“नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका”
“नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका”
डेव्हिड लंस्ट्रम यांच्याद्वारे कथित
मी आणि माझा भाऊ एलवूड नऊ मीटरपेक्षाही अधिक उंचीवर असून वॉचटावर कारखान्याच्या इमारतीवरील जाहिरात फलक रंगवत होतो. आता त्या गोष्टीला ४० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, तरी तो जाहिरात फलक अजूनही आर्जवित आहे: “देवाचे वचन, पवित्र बायबलचे दररोज वाचन करा.” प्रत्येक सप्ताहास हजारो लोक प्रसिद्ध ब्रुकलिन पुलावरून जात असता या जाहिरात फलकास पाहतात.
माझ्या स्मृतिपटलावरील बालपणाची एक आठवण म्हणजे, कपडे धुण्याचा कुटुंबाचा नियोजित दिवस. आई पहाटे ५:०० वाजता उठून आमच्या मोठ्या कुटुंबाचे कपडे धूत असे आणि बाबा कामासाठी तयार होत असत. त्यांची आणखी एका गोष्टीवरून गरमागरम चर्चा होत असे, मानवाची लाखो वर्षांच्या दरम्यान कोणत्या तरी प्रकारे उत्क्रांती झाली आहे, असा वाद बाबा घालत असत, तर मानव देवाची थेट निर्मिती आहेत हे सिद्ध करण्यासाठी आई बायबलमधून शास्त्रवचने उद्धृत करीत असे.
मी केवळ सात वर्षांचा होतो, तरी देखील आईकडे सत्य असल्याची मला जाणीव झाली. बाबांवर मी जिवापाड प्रेम करीत होतो तरी देखील भवितव्यात कोणत्याही गोष्टीची आशा नाही असा त्यांचा विश्वास असल्याचे मला स्पष्ट दिसत होते. बायबल आईचे सर्वात आवडते पुस्तक होते आणि पुष्कळ वर्षांनंतर तिच्या स्वतःच्या दोन मुलांनी, बायबलचे वाचन करण्यास उत्तेजन देणारा जाहिरात फलक रंगविल्याचे तिला समजल्यावर ती किती आनंदित झाली असती!
परंतु मी फारच पुढची घटना सांगितली. मला अशा प्रकारचे काम करण्याचा सुहक्क कसा प्राप्त झाला? हे सांगण्यासाठी माझ्या जन्माच्या आधी तीन वर्षे म्हणजे १९०६ च्या काळात जावे लागेल.
आईचे विश्वासू उदाहरण
त्यावेळी आई आणि बाबांचा नुकताच विवाह झाला होता आणि ते अँरिझोना येथे एका तंबूत राहत होते. त्यावेळी बायबल विद्यार्थी या नावाने ज्ञात असणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांनी आईला पुस्तकांची मालिका सादर केली, ती मालिका चार्ल्स टेझ रस्सेल यांनी लिहिली होती आणि तिचे शीर्षक शास्त्रवचनांतील अभ्यास (इंग्रजी) असे होते. आईने रात्रभर जागून त्या पुस्तकांचे वाचन केले आणि तिला लवकरच कळले, की पुष्कळ काळापासून ती शोधत असलेले सत्य हेच आहे. काम शोधण्यासाठी गेलेल्या बाबांची घरी परत येईपर्यंतही ती वाट पाहू शकत नव्हती.
चर्चमध्ये जे काही शिकविले जात होते, त्याबद्दल बाबा सुद्धा असमाधानी होते म्हणून काही काळापर्यंत त्यांनी या बायबल सत्यांचा स्वीकार केला. तथापि, पुढे धार्मिक बाबतीत त्यांनी स्वतःचा मार्ग अंगीकारला आणि त्यामुळे आईला त्रास झाला. तरी देखील तिने तिच्या मुलांच्या आध्यात्मिक आणि शारीरिक गरजांकडे लक्ष देण्याचे थांबविले नाही.
दिवसभर राबल्यानंतर आई आम्हाला बायबलचा काही भाग वाचून दाखविण्यासाठी आणि काही महत्त्वाच्या आध्यात्मिक गोष्टींची माहिती देण्यासाठी प्रत्येक रात्री दुसऱ्या मजल्यावरून खाली येत असे आणि या गोष्टीचे मला कधीही विस्मरण होणार नाही. बाबा देखील परिश्रमी कामगार होते आणि मी मोठा झाल्यानंतर त्यांनी मला रंगकाम करण्याचे शिकविले. होय, बाबांनी मला काम करण्याचे शिकविले, परंतु आईने मला येशूने सांगितल्याप्रमाणे, ‘नाश पावत नाही अशा अन्नासाठी’ काम करण्याचे शिकविले.—योहान ६:२७.
कालांतराने आमचे कुटुंब वॉशिंग्टन राज्यातील, एलन्सबर्गच्या छोट्याशा नगरात स्थायिक झाले, हे शहर सिॲटलच्या पूर्वेस १८० किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही मुलांनी आईबरोबर बायबल विद्यार्थ्यांच्या सभांना उपस्थित राहण्यास सुरवात केली तेव्हा आम्ही खासगी घरांमध्ये एकत्र होत
होतो. घरोघरचे सेवाकार्य करण्यात सहभागी होण्याच्या गरजेवर जोर देण्यात आला तेव्हा सर्वजण आमच्या गटास सोडून गेले. परंतु आई कधीही डगमगली नाही. यहोवाच्या संघटनेच्या मार्गदर्शनावर नेहमी विश्वास ठेवण्याकरता या गोष्टीचा माझ्यावर चिरस्थायी प्रभाव पडला.कालांतराने आई-बाबांना नऊ मुले झाली. माझा जन्म १ ऑक्टोबर, १९०९ रोजी झाला, मी त्यांचे तिसरे अपत्य होतो. आम्हांपैकी सहा जणांनी आईच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण केले आणि यहोवाचे आवेशी साक्षीदार बनलो.
समर्पण आणि बाप्तिस्मा
मी किशोरावस्थेच्या पूर्णतेस होतो तेव्हा मी यहोवास समर्पण केले आणि त्याचे द्योतक म्हणून १९२७ मध्ये पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. सिॲटलमधील एका जुन्या इमारतीत माझा बाप्तिस्मा झाला त्या इमारतीचा बॅप्टिस्ट चर्चसाठी पूर्वी वापर करण्यात येत असे. चर्चचा वरील मनोरा काढून टाकला होता हे मात्र बरे झाले. आमच्या गटाला तळघरातील तलावाकडे नेण्यात आले, तेथे आम्हाला काळ्या रंगाचे लांब झगे घालण्यासाठी देण्यात आले. असे वाटत होते, जणू आम्ही अंतयात्रेला जात आहोत.
काही महिन्यांनंतर मी पुन्हा एकदा सिॲटलमध्ये आलो आणि त्यावेळी मी पहिल्यांदा दारोदारच्या साक्षकार्याशी परिचित झालो. नेतृत्व करणाऱ्या एकाने मला सांगितले, “तुम्ही रस्त्याच्या या बाजूने जा आणि मी पलीकडून जातो.” अस्वस्थ होतो तरी देखील मी एका चांगल्या स्त्रीला पुस्तिकांचे दोन संच सादर केले. एलन्सबर्ग येथे परत आल्यानंतरही दारोदारचे सेवाकार्य मी चालू ठेवले आणि आता सुमारे ७० वर्षांनंतरही अशा प्रकारच्या सेवेमुळे मला मोठा आनंद प्राप्त होतो.
जागतिक मुख्यालयात सेवा
त्यानंतर थोड्या काळातच, ब्रुकलिन बेथेलमध्ये, वॉच टावर सोसायटीच्या जागतिक मुख्यालयात काम केलेल्या एकाने मला तेथे स्वयंसेवक म्हणून काम करण्याचे उत्तेजन दिले. आमचे हे संभाषण होऊन काही काळच लोटला होता आणि टेहळणी बुरूज नियतकालिकात बेथेलमध्ये मदतीकरता गरज असल्याची एक सूचना आली. त्यामुळे मी त्यासाठी अर्ज केला. मार्च १०, १९३० रोजी, ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे बेथेल सेवेसाठी हजर राहावे, असे सांगणारे पत्र मला मिळाले तेव्हा मला जो आनंद झाला तो मी कधीही विसरणार नाही. अशा प्रकारे ‘नाश पावत नाही अशा अन्नासाठी’ काम करण्याच्या, माझ्या पूर्ण-वेळेच्या करियरची सुरवात झाली.
रंगारी म्हणून माझ्याकडे अनुभव असल्यामुळे काहीतरी रंगवण्याचे काम मला मिळाले असेल, असा एखादा विचार करील. परंतु माझे पहिले काम, कारखान्यातील स्टिचिंग मशिनवर काम करणे होते. त्या कामात तोचतोचपणा होता तरी देखील सहा वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत ते काम मी
आनंदाने केले. तेथे एक मोठी रोटरी प्रेस होती तिला आम्ही प्रेमाने ओल्ड बॅटलशिप असे म्हणत असू. तिच्याद्वारे पुस्तिकांचे उत्पादन केले जात असे आणि त्यानंतर त्या पुस्तिकांना कन्व्हेअर बेल्टच्या साह्याने खालच्या मजल्यावर आमच्याकडे पाठविले जात असे. बॅटलशिपच्या साह्याने पुस्तिकांना ज्या वेगाने छापले जात होते त्याच वेगाने आम्हाला त्या पुस्तिकांना शिवता येते किंवा नाही, हे पाहण्यात आम्हाला मजा वाटत होती.त्यांनतर मी अनेक विभागांत काम केले, त्यांत अशा एका विभागाचाही समावेश होता जेथे ग्रामोफोन बनविले जात. आम्ही या यंत्रांचा वापर बायबलचे ध्वनिमुद्रित संदेश घरमालकांच्या दारांवर ऐकविण्यासाठी करत असू. आमच्या विभागातील स्वयंसेवकांद्वारे लंबपातळीच्या ग्रामोफोनची रचना आणि निर्मिती करण्यात आली होती. हा ग्रामोफोन आगाऊ ध्वनिमुद्रित बायबल संदेशच ऐकवत नव्हता, तर त्यामध्ये पुस्तिका आणि कदाचित सँडविच ठेवण्यासाठी खास कप्पे देखील होते. सन १९४० मध्ये मिशिगन, डेट्रॉईट येथील अधिवेशनात या नव्या साहित्याचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा सुहक्क मला प्राप्त झाला.
तथापि, आम्ही कुशल यंत्रे बनविण्यापेक्षाही अधिक काही करीत होतो. आम्ही महत्त्वाच्या आध्यात्मिक सुधारणा देखील करीत होतो. उदाहरणार्थ, यहोवाचे साक्षीदार क्रॉस ॲन्ड क्राऊनच्या पीनचा वापर करीत असत. परंतु येशूला क्रॉसवर नव्हे, तर एका सरळ खांबावर मारण्यात आले, असे त्यावेळी आम्हाला उमगले. (प्रेषितांची कृत्ये ५:३०) म्हणून त्या पीनांचा वापर करण्याचे थांबविण्यात आले. या पीनांच्या अडकवणींना काढण्याचा विशेषाधिकार मला मिळाला. नंतर त्यातील सोने वितळवून ते विकण्यात आले.
आमचा साडेपाच दिवसांच्या साप्ताहिक कामाचा आराखडा फारच व्यग्र होता तरी देखील आम्ही सप्ताहांतांमध्ये ख्रिस्ती सेवाकार्यात सहभागी होत होतो. एके दिवशी आम्हा १६ जणांना अटक करून ब्रुकलिनमधील तुरूंगात डांबण्यात आले. का? आम्ही त्या दिवसांमध्ये सर्व धर्म खोटे असल्याचे समजत होतो. त्यामुळे आम्ही जाहिरात फलकांच्या साह्याने प्रसार केला; त्याच्या एका बाजूस “धर्म पाश आणि गदारोळ आहे” आणि दुसऱ्या बाजूस “देव आणि राजा ख्रिस्त यांची सेवा करा” असे लिहिण्यात आले होते. या जाहिरात फलकांच्या साह्याने प्रसार केल्यामुळे आम्हाला तुरूंगात टाकण्यात आले होते, परंतु वॉच टावर सोसायटीचे वकील हेडन कविंग्टन यांनी आमची जामिनावर सुटका केली. त्यावेळी उपासनेच्या स्वातंत्र्यासंबंधित अनेक खटले संयुक्त संस्थानांच्या सर्वोच्च न्यायालयात चालू होते आणि बेथेलमध्ये असणे व आमच्या विजयांचे अहवाल सर्वप्रथम ऐकणे रोमांचक होते.
माझ्या रंगकामाच्या अनुभवाचा उपयोग होईल, अशा प्रकारची कामे करण्यासाठी अखेरीस मला नियुक्त करण्यात आले. न्यूयॉर्क शहराच्या पाच नगरांपैकी असणारे एक नगर म्हणजे स्टॅटन बेट येथे आमचे डब्ल्यूबीबीआर रेडियो केंद्र होते. या रेडियो केंद्राच्या बुरूजांची उंची ६० मीटरपेक्षा अधिक होती आणि त्यावर गाय वायरचे तीन संच होते. मी ९ मीटर बाय २० सेंटीमीटर रुंद असलेल्या एका फळीवर बसत असे आणि त्यानंतर सहकर्मचारी मला वर ओढत असे. जमिनीपासून खूप उंचावर त्या छोट्याशा फळीवर बसून मी गाय वायर आणि बुरूजांचे रंगकाम केले. मला काहींनी विचारले, ते काम करत असताना आम्ही खूप प्रार्थना केली नव्हती का!
उन्हाळी काम मी कधीही विसरणार नाही. तेव्हा आम्ही कारखान्याच्या इमारतींच्या खिडक्यांना धुण्याचे आणि त्यांच्या उंबरठ्यांना रंगविण्याचे काम करीत असू. आम्ही त्या कामास उन्हाळ्याची सुटी असे म्हणत होतो. आम्ही आठ मजली इमारतीच्या बाजूने दोरखंड आणि कप्पीला एक लाकडी फळी अडकवून तिच्यावरून खालीवर जात होतो.
आधार देणारे कुटुंब
सन १९३२ मध्ये माझ्या वडिलांचा देहान्त झाला आणि त्यामुळे आईची काळजी घेण्यासाठी घरी जावे किंवा जाऊ नये याविषयी मी संभ्रमात पडलो. म्हणून मी एके दिवशी दुपारच्या जेवणाच्या आधी मुख्य मेजावर जेथे सोसायटीचे अध्यक्ष बंधू रदरफोर्ड बसत असत तेथे एक चिठ्ठी ठेवली.
मला तुमच्याशी बोलायचे आहे, असे मी त्या चिठ्ठीत लिहिले होते. माझी विवंचना समजल्यानंतर आणि अजूनही माझ्या घरी इतर भाऊ आणि बहिणी राहत असल्याचे कळल्यानंतर त्यांनी विचारले, “तुम्हाला बेथेलमध्ये राहून प्रभूचे कार्य करायचे आहे काय?”“होय, अर्थातच,” मी उत्तर दिले.
येथे राहण्याच्या माझ्या निर्णयाशी आई सहमत आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी मला आईला पत्र लिहिण्याचे सुचविले. मी पत्र लिहिले आणि माझ्या निर्णयाशी ती पूर्ण सहमत असल्याचे तिने मला पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले. मला बंधू रदरफोर्ड यांच्या कृपेची आणि सल्ल्याची खरोखरच कदर वाटली.
मी बेथेलमध्ये घालविलेल्या अनेक वर्षांच्या काळात मी माझ्या कुटुंबाला नियमितपणे लिहिले आणि आईने जसे मला यहोवाची सेवा करण्यासाठी उत्तेजन दिले होते अगदी तसेच उत्तेजन मी त्यांना दिले. आई जुलै १९३७ मध्ये मरण पावली. ती आमच्या कुटुंबासाठी किती मोठी प्रेरणा राहिली होती! केवळ माझा मोठा भाऊ आणि बहीण, पौल आणि एस्तर आणि माझी धाकटी बहीण लुईस साक्षीदार झाले नाहीत. तथापि, पौल आमच्या कार्याशी सहमत होता आणि त्याने आम्हाला काही जमीन देखील दिली होती ज्यावर आम्ही आमचे पहिले राज्य सभागृह बांधले.
सन १९३६ मध्ये माझी बहीण इव्हा पायनियर किंवा पूर्ण-वेळेची प्रचारक झाली. त्याच वर्षी ती राल्फ थॉमस याबरोबर विवाहबद्ध झाली आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांची सेवा करण्यासाठी त्यांना १९३९ मध्ये प्रवासी कार्यासाठी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर ते मेक्सिकोत आले आणि तेथे त्यांनी राज्य कार्यात मदत करण्यात २५ वर्षे घालवली.
सन १९३९ मध्ये ॲलिस आणि फ्रान्सस या माझ्या बहिणींनी सुद्धा पायनियर सेवेचा अंगीकार केला. सन १९४१ मध्ये सेंट ल्युईस अधिवेशनात ॲलिस, कांऊटरवर ग्रामोफोन साहित्याचे प्रात्यक्षिक दाखवित होती ज्यास तयार करण्यास मी मदत केली होती, हे दृश्य पाहणे किती आनंदाचे होते! ॲलिसला कौटुंबिक जबाबदारींमुळे अनेकदा पायनियरींग सोडावे लागले. तरी देखील तिने पूर्ण-वेळेच्या सेवाकार्यात ४० पेक्षा अधिक वर्षे घालविली आहेत. फ्रान्सस १९४४ मध्ये वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेस उपस्थित राहिली आणि तिने मिशनरी या नात्याने काही काळ प्वेर्तो रीको येथे सेवा केली.
कुटुंबातील सर्वात लहान असणारे जोएल आणि एलवूड १९४० च्या दशकाच्या सुरवातीस मॉनटाना येथे पायनियर झाले. जोएल विश्वासू साक्षीदार राहिला आहे आणि आता तो सेवा-सेवक म्हणून काम करीत आहे. सन १९४४ मध्ये एलवूड बेथेलमध्ये आला तेव्हा मला फार आनंद झाला. मी घर सोडले तेव्हा तो पाच वर्षांपेक्षाही लहान होता. आधी सांगितल्याप्रमाणे, आम्ही दोघांनी कारखान्याच्या इमारतीवरील जाहिरात फलक रंगविला होता, “देवाचे वचन, पवित्र बायबलचे दररोज वाचन करा.” इतक्या वर्षांमध्ये तो जाहिरातीचा फलक पाहून किती लोकांना बायबल वाचण्याचे उत्तेजन मिळाले आहे, याचा मी अनेकदा विचार केला आहे.
सन १९५६ मध्ये एलवूडने इमा फ्लाइट हिच्याबरोबर विवाह केला तोपर्यंत त्याने बेथेलमध्ये सेवा केली. एलवूड आणि इमा यांनी आफ्रिकेतील केनिया तसेच स्पेन यांठिकाणी एकत्र मिळून अनेक वर्षे पूर्ण-वेळेचे सेवाकार्य केले. एलवूडला कर्क रोगाने पछाडलेले होते त्यामुळे १९७८ साली तो स्पेनमध्ये मरण पावला. इमा स्पेनमध्ये आपल्या पायनियर कार्यात अजूनही कायम आहे.
विवाह आणि कुटुंब
मी सप्टेंबर १९५३ मध्ये बेथेल सोडले आणि ॲलिस रायव्हेरा हिच्यासोबत विवाह केला. ती ब्रुकलिन सेंटर मंडळीमध्ये पायनियर होती आणि मी त्याच मंडळीत उपस्थित राहत असे. मला स्वर्गीय आशा आहे, असे मी ॲलिसला सांगितले, परंतु तरी सुद्धा तिला माझ्याशी विवाह करावयाचा होता.—फिलिप्पैकर ३:१४.
बेथेलमध्ये २३ वर्षे घालविल्यानंतर मला आणि ॲलिसला पायनियर कार्यात कायम राहता यावे यासाठी रंगारी म्हणून प्रापंचिक कामाची सुरवात करण्यात मला अनेक तडजोडी कराव्या लागल्या. ॲलिसला तिच्या शारीरिक स्वास्थ्यामुळे पायनियरींग सोडावे लागले तरी देखील ती नेहमी मला आधार देत होती. सन १९५४ मध्ये आम्हाला पहिले मूल होणार होते. प्रसूती यशस्वीपणे पार पडली नाही, परंतु आमच्या मुलाची, जॉनची प्रकृती उत्तम होती. सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी ॲलिसला फार रक्तस्त्राव झाला होता त्यामुळे ती जिवंत राहील असे डॉक्टरांना वाटत नव्हते. एक वेळ अशी होती, की जेव्हा त्यांना तिच्या नाडीचे कंपन देखील जाणवत नव्हते. तरी देखील त्या रात्री ती बचावली आणि कालांतराने पूर्णपणे बरी झाली.
काही वर्षांनंतर ॲलिसच्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा आम्ही लाँग बेटावर तिच्या आईसोबत राहण्यासाठी गेलो. आमच्याकडे मोटार नसल्यामुळे मी पायी किंवा बसने आणि भुयारी रेल्वेने प्रवास केला. अशा प्रकारे मला निरंतर पायनियर कार्य करण्यास आणि माझ्या कुटुंबास आधार देण्यास शक्य झाले. पूर्ण-वेळेच्या सेवाकार्यामुळे मिळणारा आनंद कोणत्याही अर्पणामुळे मिळणाऱ्या आनंदापेक्षा सरस आहे. जो नॉटॉलीने बेसबॉलला करियर बनविण्याचा निर्धार केला असतानाही त्याने त्याचा त्याग केला आणि तो एक साक्षीदार झाला; जो नॉटीली सारख्या लोकांना मदत करणे हा आमच्या अनेक आशीर्वादांपैकी एक आशीर्वाद आहे.
सन १९६७ मध्ये न्यूयॉर्कमधील परिस्थिती आणखी बिकट झाल्यामुळे ॲलिस आणि जॉन यांना घेऊन पुन्हा एलन्सबर्ग या माझ्या मूळगावी जाण्याचा मी निर्णय घेतला. आता माझ्या आईची नातवंडे आणि पतवंडे पूर्ण-वेळेच्या सेवाकार्यात सहभागी होत आहेत, हे पाहून मला कृतार्थ झाल्यासारखे वाटते. त्यांतील काही जण बेथेलमध्येही सेवा करीत आहेत. जॉन देखील त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांसोबत यहोवाची विश्वासूपणे सेवा करीत आहे.
दुःखाची गोष्ट म्हणजे, माझी प्रिय पत्नी ॲलिस १९८९ मध्ये मरण पावली. ही निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यास पूर्ण-वेळेच्या सेवाकार्यात व्यग्र राहिल्याने मला मदत झाली आहे. आता माझी बहीण ॲलिस आणि मी एकत्र मिळून पायनियरींगचा आनंद लुटत आहोत. पुन्हा एकदा एकाच छताखाली राहणे आणि अति महत्त्वाच्या कार्यात स्वतःला व्यग्र असलेले पाहणे किती मनोहर आहे!
सन १९९४ च्या वसंत ऋतूत मी सुमारे २५ वर्षांमध्ये पहिल्यांदा बेथेलला भेट दिली. सुमारे ४० वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी मी ज्या अनेकांसोबत काम केले त्यांना पाहणे किती आनंदाचे होते! मी १९३० मध्ये बेथेलला गेलो त्यावेळी केवळ तेथे २५० जण होते, परंतु आज ब्रुकलिन येथील बेथेल कुटुंबाच्या सदस्यांची संख्या ३,५०० पेक्षाही अधिक आहे!
आध्यात्मिक अन्नाद्वारे पोषित
बहुतेक वेळा पहाटे मी आमच्या घराजवळ असणाऱ्या याकिमा नदीच्या किनारी फिरण्यास जातो. तेथून मी विशाल बर्फाच्छादित रेनिअर पर्वत पाहतो ज्याच्या शिखरांची उंची ४,३०० मीटर पेक्षा अधिक आहे. वन्यजीवन विपुल प्रमाणात आहे. काही वेळेस मला हरिण दिसते आणि एकदा तर मला तेथे सांबर देखील दिसले.
या शांत आणि एकांताच्या वातावरणात मला यहोवाच्या आश्चर्यकारक तरतुदींवर मनन करण्यास शक्य होते. आपला देव, यहोवा याची सेवा विश्वासूपणे अविरत करता यावी म्हणून मी सामर्थ्यासाठी प्रार्थना करतो. येथून चालत असता मला गाण्यास देखील आवडते, विशेषतः “करू हर्षित मन यहोवाचे,” हे गाणे मला आवडते त्याचे बोल असे आहेत: “प्रण इच्छा तुझी करू, बुद्धीने त्व कार्य साधू. संधी मिळेल आम्हास तुज प्रसन्न करण्यास.”
यहोवाचे मन ज्यामुळे हर्षित होते असे कार्य करण्याचे मी निवडले यामुळे मी आनंदित आहे. अभिवचन देण्यात आलेले स्वर्गीय प्रतिफळ मिळेपर्यंत या कार्यात मला निरंतर राहता यावे म्हणून मी प्रार्थना करतो. या अहवालाने, इतरांना त्यांच्या जीवनांचा उपयोग ‘नाश पावत नाही अशा अन्नासाठी’ करण्यास प्रवृत्त करावे, अशी माझी इच्छा आहे.—योहान ६:२७.
[२३ पानांवरील चित्रं]
“देवाचे वचन, पवित्र बायबलचे दररोज वाचन करा,” या जाहिरात फलकाचे रंगकाम करताना एलवूड
[२४ पानांवरील चित्रं]
सन १९४० च्या अधिवेशनात ग्रँट सूटर आणि जॉन कर्झेन यांच्यासोबत नवीन ग्रामोफोनचे प्रात्यक्षिक दाखविताना
[२५ पानांवरील चित्रं]
सन १९४४ मध्ये, सत्यात असणारे आम्ही सर्व जण पूर्ण-वेळेच्या सेवाकार्यात होतो: डेव्हिड, ॲलिस, इव्हा, एलवूड आणि फ्रान्सस
[२५ पानांवरील चित्रं]
हयात असलेली भावंडे डावीकडून: ॲलिस, इव्हा, जोएल, डेव्हिड आणि फ्रान्सस