दातदुखीचा वेदनामय इतिहास
दातदुखीचा वेदनामय इतिहास
एका मध्ययुगीन नगराच्या मुख्य चौकात अतिशय भपकेबाज पोशाख घातलेला एक बुवा बसलेला आहे. त्याचा दावा आहे की तो दात काढून देऊ शकतो आणि तेसुद्धा जराही वेदना न होता. त्याचा मदतनीस भीती वाटत असल्याचे ढोंग करत हळूहळू पुढे येतो आणि दात काढणारा बुवा त्याचा दात काढण्याचे नाटक करतो. मग तो सर्वांना रक्ताने माखलेला दात दाखवतो. दातदुखीने पीडित असलेल्या लोकांना यामुळे थोडे धाडस येते आणि तेही पैसे देऊन आपले दात काढून घ्यायला पुढे येतात. त्यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून इतरांनी घाबरून परत जाऊ नये, म्हणून ढोल आणि तुताऱ्या वाजवल्या जातात. काही दिवसांनंतर दात काढलेल्या लोकांना दाताचा संसर्ग होऊन पू होतो पण तोपर्यंत हा बुवा गायब झालेला असतो.
आज दातदुखीने पीडित असलेल्या लोकांना अशा दगलबाज लोकांकडे जावे लागत नाही. आधुनिक दंतवैद्य दातदुखीवर उपचार करू शकतात आणि बरेचदा ते दात काढून टाकण्याची गरज पडणार नाही अशाप्रकारचा उपचार देतात. तरीसुद्धा, बऱ्याच लोकांना दंतवैद्याकडे जायला भीती वाटते. तेव्हा, रुग्णांना वेदनेपासून मुक्त करायला दंतवैद्य सर्वप्रथम कसे काय शिकले हे जाणून घेतल्यास आपल्याला आधुनिक दंतवैद्यकाचे महत्त्व अधिक चांगल्याप्रकारे समजू शकेल.
दात किडणे हे मानवजातीला होणाऱ्या सर्वात सामान्य दुखण्यांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक सर्दी पडशाचा आहे. पण हे दुखणे अलीकडचेच नाही. प्राचीन इस्राएलातही, म्हाताऱ्या लोकांना, कमी दात असल्यामुळे त्रास सहन करावा लागत होता, हे राजा शलमोनाच्या काव्यातून स्पष्ट होते.—उपदेशक १२:३.
राजघराणीही यातून सुटली नाहीत
एलिझाबेथ पहिली ही इंग्लंडची राणी असूनही ती दातदुखीतून सुटली नाही. एका जर्मन पाहुण्याने राणीचे काळे पडलेले दात पाहून असे लिहिले की “इंग्रज लोक साखरेचा जास्त प्रमाणात वापर करत असल्यामुळे हा रोग त्यांच्यात सर्वसामान्य आहे.” डिसेंबर १५७८ मध्ये राणी दातदुखीने रात्रंदिवस बेजार होती. तिच्या वैद्यांनी किडलेला दात काढून टाकण्याचा सल्ला दिला, पण कदाचित होणाऱ्या वेदनेच्या भीतीने राणीने याला नकार दिला. तिची भीती कमी करण्यासाठी लंडनचा बिशप जॉन एल्मर याने तिच्यासमोर आपला एक किडलेला दात काढून घेतला. त्याचे हे कृत्य शौर्याचेच म्हणावे लागेल कारण त्या बिचाऱ्या म्हाताऱ्याच्या तोंडात दोनचारच दात उरलेले होते!
त्या काळी सर्वसाधारण लोकांना दात काढून घ्यायचा असेल तर ते न्हाव्याकडे आणि कधीकधी तर लोहाराकडे जायचे. पण लोकांची आर्थिक स्थिती सुधारली आणि साखर सर्वांना परवडू लागली तेव्हा दातदुखीचे प्रकारही वाढले आणि त्यासोबतच दात काढणाऱ्या व्यावसायीकांची मागणीही वाढली. म्हणूनच, काही वैद्य व शल्यचिकित्सक किडलेल्या दातांच्या उपचारांत रस घेऊ लागले. त्यांना हे कौशल्य स्वतःहून हळूहळू शिकावे लागले कारण या क्षेत्रात निपुण असणारे आपल्या धंद्याचे गुपित सहजासहजी सांगत नसत. शिवाय, या विषयावर पुस्तकेही फारशी नव्हती.
एलिझाबेथ पहिली हिच्या जवळजवळ एका शतकानंतर लूई चौदावा हा फ्रांसचा राजा होऊन गेला. त्याला अनेक वर्षांपासून दातदुखीचा त्रास होता. १६८५ साली त्याने डावीकडचे, वरचे सगळे दात काढून घेतले. काहीजण म्हणतात की या राजाने आपल्या दातांच्या रोगाने त्रस्त होऊन त्या वर्षी फ्रांसमध्ये उपासनेचे स्वातंत्र्य बहाल करणारा कायदा रद्द केला ज्यामुळे
अल्पसंख्याक धार्मिक गटांविरुद्ध भयानक छळाची लाट उसळली.आधुनिक दंतवैद्यक शास्त्राचा जन्म
लूई चौदावा याच्या चंगळवादी जीवनशैलीचा पॅरिसच्या लोकजीवनावर प्रभाव पडून दंतवैद्यक शास्त्राचा जन्म झाला. राजाच्या दरबारात व उच्चभ्रू समाजात यशस्वी होण्याकरता एखाद्या व्यक्तीचा पेहराव व स्वरूप अत्याधुनिक दिसणे आवश्यक बनले. बनावट दातांची मागणी वाढली. खाणे सोयीस्कर होण्याकरता नव्हे तर चांगले दिसण्याकरता लोक खोटे दात बसवून घेऊ लागले. यामुळे शल्यचिकित्सकांचा एक नवीनच गट उदयास आला. हे उच्चभ्रू समाजातील रुग्णांवर उपचार करणारे दंतवैद्य होते. पॅरिसचा एक नामांकित दंतवैद्य पिएर फोशेअर हा होता. त्याने फ्रेंच आरमारात शस्त्रक्रिया करण्याची प्रॅक्टिस केली होती. त्याने दात काढण्याचे काम न्हाव्यांवर व बुवांवर सोडणाऱ्या शल्यचिकित्सकांची टीका केली. स्वतःला दंत शल्यचिकित्सक म्हणवणारा तो पहिला होता.
फोशेअर याने १७२८ साली, या धंद्यातली गुपिते लपवून ठेवण्याची प्रथा मोडीत काढली. त्याने एक पुस्तक लिहिले ज्यात त्याला अवगत असलेल्या सर्व प्रक्रियांचे त्याने वर्णन केले. यामुळे, त्याला “दंतवैद्यक शास्त्राचा जनक” म्हटले जाते. तो पहिला होता ज्याने रुग्णांना जमिनीवर बसवण्याऐवजी दंतवैद्यकाच्या खुर्चीवर बसवले. फोशेअर याने दात काढण्याची पाच हत्यारेही तयार केली. पण तो केवळ दात काढणारा नव्हता. त्याने दंतवैद्याचे गिरमिट (ड्रिल) निर्माण केले आणि दाताला पडलेले खड्डे भरून काढण्याच्या पद्धती शोधून काढल्या. तसेच त्याने दंतमूलातील दंतगराची पोकळी भरून (रूट कॅनल) काढण्याचे व दंतमूलाला कृत्रिम दात जोडण्याचे तंत्रही शिकून घेतले. त्याने हस्तीदंतापासून कोरून ज्या कवळ्या तयार केल्या होत्या, त्यांत वरचे दात जागेवर राहावेत म्हणून त्यांना स्प्रिंग लावलेले असायचे. फोशेअर याने दंतवैद्यकाला एका स्वतंत्र व्यवसायाचे रूप दिले. त्याची ख्याती युरोपातच नव्हे तर अमेरिकेतही पसरली.
अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाचे दुखणे
लूई चौदावा याच्या एका शतकानंतर अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टन यांना दातदुखीने ग्रासले. ते २२ वर्षांचे होते तेव्हापासून जवळजवळ दर वर्षी त्यांनी एक दात काढून घेतला होता. काँटिनेंटल सैन्याचे सेनापती म्हणून कार्य करताना त्यांना किती त्रास झाला असावा याची कल्पना करा. १७८९ साली ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले तोपर्यंत ते बोळके झाले होते.
सर्व दात गेल्यामुळे आलेली विद्रूपता आणि नीट न बसणाऱ्या कवळीमुळे जॉर्ज वॉशिंग्टन यांना बराच मनस्तापही सहन करावा लागला. एका नव्या राष्ट्राच्या अध्यक्षपदाकरता जनतेसमोर आपली चांगली प्रतिमा बनवू इच्छित असतानाच त्यांना आपल्या विद्रूपतेची जाणीव सतत असायची. त्याकाळी दातांचे नमूने घेऊन कवळ्या बनवल्या जात नव्हत्या तर त्या हस्तीदंतापासून कोरल्या जात होत्या. त्यामुळे त्या तोंडात नीट बसत नव्हत्या. अनेक इंग्रजांनाही वॉशिंग्टन यांच्यासारख्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. असे म्हटले जाते की इंग्रज मोठ्याने हसून आपले बनावट दात दाखवायचे सहसा टाळत असल्यामुळेच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण उपरोधिक विनोदबुद्धी जन्माला आली असावी.
वॉशिंग्टन हे लाकडी कवळी लावायचे असे सांगितले जाते. पण हे खरे नाही. त्यांच्या कवळ्यांमध्ये मानवी दात, हस्तीदंताचे व शिशाचे दात होते पण लाकडाचे नव्हते. त्यांच्या दंतवैद्यांनी कदाचित त्यांच्याकरता डाकूंचे दात मिळवले असावेत. दातांच्या व्यवसायात असणारे त्याकाळी लढाईनंतर सैन्याच्या मागे जाऊन, मेलेल्या व मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या लोकांचे दात काढून घेत. त्यामुळे कवळ्या फक्त श्रीमंतांनाच परवडण्यासारखी गोष्ट होती. १८५० च्या दशकात व्हल्कनीकरण केलेल्या रबरचा शोध लागल्यानंतरच व याचा उपयोग कवळ्या तयार करण्यासाठी करण्यात येऊ लागल्यानंतरच सर्वसामान्य लोकांनाही बनावट दात उपलब्ध झाले. वॉशिंग्टनचे दंतवैद्य या व्यवसायात अग्रगामी होते तरीपण त्यांना दातदुखीचे कारण मात्र स्पष्ट समजू शकले नाही.
दंतदुखीविषयी वास्तव
प्राचीन काळापासूनच लोकांची अशी धारणा होती की दातात कीडे झाल्यामुळे दातदुखी होते. १७ व्या शतकापर्यंत ही धारणा कायम होती. १८९० साली विलबी मिलर या जर्मनीमध्ये
युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन येथे कार्य करणाऱ्या एका अमेरिकन दंतवैद्याने दात किडण्याचे व पर्यायाने दातदुखीचे मुख्य कारण शोधून काढले. एक विशिष्ट प्रकारचे जिवाणू ज्यांची खासकरून साखरेमुळे भरभराट होते, ते एक प्रकारचे अम्ल निर्माण करतात ज्यांमुळे दात किडू लागतात. पण दात किडणे कसे टाळता येते? याचे उत्तर अपघातानेच उजेडात आले.कित्येक दशकांपासून अमेरिकेतील कोलोरॅडो येथील दंतवैद्यांसमोर हा प्रश्न होता की इतक्या लोकांच्या दातांवर डाग का बरे दिसतात? शेवटी त्यांना कळले की पाणीपुरवठ्यात जास्त प्रमाणात असलेले फ्लोराईड याचे कारण होते. पण त्या परिसरातल्या या समस्येचे परीक्षण करताना त्यांना जागतिक महत्त्वाची एक वस्तुस्थिती लक्षात आली जी दात किडण्यापासून रोखण्याकरता अतिशय महत्त्वाची होती. पिण्याच्या पाण्यात पुरेसे फ्लोराईड नसलेल्या ठिकाणी लहानाचे मोठे झालेल्या लोकांमध्येही दात किडण्याचा प्रकार जास्त दिसून येतो. फ्लोराईड हे पाण्यात नैसर्गिकरित्या आढळते व ते दाताच्या लुकणातही असते. पाण्यातून कमी प्रमाणात फ्लोराईड मिळालेल्यांना आवश्यक प्रमाणात फ्लोराईड पुरवल्यास दात किडण्याचे प्रकार ६५ टक्के घसरल्याचे दिसून आले.
अशारितीने एक रहस्य उलगडले. बहुतेकदा दातदुखी दात किडण्यामुळे होते. साखर याला कारणीभूत ठरते. फ्लोराईडमुळे हे टाळता येते. अर्थात फक्त फ्लोराईड हे चांगल्याप्रकारे दात घासण्याची व फ्लॉसिंग करण्याची जागा घेऊ शकत नाही हे देखील पुरते स्पष्ट झाले आहे.
वेदनारहित दंतवैद्यकाचा ध्यास
भूल देण्याचे तंत्र विकसित करण्याआधी दंतोपचारातील प्रक्रियांमुळे रुग्णांना अतिशय यातना होत असत. दंतवैद्य संवेदनशील झालेला किडका दात टोकदार हत्यारांनी उपटून काढायचे आणि मग तो खड्डा भरून काढण्यासाठी तेथे गरम धातू ठोकून बसवायचे. त्यांच्याकडे प्रतिजैवी औषधे नसल्यामुळे दंतगरात संसर्ग झालेला असल्यास ते तापवलेल्या लोखंडाची तार दंतमूलातील पोकळीत ढकलायचे व अशारितीने संसर्ग झालेला दात जाळून टाकायचे. खास साधने व भूल देण्याची औषधे निर्माण होण्याआधी दात काढण्याची प्रक्रियाही अतिशय वेदनादायी होती. लोक असे हाल सहन करायला तयार व्हायचे कारण दातदुखी घेऊन जगणे त्या पेक्षाही वाईट होते. अफू, हेंप व मँड्रेक्स यांसारख्या वनौषधींचा कित्येक शतकांपासून उपयोग होत असूनही यामुळे वेदना फक्त काही प्रमाणात कमी होत असे. दंतवैद्यांना वेदनारहित शस्त्रक्रिया करणे कधी शक्य होईल का?
इंग्रज रसायनशास्त्रज्ञ जोसफ प्रीस्टली याने १७७२ साली पहिल्यांदा नायट्रस ऑक्साईड अर्थात लाफिंग गॅस तयार केला. लवकरच या पदार्थामुळे गुंगी येत असल्याचे दिसून आले. पण १८४४ पर्यंत कोणीही याचा भूल देण्याकरता उपयोग करून पाहिला नाही. त्या वर्षी अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील हॅटफर्ड येथे हॉरस वेल्स हा दंतवैद्य डिसेंबर १० रोजी एका व्याख्यानाला गेला होता, जेथे लाफिंग गॅसचा वापर करून लोकांची करमणूक करण्यात आली. वेल्सच्या लक्षात आले की या गॅसच्या प्रभावाखाली एका मनुष्याच्या पायाला एका मोठ्या बेंचने खरचटले तरीसुद्धा त्याला काहीच वेदना झाल्या नाहीत. वेल्स हा स्वभावाने अतिशय कनवाळू होता. उपचारादरम्यान आपल्या रुग्णांना होणाऱ्या वेदना त्याला पाहवत नव्हत्या. लगेच त्याच्या मनात विचार आला, की लाफिंग गॅसचा भूल देण्याकरता वापर केला तर? पण इतरांसाठी याचा उपयोग करण्याआधी त्याने स्वतःवर हा प्रयोग करण्याचे ठरवले. दुसऱ्याच दिवशी त्याने रुग्णाच्या खुर्चीत बसून बेशुद्ध होईपर्यंत हा गॅस हुंगला. मग त्याच्याच एका सहकाऱ्याने त्याची दुखणारी अक्कलदाढ काढली. ही एक ऐतिहासिक घटना होती. वेदनारहित दंतवैद्यकाचा जन्म झाला होता! *
तेव्हापासून दंतवैद्यकात बरीच तांत्रिक प्रगती झाली आहे. त्यामुळे आज दंतवैद्याकडे जाणे हा पूर्वीच्या तुलनेने बराच सुखदायी अनुभव म्हणावा लागेल. (g ९/०७)
[तळटीपा]
^ आज नायट्रस ऑक्साईडपेक्षा शरीराचा विशिष्ट भाग असंवेदनशील करण्याची औषधे जास्त वापरली जातात.
[२८ पानांवरील चित्र]
अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची एक हस्तीदंताची कवळी
[चित्राचे श्रेय]
Courtesy of The National Museum of Dentistry, Baltimore, MD
[२९ पानांवरील चित्र]
नायट्रस ऑक्साईडचा वापर करून १८४४ साली झालेल्या पहिल्या दंत शल्यचिकित्सेचे एका कलाकाराने काढलेले काल्पनिक चित्र
[चित्राचे श्रेय]
Courtesy of the National Library of Medicine
[२७ पानांवरील चित्राचे श्रेय]
Courtesy of the National Library of Medicine