प्रेमळ घरकूल निर्माण करा
२
प्रेमळ घरकूल निर्माण करा
हे महत्त्वाचे का आहे? मुले प्रेमाची भुकेली असतात. प्रेम न मिळाल्यास ती कोमेजून जातात. १९५० च्या दशकात, मानवविज्ञानशास्त्रज्ञ एम. एफ. ॲश्ली मोन्टॅग्यू यांनी असे लिहिले: “सर्वांगीण विकासाकरता मानव प्राण्याला सर्वात जास्त जर कशाची गरज असेल तर ते आहे प्रेम; विशेषतः जीवनाच्या पहिल्या सहा वर्षांत प्रेम अनुभवणे हे चांगल्या आरोग्याचे रहस्य आहे.” मोन्टॅग्यू यांच्या या निष्कर्षाशी आधुनिक संशोधकही सहमत आहेत. ते म्हणतात की “प्रेमाचे पोषक तत्त्व पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास, मुलांना अतिशय हानीकारक दुष्परिणाम भोगावे लागतात.”
हे सोपे का नाही? या द्वेषाने भरलेल्या, स्वार्थी जगात कौटुंबिक ताणतणावही वाढले आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) मुलांना वाढवताना तोंड द्याव्या लागणाऱ्या आर्थिक व भावनिक दबावांमुळे, वैवाहिक जीवनातील समस्यांमध्ये आणखीनच भर पडते. उदाहरणार्थ, मुलांना शिस्त लावण्याच्या बाबतीत किंवा त्यांचे लाड पुरवण्याच्या बाबतीत पती पत्नीमध्ये दुमत असल्यास, आपसांत सुसंवाद साधणे, जे एरवीही सोपे नसते, ते आणखीनच कठीण होऊन बसते.
यावर उपाय कोणता? नियमित स्वरूपाने कुटुंबाने एकत्र वेळ घालवण्याकरता काही वेळ राखून ठेवा. पती पत्नीनेही फक्त एकमेकांच्या सहवासात घालवण्यासाठी काही वेळ काढलाच पाहिजे. (आमोस ३:३) मुले झोपल्यानंतर जो थोडा वेळ मिळतो त्याचा सुज्ञपणे उपयोग करा. हे मौल्यवान क्षण टीव्हीच्या चरणी अर्पण करू नका. वेळोवेळी एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याद्वारे वैवाहिक जीवनातील प्रणयभावना जिवंत ठेवा. (नीतिसूत्रे २५:११; गीतरत्न ४:७-१०) ‘दोष देत राहण्याऐवजी’ दररोज आपल्या जोडीदाराची प्रशंसा करण्याचे निमित्त शोधा.—स्तोत्र १०३:९, १०; नीतिसूत्रे ३१:२८.
तुमचे तुमच्या मुलांवर प्रेम आहे हे त्यांना सांगा. यहोवा देवाने आपला पुत्र, येशू याच्याबद्दल उघडपणे प्रेम व्यक्त करण्याद्वारे आईवडिलांसाठी आदर्श मांडला आहे. (मत्तय ३:१७; १७:५) ऑस्ट्रिया येथे राहणारा फ्लेक् नावाचा एक पिता म्हणतो: “माझ्या मते, मुले काही फुलांच्या रोपांसारखी असतात. ही लहानलहानशी रोपे जशी प्रकाश व ऊब मिळवण्याकरता सूर्याकडे वळतात तशीच मुले देखील आपल्या आईवडिलांकडे सतत पाहात असतात. त्यांच्याकडून त्यांना प्रेम आणि कुटुंबात आपली कदर केली जाते याचे आश्वासन हवे असते.”
तुम्ही विवाहित असोत वा एकाकी पालक असोत, जर तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांना एकमेकांबद्दल आणि देवाबद्दल प्रेम उत्पन्न करण्यास मदत केली तर तुमचे कौटुंबिक जीवन नक्कीच सुधारेल.
पण आईवडिलांनी मुलांवर अधिकार गाजवण्याविषयी देवाचे वचन काय म्हणते? (g ८/०७)
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
“प्रीती . . . ही पूर्णतेचे बंधन आहे.”—कलस्सैकर ३:१४