सत्कर्मांमुळे यहोवाचा गौरव होतो
राज्य घोषकांचा वृतान्त
सत्कर्मांमुळे यहोवाचा गौरव होतो
येशूने त्याच्या शिष्यांना डोंगरावरील प्रवचनात असे म्हटले: “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६) त्याचप्रमाणे, आजही खरे ख्रिश्चन, यहोवाला गौरवणारी “सत्कर्मे” करण्यात गुंतलेले आहेत.
ही सत्कर्मे कोणती आहेत? त्यांत सुवार्तेचा प्रचार करणे अंतर्भूत आहे, परंतु आपल्या आदर्श वर्तणुकीची देखील त्यांत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. लोकांना ख्रिस्ती मंडळीकडे पहिल्यांदा आकर्षित करण्यास अनेकदा कारणीभूत ठरते ते आहे आपले सद्वर्तन. मार्टिनिक येथील यहोवाचे साक्षीदार, ‘त्यांचा प्रकाश लोकांसमोर कशा प्रकारे प्रकाशू देत आहेत,’ हे खालील अनुभव सचित्रित करतात.
◻ घरोघरचे प्रचार कार्य करीत असताना यहोवाच्या एका महिला साक्षीदाराने कॅथलिक स्त्रीला भेट दिली. मागील २५ वर्षांपासून ती स्त्री एका अशा पुरुषाबरोबर राहत होती ज्याबरोबर तिचा विवाह झालेला नव्हता. तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकता हे पुस्तक तिला सुमारे सात वर्षांपूर्वीच प्राप्त झाल्यामुळे ती यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणुकींशी परिचित होती. * या स्त्रीने साक्षीदारास असे म्हटले: “जगामध्ये अनेक धर्म आहेत. त्यामुळे कोणत्या धर्मावर विश्वास ठेवावा याविषयी मी संभ्रमात आहे.“ सत्य केवळ बायबलमध्येच आढळू शकते आणि त्याचा शोध घेण्यासाठी तिला शास्त्रवचनांचा लक्षपूर्वक अभ्यास करण्यास हवा तसेच देवाचा आत्मा आणि मार्गदर्शनाकरता तिला देवाकडे प्रार्थना करण्याची गरज आहे, असे या साक्षीदाराने तिला सांगितले.
बायबलचा अभ्यास करण्यात आस्था असूनही काही काळापर्यंत या स्त्रीने यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहामध्ये होणाऱ्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याच्या अनेक निमंत्रणांना नकार दिला. का? ती अगदीच बुजऱ्या स्वभावाची होती. तथापि, येशूच्या मृत्यूच्या स्मारक विधीचे निमंत्रण मिळाल्यानंतर तिने स्वतःच्या बुजरेपणावर मात केली आणि त्यास उपस्थित राहिली.
सभेमध्ये तिला कोणत्या गोष्टीने सर्वात अधिक प्रभावित केले असेल, तर ते होते राज्य सभागृहातील प्रेमळ वातावरण. तिला तिच्या चर्चमध्ये अशी खरी मैत्री कधीही अनुभवण्यास मिळाली नव्हती! त्या सभेनंतर तिने स्थानिक साक्षीदारांद्वारे संचालित होणाऱ्या सर्व सभांना उपस्थित राहण्यास सुरवात केली आणि लवकरच त्या पुरुषासोबत विवाहबद्ध झाली ज्यासोबत ती पुष्कळ काळापासून राहत होती. ती आता मंडळीची बाप्तिस्माप्राप्त सदस्य आहे.
◻ दुसऱ्या एका महिला साक्षीदाराच्या सत्कर्मांमुळे चांगले परिणाम सामोरे आले. तिला दफ्तरामध्ये जबाबदारीचे काम होते. रियुनियनच्या बेटावरून एक कामगार तेथे कामास होता, तो ठेंगणा असल्यामुळे काही कामगारांनी त्याची खिल्ली उडविण्यास सुरवात केली. तो त्यांच्यासाठी हास्याचा एक विषय बनला. उलटपक्षी, ही महिला साक्षीदार त्या मनुष्याशी नेहमी प्रेमाने आणि आदराने वागत असे. आपण इतरांपेक्षा इतक्या वेगळ्या कसे, असे त्याने या महिला साक्षीदाराला विचारले.
तिचे आदरणीय वर्तन, यहोवाच्या साक्षीदारांपासून शिकलेल्या बायबल तत्त्वांचा परिणाम आहे, असे या महिला साक्षीदाराने स्पष्ट केले. देवाचे उद्देश आणि नव्या जगाची आशा यांविषयी शास्त्रवचने काय सांगतात हे सुद्धा तिने त्याला दाखविले. त्या मनुष्याने बायबल अभ्यासाचा स्वीकार केला आणि जिच्यासोबत तो राहत होता तिच्याशी तो विवाहबद्ध झाला.
कालांतराने तो रियुनियनला परत गेला. यापूर्वी नातेवाईकांसोबत त्याच्या अनेक समस्या होत्या विशेषतः त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांसोबत त्याचे पटत नव्हते. परंतु आता त्याच्या उत्तम ख्रिस्ती वर्तणुकीमुळे ते फारच प्रभावित झाले. या मनुष्याने बाप्तिस्मा घेतला आणि सध्या तो एक सेवा-सेवक आहे. पत्नी आणि दोन मुलींसह त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्य ख्रिस्ती मंडळीमध्ये देव राज्याच्या सुवार्तेचे प्रचारक म्हणून सेवा करीत आहेत.
[तळटीपा]
^ वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी द्वारे प्रकाशित.