इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा तुम्ही योग्य वापर करता का?
जेनीला व्हिडिओ गेम खेळायचं जणू काय वेडच लागलं आहे. ती म्हणते: “एकदा का मी गेम खेळायला बसले की आठ तास कसे जातात कळत नाही. ही खरंच एक समस्या झाली आहे.”
डेनिसनं एका आठवड्यापर्यंत इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि इंटरनेट न वापरण्याचं ठरवलं होतं. पण तो दोन दिवसही त्याच्यावाचून राहू शकला नाही.
जेनी आणि डेनिस हे काही तरुण नाहीत. जेनी ४० वर्षांची असून चार मुलांची आई आहे तर डेनिस ४९ वर्षांचा आहे.
तुम्ही इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरता का? * बरेच जण वापरतात आणि ते योग्यच आहे. कारण आज नोकरीच्या ठिकाणी, मित्रपरिवारासोबत संपर्कात राहण्यासाठी आणि मनोरंजनासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणं खूप मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
पण इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्याच्या बाबतीत, कित्येक लोकांना जेनी आणि डेनिस यांच्यासारखं व्यसन लागलं आहे. २० वर्षांची निकोल म्हणते: “मला हे सांगायला लाज वाटते की मी मोबाईलशिवाय राहूच शकत नाही. तो जणू माझा बेस्ट फ्रेंड झालाय. एखाद्या ठिकाणी जर मोबाईलला कवरेज नसेल तर माझं डोकंच फिरतं! थोडा वेळ मी कसंबसं शांत राहू शकते. पण त्यानंतर मात्र मी अस्वस्थ होते. मला मेसेज पाहायचाच असतो. कधीकधी मी यावर विचार करते तर माझं मलाच हसू येतं.”
काही लोक आपल्या उपकरणावरील मेसेज आणि अपडेट्स पाहण्यासाठी रात्ररात्र जागतात. त्यांना त्यांच्या उपकरणांपासून दूर केलं तर ते अस्वस्थ
होतात; त्यामुळं त्यांना कधीकधी मानसिक आणि शारीरिक त्रासही होऊ शकतो. काही संशोधकांनी अशा वागण्याला व्यसन म्हटलं आहे. मग ते कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्याचं; इंटरनेट किंवा स्मार्टफोन वापरण्याचं व्यसन असू शकतं. काही लोकांना “व्यसन” म्हणायला आवडत नाही. पण त्यांना हे कळतं की एखाद्या उपकरणाचा अतिवापर केला तर दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो.काहीही असो, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर केल्यामुळं त्रास हा होतोच. यामुळं काही कुटुंबात दरी निर्माण झाली आहे. २० वर्षांची एक तरुणी दुःखी मनानं म्हणते: “माझ्या वडिलांना अजिबात कल्पना नाही की आता माझ्या जीवनात काय चाललंय. ते माझ्याशी बोलत असले तरी त्यांचं सगळं लक्ष ई-मेलकडेच असतं. आणि फोन तर त्यांच्या हातून सुटतच नाही. त्यांचं माझ्यावर प्रेम असेल, पण कधीकधी त्यांच्या वागण्यावरून तसं वाटत नाही.”
“इलेक्ट्रॉनिक उपकरण व्यसनमुक्ती”
उपकरणांचा होत असलेला गैरवापर रोखण्यासाठी चीन, दक्षिण कोरिया, संयुक्त राज्य आणि अमेरिका या देशांनी “इलेक्ट्रॉनिक उपकरण व्यसनमुक्ती” केंद्रे स्थापन केली आहेत. त्या केंद्रांमध्ये भरती झालेल्यांना बऱ्याच दिवसांपर्यंत इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्याची सक्त मनाई असते. उदाहरणार्थ, बंटी नावाचा एक तरुण म्हणतो: “एक वेळ अशी आली की मी दिवसातले १६ तास इंटरनेटवर गेम खेळू लागलो. ड्रग्स घेतल्यावर जशी नशा चढते, तशी नशा मला चढायची.” बंटीला जाणवलं की त्याला मदतीची गरज आहे म्हणून तो व्यसनमुक्ती केंद्रात भरती झाला. पण तोपर्यंत त्याची नोकरी सुटली होती, त्याचं स्वतःकडे दुर्लक्ष झालं होतं आणि त्याचे मित्र दुरावले होते. अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता?
स्वतःचं परीक्षण करा. तंत्रज्ञानाचा तुमच्या जीवनावर किती वाईट प्रभाव पडतो याचा विचार करा. त्यासाठी स्वतःला पुढील प्रश्न विचारा:
-
मला माझा मोबाईल, टॅब, इंटरनेट वापरता येत नाही तेव्हा मी उगाच चिडचिड करतो का?
-
किती वेळ इंटरनेट वापरायचं हे ठरवूनसुद्धा मी मुद्दाम त्यापेक्षा जास्त वेळ घालवतो का?
-
रात्ररात्र मेसेज पाहण्याच्या सवयीमुळं माझी झोप अपुरी राहते का?
-
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अतिवापरामुळं माझं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं का, या प्रश्नाचं मी जे उत्तर देईन त्याच्याशी माझ्या घरातले लोक सहमत असतील का?
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरामुळं अधिक महत्त्वाच्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष होतं का: जसं की तुमचं कुटुंब, तुमच्या जबाबदाऱ्या. तर वेळीच पाऊल उचला. (फिलिप्पैकर १:१०) तुम्ही काय करू शकता?
वेळेचं योग्य नियोजन करण्यास शिका. अती तिथं माती अशी म्हण आहे. म्हणून तुम्ही कामासाठी किंवा मनोरंजनासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरता तेव्हा वेळेचं योग्य नियोजन करा आणि त्याला चिकटून राहा.
टीप: तुम्ही आपल्या कौटुंबिक सदस्याची किंवा एखाद्या मित्राची मदत घेऊ शकता. याबद्दल बायबल सांगतं: “एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण ... त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल.”—उपदेशक ४:९, १०.
आकर्षणाचं रूपांतर ‘व्यसनात’ होऊ देऊ नका
नवीन उपकरणांमुळं माहिती मिळवणं आणि ती पाठवणं जसजसं जास्त सोपं आणि जलद होईल तसतसं या उपकरणांचा गैरवापरही नक्कीच वाढेल. पण या आकर्षणाचं रूपांतर ‘व्यसनात’ होऊ देऊ नका. “वेळेचा सदुपयोग करा” आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर टाळा.—इफिसकर ५:१६. ▪ (g15-E 05)
^ परि. 5 या लेखात, “इलेक्ट्रॉनिक उपकरणं” म्हणजे डिजिटल माहिती, ई-मेल, टेक्स्ट मेसेज, व्हिडिओ, संगीत, गेम आणि फोटो पाहण्यासाठी किंवा इतरांना पाठवण्यासाठी तसंच फोन करण्यासाठी वापरली जाणारी साधने आहेत.