व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धैर्य धरा!

धैर्य धरा!

धैर्य धरा!

“धैर्य धरा व म्हणा: ‘यहोवा मला साहाय्य करणारा आहे.’”—इब्रीयांस १३:६, न्यूव.

१. देवाविषयीचे सत्य शिकल्यावर पहिल्या शतकातील काहींनी कोणते साहस दाखवले?

 आमच्या सामान्य युगाचे ते पहिले शतक होते. दीर्घ काळ वाट पाहिलेला मशीहा आला होता. त्याने त्याच्या शिष्यांना उत्तम रितीने शिकवले होते व एक महत्त्वपूर्ण प्रचारकार्याची मोहीम सुरू केली होती. लोकांनी देवाच्या राज्याची सुवार्ता ऐकण्याची ती वेळ होती. याप्रकारे, सत्य शिकलेल्या पुरूष व स्त्रियांनी हा अद्‌भुत संदेश धैर्याने घोषित केला.—मत्तय २८:१९, २०.

२. यहोवाच्या साक्षीदारांना आज धैर्याची आवश्‍यकता का आहे?

राज्याची स्थापना त्या दिवसात झाली नव्हती. परंतु नेमस्त राजा, येशू ख्रिस्ताने भविष्यातील त्याच्या राज्याधिकारातील अदृश्‍य उपस्थितीविषयी भविष्यवाणी केली होती. ती युद्ध, दुष्काळ, मऱ्‍या, भूकंप आणि जगव्याप्त स्वरुपात सुवार्तेचा प्रचार या अप्रतिम गोष्टींद्वारे सूचित होणार होती. (मत्तय २४:३-१४; लूक २१:१०, ११) यहोवाचे साक्षीदार या नात्याने, या परिस्थितींचा आणि अनुभव घेत असलेल्या छळाचा सामना करण्यासाठी आम्हाला धैर्याची गरज आहे. यास्तव पहिल्या शतकातील धैर्यवान राज्य घोषकांविषयी पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या अहवालांचा विचार करणे फायदेकारक आहे.

ख्रिस्ताचे अनुकरण करण्यासाठी धैर्य

३. धैर्याच्या बाबतीत उत्तम उदाहरण कोणी पुरवले आणि इब्रीयांस १२:१-३ मध्ये त्याच्याविषयी काय म्हटले होते?

येशू ख्रिस्त धैर्याचे उत्तम उदाहरण पुरवतो. आरंभीच्या धैर्यवान असलेल्या ‘मोठ्या मेघरूपी’ यहोवाच्या साक्षीदारांना उद्धृत केल्यावर प्रेषित पौल येशू ख्रिस्तावर असे म्हणून लक्ष केंद्रित करतो: “तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरूद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.”—इब्रीयांस १२:१-३.

४. सैतानाने येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने धैर्य कसे दाखवले?

येशूने त्याच्या बाप्तिस्म्यानंतर, अरण्यातील ४० दिवसांचे मनन, प्रार्थना, आणि उपोषणानंतर, धैर्याने सैतानाचा विरोध केला. धोंड्याचे रूपांतर भाकरीत करण्यासाठी दियाबलाने येशूला मोहीत केले तेव्हा त्याने वैयक्‍तिक इच्छांची तृप्ती करण्यासाठी चमत्कार करणे चूक होते म्हणून ते नाकारले. येशूने म्हटले, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यूव.] मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे.” येशूला मंदिराच्या शिरोभागावरून उडी टाकण्याचे सैतानाने आव्हान केले, तेव्हा त्याने ते नाकारले, कारण संभवनीय आत्महत्येपासून त्याचा बचाव करण्यासाठी देवाला मोहात पाडण्याचे ते पाप ठरले असते. ख्रिस्ताने पुन्हा म्हटले, “आणखी असा शास्त्रलेख आहे की, परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको.” सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये, ‘उपासनेचे केवळ एक कृत्य करून दाखविण्याबद्दल’ देऊ केली, परंतु येशूने धर्मत्यागी होऊन, परीक्षेत असताना मानव देवाला विश्‍वासू राहणार नाही या दियाबलाच्या निंदेला पाठबळ दिले नाही. यास्तव येशूने हे स्पष्टपणे म्हटले: “अरे सैताना चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] तुझा देव ह्‍याला नमन कर, व त्याचीच उपासना कर.’” त्यानंतर मोहात पाडणारा आणखी “संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला.”—मत्तय ४:१-११; लूक ४:१३.

५. मोहाचा प्रतिकार करण्यासाठी आम्हाला काय मदत करील?

येशू यहोवाच्या अधीन होता व सैतानाचा विरोध करत होता. अशाप्रकारे आम्ही, ‘स्वतःला देवाच्या अधीन केले आणि सैतानाला अडवले तर तो आपल्यापासून पळून जाईल.’ (याकोब ४:७) येशूप्रमाणे, आम्ही काही पापी कृत्य करण्यासाठी मोहीत झाल्यास, कदाचित शास्त्रवचनांना उद्धृत करून धैर्याने मोहाचा प्रतिकार करू शकतो. चोरी करण्याचा मोह आम्हाला अनावर होत असता व तेव्हाच आपण “चोरी करू नको,” या देवाच्या नियमाचा पुनरुच्चार स्वतःपाशी केला तर ते कृत्य करण्याचे आपल्याला धाडस होईल का? दोघा ख्रिश्‍चनांना लैंगिक अनीती आचरण्याचा मोह झाला व त्यापैकी एकाने जरी धैर्याने “व्यभिचार करू नको,” हे शब्द अवतरीत केले तर, ते या कृत्यात पडतील का?—रोमकर १३:८-१०; निर्गम २०:१४, १५.

६. येशू कशाप्रकारे जगाला जिंकणारा धैर्यवान होता?

या जगाने द्वेष केल्यामुळे ख्रिश्‍चन या नात्याने आम्ही त्याच्या आत्म्यास व पापी वर्तनास टाळले पाहिजे. येशूने त्याच्या अनुयायांना म्हटले: “जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धैर्य धरा मी जगाला जिंकले आहे!” (योहान १६:३३, न्यूव.) जगासारखे न होऊन त्याने जगावर विजय मिळवला. विजेता या नात्याने त्याचे उदाहरण आणि सत्त्वनिष्ठ कामाची निष्पत्ती आम्हाला, जगापासून वेगळे, निष्कलंक राहून त्याचे अनुकरण करण्याचे धैर्य येऊ शकते.—योहान १७:१६.

प्रचार करत राहण्यासाठी धैर्य

७, ८. छळ होत असताना देखील प्रचारकार्य करत राहण्यासाठी आम्हाला काय मदत करील?

छळ होत असतानाही प्रचार करण्यास धैर्य मिळण्यासाठी येशू व त्याच्या शिष्यांनी यहोवावर भाव ठेवला. छळ होत असताना देखील ख्रिस्ताने त्याची सेवा साहसाने पार पाडली, आणि इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्ट नंतर यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांनी त्यांचे कार्य बंद करण्याचा प्रयत्न केला असतानाही त्याचे छळग्रस्त अनुयायी सुवार्तेचा प्रचार करत राहिले. (प्रे. कृत्ये ४:१८-२०; ५:२९) शिष्यांनी प्रार्थना केली की: “हे प्रभो [यहोवा, न्यूव.] आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा, आणि . . . आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.” मग काय घडले? “त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.”—प्रे. कृत्ये ४:२४-३१.

आज पुष्कळ लोक सुवार्तेस ग्रहणशील मनोवृत्ती दाखवत नसल्यामुळे, अशांना सुवार्ता घोषित करत राहण्यास साहसाची नेहमीच गरज असते. विशेषपणे यहोवाच्या सेवकांचा छळ होत असताना पूर्णपणे साक्ष देण्यासाठी देवाने दिलेल्या धैर्याची त्यांना आवश्‍यकता असते. (प्रे. कृत्ये २:४०; २०:२४) यास्तव धैर्यवान राज्य घोषक, पौलाने तरूण, कम-अनुभवी सहकाऱ्‍याला सांगितले की: “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान्‌ त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे.” (२ तीमथ्य १:७, ८) आम्ही धैर्यासाठी प्रार्थना केल्यास, आपण प्रचारकार्य करत राहू व राज्याचे घोषक या नात्याने असलेल्या आमच्या आनंदाला छळ देखील हिरावून घेऊ शकत नाही.—मत्तय ५:१०-१२.

यहोवाची बाजू घेण्यासाठी धैर्य

९, १०. (अ) पहिल्या शतकातील यहुदी तसेच विदेशांनी ख्रिस्ताचे बाप्तिस्माप्राप्त अनुयायी होण्यासाठी काय केले? (ब) ख्रिश्‍चन होण्यासाठी धैर्य का लागते?

पहिल्या शतकातील अनेक यहुदी तसेच विदेशांनी ख्रिस्ताचे बाप्तिस्माप्राप्त अनुयायी होण्यासाठी, धैर्याने अशास्त्रीय सांप्रदायांचा त्याग केला. इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्ट नंतर लगेचच, “यरूशलेमात शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गांतीलही पुष्कळ लोकांनी ह्‍या विश्‍वासाला मान्यता दिली.” (प्रे. कृत्ये ६:७) त्या यहुद्यांठायी, धार्मिक बंधने तोडून येशूचा मशीहा म्हणून स्वीकार करण्याचे धैर्य होते.

१० इ.स. ३६ च्या आरंभाला, अनेक विदेशी लोक विश्‍वासू झाले. कर्नेल्य व त्याच्या कुटुंबातील सदस्य तसेच अनेक विदेशांनी सुवार्ता ऐकल्यावर, ताबडतोब तिचा स्वीकार केला, त्यांना पवित्र आत्मा मिळाला, व “येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांनी बाप्तिस्मा घेतला.” (प्रे. कृत्ये १०:१-४८) फिलिप्पैमधील तुरूंगाधिकारी व त्याच्या घरातील सर्वांनी लगेच ख्रिस्तीधर्माचा स्वीकार केला आणि ‘त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी लगेच बाप्तिस्मा घेतला.’ (प्रे. कृत्ये १६:२५-३४) अशी भूमिका घेण्यासाठी धैर्याची आवश्‍यकता होती कारण ख्रिश्‍चनांचा तेव्हा छळ केला जात होता व ते लोकांना न आवडणारे अल्पसंख्याक होते. ते आता देखील आहेत. परंतु तुम्ही तुमचे जीवन देवाला समर्पण करून यहोवाचे एक साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा घेतला नसल्यास, धैर्याची पावले उचलण्याची हीच वेळ नाही का?

विभाजित घरामध्ये धैर्य

११. युनीके आणि तीमथ्य यांनी धैर्याची कोणती उत्तम उदाहरणे पुरवली?

११ धार्मिकरीत्या विभाजित असलेल्या घरामध्ये, धैर्यवान विश्‍वासाविषयी युनीके व तिचा मुलगा तीमथ्य यांनी उत्तम उदाहरण मांडले आहे. युनीकेचा पती मुर्तीपूजक असताना देखील तिने तिच्या मुलाला बालपणापासून “पवित्र शास्त्रलेख” शिकवला. (२ तीमथ्य ३:१४-१७, पंडिता रमाबाई भाषांतर) ख्रिस्ती झाल्यावर तिने ‘निष्कपट विश्‍वास’ दाखवला. (२ तीमथ्य १:५, पंडिता रमाबाई भाषांतर.) ख्रिस्ती विश्‍वासात नसलेल्या पतीच्या मस्तकपदास आदर देत असताना, तीमथ्याला ख्रिस्ती शिक्षण देण्याचे धैर्य देखील तिला झाले. नक्कीच मग, तिच्या उत्तमरितीने शिकवलेल्या पुत्राची मिशनरी प्रवासात पौलाचा सोबती या नात्याने निवड केल्यामुळे तिच्या विश्‍वास व धैर्याला प्रतिफळ मिळाले. अशाच परिस्थितीत असणाऱ्‍या ख्रिस्ती पालकांसाठी हे किती उत्तेजन देते बरे!

१२. तीमथ्य कशाप्रकारचा व्यक्‍ती झाला, व त्याच्याप्रमाणे आज कोण स्वतःला शाबीत करत आहेत?

१२ तीमथ्य, धार्मिकतेत विभाजित असलेल्या घरात राहत असला तरी, धैर्याने त्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला व आध्यात्मिक व्यक्‍ती झाला, ज्यामुळे त्याच्याबद्दल पौल असे म्हणू शकला: “तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुम्हाकडे [फिलिप्पैकरांकडे] लवकर पाठवीन अशी मला प्रभु येशूमध्ये आशा आहे. तुमच्या बाबीसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही . . . त्याचे शील तुम्हाला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.” (फिलिप्पैकर २:१९-२२) आज, विभाजित कुटुंबातील अनेक मुले व मुली साहसाने खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करत आहेत. तीमथ्याप्रमाणेच ते स्वतःचा पुरावा देतात व ते यहोवाच्या संस्थेचा भाग आहेत याबद्दल आम्हाला किती आनंद होतो!

‘जिवाला धोक्यात घालण्यासाठी’ धैर्य

१३. कशारीतीने अक्विला आणि प्रिस्क यांनी धैर्य दाखवले?

१३ अक्विला आणि त्याची पत्नी प्रिस्किल्ला (प्रिस्क) यांनी समविश्‍वासूसाठी धैर्याने ‘आपला जीव धोक्यात घातला.’ त्यांनी त्यांच्या घरात पौलाचा स्वीकार केला, तंबू बनवण्यासाठी त्यांनी त्याच्यासोबत काम केले, आणि करिंथमध्ये नवी मंडळी स्थापन करण्यासाठी त्यांनी त्याला साहाय्य केले. (प्रे. कृत्ये १८:१-४) त्यांच्या १५ वर्षे असलेल्या मैत्रीच्या संबंधात, अप्रकट मार्गांनी देखील त्यांनी त्याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्यावेळी ते रोममध्ये राहत असावेत कारण पौलाने तेथील ख्रिश्‍चनांना लिहितेवेळी असे म्हटले की: “ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी, प्रिस्क आणि अक्विला ह्‍यांना माझा सलाम सांगा, त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला, त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्यांही मानतात.”—रोमकर १६:३, ४.

१४. अक्विला आणि प्रिस्क, पौलासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याद्वारे कोणत्या आज्ञेचे अनुकरण ते करत होते?

१४ पौलासाठी अक्विला आणि प्रिस्क यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याद्वारे, येशूच्या शब्दानुसार कार्य केले: “मी तुम्हांस नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.” (योहान १३:३४) ही आज्ञा “नवी” होती, ते या अर्थाने की, एखाद्याने आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखीच प्रीती करावी, या मोशेच्या नियमशास्त्रातील गरजेपेक्षाही ती पुढे जात होती. (लेवीय १९:१८) कारण यात इतरांसाठी येशूप्रमाणे स्वतःचा प्राण देण्याच्या स्वार्थत्यागाच्या प्रीतीची मागणी केलेली होती. दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या शतकातील टर्टुलियन या लेखकाने ख्रिश्‍चनांच्या बाबतीत जगातील लोकांच्या शब्दांचे अवतरण घेऊन असे लिहिले: “‘पहा,’ ते एकमेकांवर कसे प्रेम करतात . . . एकमेकांसाठी प्राण देण्यास कसे तयार असतात.’” (अपॉलॉजी, प्रकरण ३९, ७) विशेषपणे छळ होत असताना, शत्रूकडून क्रुरता किंवा मृत्यू मिळेल म्हणून आम्ही आमच्या समविश्‍वासू बांधवांविषयीची माहिती प्रकट करण्याचे टाळून बंधुप्रीती दाखवण्यासाठी धैर्याने स्वतःचा जीव धोक्यात घालण्यास आमचे कर्तव्य समजले पाहिजे.—योहान ३:१६.

धैर्याने आनंद मिळतो

१५, १६. प्रे. कृत्याच्या १६ व्या अध्यायात दाखवल्याप्रमाणे धैर्य आणि आनंदाचा मेळ कसा घातला जाऊ शकतो?

१५ परीक्षा होत असताना धैर्य दाखवल्याने आनंद मिळतो, याचा पौल आणि सीला पुरावा देतात. फिलिप्पैमधील शहरात, मुलकी फौजदारी न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार सर्वांसमक्ष काठीने फटके मारल्यावर त्यांना खोड्यांत अडकवले. तथापि, ते उदास होऊन भयभीत झाले नाहीत. त्यांच्या त्रासदायक परिस्थितीत देखील, देवाने दिलेले धैर्य व विश्‍वासू ख्रिश्‍चनांसाठी मिळत असलेला आनंद त्यांच्याठायी होता.

१६ मध्यरात्रीच्या सुमारास, पौल आणि सीला प्रार्थना व गाणे गाऊन देवाची स्तुती करत होते. एकाएकी, तुरूंगात भूमिकंप झाला, त्यांची बंधने तुटली व दरवाजे उघडले गेले. भयभीत झालेल्या तुरुंगाधिकाऱ्‍याला व त्याच्या कुटुंबाला साहसाने साक्ष दिल्यामुळे बाप्तिस्माप्राप्त यहोवाचे सेवक होण्याप्रत निरवले गेले. यास्तव, “त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला.” (प्रे. कृत्ये १६:१६-३४) पौल आणि सीला यांना यामुळे किती आनंद झाला असेल बरे! धैर्याच्या या व इतर शास्त्रवचनीय उदाहरणांचा विचार केल्यावर, यहोवाचे सेवक या नात्याने आम्ही धैर्यवान कसे राहू शकतो?

सतत धैर्यवान राहा

१७. स्तोत्रसंहितेच्या २७ व्या अध्यायात दाखवल्यानुसार, यहोवाची प्रतीक्षा करण्याचा संबंध धैर्यासोबत कसा आहे?

१७ यहोवावर आशा ठेवल्याने धैर्यवान राहण्यास आम्हाला मदत होईल. दाविदाने गायिले: “यहोवाची प्रतीक्षा कर; दृढ ऐस आणि तुझे हृदय धीर धरो. होय, यहोवाची प्रतीक्षा कर.” (स्तोत्रसंहिता २७:१४, पंडिता रमाबाई भाषांतर.) स्तोत्रसंहिता २७ दाखवते की दाविदाने यहोवावर जीवनाचा “दुर्ग” याप्रमाणे भाव ठेवला. (वचन १) गत काळात देवाने दाविदाच्या शत्रूंसोबत कसा व्यवहार केला हे पाहिल्यामुळे त्याला धैर्य मिळाले. (वचने २, ३) यहोवाच्या उपासनेच्या केंद्राबद्दलची गुणग्राहकता हा आणखी एक घटक होता. (वचन ४) यहोवाची मदत, संरक्षण, आणि तो त्याला सोडवील यावर भरवसा ठेवल्याने दाविदाचे धैर्य वाढले. (वचने ५-१०) यहोवाच्या धार्मिक मार्गातील तत्त्वांचे सतत शिक्षण देखील साहाय्यकारी होते. (वचन ११) शत्रूंपासून सुटका मिळण्यासाठी विश्‍वास आणि आशेच्या आत्मविश्‍वासाने प्रार्थना केल्याने धैर्यवान असण्यासाठी दाविदाला मदत मिळाली. (वचने १२-१४) अशाप्रकारे आम्ही देखील आमचे धैर्य वाढवू शकतो, व यारीतीने आम्ही “यहोवाची प्रतीक्षा” करतो हे खरेपणाने दाखवू.

१८. (अ) यहोवाच्या समउपासकांबरोबरील नियमित सहवास धैर्यवान होण्यास आम्हाला मदत करू शकतो हे कसे दाखवतो? (ब) धैर्याला मजबूत करण्यासाठी ख्रिस्ती सभा कोणती भूमिका पार पाडतात?

१८ यहोवाच्या समविश्‍वासू सेवकांसोबत नियमित सहवास ठेवल्यास धैर्यवान राहण्यास आम्हाला मदत मिळू शकते. पौल कैसरापुढे उपस्थित राहण्यासाठी रोमचा प्रवास करत असताना, समविश्‍वासू त्याला अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा येथे भेटले. अहवाल सांगतो की, “त्यांना पाहून पौलाने देवाची उपकारस्तुती करून धैर्य धरले.” (प्रे. कृत्ये २८:१५) आम्ही नियमितपणे सभांना उपस्थित राहिल्यास पौलाचा सल्ला ऐकतो: “प्रीती आणि सत्कर्मे करावयास उत्तेजन मिळेल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्रीयांस १०:२४, २५) एकदुसऱ्‍यांना उत्तेजन देण्याचा अर्थ काय होतो? उत्तेजन देण्याचा अर्थ, “धैर्याने, आत्म्याने, किंवा आशेने प्रेरणा देणे होय.” (वेबस्टरर्स्‌ नाइन्थ न्यू कॉलिजिएट डिक्शनरी) इतर ख्रिश्‍चनांना धैर्याने प्रेरणा देण्यासाठी आपण बरेच काही करू शकतो, व त्यांच्या उत्तेजनामुळे आमच्यात या गुणाची वाढ होऊ शकते.

१९. कशाप्रकारे शास्त्रवचने आणि ख्रिस्ती प्रकाशनांचा संबंध धैर्यवान राहण्यासाठी आहे?

१९ धैर्यवान राहण्यासाठी, आम्ही देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास केला पाहिजे व त्याचा सल्ला आमच्या जीवनात लागू केला पाहिजे. (अनुवाद ३१:९-१२; यहोशवा १:८) आमच्या नियमित अभ्यासात शास्त्रवचनावर आधारित असलेल्या ख्रिश्‍चन प्रकाशनांचा समावेश असला पाहिजे, जेणेकडून त्यात पुरवलेला उत्तम सल्ला आम्हाला विश्‍वासाच्या परीक्षेचा सामना देवाने दिलेल्या धैर्याने करण्यास मदत देऊ शकेल. यहोवाचे सेवक विविध परिस्थितीमध्ये कसे धैर्यवान होते हे आम्ही पवित्र शास्त्रातील अहवालांवरून पाहिले आहे. या माहितीची मदत आता कशी होऊ शकते हे कदाचित आम्हाला आता समजणार नाही, परंतु देवाच्या वचनात सामर्थ्य आहे, आणि त्यातून आम्ही जे काही शिकतो त्याचा आम्हाला नेहमीच फायदा होतो. (इब्रीयांस ४:१२) उदाहरणार्थ, आमच्या सेवेत मनुष्याच्या भयाचा परिणाम होत असल्यास, हनोखने भक्‍तिहीन लोकांना देवाचा संदेश धैर्याने कसा सांगितला त्याची आम्ही आठवण करू शकतो.—यहूदा १४, १५.

२०. यहोवाचे धैर्यवान सेवक राहण्यासाठी प्रार्थना महत्त्वपूर्ण आहे असे का म्हटले जाऊ शकते?

२० यहोवाचे सेवक या नात्याने धैर्यवान राहण्यासाठी, आम्ही प्रार्थनेत तत्पर असले पाहिजे. (रोमकर १२:१२) येशू परीक्षांत धैर्याने टिकून राहिला कारण “आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्‌भक्‍तीमुळे ऐकण्यात आली.” (इब्रीयांस ५:७) प्रार्थनेत देवाच्या जवळ राहण्याद्वारे, जेथून पुन्हा पुनरूत्थान नाही त्या “दुसरे मरण” याचा अनुभव घेणाऱ्‍या जगीक भ्याड लोकांसारखे आम्ही असणार नाही. (प्रकटीकरण २१:८) त्याच्या धैर्यवान सेवकांसाठी, ईश्‍वरी संरक्षण आणि नवीन जगातील जीवन ठेवलेले आहे.

२१. यहोवाचे निष्ठावंत सेवक धैर्यवान का असू शकतात?

२१ यहोवाचे निष्ठावंत सेवक असल्यामुळे, आम्ही दुरात्मे आणि मानवी शत्रूंना घाबरू नये, कारण आम्हाला देवाचा पाठिंबा व जगाला जिंकलेल्या येशूचे धैर्यवान उदाहरण सुद्धा आहे. त्याचप्रमाणे, यहोवाच्या लोकांबरोबरील आध्यात्मिकतेत उभारणीकारक सहवास आम्हाला धैर्यवान असण्यासाठी मदत करतो. आमच्या धैर्याला, शास्त्रवचने आणि ख्रिस्ती साहित्याचे मार्गदर्शन आणि सल्ल्याद्वारे मजबूत केले जाते. शिवाय, देवाच्या मार्गात धैर्याने चालण्यासाठी, गत काळातील त्याच्या सेवकांचा पवित्र शास्त्रात असलेला अहवाल आम्हाला मदत करतो. यास्तव, या कठिण दिवसात, पवित्र सेवेत साहसाने पुढे जाण्यासाठी आपण स्वतःला रेटू या. होय, यहोवाचे सर्वच लोक धैर्यवान होवोत!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ येशूचे उदाहरण आम्हाला कसे धैर्य देते?

▫ येशू व त्याच्या शिष्यांना प्रचार करत राहण्यासाठी कशामुळे धैर्य मिळाले?

▫ यहोवाची बाजू घेण्यासाठी यहुदी तसेच विदेशांना धैर्याची आवश्‍यकता का होती?

▫ युनीके आणि तीमथ्य यांनी धैर्याची कोणती उदाहरणे पुरवली?

▫ छळामध्ये देखील धैर्यामुळे आनंद मिळतो यासाठी कोणता पुरावा आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील संक्षिप्त आशय]

येशूप्रमाणे शास्त्रवचनांना लागू करून, उद्धृत केल्यास आम्ही मोहाचा प्रतिकार करू शकतो