व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचा निर्माता—तो कसा आहे हे जाणून घ्या

तुमचा निर्माता—तो कसा आहे हे जाणून घ्या

तुमचा निर्माता—तो कसा आहे हे जाणून घ्या

“मी आपले सगळे चांगलेपण तुझ्यापुढे चालवीन, आणि तुझ्यापुढे यहोवाचे नाव जाहीर करीन.”—निर्गम ३३:१९, पं.र.भा.

१. निर्मात्याचा आदर करणे का योग्य आहे?

 प्रेषित योहान, बायबलच्या शेवटल्या पुस्तकाच्या या लेखकाने, निर्मात्याविषयी ही गहन अर्थाची घोषणा नमूद केली: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” (प्रकटीकरण ४:११) आधीच्या लेखाने सिद्ध केल्याप्रमाणे, आधुनिक विज्ञानाचे शोध बहुधा सर्व गोष्टींच्या निर्मात्यावर विश्‍वास करण्यासाठी आणखी कारणे देतात.

२, ३. (अ) लोकांना निर्मात्याविषयी काय शिकून घेण्याची गरज आहे? (ब) व्यक्‍तिशः निर्मात्याला भेटणे वाजवी का नाही?

निर्माता अस्तित्वात आहे हे मान्य करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो कसा आहे, अर्थात, आपल्या व्यक्‍तिमत्त्वाने आणि मार्गांनी लोकांना स्वतःकडे आकर्षित करणारी एक खरीखुरी व्यक्‍ती आहे हे शिकणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही हे थोड्याफार प्रमाणात आधीच केले असले तरीही, त्याला अधिक चांगल्यारीतीने जाणून घेणे फायद्याचेच ठरणार नाही का? त्यासाठी आपण इतर मानवांना व्यक्‍तिगतपणे भेटतो तसे त्याला व्यक्‍तिगतपणे भेटण्याची गरज नाही.

यहोवा हा ताऱ्‍यांचा उगम देखील आहे; आपला सूर्य हा केवळ एक मध्यम आकाराचा तारा आहे. सूर्याच्या अगदी जवळ जाण्याचा विचार तुम्ही कधी कराल का? मुळीच नाही! पुष्कळ लोक थेट सूर्याकडे पाहत नाहीत किंवा खूप वेळापर्यंत उन्हातही राहत नाहीत. त्याचे केंद्रीय तापमान १,५०,००,००० डिग्री सेल्सियस (२,७०,००,००० डिग्री फॅरेनहाईट) इतके असते. प्रत्येक सेकंदाला ही औष्णिक अणुकेंद्रीय भट्टी, सुमारे चाळीस लाख टन वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर करते. त्यातला केवळ एक अंश, उष्णता आणि प्रकाश यांच्या रूपात पृथ्वीवर पोहंचतो पण येथील जीवसृष्टी टिकून ठेवण्याकरता हे पुरेसे आहे. या मूलभूत वस्तुस्थितींवरून निर्मात्याच्या अद्‌भुत शक्‍तीबद्दल आपण प्रभावित झाले पाहिजे. म्हणूनच यशया अगदी उचितपणे, “[निर्माता] महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे,” असे लिहू शकला.—यशया ४०:२६.

४. मोशेने कशाची विनंती केली आणि यहोवाने कशी प्रतिक्रिया दर्शवली?

परंतु, इस्राएल लोक, सा.यु.पू. १५१३ मध्ये ईजिप्त सोडून गेले त्याच्या काही महिन्यांनंतरच मोशेने निर्मात्याकडे, “कृपा करून मला तुझे तेज दाखीव” अशी विनंती केली हे तुम्हाला ठाऊक होते का? (निर्गम ३३:१८) सूर्याचा उगमही देवच असल्यामुळे त्याने मोशेला, “तुला माझे मुख पाहवणार नाही; कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही” असे का म्हटले हे तुम्हाला आता समजू शकते. तथापि निर्मात्याने आपण “निघून जाईपर्यंत” मोशेला सिनाय पर्वतावरती एका खडकात लपून राहण्याची परवानगी मात्र दिली. मग देव मोशेला “पाठमोरा” दिसला; जणू निर्मात्याच्या तेजाचा किंवा अस्तित्वाचा मागे राहिलेला प्रकाश त्याला दिसला.—निर्गम ३३:२०-२३; योहान १:१८.

५. निर्मात्याने मोशेची विनंती कशी पूर्ण केली आणि त्यावरून काय सिद्ध होते?

निर्मात्याला अधिक चांगल्यारीतीने जाणून घेण्याची मोशेची इच्छा अधुरी राहिली नाही. स्पष्टतः, एका देवदूताद्वारे बोलत असता यहोवा मोशेजवळून गेला आणि त्याने अशी घोषणा केली: “परमेश्‍वर, परमेश्‍वर [“यहोवा,” NW] दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्‍यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा.” (निर्गम ३४:६, ७) यावरून हे प्रदर्शित होते की, आपल्या निर्मात्याला अधिक चांगल्यारीतीने जाणून घेण्यामध्ये शारीरिक आकार पाहणे नव्हे, तर तो कसा आहे, त्याचे व्यक्‍तिमत्त्व आणि गुण हे आणखी चांगल्यारीतीने समजून घेणे गोवलेले आहे.

६. आपली रोगप्रतिकारक संस्था कशाप्रकारे अद्‌भुत आहे?

असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, देवाने निर्माण केलेल्या गोष्टींवरून त्याचे गुण जाणून घेणे. आपल्या रोगप्रतिकारक संस्थेचा विचार करा. सायंटिफिक अमेरिकन या पत्रिकेने, प्रतिकारशक्‍तीबद्दलच्या एका अंकात म्हटले: “जन्मापासून मृत्यूपर्यंत रोगप्रतिकारक संस्था सतत दक्ष असते. विविध अणू आणि पेशी . . . परजीवी आणि रोगजनकांपासून आपले संरक्षण करतात. ही प्रतिकारक तंत्रे नसती, तर मानव जिवंत राहूच शकला नसता.” ही रोगप्रतिकारक संस्था कोठून निर्माण झाली? त्या पत्रिकेतील एका लेखात म्हटले होते: “सूक्ष्मजीव आणि रोगजंतू यांपासून शरीराचे संरक्षण करणाऱ्‍या इतक्या वेगवेगळ्या कुशल प्रतिकारक पेशी, काही पूर्वगामी पेशींमधून तयार होतात ज्या गर्भ राहण्याच्या सुमारे नऊ आठवड्यांनंतर प्रथम दिसू लागतात.” गरोदर स्त्री आपल्या उदरात वाढणाऱ्‍या गर्भाला थोडीफार प्रतिकारशक्‍ती देते. नंतर, बाळाला आईच्या दूधातून प्रतिकारक पेशी तसेच उपयुक्‍त असणारी रसायने मिळतात.

७. आपल्या रोगप्रतिकारक संस्थेबद्दल आपण काय विचार करू शकतो आणि त्यावरून कोणता निष्कर्ष निघतो?

तुमची रोगप्रतिकारक संस्था आधुनिक औषधांपेक्षाही वरचढ आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. म्हणून स्वतःला विचारा, ‘यावरून, हे सर्वकाही निर्माण केलेल्या उत्पन्‍नकर्त्याविषयी आणि दात्याविषयी काय सूचित होते?’ ‘गर्भ राहण्याच्या सुमारे नऊ आठवड्यांनंतर प्रथम दिसून येणाऱ्‍या’ आणि नवजात बालकाचे संरक्षण करायला सुसज्ज असणाऱ्‍या या संस्थेत निश्‍चितच बुद्धी आणि दूरदृष्टी झळकते. पण या संस्थेवरून आपण निर्मात्याविषयी आणखी काही जाणून घेऊ शकतो का? अल्बर्ट श्‍वाइट्‌सर आणि इतरजण ज्यांनी गोरगरिबांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आपले आयुष्य वाहिले त्यांच्याविषयी आपल्यातील बहुतेकांना काय वाटते? या दयाळू सत्पुरुषांची आपण प्रशंसा करतो. त्याचप्रमाणे, ज्याने गोरगरिबांना तसेच श्रीमंतांनाही रोगप्रतिकारक संस्था देऊ केली आहे त्या आपल्या निर्मात्याविषयी आपले काय मत आहे? तो प्रेमळ, अपक्षपाती, दयाळू आणि न्यायी आहे हेच यावरून स्पष्ट होते. मोशेने निर्मात्याविषयी जे वर्णन ऐकले त्याच्या हे एकवाक्यतेत नाही का?

तो कसा आहे हे तो प्रकट करतो

८. यहोवा स्वतःविषयी कोणत्या खास प्रकारे आपल्याला प्रकट करतो?

पण आपल्या निर्मात्याला अधिक चांगल्यारीतीने जाणून घेण्याचा आणखी एक मार्ग आहे—तो म्हणजे बायबलद्वारे. हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण त्याच्याविषयी अशा काही गोष्टी आहेत ज्यांना विज्ञान किंवा हे विश्‍व प्रकट करू शकत नाही आणि दुसऱ्‍या काही गोष्टी आहेत ज्या बायबलमधून अधिक स्पष्टपणे कळतात. याचे एक उदाहरण म्हणजे निर्मात्याचे व्यक्‍तिगत नाव. केवळ बायबलमध्येच निर्मात्याचे नाव तसेच त्या नावाचा अर्थ दिला आहे. बायबलच्या इब्री हस्तलिखितांमध्ये, त्याचे नाव सुमारे ७,००० वेळा, योध, ही, वाव आणि ही या चार इब्री व्यंजनांच्या रूपात आढळते; मराठीत, त्याचा सर्वसामान्यपणे यहोवा असा शब्दोच्चार होतो.—निर्गम ३:१५; ६:३.

९. निर्मात्याच्या व्यक्‍तिगत नावाचा काय अर्थ होतो आणि यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो?

आपण निर्मात्याला अधिक चांगले जाणून घेण्यासाठी हे समजून घेतले पाहिजे की तो केवळ एक अस्पष्ट “आदि कारण” किंवा दुर्बोध “मी आहे” असा नाही. त्याच्या व्यक्‍तिगत नावावरूनच हे दिसून येते. हे नाव, “होणे” किंवा “ठरणे” या अर्थाच्या इब्री क्रियापदाचे एक रूप आहे. * देवाच्या नावाचा अर्थ, “तो व्हावयास कारणीभूत ठरतो” असा होतो आणि हे, देव उद्देशितो आणि घडवून आणतो यावर जोर देते. त्याचे नाव जाणून त्याचा वापर केल्याने, तो आपली अभिवचने पूर्ण करतो आणि सतत आपला उद्देश खरा करून दाखवत असतो हे आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो.

१०. उत्पत्तीच्या अहवालातून आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात?

१० बायबल, देवाचे उद्देश आणि त्याचे व्यक्‍तिमत्त्व यांविषयी माहिती देणारा स्रोत आहे. उत्पत्तीच्या अहवालात असे प्रकट केले आहे की, एकेकाळी मानवजातीचा देवासोबत एक सुरळीत नातेसंबंध होता आणि त्यांना दीर्घकालीन, अर्थपूर्ण जीवनाची प्रत्याशा होती. (उत्पत्ति १:२८; २:७-९) आपल्या नावाच्या अर्थानुरूप यहोवा, मानवजातीने कित्येक वर्षांपासून सहन केलेले दुःख आणि निराशा काढून टाकेल याची आपण खात्री बाळगू शकतो. त्याच्या उद्देशाच्या पूर्णतेबद्दल आपल्याला असे वाचायला मिळते: “निर्माण केलेले जग निराशेला स्वाधीन करण्यात आले होते ते इच्छेने नव्हे तर देवाच्या इच्छेने स्वाधीन केले होते, या आशेने की एके दिवशी त्याने . . . देवाच्या मुलांचे वैभवी गौरव उपभोगावे.”—रोमकर ८:२०, २१, जे. डब्ल्यू. सी. वाँड यांचे द न्यू टेस्टामेंट लेटर्स.

११. बायबल अहवाल आपण विचारात का घ्यावेत आणि अशाच एका अहवालाचा तपशील काय आहे?

११ बायबल आपल्याला आणखी एका प्रकारे आपल्या निर्मात्याला अधिक चांगल्यारीतीने जाणून घेण्यासही मदत करू शकते अर्थात प्राचीन इस्राएलशी व्यवहार करताना तो कसा वागला आणि त्याने कसा प्रतिसाद दाखवला हे प्रकट करण्याद्वारे. एलीशा आणि सिरिया या शत्रू राष्ट्राचा सेनापती नामान यांचे एक उदाहरण पाहा. २ राजे ५ व्या अध्यायातला अहवाल तुम्ही वाचलात तर, गुलाम असलेल्या एका इस्राएली मुलीने, इस्राएलमधील एलीशाच्या मदतीने नामानचे कोड बरे होऊ शकते असे आग्रहाने म्हटले हे तुम्हाला पाहायला मिळेल. एलीशा काहीतरी चमत्कारिक पद्धतीने हातवारे करून त्याला बरे करील अशी अपेक्षा ठेवून नामान त्याच्याजवळ गेला. पण, एलीशाने त्या सिरियन सेनापतीला यार्देन नदीत स्नान करायला सांगितले. नामानच्या सेवकांना त्याला असे करण्यास पटवावे लागले तरी त्याने सांगितल्याप्रमाणे केले तेव्हा तो बरा झाला. नामानने मौल्यवान बक्षीसे पेश केली, पण एलीशाने ती नाकारली. नंतर एलीशाचा एक सहकारी त्याच्या नकळत नामानकडे गेला आणि लबाड बोलून त्याने काही मौल्यवान वस्तू घेतल्या. त्याच्या या अप्रामाणिकतेमुळे त्यालाच कोड झाले. हा मानवी स्वभावाचे दर्शन घडवणारा एक लक्षवेधक अहवाल आहे—यातून आपण बरेच काही शिकू शकतो.

१२. एलीशा आणि नामान यांच्या वृतान्तावरून आपण निर्मात्याबद्दल काय निष्कर्ष काढू शकतो?

१२ सबंध विश्‍वाचा महान निर्माता, सर्वथोर असूनही त्याला एका लहानशा मुलीवर कृपादृष्टी दाखवण्यात कमीपणा वाटला नाही हे या अहवालातून अतिशय सुरेखपणे दाखवले आहे; आज अनेक संस्कृतींमध्ये दिसून येणाऱ्‍या वहिवाटीपेक्षा हे किती वेगळे आहे. या वृत्तान्तावरून हे देखील सिद्ध होते की, निर्माता कोणा एकाच जातीवर किंवा राष्ट्रावर कृपा दाखवत नाही. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) लक्षात घेण्याजोगी आणखी एक गोष्ट म्हणजे, गतकाळातले तसेच आजचे “चमत्काराने बरे करणारे” ज्या बोगस पद्धतींचा सर्रास वापर करतात तशा बोगस पद्धती लोकांनी वापराव्यात अशी अपेक्षा करण्याऐवजी निर्मात्याने आश्‍चर्यकारक बुद्धी दर्शवली. कोड कसा बरा करावा हे देवाला चांगले ठाऊक होते. तसेच लबाडीचा विजय होऊ न देण्यासाठी त्याने दूरदृष्टी आणि न्याय हे गुणही प्रदर्शित केले. मोशेने यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे जे वर्णन ऐकले होते त्यात याच गुणांचा समावेश नव्हता का? हा बायबलमधील अहवाल लहान असला, तरी आपला निर्माता कसा आहे त्याविषयी आपण यातून कितीतरी शिकू शकतो!—स्तोत्र ३३:५; ३७:२८.

१३. बायबल अहवालांतून आपण मौल्यवान धडे कसे मिळवू शकतो त्याचे स्पष्टीकरण द्या.

१३ इस्राएलची कृतघ्न कृत्ये आणि देवाची प्रतिक्रिया यांविषयीच्या इतर अहवालांवरून यहोवा खरोखर काळजी वाहतो हे सिद्ध होते. बायबल म्हणते की, इस्राएली लोकांनी वारंवार त्याची परीक्षा घेतली आणि त्याला दुःखी केले व चिडवले. (स्तोत्र ७८:४०, ४१) यावरून दिसते की, निर्मात्याला भावना आहेत आणि मानव काय करतात याविषयी त्याला चिंता आहे. सुप्रसिद्ध व्यक्‍तींच्या अहवालांवरूनही पुष्कळसे शिकण्यालायक आहे. दावीदाला इस्राएलचा राजा म्हणून निवडताना देवाने शमुवेलाला म्हटले: “मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७) होय, निर्माता आपले हृदय पारखतो, बाह्‍य स्वरूप नव्हे. केवढा समाधानकारक विचार!

१४. इब्री शास्त्रवचने आपण वाचतो तेव्हा आपण कोणती अशी फायदेकारक गोष्ट करू शकतो?

१४ बायबलची एकोणचाळीस पुस्तके येशूच्या काळाआधी लिहिण्यात आली होती, आणि आपण ती वाचून काढावीत हे अगत्याचे आहे. हे केवळ बायबलमधील अहवाल किंवा इतिहास जाणून घेण्याच्या हेतूने केले जाऊ नये. आपला निर्माता कसा आहे हे आपल्याला खरेच जाणून घ्यायचे असेल, तर आपण त्या अहवालांवर मनन केले पाहिजे; ‘हा वृत्तान्त त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी काय प्रकट करतो? यातून त्याचे कोणते गुण ठळक दिसून येतात?’ * कदाचित असा विचार आपण करू शकतो. असे केल्याने देवावर विश्‍वास न करणाऱ्‍यांना देखील हे पाहण्यास मदत मिळेल की, बायबलचा उगम ईश्‍वराकडून असला पाहिजे आणि अशाप्रकारे बायबलच्या प्रेमळ लेखकाला अधिक चांगल्यारीतीने जाणून घ्यायला त्यांना आधार मिळेल.

थोर शिक्षक आपल्याला निर्मात्याला जाणून घेण्यास मदत करतो

१५. येशूच्या कृती आणि शिकवणी बोधकारक का आहेत?

१५ हे खरे की, ज्यांना निर्मात्याच्या अस्तित्वाविषयी शंका आहे किंवा देवाविषयीचे ज्यांचे मत इतके स्पष्ट नाही त्यांना बायबलविषयी अगदीच तोकडी माहिती असेल. कदाचित तुम्हाला असे लोक भेटले असतील, ज्यांना मोशे मत्तयच्या आधी होऊन गेला होता की नंतर हे सांगता आले नसेल किंवा ज्यांना येशूच्या कार्यांविषयी किंवा शिकवणींविषयी काहीच माहीत नसेल. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे कारण थोर शिक्षक, येशू याच्याकडून आपल्याला निर्मात्याबद्दल पुष्कळ काही शिकता येते. देवासोबत त्याचा जवळचा नातेसंबंध असल्यामुळे आपला निर्माता कसा आहे हे तो प्रकट करू शकत होता. (योहान १:१८; २ करिंथकर ४:६; इब्री लोकांस १:३) आणि त्याने तसेच केले. एकदा तर त्याने असे म्हटले: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.”—योहान १४:९.

१६. येशूने शोमरोनी स्त्रीसोबत केलेल्या चर्चेतून काय स्पष्ट होते?

१६ हे उदाहरण पाहा. एके प्रसंगी, प्रवासाने थकलेला असताना येशू सूखारजवळ एका शोमरोनी स्त्रीशी बोलला. त्याने अत्यंत गहन सत्यांविषयी तिला सांगितले, ‘खऱ्‍या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करण्याच्या’ गरजेवर त्याने भर दिला. त्या काळात यहुदी शोमरोन्यांना तुच्छ लेखत होते. त्याउलट, येशूने सर्व राष्ट्रांतील प्रामाणिक स्त्री-पुरुषांना स्वीकारण्याची यहोवासारखी इच्छा दाखवली—एलीशा आणि नामानच्या अहवालातही आपण पाहिले होते त्याप्रमाणे. यावरून आपल्याला ही खात्री मिळायला हवी की, आज जगामध्ये सर्रासपणे दिसून येणारी धर्मांमधील वैरभावाची संकोचित मनोवृत्ती यहोवा दाखवत नाही किंवा त्याला ती पसंत नाही. आणखी एका गोष्टीची आपण दखल घेतली पाहिजे की, येशू एका स्त्रीला शिकवायला तयार होता आणि या प्रकरणात ही स्त्री स्वतःच्या नवऱ्‍यासोबत न राहता परपुरुषासोबत राहत होती आणि तरीही येशू तिला शिकवायला तयार होता. तिचा धिक्कार करण्याऐवजी येशूने तिला सन्मानाने वागवले; तिची मदत होईल अशा तऱ्‍हेने त्याने तिच्याशी व्यवहार केला. त्यानंतर, इतर शोमरोन्यांनी येशूचे ऐकले आणि शेवटी म्हटले: “हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे.”—योहान ४:२-३०, ३९-४२; १ राजे ८:४१-४३; मत्तय ९:१०-१३.

१७. लाजरच्या पुनरुत्थानाच्या अहवालातून काय निष्कर्ष निघतो?

१७ येशूची कार्ये आणि त्याच्या शिकवणी यांच्याशी परिचित झाल्यामुळे आपण निर्मात्याविषयी अधिक जाणून घेऊ शकतो, हे दाखवणारे आणखी एक उदाहरण आपण पाहू. येशूचा मित्र लाजर मरण पावला त्या प्रसंगाची आठवण करा. मृतांना जिवंत करण्याची शक्‍ती आपल्याजवळ असल्याचे येशूने आधीच सिद्ध केले होते. (लूक ७:११-१७; ८:४०-५६) परंतु, लाजरची बहीण मरिया हिला शोक करताना पाहून त्याची काय प्रतिक्रिया होती? येशू “आत्म्यात खवळला व विव्हळ झाला.” येशू भावनाशून्य नव्हता; तो “रडला.” (योहान ११:३३-३५) येथे येशू केवळ पोकळ भावनाप्रदर्शन करत नव्हता. तर त्याने लागलीच सकारात्मक कार्यहालचाल केली—त्याने लाजरला पुनरुत्थित केले. हे पाहून प्रेषितांना निर्मात्याच्या भावनांविषयी, त्याच्या कार्यांविषयी जाणून घेण्यास किती मदत मिळाली असावी याची तुम्ही कल्पना करू शकता. यामुळे आपल्याला तसेच इतरांनाही निर्मात्याचे व्यक्‍तिमत्त्व आणि त्याचे मार्ग समजून घेण्यासही मदत मिळायला हवी.

१८. बायबलचा अभ्यास करण्याविषयी लोकांना कसे वाटले पाहिजे?

१८ बायबलचा अभ्यास करण्यामध्ये आणि आपल्या निर्मात्याविषयी अधिक शिकून घेण्यामध्ये आपल्याला लाज वाटण्याचे कारण नाही. बायबल हे काही कालबाह्‍य झालेले पुस्तक नाही. त्याचा अभ्यास करून येशूचा जवळचा मित्र बनलेला एक होता योहान. त्याने नंतर लिहिले: “आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धि त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्‍याच्या ठायी, आपण आहो हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.” (१ योहान ५:२०) लक्ष द्या की, ‘खऱ्‍या देवाचे’ अर्थात निर्मात्याचे ज्ञान घेण्यासाठी ‘बुद्धीचा’ वापर केल्याने “सार्वकालिक जीवन” प्राप्त होऊ शकते.

त्याच्याविषयी शिकण्यास इतरांना कशी मदत करता येते?

१९. देवाच्या अस्तित्वावर शंका बाळगणाऱ्‍यांना मदत करण्यासाठी काय करण्यात आले आहे?

१९ आपली काळजी वाहणारा एक कनवाळू निर्माता आहे असा विश्‍वास करण्यासाठी आणि तो कसा आहे हे समजून घेण्यासाठी काही लोकांना पुष्कळ पुरावा द्यावा लागतो. असे कोट्यवधी लोक आहेत जे अद्यापही निर्मात्याच्या अस्तित्वाबद्दल शंका बाळगतात किंवा ज्यांची निर्मात्याविषयीची कल्पना बायबलमध्ये दिलेल्या कल्पनेशी सहमत नाही. अशांना तुम्ही कशी मदत करू शकता? १९९८/९९ मधील यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये अनेक भाषांमध्ये, तुमची काळजी वाहणारा निर्माता आहे का? (इंग्रजी) या प्रभावशाली साधनाचे अनावरण करण्यात आले.

२०, २१. (अ) निर्माता पुस्तकाचा यशस्वीपणे उपयोग कसा केला जाऊ शकतो? (ब) निर्माता पुस्तक प्रभावशाली ठरल्याचे काही अनुभव सांगा.

२० हे प्रकाशन निर्मात्यावरील तुमचा विश्‍वास आणि त्याचे व्यक्‍तिमत्त्व व मार्ग यांबद्दलची तुमची समज अधिक वाढवेल. हे निश्‍चित का आहे? कारण तुमची काळजी वाहणारा निर्माता आहे का? हे पुस्तक खास हेच हेतू लक्षात ठेवून तयार करण्यात आले आहे. त्या पुस्तकातला एक मुख्य विषय म्हणजे, “तुमचे जीवन कशामुळे अर्थपूर्ण बनू शकते?” त्यातला मजकूर अशातऱ्‍हेने सादर करण्यात आला आहे की, बऱ्‍यापैकी शिक्षण प्राप्त झालेल्या लोकांनाही हे पुस्तक चित्तवेधक वाटेल. तरीही, आपल्या सर्वांच्या इच्छा-आकांक्षा यात व्यक्‍त केलेल्या आहेत. निर्मात्याच्या अस्तित्वावर शंका करणाऱ्‍या वाचकांसाठी यात अत्यंत रोचक आणि खात्री पटवणारी माहिती आहे. वाचकाचा निर्मात्यावर विश्‍वास आहे असे गृहीत धरून हे पुस्तक लिहिलेले नाही. जे देवावर विश्‍वास करत नाहीत ते यातले आधुनिक वैज्ञानिक शोध आणि संकल्पना ज्या तऱ्‍हेने सादर करण्यात आल्या आहेत ते पाहून प्रभावित होतील. तसेच ही वस्तुनिष्ठ माहिती देवाला मानणाऱ्‍या लोकांचाही विश्‍वास मजबूत करील.

२१ या पुस्तकाचा अभ्यास करताना तुमच्या हे लक्षात येईल की, त्यातील काही भागांमध्ये बायबलमधील इतिहासाचा सारांश अशातऱ्‍हेने मांडण्यात आला आहे की ज्यामुळे देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे पैलू ठळक केले गेले आहेत; त्यामुळे, वाचकांना देवाला अधिक चांगल्यारीतीने जाणून घेण्यास मदत होते. हे पुस्तक ज्यांनी आधीच वाचून काढले आहे त्यांनी त्यांच्याबाबतीत हे कसे खरे ठरले आहे त्यावर आपले अभिप्राय मांडले आहेत. (पुढील लेख पाहा, पृष्ठे २५-६.) तुमच्याबाबतीतही असेच घडावे, तुम्हीही या पुस्तकाचा परिचय करून घ्यावा आणि इतरांना त्यांच्या निर्मात्याला चांगले जाणून घ्यायला मदत करण्यासाठी त्याचा उपयोग करावा, अशी आम्ही आशा करतो.

[तळटीपा]

^ द कॅथोलिक बायबल क्वाटरली याचे प्रमुख संपादक असूनही जेसूट विद्वान एम. जे. ग्रंटहेनर यांनी या क्रियापदाला त्याच्या समान क्रियापदाबद्दल जे म्हटले ते लागू केले की, ते “कधीही अमूर्त स्वरूपातील अस्तित्वाला सूचित करत नाही तर नेहमी दृश्‍य स्वरूपात असणे किंवा होणे, म्हणजेच मूर्त स्वरूपात प्रकट होणे याला सूचित करते.”

^ आपल्या मुलांना बायबलमधील अहवाल सांगताना पालक असे प्रश्‍न विचारून त्यांची मदत करू शकतात. अशातऱ्‍हेने, मुले देवाला जाणून घेऊ शकतील त्याचप्रमाणे त्याच्या वचनावर मनन करायलाही ते शिकतील.

तुम्ही लक्ष दिले आहे का?

◻ सिनाय पर्वतावर मोशे यहोवाशी अधिक चांगल्यारीतीने परिचित कसा झाला?

◻ बायबलचा अभ्यास म्हणजे देव कसा आहे हे जाणून घेण्याचे एक साधन आहे ते का?

◻ बायबल वाचताना, निर्मात्याच्या अधिक जवळ जाण्यासाठी आपण काय करू शकतो?

निर्माता पुस्तकाचा तुम्ही कोणत्या पद्धतीने वापर करण्याचे ठरवले आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२० पानांवरील चित्र]

आपली रोगप्रतिकारक संस्था आपल्या निर्मात्याविषयी काय सुचवते?

[२१ पानांवरील चित्र]

मृत समुद्र गुंडाळ्यांचा एक भाग, ज्यात टेट्राग्रॅमॅटन (इब्रीमध्ये देवाचे नाव) ठळक अक्षरात दिले आहे

[Credit Line]

Courtesy of the Shrine of the Book, Israel Museum, Jerusalem

[२३ पानांवरील चित्र]

मरियेच्या दुःखाबद्दल येशूने दाखवलेल्या प्रतिक्रियेवरून आपण काय शिकू शकतो?