व्हिडिओ पाहण्यासाठी

प्राचीन काळातल्या थैल्या

प्राचीन काळातल्या थैल्या

प्राचीन काळातल्या थैल्या

यहोवाच्या आधुनिक काळातील साक्षीदारांच्या वस्तूंमध्ये थैल्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ख्रिस्ती सभांना जाताना अभ्यासाची पुस्तके ठेवायला आणि जागतिक प्रचार कार्यात प्रकाशने वितरण करायला घेऊन जाण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. बायबल काळातील थैल्यांबद्दल काय? त्यांचा सर्रास उपयोग केला जात होता का? त्या कशा होत्या?

विविध प्रकारच्या प्राण्यांच्या चामड्यापासून आणि विणलेल्या वस्तूंपासून तयार केलेल्या प्राचीन काळातल्या थैल्यांचे नानाविध उपयोग होते. धान्य किंवा इतर अन्‍नपदार्थ, दगडी वजने, मौल्यवान वस्तू, सोन्याचांदीचे गोळे, नाणी इतकेच नव्हे तर, पाणी व द्राक्षारसही त्यांमध्ये ठेवता येऊ शकत होते.—यहोशवा ९:४; मत्तय ९:१७.

शब्दांचा भरणा असलेल्या इब्री भाषेत थैली, बटवा, पिशवी आणि गाठोडी यांचे वर्णन करायला विविध शब्द वापरले आहेत. सॅक हा इंग्रजी शब्द इब्रीतल्या साक या शब्दातून आला आहे; बायबलमध्ये हा शब्द गोणपाट तसेच गोणपाटातून अन्‍नपदार्थ आणि धान्य ठेवण्यासाठी तयार केलेल्या गोण्यांसाठी वापरण्यात आला आहे. हा शब्द आणि “पसरवणे” या क्रियापदावरून येणारा आमटाखात हा इब्री शब्द, योसेफाचे भाऊबंद ईजिप्तला भेट देतात त्या अहवालात समानार्थी शब्दांसारखेच वापरण्यात आले आहेत. हे दोन्ही शब्द ईजिप्तवरून धान्य ज्यातून नेले होते त्या थैल्यांसाठी वापरण्यात आले आहेत. असे दिसते की, आमटाखात हा शब्द थैलीच्या प्रकाराचे तर साक हा शब्द, ती थैली ज्यापासून तयार करण्यात आली होती त्याचे वर्णन करते.—उत्पत्ति ४२:२५, २७, २८, ३५.

दावीदाची आणि नामानाची थैली

गल्याथाचा सामना करायला जाताना दावीदाने पाच गोटे आपल्या धनगरी बटव्यात ठेवले. ही थैली कदाचित खांद्यांवर अडकवून पाठीवर घ्यायच्या थैलीसारखी असावी. (१ शमुवेल १७:४०) तथापि, येथे वापरण्यात आलेला केली हा इब्री शब्द कदाचित माती, लाकूड, धातू अथवा चामड्याच्या पात्राला किंवा भांड्याला सूचित होऊ शकतो.

सिरियाचा सेनापती नामान याचा भयंकर कोड बरा होण्याविषयीच्या अहवालात त्याने लोभी गेहजीसाठी ‘दोन पोशाकांसह दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून आपल्या दोन सेवकांना उचलायला दिल्या’ असे आपण वाचतो. (२ राजे ५:२३) येथे थैलीसाठी वापरण्यात आलेला इब्री शब्द खारिट हा आहे. ३४ किलोग्रॅमचा एक किक्कार होता तेव्हा एक किक्कार शिवाय पोशाख मावण्याइतकी ती पिशवी आकाराने मोठी आणि मजबूत असावी हे स्पष्टच आहे. म्हणून यात आश्‍चर्याचे काही नाही की, भरल्यावर प्रत्येक थैली एका माणसाला उचलण्याइतकी मोठी होती. खारिट हा शब्द नेहमीच मोठ्या पिशव्यांना सूचित होत नाही कारण तोच शब्द, सियोनेच्या गर्विष्ठ कन्या चैनीची वस्तू म्हणून बाळगत असलेल्या बटव्यांसाठीही वापरला आहे.—यशया ३:१६, २२.

व्यापाऱ्‍याची थैली

अगदी अलीकडील काळापर्यंत पौर्वात्य देशांमध्ये वापरत असलेल्या थैल्यांसारख्याच व्यापाऱ्‍यांच्या थैलीसाठी किस हा इब्री शब्द आहे. त्या अलीकडील थैल्यांवरून असे म्हणता येते की, व्यापाऱ्‍यांच्या थैल्या बहुतेक विणलेला कापूस, लवचीक लव्हाळा किंवा चामडे यांपासून बनवलेल्या होत्या. व्यापाऱ्‍यांना उत्पादने, धान्य किंवा मौल्यवान धातूंचे वजन करण्यासाठी आवश्‍यक असलेली वजने ठेवायला त्यांचा उपयोग केला जाई. किसचा उल्लेख करून, मोशेच्या नियमशास्त्रात फसव्या व्यापारी पद्धतींबद्दल असा इशारा दिला होता: “तुझ्या थैलीत . . . दोन प्रमाणाची वजने ठेवू नको.” (अनुवाद २५:१३) आपल्या संदेष्ट्याद्वारे यहोवाने विचारले: “दगलबाजीची तागडी ठेवून, खोट्या वजनांची थैली बाळगून मी शुद्ध ठरणार काय?” (मीखा ६:११) पैसे किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्याची थैली किंवा बटवा म्हणूनही किसचा वापर करता येत होता.—यशया ४६:६.

बांधलेली व मोहर लावलेली गाठोडी

त्सरोर हा इब्री शब्द “गुंडाळणे” या क्रियापदातून आला असून वादीने किंवा सुतळीने फक्‍त तोंड एकत्र करून गाठोडे नाहीतर थैली बांधलेल्या सर्वसामान्य प्रकारच्या पात्राचे ते वर्णन करते. या प्रकारच्या थैलीत योसेफाने त्याच्या भावांनी घेतल्या धान्याचे पैसे घालून परत केले होते आणि त्या अहवालात प्रत्येक गोणीत “पैक्याची गाठोडी” होती असे म्हटले आहे.—उत्पत्ति ४२:३५, पं.र.भा.

मंदिरातील दानपात्रातल्या देणग्यांमधून मिळालेल्या पैशांचे सारखे वाटे करून ते बहुतेक अशाच गाठोड्यांमध्ये ठेवले जात होते. प्राचीन काळी, मोठाल्या रक्कमांच्या व्यापारी व्यवहारांमध्ये पैशांचे वजन करून अशाच गाठोड्यांमध्ये किंवा थैल्यांमध्ये पैसे घालून गाठ मारून त्यावर मोहर लावली जात असे. मग, हवे असल्यास, ती थैली एका व्यक्‍तीकडून दुसऱ्‍या व्यक्‍तीला देऊनही ठराविक रक्कम त्यात असण्याची खात्री होती. अशातऱ्‍हेने, तोडला न गेलेला मोहर त्या थैलीतल्या चांदी, सोने किंवा इतर धातूच्या नेमक्या प्रमाणाची खात्री देऊ शकत होता. स्पष्टतः, ईयोब १४:१७ येथे ईयोब असेच एक रूपक वापरून देवाला म्हणतो: “माझे पातक थैलीत घालून मोहरबंद केले आहे; माझा अधर्म तू वज्रलेप करून ठेवितोस.” दावीदाला यहोवाचे संरक्षण आहे याबद्दल खात्री व्यक्‍त करत अबीगईलने म्हटले की, कोणी शत्रू दावीदाचा पाठलाग करू लागला तर त्याचा प्राण “यहोवा [त्याचा] देव याच्याजवळ जिवाच्या जिवंत गाठोड्यात बांधलेला राहील.”—१ शमुवेल २५:२९.

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमधील पिशव्या

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये पिशव्या, कंबरकश आणि झोळी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पिशवी ही सोने, चांदी, तांबे, नाणी किंवा इतर वस्तू नेण्यासाठी स्त्री तसेच पुरुष वापरत असलेली थैली किंवा बटवा होता. (लूक १०:४) काहीवेळा, बहुतेक लंबगोलाकारातले शोभायमान बटवे किंवा थैल्या स्त्रियांकडे असत; या प्रकारच्या बटव्यांसाठी खारिट किंवा किस हे इब्री शब्द वापरले जात होते. (यशया ३:२२; ४६:६) प्रारंभिक बटवे चामड्याच्या किंवा विणलेल्या लव्हाळ्याच्या अथवा कापसाच्या बनवलेल्या असत. चामडी वाद्यांनी किंवा इतर सुतळ्यांनी त्यांचे तोंड बांधले जात असे.

पुराव्यानुसार, यहुदियात येशूने आपल्या शिष्यांना प्रचारासाठी पाठवले असताना त्यांना सांगितले होते की सोबत कंबरकश किंवा झोळणा घ्यायचा नाही; त्यावरून हे सूचित होत होते की, रीतीरिवाजानुसार सहइस्राएलांच्या पाहुणचाराकरवी यहोवा त्यांची काळजी घेणार होता. (मत्तय १०:९, १०) कंबरकश (प्रत्यक्ष ‘कमरपट्टा’; ग्रीक झोने,) कदाचित एक प्रकारचा पैसे ठेवण्याचा पट्टा होता. एकतर त्या कंबरकशात पैसे ठेवण्यासाठी मोकळी जागा होती किंवा कंबरकश कापडाचा असून घड्या पाडून बांधला जात असावा तर पैसे कदाचित घड्यांमध्ये ठेवले जात असावेत.

झोळणा असा भाषांतरित केलेला पीरा हा ग्रीक शब्द, प्रवासी खांद्यावर घेत असलेल्या थैलीला सूचित होतो; दावीद ज्याप्रमाणे आपला धनगरी बटवा खांद्यावर घेऊन जायचा अगदी त्याचप्रमाणे. त्यात अन्‍न, वस्त्र आणि इतर आवश्‍यक वस्तू ठेवल्या जात.

कायम टिकणाऱ्‍या पिशव्या

लाखो लोकांना आज हे कळून चुकले आहे की, “[“थैलीभर,” NW] ज्ञानाचे मोल मोत्यांहून अधिक आहे.” (ईयोब २८:१८) हे ज्ञान इतरांना देताना यहोवाचे साक्षीदार आपल्या ख्रिस्ती सुर्वातेच्या कार्यात खरोखरच्या थैल्यांचा आणि पिशव्यांचा उत्तम उपयोग करतात. स्तोत्रकर्त्याने भाकीत केल्याप्रमाणे ते करत आहेत—थैलीभर “बी” अर्थात देवाचे सत्य वचन ज्यामध्ये देवाच्या राज्याकरवी पृथ्वीवर पुनर्स्थापित केलेल्या परादीसची सुवार्ता आहे ती घेऊन ते जात आहेत. सत्याचा शोध करणारे आणखी लोक ईश्‍वरी बुद्धी प्राप्त करतात तसे आपल्या परिश्रमाच्या फळाची ते “आनंद करीत” कापणी करतात.—स्तोत्र १२६:६.

आध्यात्मिक गोष्टींच्या उच्च मूल्यावर जोर देत येशूने आपल्या अनुयायांना आर्जवले: “स्वर्गांतील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्‍या थैल्या आपणासाठी करून ठेवा.” होय, स्वर्गीय धनाने भरलेला बटवा किंवा थैली किंवा गोणी किंवा गाठोडे खरी सुरक्षा देईल आणि ती कायम टिकेल.—लूक १२:३३.