व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पिसे अद्‌भुत रचनेचा नमुना

पिसे अद्‌भुत रचनेचा नमुना

पिसे अद्‌भुत रचनेचा नमुना

आपल्या पंखांना खालच्या दिशेने जोराचा हिसका देऊन सीगल नावाचा समुद्रपक्षी आकाशाकडे झेपावतो. आकाशात बऱ्‍याच वरपर्यंत गेल्यावर तो वाऱ्‍यासोबत अगदी विनासायास, गोल गोल फिरत आणखी उंच जाऊ लागतो. आपल्या पंखांच्या व शेपटीच्या क्वचितच हालचाली करत हा पक्षी हवेत अक्षरशः तरंगत असल्यासारखा भासतो. इतक्या रुबाबदार व सफाईदार हालचाली तो कशा काय करू शकतो? याचे गुपित म्हणजे त्याची पिसे.

आज पिसे फक्‍त पक्ष्यांच्याच अंगावर आढळतात. बहुतेक पक्षांना वेगवेगळ्या प्रकारची पिसे असतात. नेहमीच्या पाहण्यातली पिसे ही आवरण पिसे असून त्यांचे शरीरावर आच्छादन असते. ही पिसे पक्ष्यांना गुळगुळीतपणा व उड्डाणाच्या वेळी त्यांच्या शरीराला आकार देतात. शेपटीवरील आणि पंखांवरील पिसांचा आवरण पिसांत समावेश करता येईल. ही उड्डाणाकरता महत्त्वाची असतात. हमिंगबर्डला अशा प्रकारची आवरण पिसे १,००० पेक्षा कमी तर हंसपक्ष्याला २५,००० पेक्षा जास्त असू शकतात.

पिसांना अद्‌भुत रचनेचा नमुना म्हणावा लागेल. पिसाच्या मधला दांडा, ज्याला पिच्छाक्ष म्हणतात तो लवचिक व अतिशय कणखर असतो. त्यापासून ओळीने पिसाचे मऊ पाते तयार करणाऱ्‍या वाढी तयार होतात. यांना पिच्छक म्हणतात. पिच्छक एकमेकांशी शेकडो लहान लहान पिच्छिकांनी जोडलेले असतात. या पिच्छिका एकमेकांशी आकड्यांनी जोडल्यासारख्या वाटतात. पिच्छिका एकमेकांपासून वेगळ्या होतात तेव्हा पक्षी आपल्या चोचीने त्या पुन्हा व्यवस्थित करतो. तुम्ही पण पीस हातात घेऊन अगदी अलगद ते आपल्या बोटांमधून फिरवून असे करू शकता.

पंखांतील पिसे सहसा असममिती आकाराची असतात. पिसाचे पाते मागच्या तुलनेत पुढच्या बाजूला निमूळते असते. विमानासारख्या या आकारामुळे प्रत्येक उड्डाणाचे पीस एका लहानशा पंखासारखे कार्य करते. तसेच मोठे पीस पाहिल्यास तुम्हाला पिच्छाक्षाच्या खालच्या बाजूला एक खाच दिसेल. पिसाच्या साध्या रचनेतील या वैशिष्ट्यामुळे पिसाच्या दांड्याला बळकटी मिळते आणि तो वाकला किंवा पिळवटला तरी तुटत नाही.

पंखांची अनेक कार्ये

अनेक पक्ष्यांच्या आवरण पिच्छांत अधून मधून बारीकशी लांब पिसे असतात ज्यांना रोम पिच्छे तसेच भुकटी पिच्छे म्हणतात. रोमपिच्छांच्या मुळाशी असलेले संवेदक, आवरण पिच्छांना काहीही क्षती झाल्यास पक्ष्याला त्याची सूचना देतात आणि हवेतील वेग निश्‍चित करण्यासही ते पक्ष्याला मदत करत असावेत. भुकटी पिच्छे ही सतत वाढत असतात आणि पक्ष्याची ही पिच्छे कधीही झडत नाहीत, तर या पिच्छांच्या पिच्छकांची बारीक भुकटी बनते. असे मानले जाते की ही भुकटी पक्ष्याच्या पंखांवर पसरून त्यांना जलरोधक बनवते.

इतर कार्यांसोबतच पिसे पक्ष्यांना उष्णतेपासून, थंडीपासून आणि नीलातीत प्रकाशापासून संरक्षण पुरवतात. उदाहरणार्थ, समुद्रातील बदके अतिशय कडाक्याच्या थंडीत व समुद्री वाऱ्‍यांतही अगदी मजेत राहू शकतात. ती कशी? त्यांच्या आवरण पिच्छांच्या अभेद्य आच्छादनाखाली मऊ, कोमल पिच्छांचा थर असतो. या मऊ परांचा थर दीड दोन सेंटीमीटर जाड असून तो बदकाच्या जवळजवळ संपूर्ण शरीरावर असतो. ही नैसर्गिक कोमल पिच्छे उत्कृष्ट रोधक असतात. आजपर्यंत मानवाने तयार केलेल्या कोणत्याही वस्तूत इतकी चांगली रोधन क्षमता दिसून येत नाही.

पिसे झिजल्यावर ती गळून पडतात आणि त्या ठिकाणी नवीन पिसे उगवतात. बहुतेक पक्ष्यांच्या पंखांची व शेपटीची पिसे क्रमाक्रमाने व विशिष्ट पद्धतीने गळतात जेणेकरून त्यांच्या उड्डाण क्षमतेवर परिणाम होणार नाही.

“खूपच उत्कृष्ट रचना”

सुरक्षित विमानांची रचना करण्याकरता बऱ्‍याच अभिकल्पकांना, अभियंत्यांना व कारागिरांना परिश्रम घ्यावे लागतात. पक्ष्यांविषयी व पिसांविषयी काय म्हणता येईल? पुराव्याकरता जिवाश्‍मे उपलब्ध नसल्यामुळे पिसांची सुरुवात कशी काय झाली असावी हा उत्क्रांतीवादाच्या समर्थकांमध्ये वादाचा विषय बनला आहे. साईन्स न्यूज नावाच्या मासिकात म्हटल्यानुसार या वादविवादात ‘जिवाश्‍मविज्ञानाचे शास्त्रज्ञ धर्मवेड्या मूलतत्त्ववाद्यांप्रमाणे एकमेकांशी भांडतात व एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात.’ पिसांची उत्क्रांती या विषयावर एक परिचर्चा आयोजित करणाऱ्‍या एका उत्क्रांतीवादी जीववैज्ञानिकाने असे कबूल केले: “कोणत्याही वैज्ञानिक विवादामुळे शास्त्रज्ञ एकमेकांना इतकी वाईट वागणूक देऊ शकतात आणि त्यांच्या मनात एकमेकांप्रती इतक्या कटू भावना निर्माण होऊ शकतात असे मला कधीही वाटले नव्हते.” जर पिसांची उत्क्रांती झाली हे स्पष्ट असेल तर मग त्यांवरील चर्चा इतकी द्वेषपूर्ण का असावी?

येल युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेल्या मॅन्युअल ऑफ ऑर्निथोलॉजी—एव्हियन स्ट्रक्चर अँड फंक्शन यात असे म्हणण्यात आले, “समस्या अशी आहे की पिसांची रचना पाहिल्यास ती खूपच उत्कृष्ट असल्याचे दिसून येते.” त्यांत कोणत्याही सुधारणेची गरज असल्याचे संकेत दिसून येत नाही. किंबहुना, “उपलब्ध असलेल्या सर्वात जुन्या पिसांचे जिवाश्‍म इतके आधुनिक दिसते की आजच्या पक्ष्यांच्या पिसांमध्ये आणि त्यांमध्ये काहीही फरक दिसून येत नाही.” * तरीसुद्धा, उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त असा दावा करतो की बाह्‍य त्वचेतील वाढी हळूहळू विकसित होऊन व बदलत जाऊन शेवटी पिसे विकसित झाली. वर उल्लेख केलेल्या मॅन्युअलनुसार आणखी एक मुद्दा असाही आहे, “की मधल्या सर्व टप्प्यांमध्ये पिसांच्या बदलत जाणाऱ्‍या रूपांचा काही न काही उपयोग असल्याशिवाय त्यांची उत्क्रांती होणे शक्य नाही.”

साध्या शब्दांत सांगायचे तर, उत्क्रांतीच्या सिद्धान्तानुसार काळाच्या ओघात पिसांच्या रचनेत झालेल्या बदलांपैकी प्रत्येक टप्पा प्राण्याचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्याकरता उपयोगी असल्याशिवाय पिसांची उत्क्रांती होणे शक्य नाही. इतकी गुंतागुंतीची रचना व इतकी कार्यक्षम असणारी पिसे अशाप्रकारे विकसित झाली असावीत हे बऱ्‍याच उत्क्रांतीवाद्यांना देखील अशक्यप्राय वाटते.

शिवाय, जर पिसे बऱ्‍याच काळादरम्यान क्रमाक्रमाने विकसित झाली असतील तर मधल्या सर्व टप्प्यांची जिवाश्‍मे सापडायला हवी होती. पण अशी जिवाश्‍मे कधीच सापडली नाहीत. फक्‍त पूर्णपणे विकसित पिसांचेच अवशेष सापडले आहेत. मॅन्युअल म्हणते, “दुर्दैवाने, उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्ताकरता पिसे हा अतिशय अवघड विषय ठरला आहे.”

पक्ष्यांचे उड्डाण फक्‍त पिसांवरच अवलंबून नाही

पिसांची उत्कृष्ट रचना ही उत्क्रांतीवाद्यांसमोर असलेली केवळ एक समस्या आहे. कारण पक्ष्याच्या शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाची रचना ही उड्डाणाकरता अनुरूप अशी आहे. उदाहरणार्थ, पक्ष्यांची हाडे हलकी व पोकळ असतात. तसेच त्यांची श्‍वसन यंत्रणा अतिशय कार्यक्षम असते. पंखांच्या हालचालींवर नियंत्रण करण्यासाठी त्यांना खास स्नायू असतात. प्रत्येक पिसाच्या स्थितीवर नियंत्रण करण्यासाठीही त्यांना बरेच स्नायू असतात. शिवाय, प्रत्येक स्नायू मज्जातंतूंच्या साहाय्याने पक्ष्याच्या इवल्याशा पण आश्‍चर्यकारक मेंदूशी जोडलेले असतात व या मेंदूत या सर्व यंत्रणांवर एकाचवेळी, एखाद्या स्वयंचलित यंत्राप्रमाणे अगदी अचूकपणे नियंत्रण करण्याची क्षमता असते. तर अशाप्रकारे, फक्‍त पिसेच नव्हेत तर या सर्व गुंतागुंतीच्या यंत्रणा पक्ष्याच्या उड्डाणाकरता आवश्‍यक असतात.

हे देखील लक्षात असू द्या, की प्रत्येक पक्षी एका लहानशा पेशीपासून विकसित होतो. या लहानशा पेशीतच त्याच्या वाढीसंबंधी व त्याच्या उपजतबुद्धीसंबंधी सर्व सूचना असतात, ज्याच्या साहाय्याने एक दिवशी तो आकाशात भरारी मारणार असतो. हे सर्वकाही एखाद्या प्राण्याच्या अस्तित्त्वाकरता उपयोगी ठरलेल्या अनेक अपघाती परिवर्तनांमुळे विकसित होणे शक्य आहे का? की पक्ष्यांच्या व त्यांच्या पिसांच्या अद्‌भुत रचनेवरून त्यांना एका अतिशय बुद्धिमान रचनाकाराने निर्माण केले आहे हे स्पष्टपणे दिसून येते? हे सर्वात सोपे स्पष्टीकरणच, सर्वात तर्कशुद्ध व वैज्ञानिक दृष्टीनेही समर्पक नाही का? पुरावा स्वतःच याचे उत्तर देतो.—रोमकर १:२०. (g ७/०७)

[तळटीप]

^ हे जिवाश्‍म आर्किओप्टेरिक्स या लुप्त झालेल्या प्राण्याचे असून कधीकधी हे जिवाश्‍म आधुनिक पक्ष्यांच्या उत्क्रांतीचा पुरावा म्हणून सादर केले जाते. परंतु, बहुतेक जिवाश्‍मवैज्ञानिक आता याला आधुनिक पक्ष्यांचा पूर्वज मानत नाहीत.

[२४ पानांवरील चौकट/चित्र]

बनावट “पुरावा”

काही जैवाश्‍मिक “पुरावे” जे एकेकाळी पक्ष्यांची इतर प्राण्यांपासून उत्क्रांती झाली हे सिद्ध करण्यासाठी मोठ्या उत्साहाने सादर केले जायचे ते बनावट असल्याचे दिसून आले आहेत. उदाहरणार्थ, १९९९ साली नॅशनल जियोग्रॅफिक या मासिकाने एक लेख प्रसिद्ध केला होता ज्यात पिसे असलेल्या व डायनोसॉरसारखी शेपटी असलेल्या एका प्राण्याविषयी माहिती होती. सदर मासिकाने हा प्राणी ‘डायनोसॉरना पक्ष्यांशी जोडणाऱ्‍या गुंतागुंतीच्या श्रृंखलेतील चुकलेला दुवा’ असल्याचे जाहीर करून टाकले. पण नंतर हे जिवाश्‍म बनावट असल्याचे समजले. ते दोन वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष जोडून निर्माण करण्यात आले होते. वास्तवात, असा कोणताही “चुकलेला दुवा” आजपर्यंत सापडलेला नाही.

[चित्राचे श्रेय]

O. Louis Mazzatenta/National Geographic Image Collection

[२५ पानांवरील चौकट]

पक्ष्याची दृष्टी

निरनिराळ्या रंगांची व चमकदार पिसे मनुष्यांना अतिशय आकर्षक वाटतात. पण इतर पक्ष्यांना ही पिसे आणखीनच आकर्षक वाटू शकतात. काही पक्ष्यांच्या डोळ्यांत रंगांची पारख करणारे चार प्रकारचे शंकू असतात. मानवांमध्ये फक्‍त तीन प्रकारचे शंकू आढळतात. या अतिरिक्‍त दृष्टिक्षमतेमुळे पक्षी नीलातीत प्रकाशही पाहू शकतात, जे मानव पाहू शकत नाहीत. मनुष्यांना काही जातींच्या पक्ष्यांमध्ये नर व मादी एकसारखीच दिसतात पण नर पक्ष्याच्या पिसांतून नीलातीत प्रकाश मादीच्या तुलनेने वेगळ्या प्रकारे परावर्तित होतो, हा फरक पक्ष्यांना दिसतो आणि याचा कदाचित त्यांना जोडीदार शोधण्याकरता फायदा होत असावा.

[२३ पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

पिच्छक

पिच्छिका

पिच्छाक्ष

[२४ पानांवरील चित्र]

आवरण पिसे

[२४ पानांवरील चित्र]

रोम पिच्छे

[२५ पानांवरील चित्र]

भुकटी पिच्छे

[२५ पानांवरील चित्र]

कोमल पिच्छे

[२४, २५ पानांवरील चित्र]

गॅनेट समुद्रपक्षी