ये आहेत. येथे मुबलक प्रमाणात आढळणाऱ्‍या वटवृक्षांच्या फांद्या बऱ्‍याच दूरपर्यंत पसरतात. लहान झुडपे देखील दाटीवाटीने वाढत असून येथे ऑर्किड फुलांच्या १५० जाती आणि फर्नचे २५० प्रकार आढळतात. नयनरम्य समुद्रकिनाऱ्‍यांना व खडकाळ सुळक्यांना लागून समुद्राचे नितळ पाणी आहे व त्यात निरनिराळे रंगीबेरंगी मासे व पोवळे आढळतात. सबंध जगातील पर्यटक, इथल्या एपी बेटावर ड्यूगाँग नावाच्या सौम्य पण खेळकर प्राण्यांसोबत पोहायला येतात. *

नरभक्षक आणि कार्गो कल्ट्‌स

युरोपियन शोधक सर्वप्रथम १६०६ साली वानवातू येथे आले होते. * तेव्हा या बेटांवर क्रूर जमाती राहात होत्या आणि नरभक्षण अगदी सर्रास चालायचे. त्या काळी या बेटांवर चंदनवृक्षांची जंगले होती. आशियात या सुगंधी लाकडाला बरीच किंमत होती. युरोपियन व्यापाऱ्‍यांनी आपला फायदा ओळखून ही जंगले तोडून टाकण्यास सुरुवात केली. मग त्यांनी बेटांवरील मूळ रहिवाशांना मजूरीला लावण्यास सुरवात केली.

या मूळ रहिवाशांना सामोआ, फिजी व ऑस्ट्रेलिया येथील उसाच्या व कापसाच्या शेतांत मजूरी करण्यासाठी नेले जाऊ लागले. म्हणायला तर हे मजूर स्वतःहून तीन वर्षे काम करण्याच्या करारांवर सही करत होते. पण खरे पाहता यांपैकी बहुतेकांना जबरदस्तीने पकडून नेले जात असे. १८०० दशकाच्या उत्तरार्धात हा व्यापार जोराने सुरू असताना, वानवातू बेटांवरील लोकसंख्येपैकी निम्म्यापेक्षा अधिक पुरुष परदेशी काम करत होते. यांपैकी बहुतेकजण कधीही परत आले नाहीत. प्रशांत महासागरातील निरनिराळ्या बेटांवरील जवळजवळ १०,००० नागरिक ऑस्ट्रेलियातच दगावले. यांपैकी बहुतेकजण आजारांना बळी पडले.

युरोपियन लोकांनी आपल्यासोबत आणलेल्या रोगांनीही वानवातू बेटांवर बराच हैदोस घातला. गोवर, कॉलेरा, स्मॉलपॉक्स आणि इतर रोगांना प्रतिकार करण्याची रोगप्रतिकारकशक्‍ती या बेटांवर राहणाऱ्‍यांजवळ नव्हती. एका माहितीसूत्रानुसार “सर्दी पडशांनाही सबंध बेटावरील लोकसंख्या बळी पडू लागली.”

ख्रिस्ती धर्मप्रसारक १८३९ साली पहिल्यांदा वानवातूला आले. येथील मूळ रहिवाशांनी त्यांना लगेच जेवणाचे आमंत्रण दिले आणि त्यांनाच खाऊन टाकले! त्यानंतर आलेल्या अनेक धर्मप्रसारकांनाही हाच भयानक अनुभव आला. पण कालांतराने प्रोटेस्टंट व कॅथलिक चर्चेसनी या बेटांवर चांगला जम बसवला. आज वानवातूच्या रहिवाशांपैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोक चर्चचे सदस्य आहेत. तरीपण, लेखक पॉल राफाएल यांच्या मते, “बरेच रहिवासी अजूनही गावांतल्या मांत्रिकांना मानतात. हे मांत्रिक एखाद्या व्यक्‍तीला प्रेमात पाडण्यासाठी, डुकराला धष्टपुष्ट करण्यासाठी किंवा एखाद्या शत्रूचा काटा काढण्यासाठी लोकांना मंतरलेले जादुई दगड देतात.”

तसेच वानवातू हे जगातल्या सर्वात टिकाऊ कार्गो कल्ट्‌सचेही माहेरघर आहे. दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान पॅसिफिक युद्धभूमींपर्यंत पोचण्यासाठी जवळजवळ ५,००,००० यु.एस. शिपाई वानवातूमार्गे गेले होते. बेटांवरील लोकांना शिपायांनी आपल्यासोबत आणलेली दौलत किंवा “बारदान” पाहून खूप आश्‍चर्य वाटले. युद्ध संपल्यावर अमेरिकन शिपाई सगळे काही तिथेच टाकून निघून गेले. लाखो डॉलर्सचे सामानसुमान समुद्रात टाकून देण्यात आले. कार्गो कल्ट्‌स म्हटलेल्या धार्मिक गटांनी जहाजांकरता गोद्या, विमान उतरवण्याकरता रनवे बांधले आणि गेलेल्या शिपायांना परत येण्याचे आमिष दाखवण्याकरता खोट्या लष्करी कवाइती पण करू लागले. आजही टान्‍ना बेटावरील शेकडो गावकरी जॉन फ्रम नावाच्या “एका अदृश्‍य काल्पनिक अमेरिकन मशीहाला” प्रार्थना करतात. त्यांचा दावा आहे की एक न एक दिवशी तो परत येईल आणि आपल्यासोबत भरपूर दौलत आणील.

सांस्कृतिक वैविध्य

या द्वीपराष्ट्रातील भाषा व रुढीपरंपरांमध्ये आश्‍चर्यजनक वैविध्य दिसून येते. एका गाईडबुकनुसार, “वानवातू येथे जगातल्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत एका माणसामागे सर्वात जास्त भाषा बोललेल्या दिसून येतात.” सबंध द्वीपसमुहावर जवळजवळ १०५ भाषा आणि कित्येक पोटभाषा बोलल्या जातात. इथली राष्ट्रभाषा बिस्लामा, इंग्रजी व फ्रेंच या सगळ्या अधिकृत भाषा आहेत.

बेटांवर एक गोष्ट मात्र सर्वत्र दिसून येते. आणि ती म्हणजे इथले रितीरिवाज. जीवनाच्या प्रत्येक कार्यावर जणू यांचा पगडा आहे. पेन्टेकॉस्ट द्वीपावर, सुपीकतेसाठी केल्या जाणाऱ्‍या एका प्राचीन धर्मविधीतूनच बंजी जंपिंगचे सगळ्या जगाला वेड लागले. दर वर्षी, सुरणाच्या वार्षिक कापणीच्या वेळी पुरुष व मुले ६० ते १०० फुटांच्या लाकडी बुरुजांवरून खाली उडी मारतात. एवढ्या उंचावरून उडी टाकल्यावर मृत्यू अटळ आहे, पण त्यांच्या पायाच्या घोट्याला लांब वेली बांधल्या जातात त्यामुळे त्यांना काहीही होत नाही. हे उडी मारणारे, जमिनीला फक्‍त डोक्याने स्पर्श करतात. त्यांची अशी धारणा आहे की असे केल्यामुळे पुढच्या वर्षाच्या पिकासाठी जमीन ‘सुपीक’ होते.

मालेकुला बेटावर अलीकडच्याच वर्षांत काही गावांनी बाहेरच्या लोकांशी संपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे. मोठे नांबा व लहान नांबा नावाच्या दोन जमाती येथे राहातात. एकेकाळी क्रूर नरभक्षक असलेल्या या जमातींनी आपले शेवटचे भक्ष्य १९७४ साली खाल्ले असे म्हटले जाते. त्याचप्रकारे, पुरुषांच्या डोक्यांना “आकर्षक” निमूळता आकार येण्यासाठी बालपणीच त्यांच्या डोक्याला बांधून ठेवण्याची प्रथाही अनेक वर्षांपूर्वी संपुष्टात आली. आज हे नांबा अतिशय मनमिळाऊ झाले आहेत आणि पर्यटकांना आपल्या संस्कृतीबद्दल सांगण्यास त्यांना आनंद वाटतो.

नंदनवनाचे रहिवाशी

बहुतेक पर्यटक वानवातूला फक्‍त काही काळ सुटी घालवण्यासाठी येतात. पण जवळजवळ ७० वर्षांपूर्वी यहोवाचे साक्षीदार मात्र येथे लोकांना आध्यात्मिक मदत देण्याकरता आले. ‘पृथ्वीच्या शेवटी’ असलेल्या या ठिकाणी साक्षीदारांनी घेतलेल्या परिश्रमांचे चांगले प्रतिफळ त्यांना मिळाले आहे. (प्रेषितांची कृत्ये १:८) (“कावाच्या आहारी गेलेला ख्रिस्ती बनला” ही चौकट पाहा.) २००६ साली या देशातील ५ मंडळ्यांनी पृथ्वीवर येणार असलेल्या नंदनवनाविषयी बायबलचा संदेश लोकांना सांगण्यात ८०,००० तास खर्च केले. (यशया ६५:१७-२५) त्या भविष्यातील नंदनवनात आजच्या जगातील सर्व दबावांपासून व तणावांपासून आपल्याला कायमची मुक्‍ती मिळेल!—प्रकटीकरण २१:४. (g ९/०७)

[तळटीपा]

^ ड्यूगाँग हे समुद्रात राहणारे शाकाहारी, सस्तन प्राणी असून त्यांची लांबी ११ फुट व वजन ४०० किलो इतके असते.

^ वानवातू द्वीपसमुहांना १९८० साली स्वातंत्र्य मिळण्याआधी न्यू हेब्रिडीज या नावाने ओळखले जात होते.

[१७ पानांवरील चौकट/चित्र]

आनंदी बेटे

२००६ साली वानवातूने जागतिक आनंदी ग्रह सूचीत पहिला क्रमांक पटकावला. न्यू इकोनॉमिक्स फाउंडेशन नावाच्या एका ब्रिटिश बुद्धिजिवी गटाने प्रसिद्ध केलेल्या या सूचीत राष्ट्रातील लोक किती आनंदी आहेत, त्यांचे सरासरी आयुष्य आणि पर्यावरणावर पडणारा प्रभाव या आधारावर १७८ राष्ट्रांचा अभ्यास केला. “[वानवातू] पहिल्या क्रमांकावर आले कारण या राष्ट्रातील लोक आनंदी आहेत, ते जवळजवळ ७० वर्षे जगतात आणि पृथ्वीग्रहाला काहीच हानी करत नाहीत,” असे वानवातू डेली पोस्ट या वृत्तपत्राने म्हटले.

[चित्र]

पारंपरिक पोशाख

[चित्राचे श्रेय]

© Kirklandphotos.com

[१७ पानांवरील चौकट/चित्र]

कावाच्या आहारी गेलेला ख्रिस्ती बनला

पेन्टेकॉस्ट बेटावरील रहिवासी विली याला तरुणपणापासूनच कावा पिण्याची सवय होती. हे उग्र शामक पेय मिऱ्‍यांच्या झुडपाची मुळे ठेचून तयार केले जाते. रोज रात्री विली कावा पिऊन घरी नशेत परत यायचा. तो कर्जात बुडाला. कित्येकदा तो आपली पत्नी आयडा हिला मारहाण करायचा. मग यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेल्या त्याच्या एका सहकर्मचाऱ्‍याने त्याला बायबलचा अभ्यास करण्याचे प्रोत्साहन दिले. विली तयार झाला. आयडाने सुरुवातीला या अभ्यासाला विरोध केला. पण आपल्या पतीची वागणूक सुधारू लागली तेव्हा तिचीही मनोवृत्ती बदलली आणि तीसुद्धा अभ्यास करू लागली. त्या दोघांनी मिळून उत्तम आध्यात्मिक प्रगती केली. कालांतराने, विलीने आपल्या सगळ्या वाईट सवयी सोडून दिल्या आणि १९९९ साली त्याचा व आयडाचा बाप्तिस्मा झाला व ते यहोवाचे साक्षीदार बनले.

[१५ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

न्यू झीलंड

ऑस्ट्रेलिया

प्रशांत महासागर

फिजी

[१६ पानांवरील चित्र]

जमिनीवर उडी मारणारे या अतिशय धोकादायक प्रथेत सुपीकतेच्या धर्मविधीच्या नावाखाली सहभाग घेतात

[चित्राचे श्रेय]

© Kirklandphotos.com

[१७ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Kirklandphotos.com

[१५ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Kirklandphotos.com

[१६ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Kirklandphotos.com