व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘यहोवाचे स्तवन करा!’

‘यहोवाचे स्तवन करा!’

‘यहोवाचे स्तवन करा!’

“प्रत्येक प्राणी परमेशाचे [यहोवाचे, NW] स्तवन करो.”—स्तोत्र १५०:६.

१, २. (अ) खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची पहिल्या शतकामध्ये कितपत भरभराट झाली? (ब) प्रेषितांनी कोणता पूर्व इशारा दिला होता? (क) धर्मत्यागाची सुरवात कशी झाली?

 येशूने त्याच्या शिष्यांना ख्रिस्ती मंडळीमध्ये संघटित केले जिची पहिल्या शतकामध्ये भरभराट झाली. कटू धार्मिक विरोध असताना देखील ‘सुवार्तेची, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत घोषणा झाली.’ (कलस्सैकर १:२३) पण येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर, सैतानाने कावेबाजपणे धर्मत्याग भडकवला.

प्रेषितांनी याबद्दलचा पूर्व इशारा दिला होता. उदाहरणार्थ, पौलाने इफिसमधील वडिलांना सांगितले: “तुम्ही स्वत:कडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्‍यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्‍ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रेषितांची कृत्ये २०:२८-३०; तसेच २ पेत्र २:१-३; १ योहान २:१८, १९ हेही पहा.) अशा प्रकारे, चौथ्या शतकामध्ये धर्मत्यागी ख्रिस्ती धर्म रोमी साम्राज्यासोबत मैत्री करू लागला. काही शतकांनंतर रोमच्या पोपशी नातेसंबंध असलेले पवित्र रोमी साम्राज्य, मानवजातीच्या मोठ्या भागावर राज्य करू लागले. या वेळेपावेतो, प्रोटेस्टंट धर्मसुधारणेने कॅथलिक चर्चच्या बेसुमार दुष्टपणाविरुद्ध बंड केला खरा, पण सत्य ख्रिस्ती विश्‍वास पुनःस्थापण्यात अपयशी ठरला.

३. (अ) सर्व सृष्टीसमोर सुवार्तेचा प्रचार कधी आणि कसा करण्यात आला? (ब) १९१४ मध्ये कोणत्या बायबल आधारित अपेक्षांची समज मिळाली?

परंतु, १९ व्या शतकाचा अंत जसजसा जवळ येत होता, तसतसा बायबल विद्यार्थ्यांचा एक प्रामाणिक गट प्रचार करण्यात आणि ‘आकाशाखालच्या सर्व सृष्टीत सुवार्तेची घोषणा’ करण्यात पुन्हा व्यग्र झाला होता. या गटाने, बायबल भविष्यवाणींच्या त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर ३० पेक्षा अधिक वर्षांआधी, सा. यु. पू. ६०७ मध्ये सुरवात झालेली “परराष्ट्रीयांची सद्दी,” “सात काळ,” अथवा २,५२० वर्ष १९१४ या वर्षी समाप्त होतात, हे दाखवून दिले. (लूक २१:२४; दानीएल ४:१६) त्यांच्या अपेक्षेनुसार, १९१४ हे वर्ष पृथ्वीवरील मानवी व्यवहारांना वळण देणारे ठरले. त्याचबरोबर स्वर्गातही ऐतिहासिक घटना घडल्या. तेव्हाच तर सनातन राजाने त्याचा सहकारी राजा असलेल्या येशू ख्रिस्ताला पृथ्वीवरील सर्व दुष्टाई काढून टाकण्याच्या व परादीसच्या पुनर्स्थापनेची तयारी करण्यासाठी स्वर्गीय सिंहासनावर विराजमान केले.—स्तोत्र २:६, ८, ९; ११०:१, २, ५.

तो पाहा मशिही राजा!

४. येशू, मीखाएल या त्याच्या नावाच्या अर्थानुसार कशाप्रकारे वागला?

मशिही राजा येशूने, १९१४ मध्ये कार्यास सुरवात केली. बायबलमध्ये त्याला मीखाएल हे नाव देखील दिले आहे ज्याचा अर्थ “देवासारखा कोण आहे?” असा होतो, कारण यहोवाच्या सार्वभौमत्वाला उंचावण्याचा त्याचा हेतू आहे. प्रकटीकरण १२:७-१२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रेषित योहानाने पुढे काय होणार त्याचे दृष्टान्तात अशा प्रकारे वर्णन केले: “मग स्वर्गात युद्ध सुरू झाले; मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले; तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणहि उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.” खरोखरच तो एक शक्‍तिशाली पाडाव होता!

५, ६. (अ) स्वर्गातून १९१४ नंतर कोणती रोमांचकारी घोषणा करण्यात आली? (ब) मत्तय २४:३-१३ याचा या गोष्टीशी कशाप्रकारे संबंध आहे?

मग स्वर्गातून एका खड्या आवाजाने घोषित केले: “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी [विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी] कोकऱ्‍याच्या [ख्रिस्त येशूच्या] रक्‍तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले, आणि त्यांच्यावर मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीति केली नाही.” याचा अर्थ येशूच्या मौल्यवान खंडणी बलिदानावर ज्यांनी विश्‍वास प्रकट केला त्या सचोटी राखणाऱ्‍यांची मुक्‍तता, असा आहे.—नीतिसूत्रे १०:२; २ पेत्र २:९.

स्वर्गातील तो मोठा आवाज पुढे म्हणाला: “म्हणून स्वर्गांनो व त्यांत राहणाऱ्‍यांनो उल्लास करा, पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.” पृथ्वीसाठी उच्चारलेला “अनर्थ,” या शतकामध्ये जागतिक युद्धे, अन्‍नटंचाई, मऱ्‍या, भूकंप आणि स्वैराचार यांनी पीडित झालेल्या पृथ्वीवर दिसून आला. मत्तय २४:३-१३ मध्ये तपशीलवार कथन केल्याप्रमाणे येशूने भाकीत केले, की या सर्व गोष्टी ‘ह्‍या युगाच्या समाप्तीच्या चिन्हाचा’ भाग असतील. या भविष्यवाणीनुसार, मानवजातीने १९१४ पासून जो अनर्थ पृथ्वीवर अनुभवला तो पूर्वीच्या सर्व मानवी इतिहासामध्ये अतुलनीय आहे.

७. यहोवाचे साक्षीदार निकडीने प्रचार का करतात?

या सैतानी अनर्थाच्या युगात, मानवजातीला भवितव्यासाठी काही आशा मिळू शकते का? होय, निश्‍चितच, कारण मत्तय १२:२१ येशूविषयी म्हणते: “आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील!” राष्ट्रांमधील आघातजन्य परिस्थिती केवळ ‘ह्‍या युगाच्या समाप्तीच्या चिन्हालाच’ नव्हे तर मशिही राज्याचा स्वर्गीय राजा या नात्याने ‘येशूच्या उपस्थितीच्या चिन्हाला’ देखील चिन्हांकित करते. त्या राज्याविषयी येशू पुढे म्हणतो: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) देवाच्या राज्य शासनाच्या भव्य आशेचा प्रचार पृथ्वीवर आज कोणते लोक करत आहेत? यहोवाचे साक्षीदार! ते निकडीने, जाहीररीत्या आणि घरोघरी जाऊन घोषित करतात, की देवाचे धार्मिक आणि शांतीमय राज्य लवकरच पृथ्वीवरील कारभार आपल्या हाती घेणार आहे. तुम्ही या कार्यामध्ये सहभाग घेत आहात का? याहून कोणताही मोठा विशेषाधिकार तुम्हाला मिळणार नाही!—२ तीमथ्य ४:२, ५.

“शेवट” कसा येतो?

८, ९. (अ) कशा प्रकारे “देवाच्या घरापासून” न्यायाची सुरवात झाली? (ब) ख्रिस्ती धर्मजगताने कशा प्रकारे देवाच्या वचनाचे उल्लंघन केले आहे?

मानवजातीने न्यायाच्या काळामध्ये पदार्पण केले आहे. १ पेत्र ४:१७ मध्ये आपल्याला असे कळवण्यात येते, की न्याय “देवाच्या घरापासून” सुरू झाला—म्हणजेच, १९१४-१८ दरम्यान पहिल्या जागतिक युद्धातील कत्तलीद्वारे ‘शेवटल्या काळाची’ सुरवात झाल्यापासून स्पष्ट झालेल्या व ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या संघटनांचा न्याय. या न्यायाच्या वेळी ख्रिस्ती धर्मजगताचे काय झाले? १९१४ पासून युद्धांना पाठिंबा देण्याच्या चर्चच्या भूमिकेचा विचार करा. प्रचार करून युद्ध क्षेत्रात पाठवलेल्या “दीन जनांच्या जिवांच्या रक्‍ताने” त्यांच्यातील पाळक माखलेले नाहीत का?—यिर्मया २:३४.

मत्तय २६:५२ नुसार येशूने म्हटले: “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” या शतकाच्या युद्धांमध्ये हे किती खरे ठरले आहे! पाळकांनी तरुणांना, इतर तरुण पुरुषांची, त्यांच्या स्वतःच्याच धर्मातील तरुणांची कत्तल करण्यासाठी उत्तेजित केले—कॅथलिकांनी कॅथलिकांना मारले आणि प्रोटेस्टंट लोकांनी प्रोटेस्टंट लोकांना मारले. देव आणि ख्रिस्त यांच्यापेक्षा राष्ट्रवादाला उच्च स्थान देण्यात आले आहे. अलीकडेच, काही आफ्रिकन राष्ट्रांमध्ये, बायबल तत्त्वांऐवजी वांशिक बंधनांना प्रथम दर्जा प्राप्त करून देण्यात आला आहे. बहुतांश लोकसंख्या कॅथलिक असलेल्या रवांडामध्ये, निदान पाच लक्ष लोकांची वांशिक हिंसाचारामध्ये कत्तल करण्यात आली. ला’ओस्सरवॉटोरे रोमानो या वॅटिकन वृत्तपत्रात पोपनी कबूल केले, की “हे कृत्य पूर्णपणे जातीयसंहाराचे होते, ज्याच्यासाठी दुर्दैवाने कॅथलिक देखील जबाबदार आहेत.”—पडताळा यशया ५९:२, ३; मीखा ४:३, ५.

१०. खोट्या धर्मावर यहोवा कोणता न्यायदंड बजावेल?

१० एकमेकांची कत्तल करण्यास उत्तेजन देणाऱ्‍या किंवा स्वतःच्या कळपातील सदस्य इतर सदस्यांची कत्तल करत असताना निमूटपणे पाहत उभे राहणाऱ्‍या धर्मांना सनातन राजा कसे लेखतो? मोठी बाबेल म्हणजे खोट्या धर्माची जागतिक व्यवस्थेविषयी प्रकटीकरण १८:२१, २४ आपल्याला सांगते: “एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले: ‘अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व ह्‍यापुढे कधीहि सापडणार नाही. तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्‍त सापडले.’”

११. ख्रिस्ती धर्मजगतामध्ये कोणत्या भयंकर गोष्टी घडत आहेत?

११ बायबल भविष्यवाणीच्या पूर्णतेत, ख्रिस्ती धर्मजगतामध्ये भयंकर गोष्टी घडत आहेत. (पडताळा यिर्मया ५:३०, ३१; २३:१४.) पाळकांच्या सोशिक मनोवृत्तीमुळे त्यांच्या कळपात अनैतिकता चोहोकडे पसरली आहे. स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणाऱ्‍या संयुक्‍त संस्थानात, सर्व विवाहांपैकी निम्म्या विवाहांचा घटस्फोटात अंत होतो. कुमारिकांची गर्भधारणा आणि समलैंगिकता चर्च सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पाळक तरुण मुलांवर लैंगिक अत्याचार करत आहेत—आणि असे प्रसंग कमी नाहीत. अशा प्रकारच्या प्रकरणांच्या न्यायालयीन समझोत्यांसाठी संयुक्‍त संस्थानातील कॅथलिक चर्चला एका दशकामध्ये महापद्‌म डॉलर किंमत मोजावी लागेल असे म्हटले आहे. “अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही” या १ करिंथकर ६:९, १० मधील प्रेषित पौलाच्या इशाऱ्‍याकडे ख्रिस्ती धर्मजगताने दुर्लक्ष केले.

१२. (अ) सनातन राजा मोठ्या बाबेलीविरुद्ध कशा प्रकारे कार्यवाही करील? (ब) ख्रिस्ती धर्मजगताच्या विरुद्धतेत, देवाचे लोक कोणत्या कारणास्तव “हालेलूया”चे गीत गातील?

१२ लवकरच, सनातन राजा यहोवा, त्याचा स्वर्गीय फिल्ड मार्शल ख्रिस्त येशू याच्या द्वारे मोठ्या संकटास परवानगी देईल. प्रथम, ख्रिस्ती धर्मजगत आणि मोठ्या बाबेलच्या इतर सर्व शाखा यहोवाकडून आलेला न्यायदंड भोगतील. (प्रकटीकरण १७:१६, १७) त्यांनी स्वतःला येशूच्या खंडणी बलिदानाकरवी यहोवाने पुरवलेल्या तारणास अपात्र असल्याचे शाबीत केले आहे. त्यांनी देवाच्या पवित्र नावाला तुच्छ लेखले आहे. (पडताळा यहेज्केल ३९:७.) त्यांच्या मोठमोठ्या धार्मिक इमारतींमध्ये ते “हालेलूया”ची गाणी गातात ही केवढ्या थट्टेची गोष्ट आहे! त्यांच्या बायबल अनुवादांमधून ते यहोवाचे मौल्यवान नाव काढून टाकतात पण या वस्तुस्थितीचा त्यांना जणू विसर पडला आहे, की “हालेलूया” या शब्दाचा अर्थ “याहची स्तुती करा” असा होतो—“याह” हे “यहोवा” या नावाचे संक्षिप्त रूप आहे. उचितपणे, प्रकटीकरण १९:१-६ मध्ये, मोठ्या बाबेलवर देवाकडून येणाऱ्‍या न्यायदंडाच्या आनंदात लवकरच गायिली जाणारी “हालेलूया”ची गीते लिहून ठेवली आहेत.

१३, १४. (अ) त्यानंतर कोणत्या अतिमहत्त्वाच्या घटना घडतात? (ब) देव-भीरू मानवांना कोणते आनंदी प्रतिफळ प्राप्त होईल?

१३ त्यानंतर, राष्ट्र आणि लोक यांवर न्यायदंड घोषित करण्यासाठी व तो बजावण्यासाठी येशूचे ‘येणे’ घडेल. त्याने स्वतः असे भाकीत केले: “जेव्हा मनुष्याचा पुत्र [ख्रिस्त येशू] आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली [न्यायाच्या] राजासनावर बसेल; त्याच्या पुढे [पृथ्वीवर] सर्व राष्ट्रे जमविली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील, आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांस म्हणेल, ‘अहो माझ्या पित्याचे आशीर्वादितहो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.’” (मत्तय २५:३१-३४) ४६ वे वचन पुढे म्हणते, की शेरडे “सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील, आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील.”

१४ आपला स्वर्गीय प्रभू, येशू ख्रिस्त जो “राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू” आहे तो हर्मगिदोनाच्या लढाईत सैतानी व्यवस्थीकरणातील राजकीय आणि व्यापारी घटकांचा कशा प्रकारे नाश करील त्याचे वर्णन बायबलमधील प्रकटीकरणाचे पुस्तक करते. अशा तऱ्‍हेने, ख्रिस्ताने सैतानाच्या संपूर्ण पार्थिव क्षेत्रावर ‘सर्वसमर्थ देव ह्‍याचा तीव्र क्रोध’ ओतलेला असेल. या “पहिल्या गोष्टी होऊन” गेल्यानंतर, देव-भीरू मानवांना त्या वैभवी नव्या जगामध्ये नेले जाईल जेथे देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.”—प्रकटीकरण १९:११-१६; २१:३-५.

याहची स्तुती करण्याचा समय

१५, १६. (अ) आपण यहोवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्यावे आवश्‍यक का आहे? (ब) तारणासाठी आपण काय करावे असे संदेष्टे आणि प्रेषित म्हणतात व आजच्या समूहासाठी याचा काय अर्थ होऊ शकतो?

१५ न्यायदंड बजावण्याचा तो दिवस जवळ आला आहे! यास्तव, आपण सनातन राजाच्या भविष्यसूचक शब्दांकडे लक्ष देतो हे बरे करितो. अजूनही खोट्या धर्माच्या शिकवणींमध्ये व रूढींमध्ये गुरफटलेल्यांसाठी स्वर्गातून एक वाणी असे घोषित करते: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा.” पण उत्तरजीवी लोकांनी कोठे गेले पाहिजे? सत्य एकच असू शकते यास्तव, सत्य धर्मही एकच असू शकतो. (प्रकटीकरण १८:४; योहान ८:३१, ३२; १४:६; १७:३) चिरकालिक जीवन प्राप्त करणे हे तो धर्म शोधून त्या धर्माच्या देवाची आज्ञा पाळणे यावर अवलंबून आहे. बायबल आपल्याला स्तोत्र ८३:१८ मध्ये त्या देवाकडे मार्गदर्शित करते, जेथे लिहिले आहे: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस.”—पंडिता रमाबाई भाषांतर.

१६ परंतु, आपल्याला सनातन राजाचे नुसतेच नाव जाणण्यापेक्षा आणखी काही तरी करणे आवश्‍यक आहे. आपण बायबलच्या अभ्यासाद्वारे त्याच्या महान गुणांबद्दल आणि उद्देशांबद्दल शिकून घेतले पाहिजे. त्यानंतर, रोमकर १०:९-१३ मध्ये सांगितल्याप्रमाणे या सद्य काळात त्याच्या इच्छेनुरूप वागले पाहिजे. तेथे प्रेषित पौल प्रेरित संदेष्ट्यांचा उल्लेख करून अशा प्रकारे समारोप करतो: “जो कोणी परमेश्‍वराचा [यहोवाचा, NW] धावा करील तो तरेल.” (योएल २:३२; सफन्या ३:९) तारण? होय, सैतानाच्या भ्रष्ट जगावर न्यायदंड ठोठावण्यात येईल तेव्हा ख्रिस्ताद्वारे यहोवाने पुरवलेल्या खंडणी बलिदानाच्या तरतुदीवर आज विश्‍वास प्रकट करणाऱ्‍या समूहाला येणाऱ्‍या मोठ्या संकटातून वाचवण्यात येईल.—प्रकटीकरण ७:९, १०, १४.

१७. कोणत्या महान आशेने आता आपल्याला मोशे आणि कोकऱ्‍याचे गीत गाण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे?

१७ उत्तरजीवी असण्याची आशा बाळगणाऱ्‍या लोकांबद्दल देवाची काय इच्छा आहे? की आपण आत्ताही मोशेचे आणि कोकऱ्‍याचे गीत गाण्यात सहभाग घेऊन सनातन राजाच्या विजयाची वाट पाहात त्याची स्तुती करावी. हे आपण, त्याच्या वैभवी उद्देशांविषयी इतरांना सांगून करतो. बायबलची समज प्राप्त करण्यात आपण जसजशी प्रगती करत जातो तसतसे आपण सनातन राजाला आपले जीवन समर्पण करतो. त्यामुळे या सामर्थ्यशाली राजाने वर्णन केलेल्या व्यवस्थेखाली आपण चिरकालिक जीवन जगू. हे वर्णन आपल्याला यशया ६५:१७, १८ वचनांमध्ये आढळून येते जेथे म्हटले आहे: “पाहा, मी नवे आकाश [येशूचे मशिही राज्य] व नवी पृथ्वी [मानवजातीचा धार्मिक नवा समाज] निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परंतु जे मी उत्पन्‍न करितो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा.”

१८, १९. (अ) स्तोत्र १४५ मधील दाविदाच्या शब्दांनी आपल्याला काय करण्यास प्रवृत्त केले पाहिजे? (ब) यहोवाच्या हातून आपण कोणत्या गोष्टीची खात्रीने अपेक्षा करू शकतो?

१८ स्तोत्रकर्त्या दाविदाने सनातन राजाचे वर्णन अशा शब्दांत केले: “परमेश्‍वर [यहोवा] थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे.” (स्तोत्र १४५:३) त्याची महानता अंतराळाच्या आणि सनातनपणाच्या विस्तारितपणाप्रमाणे अगम्य आहे! (रोमकर ११:३३) आपल्या सृष्टीकर्त्याविषयीचे आणि त्याचा पुत्र ख्रिस्त येशू याच्याद्वारे पुरवलेल्या त्याच्या खंडणी तरतुदीविषयीचे ज्ञान निरंतर घेत असताना आपल्याला सनातन राजाची स्तुती अधिकाधिक करण्यास आवडेल. “ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करितात; ह्‍यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्‍त ऐश्‍वर्य ही मानवजातीस कळावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्यधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे,” असे स्तोत्र १४५: ११-१३ मध्ये जे म्हटले आहे त्यानुसार आपल्याला करावेसे वाटेल.

१९ “तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस,” या घोषणेला आपला देव खरे करील याची आपण खात्रीने अपेक्षा करू शकतो. सनातन राजा या शेवटल्या दिवसांमधून आपल्याला शेवटापर्यंत कोमलतेने नेईल, कारण दाविदाने आपल्याला खात्री दिली आहे: “परमेश्‍वर [यहोवा] आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचे रक्षण करितो, पण सर्व दुर्जनांचा नाश करितो.”—स्तोत्र १४५:१६, २०.

२०. शेवटल्या पाच स्तोत्रांमध्ये लिखित, सनातन राजाच्या आमंत्रणाला तुम्ही कशा प्रकारे प्रतिसाद देता?

२० बायबलमधील शेवटची प्रत्येक पाच स्तोत्रे “हालेलूया”च्या आमंत्रणाने सुरु व समाप्त होतात. म्हणूनच, स्तोत्र १४६ आपल्याला आमंत्रण देते: “परमेश्‍वराचे [यहोवाचे] स्तवन करा. हे माझ्या जिवा, परमेश्‍वराचे स्तवन कर. माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्‍वराचे स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.” तुम्ही या हाकेस उत्तर द्याल का? तुम्हाला निश्‍चितच त्याची स्तुती कराविशी वाटली पाहिजे! तुम्ही, “कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्‍वराच्या नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे. त्याचे ऐश्‍वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे,” या स्तोत्र १४८:१२, १३ मध्ये वर्णिलेल्यांपैकी राहोत ही सदिच्छा. ‘यहोवाचे स्तवन करा,’ या दिलेल्या आमंत्रणाला आपण पूर्ण अंतःकरणाने प्रतिसाद देऊ या! तेव्हा, चला आपण सर्व स्वरैक्यात सनातन राजाची स्तुती करू या!

तुमचे उत्तर काय आहे?

◻ येशूच्या शिष्यांनी कशाबद्दलचा पूर्वइशारा दिला?

◻ १९१४ पासून सुरवात होऊन, कोणती निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत?

◻ यहोवा लवकरच कोणते न्यायदंड बजावणार आहे?

◻ हा समय सनातन राजाची स्तुती करण्याचा सर्वात महत्त्वपूर्ण समय का आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९ पानांवरील चौकट]

दाधुंदीचे हे अरिष्टकारक युग

अंदाधुंदीचे हे युग, २० व्या शतकाच्या सुरवातीला उदयास आले असे अनेकांनी कबूल केले आहे. उदाहरणार्थ, सं.सं. अधिसभा सदस्य डॅनिएल पॅट्रिक मॉयनिहन यांच्या १९९३ मध्ये प्रकाशित झालेल्या पॅन्डेमोनियम नावाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत “१९१४ चे अरिष्ट” या मुद्यावर अशा प्रकारे विवेचन करण्यात आले: “युद्ध आले आणि जगाचे रूपच पालटले—अगदी पूर्णपणे. १९१४ मध्ये अस्तित्वात असलेले आणि तेव्हापासून आजपर्यंत हिंसाचाराने त्यांची सरकारे बदलली नाहीत असे केवळ आठ प्रांत आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. . . . उरलेल्या अंदाजे १७० समकालीन प्रांत यातील काही अगदी अलीकडेच स्थापन झाले असल्यामुळे त्यांनी अलीकडील अरिष्ट अनुभवलेले नाही.” खरेच, १९१४ पासूनच्या युगाने एकावर एक अरिष्टे पाहिली आहेत!

तसेच १९९३ मध्ये नियंत्रणाबाहेर—एकविसाव्या शतकाच्या पूर्वसंध्याकाळी विश्‍वव्यापी अरिष्ट (इंग्रजी), हे पुस्तक प्रकाशित झाले. त्या पुस्तकाचे लेखक, सं.सं. राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे माजी प्रमुख झुबेगनेफ ब्रान्झीस्के हे आहेत. ते लिहितात: “विसाव्या शतकाची सुरवात म्हणजे तर्क युगाची खरी सुरवात असे म्हणून अनेक समीक्षणांनी त्याचे स्वागत केले. . . . पण त्याच्या प्रतिज्ञेच्या अगदी विपरीत, विसावे शतक मानवजातीचे सर्वात रक्‍तरंजित आणि द्वेषपूर्ण शतक झाले, फसव्या राजकारणाचे आणि राक्षसी हत्यांचे शतक ठरले. क्रूरता अभूतपूर्व प्रमाणात संघटित केली होती, प्राणहारकता एका प्रचंड प्रमाणात संघटित करण्यात आली होती. चांगल्या कारणासाठी असलेली वैज्ञानिक शक्यता आणि राजकीय दुष्टाई यांच्यातील उघडकीस आणलेला विरोधाभास खरोखरच धक्कादायक आहे. यापूर्वी कधीच इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हत्येने विश्‍व व्यापले नव्हते, पूर्वी कधीच इतकी प्राणहानी झाली नव्हती, पूर्वी कधीच अशा प्रकारच्या उद्धट तर्कशून्य ध्येयांपायी अविरत प्रयत्नांवर एकाग्र होऊन मानवी उच्चाटनाचा पाठलाग करण्यात आला नव्हता.” किती खरे आहेत हे शब्द!

[१७ पानांवरील चित्रं]

मीखाएलने १९१४ मध्ये राज्याची स्थापना झाल्यानंतर सैतान आणि त्याच्या टोळक्याला या पृथ्वीवर खाली टाकले