बायबल काय म्हणतं?
देवाला आपलं दुःख कळतं का?
काहींना वाटतं, की देवच आपल्याला दुःख देतो; तर काहींना वाटतं, आपल्या दुःखाबद्दल त्याला काहीच वाटत नाही. पण, याविषयी बायबल काय म्हणतं हे जाणून तुम्ही थक्क व्हाल.
देव कधी दुःख देतो का?
“देव कधीही दुष्ट . . . असू शकत नाही.”—ईयोब ३४:१२.
लोक काय म्हणतात?
काहींचं असं म्हणणं आहे, की आपल्या जीवनात जे काही घडतं ते देवच घडवून आणतो; त्यामुळं दुःखसुद्धा तोच देतो. उदाहरणार्थ, एखादी नैसर्गिक आपत्ती आली, की लोक म्हणतात पापी लोकांना शिक्षा देण्यासाठीच देवानं ही आपत्ती आणली.
बायबल काय म्हणतं?
बायबलमध्ये स्पष्टपणे असं सांगितलं आहे, की देव कधीच कुणाला दुःख देत नाही. उदाहरणार्थ, आपल्यावर संकट येतं तेव्हा “हे संकट देवानं माझ्यावर आणलं,” असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण “देव वाईट गोष्टींनी कोणाचीही परीक्षा घेत नाही.” (याकोब १:१३, NW) दुसऱ्या शब्दांत, आपल्यावर येणाऱ्या समस्या आणि त्यामुळं ओढवणाऱ्या दुःखासाठी देव जबाबदार नाही. असं करणं दुष्टपणाचं ठरेल. पण, बायबल म्हणतं: “देव कधीही दुष्ट . . . असू शकत नाही.”—ईयोब ३४:१२, सुबोधभाषांतर.
जर देव आपल्या दुःखासाठी जबाबदार नाही, तर मग कोण जबाबदार आहे? बऱ्याचदा पाहायला मिळतं, की माणूसच माणसाचं नुकसान करतो आणि त्यामुळं दुःख ओढवतं. (उपदेशक ८:९) तसंच, अनपेक्षितपणे कोसळणाऱ्या संकटांमुळं आपल्याला दुःख सोसावं लागतं. (उपदेशक ९:११) पण सगळ्यात मुख्य म्हणजे, आपल्या दुःखासाठी “या जगाचा अधिकारी,” अर्थात सैतान जबाबदार आहे असं बायबल शिकवतं; कारण “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (योहान १२:३१; १ योहान ५:१९) तर मग स्पष्टच आहे, की आपल्या दुःखासाठी देव नव्हे, तर सैतान जबाबदार आहे.
देवाला आपल्या दुःखाबद्दल काय वाटतं?
“त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला.”—यशया ६३:९.
लोक काय म्हणतात?
काहींना असं वाटतं, की देव भावनाशून्य आहे; त्याला आपल्या दुःखाबद्दल काहीच वाटत नाही. उदाहरणार्थ एक लेखक म्हणतो: “असलाच कोणी देव, तरी आपलं दुःख पाहून त्याच्या मनाला पाझर फुटत नसावा.”
बायबल काय म्हणतं?
पण बायबलमध्ये देवाचं वर्णन अगदी उलट करण्यात आलं आहे. बायबल म्हणतं, की आपलं दुःख पाहून देवाचं मन हळहळतं. तसंच, तो लवकरच आपलं दुःख कायमचं काढून टाकणार आहे. बायबलमध्ये सांगितलेल्या तीन सांत्वनदायक गोष्टींचा विचार करा.
देवाला आपलं दुःख कळतं. बायबल म्हणतं, की यहोवाचे * “नेत्र मानवांस पाहतात.” आणि म्हणूनच, दुःखाची सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत मानवाचा एकही अश्रू त्याच्या नजरेतून सुटलेला नाही. (स्तोत्र ११:४; ५६:८) उदाहरणार्थ, प्राचीन काळी देवाच्या सेवकांवर अत्याचार होत होते तेव्हा देवानं म्हटलं: “माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे.” पण, देवाला त्यांच्या दुःखाची फक्त वरवर कल्पना होती का? नाही. कारण पुढं त्याच वचनात तो म्हणतो: “त्यांचे क्लेश मी जाणून आहे.” (निर्गम ३:७) आपण जे सोसतो त्याची सहसा इतरांना कल्पना नसते आणि असली तरी त्यांना ते पूर्णपणे कळत नसतं. पण देवाला मात्र आपलं प्रत्येक दुःख कळतं. या जाणिवेमुळंच अनेकांचं अर्ध दुःख कमी होतं.—स्तोत्र ३१:७; नीतिसूत्रे १४:१०.
आपलं दुःख पाहून देवाचं मन हळहळतं. यहोवा देवाला आपलं दुःख फक्त कळत नाही, तर ते पाहून त्याचं मन हळहळतंसुद्धा. एक उदाहरण विचारात घ्या. प्राचीन काळातल्या देवाच्या उपासकांचा छळ करण्यात आला तेव्हा त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या. बायबल म्हणतं: “त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला.” (यशया ६३:९) यहोवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ असला, तरी तो आपला समदुःखी आहे; जणू आपलं प्रत्येक दुःख तो स्वतः अनुभवतो! खरंच यहोवा “फार कनवाळू व दयाळू आहे.” (याकोब ५:११) इतकंच नाही, तर दुःख सहन करण्यास तो आपल्याला मदतही करतो.—फिलिप्पैकर ४:१२, १३.
देव लवकरच दुःखाचा अंत करेल. बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की यहोवा लवकरच प्रत्येक व्यक्तीचं दुःख नाहीसं करेल. त्याच्या स्वर्गीय राज्याद्वारे तो एक मोठा आणि चांगला बदल घडवून आणणार आहे. त्या काळाबद्दल बायबल म्हणतं, देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) पण, त्या लोकांबद्दल काय जे आता आपल्यात नाहीत? अशांना देव पुन्हा जिवंत करेल आणि त्यांनासुद्धा दुःख नसलेलं जीवन देईल. (योहान ५:२८, २९) कटू किंवा दुःखद आठवणींबद्दल काय म्हणता येईल? त्या पुढंही आपल्याला छळत राहतील का? नाही. कारण स्वतः यहोवा असं वचन देतो: “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.”—यशया ६५:१७. * ▪ (g15-E 01)