व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आपले मन आणखी खुले करण्याची गरज आहे का?

तुम्हाला आपले मन आणखी खुले करण्याची गरज आहे का?

तुम्हाला आपले मन आणखी खुले करण्याची गरज आहे का?

पश्‍चिम जपानच्या कोबे शहराला भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला तेव्हा अनेक आत्मत्यागी स्वयंसेवक भूकंपग्रस्तांच्या मदतीला धावून आले. बाहेरगावाहून आलेल्या एका वैद्यकीय पथकाला आढळले, की त्यांनी औषधांची केलेली मागणी शहराच्या आरोग्य खात्यातील एका अधिकाऱ्‍याने सरळ धुडकावून लावली होती. नगरपालिकेच्या एका मोठ्या रुग्णालयात संचालक पदावर असलेल्या या अधिकाऱ्‍याचे म्हणणे होते, की डॉक्टरांनी महागडी इंजेक्शने आणि शिरेतून दिले जाणारे महागडे द्रव्य साहाय्य केंद्रांवर जाऊन देण्याऐवजी खुद्द भूकंपग्रस्तांनी कोबेच्या रुग्णालयांत जावे. डाक्टरांनी मागितलेली औषधे त्यांना शेवटी मिळाली खरी; पण, त्या अधिकाऱ्‍याने सुरवातीला दाखवलेल्या अडेल, निर्दयी वृत्तीमुळे त्याची सर्वत्र टीका झाली.

अधिकार पदावर असलेल्या एखाद्या हेकेखोर वृत्तीच्या व्यक्‍तीकडून तुम्हाला देखील कदाचित अशाप्रकारचा अनुभव आला असेल. किंवा मग, तुम्ही स्वतःही कधीतरी असे वागला असाल. तर मग, मनाचा मोठेपणा यावर मात करण्यास तुम्हाला कशी मदत करेल?

सर्व बाजू विचारात घ्या

एखाद्या गोष्टीकडे लोक सहसा केवळ एकाच अंगाने, किंवा एकाच दृष्टिकोनातून पाहत असतात आणि त्यामुळे त्यांना परिस्थितीची पूर्ण समज किंवा कल्पना येत नाही. एखाद्याची शैक्षणिक पात्रता, जीवनातील त्याचे अनुभव आणि विशिष्ट पार्श्‍वभूमी यामुळे सहसा असे घडते. पण, आपण एखाद्या परिस्थितीच्या सर्व बाजू विचारात घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण अधिक डोळसपणे निर्णय घेऊ शकतो. उदाहरणार्थ, सिग्नलचे दिवे नसलेला एखादा वर्दळीचा चौक ओलांडताना केवळ समोर पाहून रस्ता ओलांडणे शहाणपणाचे ठरेल का? मुळीच नाही! त्याचप्रमाणे, परिस्थितीचे समग्र चित्र डोळ्यापुढे आणण्यासाठी आपली वैचारिक कक्षा रुंदावल्यास योग्य निर्णय घेण्यासाठी तसेच जबाबदारीने काम पार पाडण्यासाठी खूप मदत होते; इतकी की, त्यामुळे तुमचे जीवनही वाचू शकते.

यावर बहुधा आपणा सगळ्यांनाच सुधारणा करण्याची गरज असेल. तेव्हा स्वतःस असा प्रश्‍न विचारा की, ‘माझी विचार कक्षा रुंदावल्याने मला फायदा होईल अशी कोणती काही क्षेत्रे आहेत?’

इतरांविषयीचे तुमचे मत

तुम्ही इतरांकडे पाहता तेव्हा तुम्हाला काय दिसते? त्यांच्या वागण्याबोलण्यातील प्रत्येक गोष्ट एक तर खूपच चांगली जणू त्यांच्यात काहीएक दोष नाही; किंवा खूपच वाईट जणू त्यांच्यात एकही चांगली गोष्ट नाही या दृष्टीने तुम्ही सहसा पाहता का? तुमच्याबद्दल एखाद्याने केलेले विधान तुमची प्रशंसा करण्यासाठी केले होते किंवा तुमचा अपमान करण्यासाठी केले होते या दृष्टीने तुम्ही त्याकडे पाहता का? एखादी व्यक्‍ती नेहमीच चुकते किंवा कधीच चुकत नाही असे एखाद्याविषयी तुम्ही मत बनवता का? असा दृष्टिकोन बाळगणे म्हणजे शरद ऋतूतील एखाद्या नयनरम्य परिसरातील वैविध्यपूर्ण, तेजस्वी रंगछटांकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या छायाचित्रकारासारखे असल्यागत होईल; जणू निसर्गात केवळ कृष्णधवल प्रतिमाच आहेत. किंवा मग काही अविचारी प्रवाशांनी टाकलेल्या केरकचऱ्‍यामुळे एका सुंदर दृश्‍याची मजाच गमावून बसणाऱ्‍या प्रवाशासारखे तुम्ही एखाद्याच्या व्यक्‍तिमत्त्वातील केवळ नकारात्मक पैलूंवरच लक्ष केंद्रित करता का?—पडताळा उपदेशक ७:१६.

मनुष्याच्या चुकांकडे यहोवा ज्या नजरेतून पाहतो त्यावरून पुष्कळसे शिकण्यासारखे आहे? त्याला मनुष्याच्या अनेकानेक कमतरतांची, उणिवांची कल्पना असूनसुद्धा तो त्यांवर लक्ष केंद्रित करत नाही किंवा सतत त्यांचाच विचार करत बसत नाही. म्हणूनच एका कृतज्ञ गीतकाराने म्हटले: “तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तोत्र १३०:३) पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पातक्यांपासून यहोवा त्यांची पातके अतिशय दूर सारू इच्छितो; होय, तो अगदी उदारपणे ती पुसून टाकतो जेणेकरून त्याच्यासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर या पातकांचा कलंक राहणार नाही. (स्तोत्र ५१:१; १०३:१२) एके काळी ज्याने बथशेबासोबतच्या प्रकरणात गंभीर पातके केली होती, त्या दावीद राजाविषयी यहोवा असे म्हणू शकला की तो, “माझ्या आज्ञा पाळीत असे; तो मला जिवे भावे धरून राहिला व माझ्या दृष्टीने जे योग्य तेच तो करीत असे.” (१ राजे १४:८) दावीदाविषयी देव असे का म्हणू शकला? कारण त्याने पश्‍चात्तापी दावीदाच्या व्यक्‍तिमत्त्वातील अधिक चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केले. त्याने सर्व संबंधित बाबी विचारात घेतल्या आणि आपल्या सेवकाला तो दया दाखवत राहिला.

इतरांच्या चुकांसंबंधी ख्रिस्त येशूने असाच विशाल दृष्टिकोन अगदी हुबेहूब प्रतिबिंबित केला. (योहान ५:१९) त्याच्या शिष्यांमध्ये त्याला दोष आढळले तेव्हा त्याने दया दाखवली, त्यांना समजून घेतले. पापी मनुष्याच्या बाबतीत, ‘आत्मा उत्सुक असला तरी देह अशक्‍त असतो’ ही गोष्ट त्याने जाणली. (मत्तय २६:४१) आणि हेच लक्षात ठेवून, आपल्या शिष्यांच्या कमतरतांशी, त्यांच्यातील उणिवांशी येशू धीराने आणि समजुतदारपणे व्यवहार करू शकला. त्यांच्या उणिवांवर नव्हे तर त्यांच्यातल्या चांगल्या गुणांवर त्याने लक्ष केंद्रित केले.

एके प्रसंगी, आपल्यात श्रेष्ठ कोण यावर वादविवाद करणाऱ्‍या प्रेषितांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर येशूने म्हटले: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहां. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो. ह्‍यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.” (लूक २२:२४-३०) होय, प्रेषितांनी अनेक चुका केल्या होत्या; तरी आपल्यावरील त्यांच्या विश्‍वासाचा आणि प्रेमाचा येशूला विसर पडला नाही. (नीतिसूत्रे १७:१७) ते जे काही करू शकत होते आणि येणाऱ्‍या दिवसांतही ते जे काही करणार होते यावर येशूचा भरवसा होता आणि म्हणूनच त्याने त्यांच्याबरोबर राज्याचा करार स्थापित केला. होय, ‘अगदी शेवटपर्यंत येशूने आपल्या शिष्यांवर प्रेम केले.’—योहान १३:१.

तर मग, एखाद्याच्या विक्षिप्त सवयी किंवा चुका तुम्हाला सहन होत नसतील तर यहोवाचे आणि येशूचे अनुकरण करा. आपले मन मोठे करा आणि सर्व बाबी तोलून पाहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीचा असा समग्र विचार केल्यामुळे तुमच्या बांधवांवर प्रेम करण्यास तसेच त्यांची कदर करण्यास तुम्हाला जड जाणार नाही.

मदत करण्याच्या बाबतीत

इतरांना मदत करण्याचा विशेषाधिकार मिळाल्यामुळे ख्रिश्‍चनांना आनंदच होतो. पण, केवळ एकाच मार्गाने उदाहरणार्थ क्षेत्र सेवेत सहभाग घेऊन आपण मदत करू शकता का? (मत्तय २४:१४; २८:१९, २०) की इतरांच्या भौतिक गरजा, त्यांचे कल्याण या गोष्टीही विचारात घेऊन तुम्ही तुमची विचारसरणी विशाल करू शकता? अर्थात, आध्यात्मिकरित्या देणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे हे सर्वच ख्रिस्ती जाणतात. (योहान ६:२६, २७; प्रेषितांची कृत्ये १:८) पण तरी, आध्यात्मिकरित्या मदत करणे जसे महत्त्वाचे आहे तसेच भौतिकरित्या मदत करणेही महत्त्वाचे आहे.—याकोब २:१५, १६.

आपल्या स्वतःच्या मंडळीतील तसेच जगभरातील आपल्या आध्यात्मिक बांधवांच्या निकडीच्या गरजांचा विचार केल्यास त्यांची मदत करण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समजेल. आर्थिकरित्या सुस्थितीत असणाऱ्‍यांनी उदारपणे इतरांच्या गरजा पूर्ण केल्यास, समानतेने आपल्या सर्व बांधवांच्या गरजा भागू शकतात. यावर खुलासा करताना एक ख्रिस्ती वडील म्हणाले: “जगाच्या एका भागात आर्थिक साहाय्याची गरज निर्माण झाली, तर जगाच्या दुसऱ्‍या भागात राहणारे बांधव मदतीला धावून येतील. आणि समजा त्यांना शक्य नसेल तर आणखी दुसऱ्‍या कोणत्या भागातले बांधव मदत करायला पुढे येतील. अशाप्रकारे, जगभरातील आपल्या बांधवांच्या गरजा भागवल्या जातात. आपले जगव्याप्त बंधुत्व निश्‍चितच विलक्षण आहे.”—२ करिंथकर ८:१३-१५; १ पेत्र २:१७.

एका ख्रिस्ती बहिणीला उत्तर युरोपमध्ये होणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती; पण काही कारणास्तव ते शक्य नव्हते. तिच्या ऐकण्यात आले की तेथील बांधवांना बायबलची आत्यंतिक गरज होती; त्यामुळे अधिवेशनाला जाणाऱ्‍या एका व्यक्‍तीच्या हातून तिने बांधवांसाठी बायबल पाठवले. अशा प्रकारे, परदेशात राहणाऱ्‍या आपल्या बांधवांना मदत करण्याचा आनंद तिने अनुभवला.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

तुम्हीही आपले मन मोठे केल्यास, अखंड वाढणाऱ्‍या बायबल शिक्षणाच्या कार्याला कदाचित याहीपेक्षा मोठा हातभार लावता येईल शिवाय, तुम्हाला स्वतःला आणि इतरांना देखील आनंद मिळू शकतो.—उपदेशक १५:७; नीतिसूत्रे ११:२४; फिलिप्पैकर ४:१४-१९.

सल्ला देताना

एखाद्याला सल्ला देताना किंवा एखाद्याची चूक सुधारताना विचारशीलतेने आणि टोकाची भूमिका न घेता विचारविनिमय केल्यास, आपले आध्यात्मिक बांधव आपला आदर करतील शिवाय, आपण दिलेल्या सल्ल्याचा खरोखर फायदा होईल. अर्धवट माहितीवर विश्‍वास ठेवून तडकाफडकी, एककली निष्कर्ष काढणे अगदी सोपे असते. यावरून, आपण संकुचित मनोवृत्तीचे आहोत आणि येशूच्या दिवसांत लोकांवर असंख्य नियमांचा बोजा लादणाऱ्‍या कोत्या मनाच्या धार्मिक पुढाऱ्‍यांसारखे आहोत असे लोकांना आपल्याविषयी वाटण्याची शक्यता आहे. (मत्तय २३:२-४) पण तेच जर आपण टोकाची भूमिका टाळून पूर्णतः बायबलच्या तत्त्वांशी सुसंगत असलेला उत्तम सल्ला दिला, आणि अशाप्रकारे यहोवाची नीतिमान पण त्याचवेळी संतुलित आणि दयावान विचारसरणी आपल्याठायी असल्याचे दाखवले, तर आपला सल्ला स्वीकारण्यास आणि त्यानुसार वागण्यास इतरांना जड जाणार नाही.

काही वर्षांपूर्वी अनेक मंडळ्यांतील तरुण बांधव खेळण्यासाठी एकत्र आले होते. दुर्दैवाने, त्यांच्यात स्पर्धेची भावना निर्माण होऊन शेवटी ते हमरीतुमरीवर आले. मग स्थानिक वडिलांनी ही समस्या कशी सोडवली? तरुणांना मनोरंजनाची गरज आहे याची जाणीव ठेवून, यापुढे त्या तरुण बांधवांनी असे एकत्र येऊन खेळूच नये असा सल्ला वडिलांनी दिला नाही. (इफिसकर ५:१७; १ तीमथ्य ४:८) उलट, स्पर्धात्मक वृत्तीमुळे काय होऊ शकते याविषयी कडक शब्दांत पण तितक्याच समंजसपणे त्यांनी सूचना दिल्या. या शिवाय, पुन्हा असे घडू नये म्हणून काय करता येईल यासंबंधी काही गोष्टी त्यांनी सुचवल्या. उदाहरणार्थ, अशा प्रसंगी प्रौढ, जबाबदार व्यक्‍ती देखील असाव्यात असा सल्ला त्यांनी दिला. वडिलांनी दिलेला संयुक्‍तिक आणि संतुलित सल्ला या तरुणांना एकदम पसंत पडला आणि ते त्यानुसार वागले. शिवाय, वडिलांबद्दल त्यांना अधिक प्रेम आणि आदर वाटू लागला.

आपले मन मोठे करण्यास प्रयत्नशील असा

तुम्ही कोणाविषयी दुष्टबुद्धीने किंवा जाणूनबुजून कलुषितपणा बाळगत नसाल, तरीही आपले मन मोठे करण्यासाठी तुम्हाला निग्रही प्रयत्न करावे लागतील. तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करता तेव्हा यहोवाची विचारसरणी काय हे चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी, त्यावर मनन करा. (स्तोत्र १३९:१७) बायबलमधील अमुक विधान का केले आहे आणि त्यामागचे तत्त्व काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा; यहोवा करतो त्याप्रमाणेच कोणत्याही गोष्टीची पारख करण्याचा प्रयत्न करा. असे करणे दाविदाच्या प्रार्थनेच्या सुसंगतेत असेल: “हे परमेश्‍वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे.”—स्तोत्र २५:४, ५.

तुम्ही आपल्या मनाचे दरवाजे अधिक खुले करत जाल, तसतसे अनेक आशीर्वाद तुम्हाला लाभतील. त्यापैकी एक आशीर्वाद म्हणजे, तुम्ही समंजस आणि समजून घेणारे आहात असा नावलौकिक तुम्ही कमवाल. विविध परिस्थितींत साह्‍य करताना तुम्ही अधिक योग्य आणि समजुतदारपणे प्रतिसाद देऊ शकाल. आणि यामुळे ख्रिस्ती बंधुत्वाच्या विलक्षण एकोप्यास आणि सुसंगतेस हातभार मिळेल.

[१२ पानांवरील चित्र]

औदार्याने दिल्यास इतरांना साह्‍य होते, देणाऱ्‍याला आनंद मिळतो आणि आपला स्वर्गीय पिताही प्रसन्‍न होतो