व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईस्टर की स्मारक विधी तुम्ही कोणता साजरा करावा?

ईस्टर की स्मारक विधी तुम्ही कोणता साजरा करावा?

ईस्टर की स्मारक विधी तुम्ही कोणता साजरा करावा?

एप्रिल ७ तारखेला, पहाटेची चकाकी क्षितिजावर पसरत जाते तेव्हा कोट्यावधी लोक वर्षातील त्यांच्या सर्वात पवित्र दिवसाचे—ईस्टरचे स्वागत करतील. एकेकाळी हे नाव, सेप्ट्युआजेसिमा नावाच्या सुटीने सुरु होणारा आणि ट्रिनीटी डे ज्याला म्हटले जाते त्याने समाप्त होणारा १२० दिवसांच्या सण व उपवासांच्या कालावधीला लागू होत होते. आज, हे नाव येशूच्या पुनरुत्थानाचा स्मरणोत्सव असलेल्या एकाच दिवसाला लागू होते—ईस्टरचा रविवार.

परंतु, त्याच आठवड्याच्या सुरवातीला एके सायंकाळी, प्रभूचे सांजभोजन असेही म्हटला जाणारा ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी साजरा करण्यासाठी लाखो लोक एकत्र जमतील. या सणाची सुरवात स्वतः येशूने पृथ्वीवरील त्याच्या शेवटल्या रात्री करून दिली होती. मग त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले: “माझ्या स्मरणार्थ हे करा.”—लूक २२:१९.

या दोहोतील तुम्ही कोणता साजरा करावा?

ईस्टरचा उगम

अनेक राष्ट्रांत वापरले जाणारे ईस्टर हे नाव बायबलमध्ये कोठेही आढळत नाही. “अरुणोदयाची आणि वसंतऋतूची मूर्तीपूजक देवता, ईयोस्टर हिच्यावरून ह्‍या सुटीला नाव देण्यात आले,” असे मध्ययुगीन सुट्या व सण (इंग्रजी) हे पुस्तक आपल्याला सांगते. ही देवता कोण होती? “दंतकथेनुसार, ईयोस्टर हिने बॉल्डरला, ज्याला त्याच्या शुद्धतेमुळे श्‍वेत देवता म्हटले आहे आणि त्याचे कपाळ मानवजातीला सूर्यप्रकाश देत असल्यामुळे सूर्यदेवता म्हटले आहे, त्याला आत घेण्यासाठी वालहाल्लाचे द्वार उघडले,” असे दिनांचे अमेरिकन पुस्तक (इंग्रजी) म्हणते. ते पुढे असेही म्हणते: “चर्चने त्याच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये जुन्या मूर्तीपूजक रूढी आपल्यामध्ये घेतल्या व त्यांना ख्रिस्ती अर्थ दिला यात काहीच शंका नाही. ईयोस्टरचा सण ज्याप्रमाणे वसंतऋतूत जीवनाच्या नविनीकरणासाठी साजरा केला जात होता त्याचप्रकारे ज्या येशूविषयीच्या शुभवर्तमानाचा ते प्रचार करत होते त्याच्या मृतातून झालेल्या पुनरुत्थानाच्या घटनेला सण बनवणे सोपे होते.”

अंतर्भूत करण्याची ही पद्धत, विशिष्ट राष्ट्रांमधील ईस्टर एग्स, ईस्टर रॅबीट आणि हॉट क्रॉस बन्स या ईस्टरच्या रूढींच्या उगमांचे स्पष्टीकरण देते. “चकचकीत तपकिरी पापुद्रा . . . व त्यावर क्रॉसचे चिन्ह असलेले” हॉट क्रॉस बन्स बनवण्याच्या रूढीविषयी ईस्टर आणि त्याच्या रूढी (इंग्रजी), हे पुस्तक म्हणते: “पहिल्या गुड फ्रायडेच्या घटनांमुळे त्यास चिरस्थायी महत्त्व प्राप्त होण्याच्याही फार पूर्वी क्रॉस हे मूर्तीपूजक चिन्ह होते आणि पूर्व ख्रिस्ती काळामध्ये काही वेळा ब्रेड आणि केकवर त्याचे चिन्ह केले जात होते.”

आपल्याला, या गोष्टींचा शास्त्रवचनांमध्ये कोठेही उल्लेख केलेला किंवा येशूच्या प्रारंभिक शिष्यांनी त्या गोष्टींना मानल्याचा कोणताही पुरावा सापडणार नाही. वास्तविक पाहता, प्रेषित पेत्र आपल्याला, “तारणासाठी [आपली] आध्यात्मिक वृद्धि व्हावी म्हणून . . . निऱ्‍या दुधाची इच्छा” धरण्यास सांगतो. (तिरपे वळण आमचे.) (१ पेत्र २:२) तर मग, ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चनी स्पष्टपणे मूर्तीपूजक असलेली चिन्हे त्यांच्या विश्‍वासामध्ये आणि रूढींमध्ये का अंगीकारल्या आहेत बरे?

जगप्रसिद्ध रूढींची कुतूहले (इंग्रजी), हे पुस्तक उत्तरते: “अशा प्रचलित मूर्तीपूजक विधींचे उच्चाटन करता येत नसल्यामुळे त्यांना ख्रिस्ती महत्त्व देण्याचे प्राचीन चर्चचे नित्य धोरण होते. ईस्टरच्या बाबतीत परिवर्तन खासकरून सोपे होते. नैसर्गिक सूर्याच्या उगवण्यामुळे झालेला आनंद आणि हिवाळा संपल्यावर निसर्गाचे जागे होण्यामुळे झालेला आनंद यांचे परिवर्तन, धार्मिकतेच्या सूर्याच्या उगवण्यामुळे, म्हणजे कबरेतून ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे झालेल्या आनंदात झाले. मे महिन्याच्या १ तारखेला घडलेले काही मूर्तीपूजक विधी देखील ईस्टरच्या सणाशी अनुरूप होण्यासाठी बदलण्यात आले.” जगप्रसिद्ध मूर्तीपूजक रूढी आणि जादूचे विधी टाळण्याऐवजी धार्मिक नेत्यांनी त्याला सूट देऊन “ख्रिस्ती महत्त्व” दिले.

‘पण यामध्ये काही चूक आहे का?’ असे तुम्हाला कदाचित वाटेल. काहींना तसे वाटत नाही. “ख्रिस्ती धर्मासारखा धर्म दुसरीकडून लोकांकडे येतो तेव्हा तो, जुन्या धर्मांपासून उगम असलेल्या लोक रूढी स्वीकारतो व त्यांना मान्य करतो,” असे ॲलन डब्ल्यू. वॅट्‌स, हे एपिस्कोपल पाळक त्यांच्या ईस्टर—त्याची कथा आणि अर्थ (इंग्रजी), या पुस्तकात म्हणाले. “ते, सर्वसामान्य लोकांच्या उपासनाविधीत अशा रूढी निवडून मिसळते ज्या चर्चने शिकवल्या प्रमाणेच चिरकालिक तत्त्वांना जणू सूचित करतात.” अनेकांना तर त्यांच्या चर्चनी या विधींना मान्य करून त्यांना पवित्र लेखले आहे ही वस्तुस्थितीच त्यांचा स्वीकार करण्यासाठी पुरेसे कारण आहे. परंतु, यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. या रूढींबद्दल देवाला कसे वाटते? या गोष्टीविषयी त्याने आपल्याला अनुसरण्यास काही मार्गदर्शन दिले आहे का?

देवाचा दृष्टिकोन समजणे

“ईस्टरचा दिवस, आपल्या प्रभूच्या पुनरुत्थानाचा सण ख्रिस्ती चर्चमधील सर्व सणांपैकी मोठा आहे,” असे क्रिस्टीन होल त्यांच्या ईस्टर आणि त्याच्या रूढी (इंग्रजी) या पुस्तकात म्हणाल्या. इतर लेखक याजशी सहमत आहेत. रॉबर्ट जे. मायर्स, त्यांच्या सण (इंग्रजी) या पुस्तकात अशी नोंद करतात, की “ख्रिस्ती वर्षामधील इतर कोणत्याही पवित्र दिनाची किंवा सणाची तुलना ईस्टर संडेच्या महत्त्वाशी करता येत नाही.” परंतु यामुळे काही प्रश्‍न उपस्थित होतात. जर ईस्टर सण साजरा करणे इतके महत्त्वपूर्ण आहे तर मग बायबलमध्ये त्याच्याविषयी विशिष्ट आज्ञा का नाही? येशूच्या प्राचीन शिष्यांनी ईस्टर संडे साजरा केला असा कोणता अहवाल आहे का?

कोणता सण साजरा करावा किंवा करू नये याबद्दलचे मार्गदर्शन देण्यासाठी बायबल टाळाटाळ करते असे नाही. प्राचीन इस्राएल राष्ट्राला देवाने याबाबत ठामपणे सांगितले होते व पूर्वी सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी साजरा करत राहण्यास ख्रिश्‍चनांना उघडउघड सूचना दिल्या होत्या. (१ करिंथकर ११:२३-२६; कलस्सैकर २:१६, १७) द एन्सायक्लोपिडिआ ब्रिटॅनिका याच्या आरंभीची आवृत्ती आपल्याला सांगते की: “ईस्टर सण साजरा केल्याचा कोणताही संकेत नव्या करारामध्ये अथवा प्रेषितीय पाळकांच्या लिखाणांमध्ये नाही. विशिष्ट काळांच्या पावित्र्याची कल्पना पहिल्या ख्रिश्‍चनांच्या मनामध्ये मुळीच नव्हती. . . . प्रभूने किंवा त्याच्या शिष्यांनी देखील या किंवा इतर कोणत्याही सणांना साजरे करण्याची आज्ञा दिली नव्हती.”

काहींना वाटते, की अशा सणांचा आनंद आणि त्यामुळे मिळणारे सौख्य, ते साजरा करण्याचा पुरेसा पुरावा देतात. परंतु इस्राएलांनी जेव्हा एक ईजिप्शीयन धार्मिक विधी आपल्यात घेऊन त्याला “परमेश्‍वराप्रीत्यर्थ [यहोवाप्रीत्यर्थ, NW] उत्सव” असे दुसरे नाव दिले त्या घटनेपासून आपण काहीतरी शिकू शकतो. ते देखील “खायलाप्यायला बसले,” आणि “मग उठून खेळू लागले.” परंतु त्यांच्या या कृतीमुळे यहोवा देवाला त्यांच्यावर अतिशय चीड आली आणि त्याने त्यांना कडक शिक्षा ठोठावली.—निर्गम ३२:१-१०, २५-२८, ३५.

देवाचे वचन अगदी स्पष्ट आहे. खऱ्‍या विश्‍वासांचा “उजेड” आणि सैतानी जगाचा “अंधार” या दोघांचा मिलाफ होऊ शकत नाही; ख्रिस्त आणि मूर्तीपूजक उपासना यांच्यात “एकवाक्यता” होऊ शकत नाही. आपल्याला सांगितले जाते: “म्हणून, त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा, असे प्रभु [यहोवा] म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन.”—२ करिंथकर ६:१४-१८.

बायबलमध्ये ख्रिश्‍चनांकरता ईस्टर नव्हे, तर केवळ स्मारक विधीचा सण साजरा करण्याची आज्ञा दिल्यामुळे तोच साजरा केला पाहिजे. तेव्हा, आपण तो कशाप्रकारे उचितरीत्या साजरा करू शकतो?

[५ पानांवरील चित्रं]

इस्राएलांनी “परमेश्‍वराप्रीत्यर्थ [यहोवाप्रीत्यर्थ,] उत्सव” केल्यामुळे देवाला अतिशय चीड आली