सर्वश्रेष्ठ नावाच्या रहस्याचा उलगडा करणे
सर्वश्रेष्ठ नावाच्या रहस्याचा उलगडा करणे
मुस्लिमांचे कुराण आणि ख्रिश्चनांचे पवित्र शास्त्र, दोन्ही सर्वश्रेष्ठ नावाचा उल्लेख करतात हे चित्तवेधक आहे. ही चर्चा, सर्वश्रेष्ठ नावाचा अर्थ आणि त्याच्या महत्त्वाविषयी सांगते. तसेच सर्व मानवजातीवर आणि या पृथ्वीवरील आमच्या भवितव्यावर, त्या नावाचा प्रभाव कसा पडतो हेही ती चर्चा दाखवते.
या पृथ्वीवर लाखो पुरूष व स्त्रियांनी वस्ती केली व शेवटी ते मृत्यू पावले. अनेक बाबतीत, त्यांच्याबरोबरच त्यांची नावे देखील नाहीशी झाली व त्यांच्याबद्दलच्या आठवणी विसरल्या गेल्या. मात्र अव्हिसिना, एडिसन, पाश्चर, बिथोवेन, गांधी, आणि न्यूटन यासारखी काही थोर नावे टिकून राहिली. या नावांचा संबंध, संपादन, शोध व संशोधनासोबत आहे.
तथापि, एक असे नाव आहे जे इतर सर्व नावांपेक्षा थोर आहे. सबंध विश्वामधील भूतकाळाच्या व वर्तमानकाळाच्या सर्व आश्चर्याचा याबरोबर संबंध आहे. मानवजातीच्या दीर्घ आणि आनंदी जीवनाच्या आशेचा या नावाशी संबंध आहे!
हे नाव माहीत असण्याची अनेकांनी इच्छा धरली. त्यांनी याविषयी शोध केला व विचारणा केली, परंतु त्यांना ते मिळाले नाही. त्यांच्याकरता ते एक रहस्यच राहिले. वास्तविक पाहता जोवर नाव धारण करणारा त्याचा उलगडा करत नाही तोवर कोणालाही हे कळणार नाही. या अप्रतिम नावाचे रहस्य उघड झाले हे आनंदाचे आहे. देवाने स्वतः असे केले जेणेकडून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याची ओळख होऊ शकेल. त्याने त्याचे नाव आदाम, नंतर अब्राहाम, मोशे आणि गत काळातील त्याच्या इतर विश्वासू सेवकांना प्रकट केले.
सर्वश्रेष्ठ नावाच्या शोधात
“शास्त्रवचनांचे सखोल ज्ञान असणाऱ्या” एकाविषयी कुराण सांगते. (२७:४०) या वचनाच्या स्पष्टीकरणासाठी, ताफसर जालेलयन या नावाने परिचित असलेले भाष्य म्हणते: “बरेख्याचा पुत्र आसाफ हा नीतिमान पुरूष होता. त्याला देवाचे सर्वश्रेष्ठ नाव माहीत होते, आणि जेव्हा ते नाव तो घेई तेव्हा त्याला उत्तर मिळत होते.” हे आम्हाला पवित्र शास्त्राचा लेखक आसाफ याची आठवण करून देते, स्तोत्रसंहिता ८३:१८ मध्ये त्याने म्हटले होते: “तू केवळ तूच परमेश्वर [यहोवा, न्यूव.] या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.”
कुराणातील १७:२, मध्ये आम्ही असे वाचतो की: “आम्ही मोशे यांना शास्त्रवचने दिली आणि इस्राएलांसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांची नेमणूक केली.” त्या शास्त्रवचनात मोशे देवाला असे संबोधून म्हणतो: “पाहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे असे मी इस्राएल वंशजांकडे जाऊन त्यांस सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील तेव्हा मी त्यांना काय सांगू?” देवाने मोशेला असे उत्तर दिले: “तू इस्राएल लोकांस सांग तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर [यहोवा, न्यूव.] याने मला तुम्हाकडे पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे.”—निर्गम ३:१३, १५.
प्राचीन काळात, इस्राएलांना देवाच्या थोर नावाची ओळख होती. त्याचा वापर त्यांच्या नावाचा भाग म्हणून केला जात होता. आज एखाद्याचे नाव अब्दुल्ला असल्याचे आपल्याला माहीत आहे व त्याचा अर्थ “देवाचा सेवक” असा होतो, त्याप्रमाणेच प्राचीन इस्राएलात ओबद्या हे एक नाव होते व त्याचाही अर्थ “यहोवाचा सेवक” असा होत होता. संदेष्टा, मोशेच्या आईचे नाव योखबेद होते, ज्या नावाचा अर्थ “यहोवा महिमा आहे,” असा असण्याची शक्यता आहे.
योहान या नावाचा अर्थ “यहोवा दयाळू आहे” असा होतो. आणि संदेष्टा एलियाच्या नावाचा अर्थ, “माझा देव यहोवा आहे” असा होतो.संदेष्ट्यांना या थोर नावाबद्दल माहिती होती आणि अधिक आदर देऊन त्यांनी त्याचा वापर केला. पवित्र शास्त्रवचनात ते ७,००० पेक्षा अधिक वेळा आढळते. मरीयेचा पुत्र, येशू ख्रिस्ताने देवाला प्रार्थना करताना ते ठळकपणे समोर मांडले: “जे लोक तू मला . . . दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले . . . मी तुझे नाव त्यास कळविले आहे आणि कळवीन ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.” (योहान १७:६, २६) बैदवे, कुराणातील त्यांच्या विख्यात भाष्यात, कुराणातील २:८७, वर विवेचन देताना म्हणतात की येशूने, “मृत लोकांना पुनः उठविण्यासाठी देवाच्या सर्वश्रेष्ठ नावाचा” उपयोग केला.
मग ते नाव एक रहस्यच ठेवण्यासाठी काय घडले असावे? आम्हा प्रत्येकाच्या भवितव्याशी त्या नावाचा काय संबंध आहे?
ते नाव रहस्य कसे राहते?
काही लोक विचार करतात की इब्रीमध्ये “यहोवा”चा अर्थ “अल्ला” (देव) असा होतो. पण “अल्ला” चा इब्रीमध्ये ʼएलो․हीमʹ, हा समानार्थी शब्द आहे, जे ʼएलोʹहा (देव) या शब्दाचे बहुवचन आहे. यहुद्यांमध्ये अंधश्रद्धा उद्भवल्यामुळे, यहोवा या ईश्वरी नावाचा उच्चार करण्यास त्यांना परावृत्त केले. यास्तव पवित्र शास्त्रवचनांचे वाचन करताना जेव्हा त्यांना, यहोवा हे नाव दिसले, तेव्हा ʼअदो․नायʹ, म्हणजे “प्रभू” असे बोलण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. काही ठिकाणी तर, त्यांनी मूळ इब्री लिखाणातील “यहोवा” या नावात ʼअदो․नायʹ असा बदल केला.
ख्रिस्ती धर्मराज्याच्या धार्मिक पुढाऱ्यांनी देखील त्याप्रमाणेच कार्य केले. त्यांनी यहोवा नावाच्या ऐवजी “देव” (अरबी भाषेत “अल्ला”) आणि “प्रभू” असा बदल केला. यामुळे पवित्र शास्त्रवचनात कोणताही आधार नसलेल्या त्रैक्याच्या खोट्या शिक्षणाच्या वाढीला दुजोरा मिळाला. यामुळेच, लक्षावधी लोक येशूची आणि पवित्र आत्म्याची चुकीने भक्ती करतात व त्यांना देवासमान लेखतात. *
सर्वश्रेष्ठ नाव आणि आमचे भवितव्य
पवित्र शास्त्रवचने म्हणतात: “जो कोणी प्रभूचे [यहोवा, न्यूव.] नाव घेऊन धावा करील त्याचे तारण होईल.” (रोमकर १०:१३) न्यायदंडाच्या दिवशी आमच्या तारणाचा संबंध, देवाचे नाव आम्हाला माहीत असण्यासोबत आहे. त्याचे नाव माहीत असण्यामध्ये, त्याचे गुण, कृत्ये, आणि उद्देश माहीत असणे, तसेच त्याच्या उच्च तत्त्वाप्रमाणे वागणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. उदाहरणार्थ, अब्राहामाला देवाचे माहीत होते व त्याने त्या नावाचा धावा केला. यामुळे देवासोबतच्या चांगल्या नातेसंबंधाचा त्याने आनंद घेतला, त्याच्यावर विश्वास प्रगट केला, त्याच्यावर विसंबून राहिला, आणि त्याच्या आज्ञांकित राहिला. अशारितीने अब्राहाम देवाचा मित्र झाला. त्याचप्रमाणे, देवाचे नाव माहीत असल्यामुळे आम्ही त्याच्या जवळ जाऊ शकतो आणि त्याच्यासोबत वैयक्तिक नातेसंबंध वाढवू शकतो व ज्यामुळे त्याच्या प्रीतीत टिकून राहण्यास आम्हाला मदत होते.—उत्पत्ती १२:८; स्तोत्रसंहिता ९:१०; नीतीसूत्रे १८:१०; याकोब २:२३.
पवित्र शास्त्रात आम्ही असे वाचतो: “परमेश्वराने [यहोवा, न्यूव.] कान देऊन ऐकले व परमेश्वराचे [यहोवा, न्यूव.] भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.” (मलाखी ३:१६) आम्ही सर्वश्रेष्ठ नामावर ‘चिंतन’ का करावे? यहोवा या नावाचा शब्दशः अर्थ “घडवून आणणारा” असा होतो. यामुळे ते यहोवाला भविष्यवाण्यांची पूर्णता घडवून आणणारा असे प्रगट करते. तो सर्वदा त्याच्या उद्देशांची पूर्तता करतो. तो सर्वशक्तीमान देव आहे, केवळ तोच निर्माणकर्ता असा आहे की ज्याच्याठायी प्रत्येक चांगले गुण आहेत. देवाच्या ईश्वरी स्वभावाचे पूर्ण वर्णन करू शकणारा असा एकही शब्द नाही. परंतु देवाने स्वतःसाठी यहोवा, या सर्वश्रेष्ठ नावाची निवड केली, ज्यामुळे त्याचे सर्व गुण आणि उद्देश लक्षात येतात.
पवित्र शास्त्रवचनात, देव मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या उद्देशाबद्दल आम्हाला सांगतो. अनंतकाळ नंदनवनातील आनंद घेण्यासाठी यहोवा देवाने मानवाला निर्माण केले. मानवजातीसाठी त्याची इच्छा आहे की, सर्व लोकांनी एक कुटुंब मिळून, प्रीतीत आणि शांतीत राहावे. प्रीतीचा देव नजिकच्या भवितव्यात त्याच्या उद्देशांची पूर्ती घडून आणील.—मत्तय २४:३-१४, ३२-४२; १ योहान ४:१४-२१.
देव, मानवजातीच्या दुःखाचे कारण स्पष्ट करतो तसेच तारण मिळणे शक्य आहे हे देखील तो दाखवतो. (प्रकटीकरण २१:४) स्तोत्रसंहिता ३७:१०, ११ मध्ये आम्ही असे वाचतो: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील, ते उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.”—तसेच कुराण २१:१०५ देखील पाहा.
होय, देव त्याच्या श्रेष्ठ नावामुळे परिचित होईल. तो यहोवा आहे हे, राष्ट्रांना कबूल करावेच लागेल. सर्वश्रेष्ठ नाव माहीत असणे, त्याची साक्ष देणे, आणि त्याला चिकटून राहण्याचा किती अद्भुत विशेषाधिकार आहे! याप्रकारे आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत देवाच्या आनंदी उद्देशांची पूर्ती केली जाईल: “माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझ्या नावाचा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. . . . त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.”—स्तोत्रसंहिता ९१:१४-१६.
[तळटीपा]
^ त्रैक्य ही पवित्र शास्त्राची शिकवण नाही याच्या पुराव्यासाठी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने १९८९ मध्ये प्रकाशित केलेले, तुम्ही त्रैक्य मानावे का? हे माहितीपत्रक पहा.
यास्तव, यहुदी धर्माचे व ख्रिस्ती धर्मराज्याचे पुढारी, सर्वश्रेष्ठ नावाबद्दल मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केल्याच्या दोषात भागीदार आहेत. परंतु देवाने भविष्यवाणी केली की: “माझे थोर नाम पवित्र मानले जाईल असे मी करीन . . . व राष्ट्रास समजेल की मी यहोवा आहे.” होय, यहोवा त्याचे नाव सर्व राष्ट्रांमध्ये कळवीन. का बरे? कारण तो केवळ यहुद्यांचा किंवा कोणत्याही एका राष्ट्राचा किंवा वैयक्तिकांचाच देव नाही. यहोवा सर्व मानवजातीचा देव आहे.—यहेज्केल ३६:२३, न्यूव; उत्पत्ती २२:१८; स्तोत्रसंहिता १४५:२१; मलाखी १:११.
[५ पानांवरील चित्रं]
जळणाऱ्या झुडूपाजवळ, देवाने मोशेला स्वतःची ओळख ‘अब्राहामाचा देव, यहोवा’ अशी करून दिली