व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी नेहमीच एकटा का पडतो?

मी नेहमीच एकटा का पडतो?

तरुण लोक विचारतात . . .

मी नेहमीच एकटा का पडतो?

“आठवड्याची सुटी आली की असं वाटतं जणू मला सोडून जगातले सर्वजण मौजमजा करताहेत.”—रने.

“सगळी मुलं एकत्र येऊन मजा करतात, आणि मी मात्र एकटा पडतो.”—जेरमी.

अगदी सुरेख दिवस उजाडलाय. सहलीला जाण्याजोगा. पण तुम्ही दिवसभर घरातच राहणार आहात. बाकीचे सर्वजण मात्र छानसा बेत आखून मौज करायला गेले आहेत. पुन्हा एकदा, तुम्हाला एकटे सोडून!

आपल्याला सामील केले नाही याचे तुम्हाला वाईट वाटते. आणि याविषयी तुम्ही जसजसा आणखी विचार करू लागता तसतसे तुम्हाला आणखीनच वाईट वाटते. तुम्ही विचार करता, ‘माझ्यातच काहीतरी दोष असेल. का सर्वांना मी नकोसा वाटतो?’

वाईट का वाटते?

चारचौघांमध्ये आपल्याला स्वीकारले जावे, सर्वांनी आपल्याला पसंत करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. मानव मुळातच समाजप्रिय असल्यामुळे इतरांचा सहवास आपल्याकरता फायदेकारक आहे. हव्वेला निर्माण करण्याआधी यहोवाने आदामाविषयी असे म्हटले: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही.” (उत्पत्ति २:१८) यावरून स्पष्ट दिसून येते की सर्वांनाच इतरांच्या सहवासाची गरज असते; ही गरज आपल्या स्वभावात उपजतच असते. आणि म्हणून आपल्याला एकटे टाकून सर्वजण मौजमजा करतात तेव्हा आपल्याला वाईट वाटते.

जर तुम्हाला वारंवार एकटे टाकले जात असेल; किंवा, तुम्ही ज्यांच्यासोबत मैत्री करू इच्छिता ते जर तुम्हाला असे भासवत असतील की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आमच्याइतके चांगले कधीच होऊ शकणार नाही, तर साहजिकच हे तुमच्याकरता अतिशय निराशाजनक ठरेल. मारी नावाची एक मुलगी म्हणते, “तरुणांचे काही ठराविक गट असतात, जे एकत्र मिळून बरेच काही करत असतात. पण तुम्हाला मात्र ते असे भासवतात की तुम्ही त्यांच्या गटात सामील होण्यास लायक नाही.” तुम्हाला अशाप्रकारे एखाद्या गटातून मुद्दामहून बेदखल केले जाते तेव्हा साहजिकच तुम्हाला एकाकी वाटू लागते.

कधीकधी तुम्हाला बऱ्‍याच लोकांच्या गर्दीतही एकाकी वाटू शकते. निकोल नावाची तरुणी म्हणते, “तुम्ही कदाचित मला वेड्यात काढाल, पण एका सामाजिक कार्यक्रमातही अतिशय एकाकी वाटत असल्याचं मला आठवतं. माझ्या भोवती इतके लोक असूनही त्यांच्यापैकी कोणीही जवळचं म्हणण्यालायक नसल्यामुळे कदाचित मला असं वाटलं असावं.” काहींना तर ख्रिस्ती संमेलन व अधिवेशनांतही एकाकी वाटते. मेगन म्हणते, “एक मला सोडले तर बाकीचे सगळेजण एकमेकांना ओळखतात असं वाटतं!” मारीया नावाच्या एका तरुणीलाही असेच वाटते. ती म्हणते, “मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात मी असते पण मला कोणीही मित्र किंवा मैत्रिणी नाहीत.”

एकटेपणाच्या भावना कोणालाही येऊ शकतात. लोकप्रिय व वरवर आनंदी दिसणाऱ्‍या व्यक्‍तीही एकटेपणाने ग्रासलेल्या असण्याची शक्यता आहे. बायबलमधील एका नीतिसूत्रात सांगितल्याप्रमाणे, कधीकधी “हसताना देखील हृदय ख्रिन्‍न असते.” (नीतिसूत्रे १४:१३) एकटेपणाच्या भावना तीव्र असल्यास आणि बऱ्‍याच काळापर्यंत राहिल्यास व्यक्‍तीवर त्यांचा अपायकारक परिणाम होतो. बायबल म्हणते: “मनातील खेदाने हृदय भंग पावते.” किंवा दुसऱ्‍या एका भाषांतरात म्हटल्याप्रमाणे: “दुःखाने माणूस खचून जातो.” (नीतिसूत्रे १५:१३; कंटेम्पररी इंग्लिश व्हर्शन) एकाकीपणामुळे जर तुम्हालाही खचून गेल्यासारखे वाटले असेल तर तुम्ही काय करू शकता?

एकाकीपणाला तोंड देणे

एकाकीपणाच्या भावना घालवण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी करून पाहू शकता:

स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्वातील बलस्थाने ओळखा. (२ करिंथकर ११:६) स्वतःला हा प्रश्‍न विचारा, “माझ्या व्यक्‍तिमत्त्वातील बलस्थाने कोणती?” तुमच्याजवळ असलेल्या काही कौशल्यांची व सकारात्मक गुणांची यादी तयार करा.

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

तुम्हाला एकटे पडल्यासारखे वाटते तेव्हा स्वतःला या बलस्थानांची आठवण करून द्या. अर्थात, तुमच्या व्यक्‍तिमत्त्वात काही उणिवाही असतील आणि त्यांवर मात करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे. पण केवळ आपल्या दोषांचा विचार करू नका. उलट, परिपूर्ण नसलो तरी आपण प्रगतीच्या पथावर आहोत असा स्वतःविषयी दृष्टिकोन बाळगा. सर्वकाही अपेक्षेप्रमाणे नसले तरी निदान काही गोष्टी तर आहेत. तेव्हा, याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करा!

मैत्रीच्या कक्षा रुंदावा. (२ करिंथकर ६:११-१३) लोकांशी संभाषण सुरू करण्याकरता पुढाकार घ्या. अर्थात हे सोपे नाही. १९ वर्षांची लिझ म्हणते, “लोकांचा घोळका पाहिला की सुरुवातीला खूप भीती वाटते, पण जर तुम्ही त्यांपैकी केवळ एका व्यक्‍तीजवळ जाऊन ‘हाय’ म्हटले, तर काही वेळातच तुम्हीही त्या घोळक्यात सामील झालेले असता.” (“संभाषण कौशल्य विकसित करण्याकरता काही सूचना” ही चौकट पाहावी.) इतरजण तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, तसे तुम्ही स्वतः तर कोणाकडे, उदाहरणार्थ वयस्क व्यक्‍तींकडे दुर्लक्ष करत नाही ना याचा विचार करा. कोरी नावाची एक किशोरवयीन मुलगी म्हणते, “मी १०-११ वर्षांची असताना मला एक मैत्रीण होती जी माझ्यापेक्षा वयाने बरीच मोठी होती. पण वयात फरक असूनही आमच्यात अगदी घनिष्ठ मैत्री होती.”

तुमच्या मंडळीतल्या दोन प्रौढ व्यक्‍तींचा विचार करा, ज्यांच्याशी तुम्ही मैत्री करू शकता.

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

पुढच्या वेळी तुम्ही सभेला जाता तेव्हा यांपैकी एका व्यक्‍तीजवळ जाऊन त्यांच्याशी संभाषण सुरू करा. त्यांना बायबलचे ज्ञान घेण्याकरता कशामुळे प्रेरणा मिळाली हे त्या व्यक्‍तीला विचारा. आपल्या मैत्रीच्या कक्षेत तुम्ही सबंध ‘बंधुवर्गाला’ सामील करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला एकटे पडल्यासारखे वाटणार नाही.—१ पेत्र २:१७.

एखाद्या प्रौढ व्यक्‍तीजवळ मन मोकळे करा. (नीतिसूत्रे १७:१७) आपल्या मनातल्या भावना आईवडिलांजवळ किंवा दुसऱ्‍या एखाद्या प्रौढ व्यक्‍तीजवळ बोलून दाखवल्यामुळे तुमच्या एकटेपणाच्या भावना कमी होतील. एका १६ वर्षांच्या मुलीला याचा अनुभव आला. सुरुवातीला तिलाही असे वाटायचे की सगळेजण आपल्याकडे दुर्लक्ष करतात. ती म्हणते, “मी सतत याचा विचार करायचे की नेमके काय घडले ज्यामुळे मला असे दुर्लक्षित वाटते? पण मग मी माझ्या आईशी याविषयी बोलायचे आणि ती मला या परिस्थितीला कसे तोंड देता येईल याविषयी सल्ला द्यायची. मनातल्या भावना बोलून दाखवल्याने खरोखरच फायदा होतो!”

जर तुम्हालाही एकाकीपणाच्या भावना सतावत असतील आणि याविषयी कोणाशी बोलावे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कोणाजवळ जाऊ शकता?

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

इतरांचा विचार करा. (१ करिंथकर १०:२४) बायबल सांगते की “आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा.” (फिलिपैकर २:४) तुम्हाला एकटे पडल्यासारखे वाटते तेव्हा तुम्ही निराश होता, खचून जाता. हे स्वाभाविक आहे. पण दुःखात आकंठ बुडण्याऐवजी एखाद्या गरजू व्यक्‍तीला मदत करण्यास काय हरकत आहे? कोण जाणे, कदाचित असे केल्यामुळे तुम्हाला नवी मैत्री जोडण्याची संधी मिळू शकेल!

एखाद्या अशा व्यक्‍तीचा विचार करा, की जिला तुमची किंवा तुमच्या मदतीची गरज आहे. कदाचित तुमच्याच कुटुंबात किंवा मंडळीत अशी व्यक्‍ती असू शकेल. त्या व्यक्‍तीचे नाव खाली लिहा आणि तुम्ही तिला किंवा त्याला कशी मदत करू शकता हे लिहून काढा.

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

तुम्ही इतरांचा विचार करता आणि त्यांना मदत करता तेव्हा आपण किती एकाकी आहोत याविषयी विचार करायला तुमच्याजवळ वेळच उरणार नाही. यामुळे तुमचा दृष्टिकोन व वागणूक अधिक आशावादी बनते आणि तुमचे व्यक्‍तिमत्त्वही आकर्षक बनते व यामुळे इतरांना तुमच्याशी मैत्री करावीशी वाटेल. नीतिसूत्रे ११:२५ म्हणते: “जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.”

निवडक असा. (नीतिसूत्रे १३:२०) जे तुमच्याकरता समस्या निर्माण करतात असे अनेक मित्र असण्यापेक्षा, तुमच्याविषयी मनापासून कळकळ असणारे दोन-चारच मित्र असणे परवडले. (१ करिंथकर १५:३३) बायबलमध्ये उल्लेख केलेल्या लहानग्या शमुवेलाचा विचार करा. कदाचित निवासमंडपात सेवा करण्यास तो गेला तेव्हा त्यालाही एकाकीपणा वाटला असावा. त्याच्यासोबत काम करणारे हफनी व फिनहास हे मुख्य याजकाचे पुत्र असले तरीही, त्यांच्या वाईट कृत्यांमुळे ते मैत्री करण्यालायक नव्हते. शमुवेलाने त्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला असता तर आध्यात्मिक दृष्टीने त्याचा सर्वनाश झाला असता. पण असे घडावे अशी निश्‍चितच शमुवेलाची इच्छा नव्हती. बायबल सांगते: “शमुवेल बाळ हा वाढत गेला; परमेश्‍वर व मानव त्याच्यावर प्रसन्‍न होते.” (१ शमुवेल २:२६) हे मानव कोण होते? नक्कीच हफनी व फिनहास नव्हते. त्यांनी तर शमुवेलाच्या चांगल्या कृत्यांमुळे त्याची अवहेलना केली असेल. उलट, ज्यांना देवाच्या नियमांविषयी आदर होता अशाच लोकांनी शमुवेलाच्या कौतुकास्पद गुणांची कदर केली असेल. जे यहोवावर प्रेम करतात अशाच व्यक्‍तींशी मैत्री करणे योग्य आहे.

सकारात्मक असा: (नीतिसूत्रे १५:१५) अधूनमधून सर्वांनाच थोड्याफार प्रमाणात एकाकी वाटते. अशावेळी काय करता येईल? नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन राखण्याचा प्रयत्न करा. आठवणीत असू द्या, तुम्ही आपल्या जीवनात जे काही घडते त्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण करू शकत नाही. पण, या घटनांना कशी प्रतिक्रिया दाखवावी यावर तुम्ही नक्कीच नियंत्रण करू शकता.

तुम्हाला एकाकी वाटते तेव्हा एकतर ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा किंवा या परिस्थितीविषयी निदान आपला दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करा. नेहमी आठवणीत असू द्या, की यहोवाला तुमची जडणघडण ठाऊक आहे. त्यामुळे तुम्हाला कशाची गरज आहे आणि या गरजा पूर्ण करण्याचा उत्तम मार्ग कोणता हे त्याला कळते. एकाकीपणाच्या भावना सतावतात तेव्हा यहोवाला प्रार्थना करा. आणि ही खात्री बाळगा, की ‘तो तुमचा पाठिंबा होईल.’—स्तोत्र ५५:२२. (g ७/०७)

“तरुण लोक विचारतात . . . ” या मालिकेतील आणखी लेख www.watchtower.org/ype या संकेतस्थळावर तुम्हाला सापडतील

विचार करण्याजोगे

▪ मला एकाकी वाटल्यास मी कोणती सकारात्मक पावले उचलू शकतो?

▪ नकारात्मक विचारांत आकंठ बुडण्याऐवजी, स्वतःकडे संतुलित दृष्टिकोनाने पाहण्यास कोणती शास्त्रवचने मला मदत करू शकतील?

[१४ पानांवरील चौकट/चित्र]

संभाषण कौशल्य विकसित करण्याकरता काही सूचना

हसमुख चेहरा ठेवा. तुमच्या आनंदी हावभावांमुळे इतरांना तुमच्याशी संभाषण करावेसे वाटेल.

स्वतःची ओळख करून द्या. तुमचे नाव-गाव इत्यादी स्वतःविषयीची माहिती सांगा.

प्रश्‍न विचारा. फार जास्त चौकशा न करता, समोरच्या व्यक्‍तीशी ओळख वाढवण्याकरता योग्य प्रश्‍न विचारा.

लक्षपूर्वक ऐका. दुसरी व्यक्‍ती बोलत असताना आपण यानंतर काय बोलणार याचा विचार करू नका. तर त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. मग आपोआपच तुम्हाला पुढचा प्रश्‍न किंवा विधान सुचेल.

दडपणात असू नका! संभाषणामुळे नव्या मैत्रीचे द्वार उघडू शकते. तेव्हा संभाषणाचा पूर्ण आनंद घ्या!