व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्माता तुमचे जीवन अर्थपूर्ण बनवू शकतो

निर्माता तुमचे जीवन अर्थपूर्ण बनवू शकतो

निर्माता तुमचे जीवन अर्थपूर्ण बनवू शकतो

“ती परमेश्‍वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केलीआणि ती निर्माण झाली.”—स्तोत्र १४८:५.

१, २. (अ) आपण कोणत्या प्रश्‍नावर विचार करावा? (ब) यशयाच्या प्रश्‍नात निर्मितीचा समावेश कसा आहे?

 “तू जाणले नाही काय?” हा केवळ एक जिज्ञासा वाढवणारा, ‘काय जाणले नाही?’ असा प्रतिप्रश्‍न विचारायला भाग पाडणारा प्रश्‍न नाही. तर हा एक गंभीर प्रश्‍न आहे. आणि आपण संदर्भ पाहिला, अर्थात यशया या बायबल पुस्तकातील ४० वा अध्याय पाहिला तर या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला अधिक चांगल्यारीतीने समजेल. यशया या होऊन गेलेल्या एका प्राचीन इब्री व्यक्‍तीने हे लिहिले होते म्हणून हा प्रश्‍न तसा जुनाच आहे. तरीही, तो आधुनिक काळाला समर्पक असा आहे, तुमच्या जीवनाच्या मूळ अर्थाशी त्याचा संबंध आहे.

यशया ४०:२८ (NW) मधील हा प्रश्‍न इतक्या महत्त्वाचा असल्यामुळे त्याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे: “तू जाणले नाही काय? तू ऐकले नाही काय? यहोवा जो पृथ्वीच्या सीमांचा निर्माता आहे, तो सनातन देव आहे.” म्हणून, ‘जाणून घेण्यामध्ये’ पृथ्वीच्या निर्मात्याचा समावेश होता, तसेच संदर्भावरून दिसून येते की, केवळ पृथ्वीचाच समावेश नाही. दोन वचनांआधी यशयाने ताऱ्‍यांविषयी लिहिले: “आपले डोळे वर करून पाहा; ह्‍यांना कोणी उत्पन्‍न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; . . . तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.”

३. तुम्हाला निर्मात्याविषयी पुष्कळ काही ठाऊक असले, तरी अधिक जाणून घेण्याची गरज का आहे?

होय, “तू जाणले नाही काय?” हा प्रश्‍न खरे तर आपल्या विश्‍वाच्या निर्मात्याविषयी आहे. कदाचित व्यक्‍तिगतरित्या तुम्हाला ही खात्री असेल की, यहोवा देवच “पृथ्वीच्या सीमांचा निर्माता” आहे. कदाचित त्याच्या व्यक्‍तिमत्वाविषयी किंवा मार्गांविषयीही तुम्हाला पुष्कळ माहिती असेल. पण, समजा जर तुम्हाला कोणी अशी व्यक्‍ती भेटली जी निर्मात्याच्या अस्तित्वाविषयी शंका बाळगते आणि तो नेमका कसा आहे याची तिला स्पष्ट माहिती नाही, तर तुम्ही काय कराल? अशी व्यक्‍ती भेटणे ही आश्‍चर्याची गोष्ट नाही कारण असे कोट्यवधी लोक आहेत ज्यांना निर्मात्याविषयी काहीच ठाऊक नाही किंवा निर्माता आहे यावर ते विश्‍वास ठेवत नाहीत.—स्तोत्र १४:१; ५३:१.

४. (अ) सध्याच्या काळात निर्मात्याचा विचार करणे उचित का आहे? (ब) विज्ञान कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकत नाही?

विश्‍वाच्या आणि जीवनाच्या उगमाविषयीच्या प्रश्‍नांची उत्तरे विज्ञानाजवळ आहेत (किंवा प्राप्त होतील) असा विश्‍वास बाळगणाऱ्‍या अनेक नास्तिकांना शाळांनी निर्माण केले आहे. जीवनाचा उगम (मूळ फ्रेंचमधील शीर्षक: ऑ ओरिजिन द ले व्ही) या पुस्तकात, लेखक एझान आणि लने असे लिहितात: “एकवीसाव्या शतकाच्या सुरवातीला देखील जीवनाच्या उगमाविषयी वादविवाद होत आहे. ही समस्या इतकी क्लिष्ट आहे की त्यासाठी अगदी अंतराळाच्या अफाटपणापासून ते पदार्थाच्या अमर्याद सूक्ष्मपणापर्यंतच्या सर्व क्षेत्रांची तपासणी करण्याची आवश्‍यकता आहे.” तरीही, त्या पुस्तकाच्या “प्रश्‍न अद्याप अनुत्तरित” या शेवटल्या अध्यायात असे कबूल केले आहे: “जीवसृष्टी कशी अस्तित्वात आली असावी, या प्रश्‍नाची काही वैज्ञानिक उत्तरे आम्ही शोधून काढली आहेत. पण ती का अस्तित्वात आली? जीवनाला काही उद्देश आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे विज्ञानाजवळ नाहीत. ते फक्‍त ‘कसे’ चा शोध करते. पण, ‘कसे’ आणि ‘का’ हे दोन अगदीच वेगवेगळे प्रश्‍न आहेत. . . . ‘का’ या प्रश्‍नाच्या बाबतीत पाहिल्यास, याचे उत्तर तत्त्वज्ञानाने, धर्माने आणि—सर्वात महत्त्वाचे म्हणजे—आपल्यातील प्रत्येकाने शोधून काढले पाहिजे.”

उत्तरे आणि अर्थ शोधणे

५. निर्मात्याविषयी शिकून घेतल्यामुळे कोणत्या प्रकारच्या लोकांना त्याचा खास लाभ होईल?

होय, जीवसृष्टी का अस्तित्वात आहे—आणि विशेषतः आपण का अस्तित्वात आहोत हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. त्याशिवाय, ज्या लोकांचा अद्याप निर्मात्यावर विश्‍वास नाही आणि ज्यांना त्याच्या मार्गांविषयी अत्यंत थोडकी माहिती आहे अशा लोकांना भेटण्याची आपल्याला अधिक उत्सुकता असली पाहिजे. किंवा, अशांचा विचार करा जे देवावर विश्‍वास करतात परंतु देवाविषयीची त्यांची कल्पना बायबलमध्ये दिलेल्या माहितीपेक्षा अगदीच निराळी आहे. पौर्वात्य देशांमध्ये किंवा इतर काही ठिकाणी असे अब्जावधी लोक आहेत ज्यांचा एका व्यक्‍तिगत देवावर विश्‍वास नाही; ते देवाला प्रेमळ व्यक्‍तिमत्त्व असलेली एक वास्तविक व्यक्‍ती समजत नाहीत. त्यांच्याकरता, “देव” म्हणजे एक अदृश्‍य शक्‍ती किंवा अमूर्त कारण आहे. त्यांनी ‘निर्मात्याला किंवा त्याच्या मार्गांना जाणून घेतलेले’ नाही. जर या लोकांना किंवा अशाच विचारांच्या कोट्यवधी इतर लोकांना निर्मात्याच्या अस्तित्वाची खात्री पटली, तर त्यांना केवढे लाभ मिळतील—भवितव्यात सार्वकालिक आशीर्वादही लाभतील! त्यांना असेही काही प्राप्त होऊ शकते जे दुर्मिळ आहे—जीवनात खरा अर्थ, खरा उद्देश आणि मनःशांती.

६. आज पुष्कळांचे जीवन आणि पॉल गोगानचा अनुभव तसेच त्याचे एक चित्र यांच्यात सादृश्‍यता कशी आहे?

उदाहरण द्यायचे झाल्यास: १८९१ साली, पॉल गोगान हे फ्रेंच कलाकार, समाधानी जीवनाच्या शोधात फ्रेंच पॉलिनेशियाच्या अतिशय रमणीय ठिकाणी राहायला गेले. परंतु त्यांच्या गतकाळातील स्वैराचारी जीवनशैलीमुळे त्यांच्यावर तसेच इतरांवरही आजारपण ओढवले. मरण अगदी समीप असल्याची त्यांना चाहूल लागली तेव्हा त्यांनी एक मोठे चित्र काढले आणि त्यात त्यांनी ‘जीवनाला एका महान रहस्याच्या रूपात चित्रित केले.’ गोगान यांनी त्या चित्राला काय नाव दिले असावे? “आपण कोठून आलो? आपण कोण आहोत? आपण कोठे जात आहोत?” आणि हेच प्रश्‍न तुम्ही इतरांच्या तोंडून कदाचित ऐकले असतील. पुष्कळजण असे प्रश्‍न विचारतात. पण जेव्हा त्यांना कोठूनही समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत—जीवनात खरा अर्थ मिळत नाही—तेव्हा ते कोठे जाऊ शकतात? कदाचित ते अशा निष्कर्षाप्रत येऊन पोहंचतील की, त्यांच्या आणि प्राण्यांच्या जीवनात फारसा फरक नाही.—२ पेत्र २:१२. *

७, ८. विज्ञानाचे शोध पूर्ण का नाहीत?

म्हणून, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, फ्रीमन डायसन यांनी पुढीलप्रमाणे का लिहिले हे तुम्हाला समजेल: “आपण दुःख-संकटात का आहोत? हे जग इतके अन्यायी का आहे? दुःख, वेदना यांचा काय उद्देश आहे? हे ईयोबाने विचारलेले प्रश्‍न मी पुन्हा विचारतो तेव्हा माझी विचारसरणी देखील पुष्कळ मान्यवर व्यक्‍तींसारखीच आहे.” (ईयोब ३:२०, २१; १०:२, १८; २१:७) आधी सांगितल्याप्रमाणे, पुष्कळ लोक देवाकडून याची उत्तरे मिळवण्याऐवजी विज्ञानाकडे वळतात. जीववैज्ञानिक, महासागरवैज्ञानिक आणि इतरजण आपल्या विश्‍वाविषयी आणि त्यावरील जीवनाविषयी अधिकाधिक माहिती देत आहेत. वेगळ्या दिशेने शोध करणाऱ्‍या खगोलशास्त्रज्ञांनी आणि भौतिकशास्त्रज्ञांनी आपल्या सूर्यमालेविषयी, तारकांविषयी तसेच दूरदूरच्या आकाशगंगांविषयी देखील बरेच नवीन शोध लावले आहेत. (पडताळा उत्पत्ति ११:६.) अशा वस्तुस्थिती कोणत्या उचित निष्कर्षांकडे बोट दाखवू शकतात?

काही शास्त्रज्ञ देवाचे “मन” किंवा त्याचे “हस्ताक्षर विश्‍वामध्ये प्रतिबिंबित झाले आहे” असे म्हणतात. पण मुख्य मुद्दा त्यांच्या नजरेतून निसटत आहे का? विज्ञान पत्रिकेने असे निरीक्षण केले: “देवाचे ‘मन’ किंवा ‘हस्ताक्षर’ विश्‍वरचनेतून प्रतिबिंबित होते असे संशोधक म्हणतात तेव्हा ते खरे तर विश्‍वातल्या सर्वात कमी महत्त्वाच्या गोष्टीचे अर्थात विश्‍वाच्या शारीरिक रचनेचे श्रेय देवाला देत असतात.” नोबेल विजेता भौतिकशास्त्रज्ञ स्टीव्हन वाईनबर्ग यांनी लिहिले: “या विश्‍वाविषयी आपल्याला जितकी अधिक समज होत जाते तितकेच ते निरर्थक वाटू लागते.”

९. कोणता पुरावा आपल्याला तसेच इतरांना निर्मात्याविषयी शिकायला मदत करू शकतो?

तरीही, तुम्ही त्या लाखो लोकांपैकी एक असाल, ज्यांनी या विषयावर गंभीरपणे अभ्यास केला आहे आणि हे ओळखून घेतले आहे, की जीवनातील खरा अर्थ निर्मात्याला जाणून घेण्याशी संबंधित आहे. प्रेषित पौलाने काय लिहिले ते आठवा: “देवाबद्दल आम्हाला ठाऊक नाही असे लोक म्हणू शकत नाहीत. जगाच्या आरंभापासून देवाने निर्माण केलेल्या गोष्टींद्वारे तो कसा आहे हे लोकांसमोर उघड आहे. यावरून त्याची सनातन शक्‍ती प्रकट होते. त्यावरून तो देव आहे हे दिसून येते.” (रोमकर १:२०, होली बायबल, न्यू लाईफ व्हर्शन) होय, आपल्या जगाविषयी आणि आपल्याविषयी अशा काही वस्तुस्थिती आहेत ज्यांमुळे निर्मात्याला जाणून घेण्यास आणि त्याच्यासंबंधाने अर्थ शोधण्यास लोकांना मदत मिळू शकते. याचे तीन पैलू पाहा: आपल्या भोवतालचे विश्‍व, जीवनाचा उगम आणि आपल्या स्वतःच्या मानसिक क्षमता.

विश्‍वासाची कारणे

१०. “प्रारंभ” यावर आपण विचार का करावा? (उत्पत्ति १:१; स्तोत्र १११:१०, पं.र.भा.)

१० आपले विश्‍व अस्तित्वात कसे आले? अंतराळ दुर्बिणी आणि अवकाशयान यांच्या अहवालांवरून तुम्हाला हे ठाऊक असेल की, बहुतेक शास्त्रज्ञांना याची जाणीव आहे की या विश्‍वाला कोठेतरी एक प्रारंभ असून ते विस्तार पावत आहे. यावरून काय सूचित होते? खगोलशास्त्रज्ञ सर बर्नार्ड लॉवेल यांचे काय म्हणणे आहे ते ऐका: “भूतकाळात कोणत्यातरी क्षणी, जर हे विश्‍व कल्पनाही करता येणार नाही इतक्या लहान आकाराच्या आणि अतिशय प्रचंड घनतेच्या बिंदूसारखे होते, तर पुढचा प्रश्‍न असा येतो की त्याआधी काय होते? प्रारंभ नेमका कोठे झाला या कठीण प्रश्‍नाला आपण टाळू शकत नाही.”

११. (अ) विश्‍व किती प्रचंड आहे? (ब) विश्‍वातील अचूकता काय सुचवते?

११ या विश्‍वाच्या शिवाय आपल्या पृथ्वीच्या रचनेत विलक्षण ताळमेळ दिसून येतो. उदाहरणार्थ, आपल्या सूर्याची आणि इतर ताऱ्‍यांची दोन उल्लेखनीय वैशिष्ट्ये म्हणजे दीर्घकालीन कार्यक्षमता आणि स्थैर्य. सध्याच्या अंदाजांनुसार, दृश्‍य विश्‍वात एकूण ५० अब्ज (५०,००,००,००,०००) ते १२५ अब्ज (१,२५,००,००,००,०००) आकाशगंगा आहेत. आणि आपल्या आकाशगंगेत अब्जावधी तारका आहेत. आता जरा विचार करा: मोटारगाडीच्या इंजिनला अचूक प्रमाणात इंधन आणि हवा लागते हे आपल्याला ठाऊक आहे. तुमच्याकडे मोटार असली, तर मोटार छान सुरळीत चालण्यासाठी आणि जास्त कार्यक्षम असण्यासाठी तुम्ही मेकॅनिककडून तिचे इंजिन ट्यून करून घ्याल. जर साध्याशा इंजिनसाठी इतकी अचूकता महत्त्वाची आहे तर मग प्रचंड कार्यक्षमतेने कार्य करणाऱ्‍या आपल्या “धगधगत्या” सूर्याबद्दल काय? स्पष्टतः, पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून राहण्यासाठी त्यातील मुख्य शक्‍तींत कमालीचा ताळमेळ दिसून येतो. हे आपोआप घडले का? प्राचीन काळातल्या ईयोबाला असा प्रश्‍न विचारण्यात आला: “आकाशमंडळाचे नियम तू दिलेस काय? पृथ्वीवर निसर्गाचे नियम तू ठरवलेस काय?” (ईयोब ३८:३३, द न्यू इंग्लीश बायबल) कोणाही मानवाने हे केलेले नाही. मग, हा ताळमेळ कसा साधला गेला?—स्तोत्र १९:१.

१२. निर्मितीमागे एक शक्‍तिशाली बुद्धी आहे हा विचार करणे अयोग्य का नाही?

१२ मानवी नेत्रांनी पाहता येणार नाही अशा कोणा वस्तूने किंवा कोणा व्यक्‍तीने हा ताळमेळ साधला असावा का? आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने या प्रश्‍नाचा विचार करा. बहुतेक खगोलशास्त्रज्ञ आता हे मान्य करतात की आकाशात अत्यंत शक्‍तिशाली खज्योती आहेत, ज्यांना कृष्णविवरे म्हणतात. ही कृष्णविवरे दिसत नाहीत तरीही ती अस्तित्वात आहेत याची खात्री तज्ज्ञांना आहे. त्याचप्रकारे, बायबलही असे सांगते की दुसऱ्‍या एका क्षेत्रात असे शक्‍तिशाली प्राणी आहेत जे अदृश्‍य आहेत—हे आत्मिक प्राणी आहेत. जर असे शक्‍तिशाली, अदृश्‍य प्राणी अस्तित्वात आहेत तर मग सबंध विश्‍वातून प्रकट होणारा ताळमेळ कोणा शक्‍तिशाली बुद्धिवंताने अस्तित्वात आणला असा विचार करणे योग्य ठरणार नाही का?—नहेम्या ९:६.

१३, १४. (अ) जीवनाच्या उगमाविषयी विज्ञानाने प्रत्यक्षात काय सिद्ध केले आहे? (ब) पृथ्वीवर जीवसृष्टीचे अस्तित्व काय दाखवून देते?

१३ निर्मात्याचा स्वीकार करण्यासाठी लोकांना मदत करणारा दुसरा एक पुरावा आहे जीवनाच्या उगमाविषयी. लुई पाश्‍चर यांनी केलेल्या प्रयोगांनंतर हे एक स्वीकृत मत बनले आहे, की कोणत्याही प्रकारचा जीव आकस्मिक उत्पत्तीने शून्यातून अस्तित्वात येऊ शकत नाही. मग, पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरवात कशी झाली? १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांनी हे सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न केला की, आरंभीच्या वातावरणाला सतत वीजेचे तडाखे बसल्यामुळे एखाद्या प्रारंभिक सागरात त्याचा हळूहळू विकास झाला असावा. तथापि, अगदी अलीकडील पुराव्यानुसार, अशाप्रकारे पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उगम होणे असंभाव्य आहे कारण तशा प्रकारचे वातावरण कधी अस्तित्वातच नव्हते. परिणामी, काही शास्त्रज्ञ या समस्येवरती आणखी अचूक स्पष्टीकरण शोधत आहेत. पण, त्यांचेही एका महत्त्वाच्या मुद्द्‌याकडे दुर्लक्ष होत आहे का?

१४ दशकानुदशके विश्‍वाचा आणि त्यामधील जीवसृष्टीचा अभ्यास केल्यावर, ब्रिटिश शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांनी असे विवेचन मांडले: “जीवन हे निसर्गाच्या अदृश्‍य शक्‍तींद्वारे अस्तित्वात आले असावे ही अत्यल्प संभावना मान्य करण्याऐवजी जीवनाचा उगम म्हणजे एक हेतूपुरस्सर बुद्धिमान कृत्य होते असे धरून चालणे जास्त योग्य वाटते.” होय, जीवनाच्या अद्‌भुत गोष्टींविषयी जितके अधिक शिकून घ्यावे तितकेच जीवन कोणा एका बुद्धिमान उगमाद्वारे अस्तित्वात आले असावे हे स्पष्टीकरण अधिकाधिक तर्कशुद्ध वाटू लागते.—ईयोब ३३:४; स्तोत्र ८:३, ४; ३६:९; प्रेषितांची कृत्ये १७:२८.

१५. तुम्ही अद्वितीय आहात असे का म्हणता येऊ शकते?

१५ यास्तव, पहिली कारणमीमांसा आहे विश्‍व आणि दुसरी आहे पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उगम. आता तिसरी कारणमीमांसा पाहा—आपला अद्वितीयपणा. पुष्कळ बाबतीत सर्व मानव अद्वितीय आहेत; याचाच अर्थ तुम्ही देखील अद्वितीय आहात. ते कसे? तुम्ही कदाचित हे ऐकलेच असेल की, मेंदूची तुलना एका शक्‍तिशाली संगणकाशी केली आहे. परंतु, खरे पाहता अलीकडील संशोधनांनुसार ही तुलना योग्य नाही. मॅसाच्यूसेट्‌सच्या तंत्रज्ञान संस्थेचे एक वैज्ञानिक म्हणाले: “पाहणे, बोलणे, हालचाल करणे किंवा व्यवहारज्ञानाचा वापर करणे या क्षमतांचा विचार केल्यास आजचे संगणक, चार वर्षांच्या मुलाची देखील बरोबरी करू शकत नाहीत. . . . असा अंदाज केला आहे की, सर्वात शक्‍तिशाली वेगवान संगणकाची माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता देखील एका गोगलगाईच्या चेतासंस्थेइतकीशीच आहे—[तुमच्या] डोक्यात असलेल्या सुपर कम्प्युटरमध्ये सामावलेल्या एकंदर शक्‍तीचा हा केवळ अल्पांश आहे.”

१६. भाषा बोलण्याची तुमची क्षमता काय दाखवून देते?

१६ भाषा ही तुमच्या मेंदूमुळे तुम्हाला मिळालेली एक क्षमता आहे. काही लोक दोन, तीन किंवा त्याहून अधिक भाषा बोलतात; पण, फक्‍त एक भाषा बोलण्याच्या क्षमतेमुळेही आपण अद्वितीय बनतो. (यशया ३६:११; प्रेषितांची कृत्ये २१:३७-४०) प्राध्यापक आर. एस. आणि डी. एच. फाऊट्‌स यांनी असा प्रश्‍न विचारला: “केवळ मनुष्यच . . . भाषेद्वारे संपर्क साधू शकतो का? . . . , सर्व उच्चतर प्राणी . . . हावभाव, गंध, आवाज, ओरडणे आणि गाणी तसेच मधमाश्‍यांचा नाच यांद्वारे संपर्क साधतात. तरीही, मानवांव्यतिरिक्‍त इतर कोणत्याही प्राण्यांत व्याकरणशुद्ध वाक्यरचना असल्याचे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की, प्राणी प्रतिकृतीचे चित्र काढत नाहीत. जास्तीत जास्त ते फक्‍त रेघोट्या मारू शकतात.” खरेच, फक्‍त मानव आपल्या मेंदूचा उपयोग करून एखादी भाषा बोलू शकतात आणि अर्थपूर्ण चित्र काढू शकतात.—पडताळा यशया ८:१; ३०:८; लूक १:३.

१७. प्राण्यांचे आरशात पाहणे आणि मानवाचे आरशात पाहणे यात एक मूलभूत फरक कोणता आहे?

१७ शिवाय, तुम्हाला स्वतःची ओळख आहे; स्वतःबद्दलची एक जाणीव आहे. (नीतिसूत्रे १४:१०) एखादा पक्षी, कुत्रे किंवा मांजर आरशात पाहून टोच मारताना, गुरगुरताना किंवा हल्ला करताना तुम्ही कधी पाहिले आहे का? आपण दुसऱ्‍या प्राण्याला पाहत आहोत असे या प्राण्यांना वाटते; ते स्वतःला ओळखू शकत नाहीत. याच्या उलट, तुम्ही जेव्हा आरशात पाहता तेव्हा आरशात दिसणारी व्यक्‍ती तुम्हीच आहात हे तुम्हाला ठाऊक असते. (याकोब १:२३, २४) तुम्ही स्वतःला न्याहाळता किंवा आणखी काही वर्षांनी मी कसा दिसेन याची कल्पना करता. प्राणी असे करत नाहीत. होय, तुमच्या मेंदुमुळे तुम्ही अद्वितीय ठरता. याचे श्रेय कोणाला जाते? हा मेंदू तुम्हाला देवाकडून नव्हे तर कोठून मिळाला?

१८. कोणत्या बौद्धिक क्षमतांमुळे तुम्ही प्राण्यांपासून भिन्‍न आहात?

१८ तुमच्या मेंदूमुळेच तुम्ही कला आणि संगीत यांचाही आस्वाद घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्हाला नैतिकतेचीही जाणीव आहे. (निर्गम १५:२०; शास्ते ११:३४; १ राजे ६:१, २९-३५; मत्तय ११:१६, १७) या क्षमता तुमच्यातच का, प्राण्यांत का नाहीत? ते आपल्या मेंदूचा उपयोग खासकरून आपल्या तात्कालिक गरजा—अन्‍न मिळवणे, साथीदार शोधणे किंवा घरटे बनवणे—या भागवण्यासाठीच करतात. फक्‍त मानव सध्याच्या स्थितीपलीकडे पाहतो. काहीजण असाही विचार करतात की, त्यांच्या कृतीमुळे पर्यावरणावर कसा परिणाम होईल किंवा त्यांच्या भावी पिढ्यांवर त्याचा कसा परिणाम होईल. का बरे? उपदेशक ३:११ येथे मानवांविषयी असे म्हटले आहे: “[निर्मात्याने] मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे.” होय, अनंतकालाचा अर्थ जाणून घेण्याची किंवा अंतहीन जीवनाची कल्पना करण्याची तुमची क्षमता ही एक खास क्षमता आहे.

निर्मात्याला तुमचे जीवन अर्थपूर्ण बनवू द्या

१९. निर्मात्याविषयी इतरांना विचार करायला मदत करण्यासाठी तुम्ही तीन भागांची कोणती कारणमीमांसा वापरू शकता?

१९ आपण फक्‍त तीन क्षेत्रांचा विचार केला आहे: प्रचंड विश्‍वात दिसून येणारा ताळमेळ, पृथ्वीवर जीवसृष्टीचा उगम आणि विविध क्षमतांनी युक्‍त असलेल्या मानवी मेंदूचा नाकारता न येणारा अद्वितीयपणा. या तिन्ही गोष्टी काय दर्शवतात? येथे एक कारणमीमांसा दिली आहे जिचा उपयोग तुम्ही इतरांना एका निष्कर्षाप्रत पोहंचायला मदत करण्यासाठी वापरू शकता. तुम्ही प्रथम विचारू शकता: विश्‍वाला कोठेतरी प्रारंभ होता का? बहुतेकजण हे मान्य करतील की विश्‍वाला प्रारंभ होता. मग असे विचारा: तो प्रारंभ आपोआप घडला, की तो घडवून आणण्यात आला? बहुतेक लोकांना असे वाटते की, विश्‍वाचा प्रारंभ घडवून आणण्यात आला होता. तसे आहे तर मग हा शेवटचा प्रश्‍न उपस्थित होतो: मग तो प्रारंभ कोणा सनातन वस्तूने घडवून आणला होता की कोणा सनातन व्यक्‍तीने? हे विषय अशा स्पष्ट आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्यात आल्यामुळे अनेकजण या निष्कर्षाप्रत पोहंचू शकतात की, एक निर्माता असलाच पाहिजे! त्याअर्थी, जीवनात अर्थ असला पाहिजे, नाही का?

२०, २१. जीवनाचा अर्थ मिळवण्यासाठी निर्मात्याला जाणून घेणे महत्त्वाचे का आहे?

२० आपले सबंध अस्तित्व त्याचप्रमाणे नैतिकतेची आपली बुद्धी आणि खुद्द नैतिकता यांचा संबंध निर्मात्याशी असायला हवा. डॉ. रॉलो मे यांनी एकदा असे लिहिले: “नैतिकतेची एकमेव योग्य संरचना जीवनाच्या मूलभूत अर्थावर आधारलेली आहे.” तो अर्थ कोठे मिळू शकतो? त्यांनी पुढे असे म्हटले: “हा मूलाधार म्हणजे देवाचा स्वभाव. देवाची तत्त्वे हीच सृष्टीच्या सुरवातीपासून ते अंतापर्यंत जीवनाला आधारभूत आहेत.”

२१ म्हणून स्तोत्रकर्त्याने जेव्हा निर्मात्याजवळ, “हे परमेश्‍वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस,” अशी विनवणी केली तेव्हा तो नम्रता आणि बुद्धी का प्रदर्शित करत होता हे आपल्याला आता नीट समजू शकते. (स्तोत्र २५:४, ५) निर्मात्याला नीट ओळखून घेतल्याने स्तोत्रकर्त्याच्या जीवनाला निश्‍चितच अधिक अर्थ, उद्देश आणि दिशा लाभणार होती. हेच आपल्या प्रत्येकाच्या बाबतीतही घडू शकते.—निर्गम ३३:१३.

२२. निर्मात्याचे मार्ग जाणून घेण्यात काय सामील आहे?

२२ ‘निर्मात्याचे मार्ग’ जाणून घेणे म्हणजे, तो कसा आहे, त्याचे व्यक्‍तिमत्त्व आणि त्याचे मार्ग अधिक चांगल्यारीतीने जाणून घेणे होय. पण, निर्माता हा अदृश्‍य आणि विलक्षण शक्‍तिमान असल्याकारणाने आपण त्याला अधिक चांगल्यारीतीने कसे जाणून घेऊ शकतो? पुढील लेख यावर चर्चा करील.

[तळटीपा]

^ नात्सी छळ छावण्यांमधील अनुभवांवरून डॉ. व्हिक्टर इ. फ्रॉन्कल यांना अशी जाणीव झाली: “जीवनामध्ये अर्थ शोधणे ही मानवामधील एक प्रमुख प्रेरणा आहे, ती [प्राण्यांमध्ये असते तशा] उपजत बुद्धीमुळे निर्माण होणारी ‘कमी महत्त्वाची’ इच्छा नाही.” दुसऱ्‍या महायुद्धानंतर काही दशकांनी फ्रान्समध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणात “असे दिसून आले की, आपले मत व्यक्‍त केलेल्या ८९ टक्के लोकांनी हे कबूल केले की, मानवाला जिवंत राहण्याची प्रेरणा देणारे ‘काहीतरी’ असणे आवश्‍यक असते.”

तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?

◻ आपल्या विश्‍वाबद्दल फक्‍त वैज्ञानिक माहिती न मिळवता त्यापलीकडे जाण्याची का गरज आहे?

◻ इतरांना निर्मात्याविषयी विचार करायला मदत करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधू शकता?

◻ समाधानकारक आणि अर्थपूर्ण जीवन जगायचे असेल, तर निर्मात्याला जाणून घेणे अनिवार्य का आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[Diagram/Picture on page 18]

(For fully formatted text, see publication)

तुमचा निष्कर्ष काय आहे?

आपले विश्‍व

↓ ↓

याला प्रारंभ याला प्रारंभ

नव्हता होता

↓ ↓

आपोआप घडवण्यात

घडले आले

↓ ↓

कोणा सनातन गोष्टीद्वारे कोणा सनातन व्यक्‍तीद्वारे

[१५ पानांवरील चित्र]

विश्‍वामध्ये प्रकट झालेली प्रचंडता आणि अचूकता यांमुळे अनेकजण निर्मात्याविषयी विचार करण्यास प्रवृत्त झाले आहेत

[Credit Line]

पृष्ठे १५ आणि १८: Jeff Hester (Arizona State University) and NASA